१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १२
संजय सोनावणे
मराठी घोडदळ जेव्हा रोहिला सैन्यावर चालून गेले त्यावेळी गारद्यांनी आपला
तोफखाना बंद केला. गारद्यांच्या बंदुकधारी पलटणी, रोहिल्यांवर गोळीबार
करण्यासाठी बाहेर कधी पडल्या असाव्यात ? मराठी सरदार रोहिल्यांचा पराभव
करून त्यांना पळवून लावतील अथवा माघार घेऊन परत येतील या दोन्ही शक्यतांचा
विचार करून इब्राहिमने आपले बंदुकधारी पायदळ गोलाच्या बाहेर आणले. हीच
शक्यता अधिक ग्राह्य अशी वाटते. कारण, गारदी पलटणी जर अशा गोलाच्या बाहेर
आधीच येऊन तयारीने उभ्या राहिल्या नसत्या तर मराठी स्वारांचा पाठलाग करत
आलेले रोहिले थेट गोलात शिरले असते व त्या ठिकाणी रोहिल्यांचा सामना करणे
गारद्यांना अवघड असे गेले असते. त्यावेळी बंदुकधारी पलटणींची गोळीबाराची
पद्धत कशी असावी ? एक पलटण खाली गुडघ्यावर बसलेली असे तर दुसरी तिच्या मागे
उभी असे. एका पलटणीने गोळीबार केला कि, लगेच दुसरी पलटण बंदुकीच्या फैरी
झाडत असे. तोवर पहिल्या तुकडीने आपल्या बंदुका ठासून भरलेल्या असत. अशा
प्रकारे शत्रूवर गोळ्यांचा अविरत वर्षाव करता येई. या ठिकाणी आणखी एका
मुद्द्याचा विचार करणे गरजेचे आहे व तो म्हणजे तत्कालीन बंदुकांना संगिनी /
Bayonet लावण्याची पद्धत होती का ? याविषयी निश्चित अशी माहिती मिळत नाही.
बंदुकींना संगीन जोडण्यास नेमका आरंभ कधी झाला असावा ? हिंदुस्थानात या
प्रकारच्या बंदुका कधी वापरात आल्या असाव्यात याची नेमकी व विश्वसनीय
माहिती मिळत नसल्याने पानिपत प्रसंगी गारदी सैन्याकडे अशा प्रकारच्या
बंदुका होत्या कि नव्हत्या याविषयी काहीही लिहिणे चुकीचे ठरेल.
No comments:
Post a Comment