विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 February 2023

चक्रधर स्वामीं

 


चक्रधर स्वामींनी महाराष्ट्राची व्याप्ती गोंदिया ते गोवा एवढी मानलेली होती. जेथे जेथे मराठी बोलली जाते तो सर्व महाराष्ट्र प्रदेश अशी त्यांची महाराष्ट्राची सोपी व्याख्या होती. महाराष्ट्राची महती सांगूनच स्वामी थांबले नाहीत तर मराठी भाषेलाही त्यांनी देववाणीचा सन्मान बहाल केला. आपली धर्मतत्त्वे त्यांनी मराठीतूनच सांगितली होती. त्यांच्या शिष्यांनीही धर्माच्या तत्त्वांची चर्चा मराठीतूनच करावी असा त्यांचा दंडक होता. सर्व सामान्य जनांना गीतेतील ब्रह्मविद्या सांगून त्यांनी मराठी भाषेला धर्मसिंहासनी विराजित केले. त्यामुळेच उत्तरकाळात पं. केसीराजासारख्या संस्कृत तज्ज्ञास स्वामींचा सूत्रपाठ संस्कृतातून तयार करण्यास प्रथम आचार्य श्रीनागदेव यांनी मनाई केली होती. नागदेवाचार्य म्हणाले होते, “ ना. गा. केशवदेया ! एणे माझीया स्वामींचा सामान्य परिवारू नागवेल कीं गा ” याचा अर्थ स्वामींचा सामान्य परिवार हा संस्कृत न जाणणारा होता. त्यासाठीच सामान्य जनांच्या बोलभाषेतूनच तत्त्वज्ञान सांगावे असा कटाक्ष पाळणारा एक धर्मपंथ श्री चक्रधरांनी महाराष्ट्रात स्थापन केला होता.
श्रीचक्रधर स्वामी यांचे महाराष्ट्र आणि मराठी भाषेवरचे प्रेम अप्रतिम आहे. यातूनच गेल्या सातशे वर्षात मराठी भाषेत, विविधांगी साहित्यनिर्मिती होऊ शकली. या साहित्यात विपुल काव्य प्रकार आहेत. तसेच नानाविध गद्य वाङ्मयाचे नमुने आहेत. व्याकरण आणि छंदशास्त्रावरचे ग्रंथ आहेत. तसेच असंख्य शब्दकोशही आहेत. तत्त्वज्ञानाला आवश्यक अशी पारिभाषिक शब्दावली मराठीत निर्माण करण्याचे श्रेयही महानुभावीय साहित्यिकांना द्यावे लागते. वाक्य-मीमांसा मराठीत निर्माण करण्याचे अजोड कर्तृत्वही महानुभावांकडेच जाते. अशी बरीचशी नवी आणि विपुल साहित्यसंस्कृती निर्माण करणाऱ्या महानुभाव साहित्यिकांचे प्रेरणास्थान श्रीचक्रधर स्वामी होते...
मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
(सर्वज्ञ श्रीचक्रधर, लेखक- प्रा. पुरुषोत्तम नागपुरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...