विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग २५

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग २५
स. १७३७ च्या पावसाळ्यात पेशवेबंधू व निजामाने भावी संग्रामाची भरपूर सिद्धता केली. या लढाईत निजामाला दोन ठिकाणाहून मदत मिळणार होती. एक, दक्षिणेतील त्याचा मुलगा नासीरजंग व दुसरा दिल्ली दरबार ! निजामाची रणनीती स्पष्ट होती. बाजीरावास माळव्यात येऊ न देता त्याला नर्मदेच्या पलीकडेचं गाठून बुडवायचे. नासीरजंगाने आणि वऱ्हाड, खानदेशातील सरदारांनी कोणत्याही परिस्थितीत बाजीरावास नर्मदापार करून द्यायची नाही. निजामाचे हे डावपेच हेरून बाजीरावाने आपले बेत पुढीलप्रमाणे आखले :- नासीरजांगास दक्षिणेतचं अडवायचे, त्याला नर्मदापार करून द्यायची नाही हि जबाबदारी बाजीरावाने चिमाजीआपावर सोपवली. निजामाचे काही सरदार वऱ्हाड, खानदेशाकडे होते. त्यांना अडवण्याचे काम शाहूच्या आज्ञेने रघुजी भोसल्याने अंगावर घेतले. निजामावर चालून जाण्याचे मुख्य कार्य बाजीरावाने स्वतःच्या अंगावर घेतले.
स. १७३७ च्या ऑक्टोबरमध्ये निजाम दिल्लीकडून माळव्याकडे सरकला तर पुढच्याच महिन्यात बाजीराव नर्मदेवर दाखल झाला. उभयतांचे सैन्यबळ समसमान म्हणजे प्रत्येकी ऐंशी हजार असल्याचे इतिहासकार नमूद करतात. निजामाच्या फौजेत अनेक मोगल सरदारांचा तसेच राजपूत, जाट, बुंदेले संस्थानिकांचा भरणा असून त्यातील बव्हंशी उमराव निव्वळ जुलमाचा रामराम म्हणून मोहिमेत दाखल झाले होते.
इकडे नासीरजंग पंधरा - वीस हजार फौज जमवून उत्तरेस जाणार तर चिमाजीआपा तापीजवळ वरणगाव येथे तळ ठोकून राहिल्याने त्याचा मार्ग खुंटला. अनपेक्षितरित्या बाजीराव नर्मदापार होऊन पुढे चालून आल्याने निजाम गडबडला. पूर्वानुभव लक्षात घेऊन त्याने आपले जड सामान रायसीनच्या किल्ल्यात ठेऊन निवडक तोफांच्या सहाय्याने बाजीरावाशी गाठ घालण्याचा निर्णय घेतला. परंतु, निजामासोबत खुल्या मैदानात झुंज घेण्याची बाजीरावाची कुठे इच्छा होती ? त्याने नेहमीप्रमाणे निजामाच्या चौगीर्द आपली धावती पथके पेरून त्याची रसद तोडण्यास आरंभ केला. पालखेडची चूक टाळण्यासाठी निजाम भोपाळच्या तटबंदीच्या आश्रयास धावला आणि त्याने नवीन चूक केली. भोपाळ संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत असल्याने व आत पाण्याचा तलाव तुडूंब भरलेला असल्यामुळे निजामाने भोपाळला आपली छावणी ठोकून व सभोवती तोफा पेरून बाजीराव अंगावर चालून येण्याची वाट बघू लागला. परंतु, निजामाच्या तोफांच्या तडाख्यात जाण्यास बाजीराव मुळीच उत्सुक नव्हता. भोपाळवर हल्ला करणे जरी त्यास शक्य नसले तरी भोपाळची रसद तोडणे त्यास सोपे व सहजशक्य होते आणि त्याने तेच केले. त्याशिवाय दिवसा व रात्री - अपरात्री मराठी सैन्यातून बाणांच्या टोकांना चिंध्या बांधून व त्या पेटवून त्यांचा मारा निजामाच्या छावणीवर केला जात होता तो वेगळाचं ! त्यामुळे निजामच्या सोबत असलेले राजपूत, जाट, बुंदेले वैतागून बेदील झाले. बचावाच्या दृष्टीने भोपाळ हे एक आदर्श ठिकाण असले तरी निजामाने आपल्या छावणीसाठी ते स्थळ आगाऊ निश्चित केलं नसल्यामुळे एवढ्या मोठ्या फौजेला पुरून उरेल इतकी अन्नसामुग्री तिथे नव्हती. त्याशिवाय मराठी फौजांनी रसद तोडल्याने बाहेरून येणारी मदतही खुंटली होती. परिणामी काही दिवसांतचं छावणीतील जनावरे मारून खाण्याचा प्रसंग ओढवला. कोंडी फोडण्याचे निजामाने अनेक प्रयत्न केले. आक्रमणे केली. परंतु, निर्णायक लढाईस बाजीराव उत्सुक नसल्याने युद्धप्रसंग लांबणीवर पडत गेला आणि निजामसुद्धा जिवावर उदार झालेला नसल्याने मारू किंवा मरू या निश्चयाने तो देखील युद्धास तयार झाला नाही. अखेर सर्व उपाय थकलेले पाहून निजामाने भोपाळचा तळ उठवून लष्करी गोलाच्या सहाय्याने उत्तरेची दिशा धरली. तरीही मराठी फौजांच्या धावत्या वेढ्याने त्याची नाकेबंदी कायम राहून त्याने तहाची वाटाघाट आरंभली. ता. ७ जानेवारी १७३८ रोजी दुराईसराई तह होऊन निजामाची कोंडी सुटली. भोपाळच्या संग्रामात चमकदार डावपेच आखण्यात आले तरी निर्णायक असे युद्धप्रसंग घडून आले नाहीत. मराठी घोडदळासमोर आपला उपाय चालत नाही याची निजामाला जाणीव होती तर निजामाच्या तोफखान्यास आपल्याकडे उत्तर नाही हे बाजीराव ओळखून असल्याने उभयतांनी निकराची लढाई टाळली असेच म्हणावे लागते. दुराईसराईच्या तहाने बाजीरावाच्या हाती फारसे काही लागले नाही. हे त्या तहातील मुख्य अटींवरून सिद्ध होते. (१) माळवा प्रांत देणे (२) नर्मदा व चंबळ यांमधील मुलुख देणे (३) या दोन्ही प्रांतांच्या बाबत बादशाही सनद मिळवून देणे (४) ५० लक्ष रुपये खर्चासाठी मोगल बादशहाकडून मिळवून देणे. या चार अटींचे पालन निजामाने केल्याचा पुरावा कोणी देईल का ?

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...