‘वाकाटक’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक इतिहासात क्रांती घडवणारे प्राचीन राजघराणे. या राजघराण्याच्या दोन शाखा. एक ‘नंदिवर्धन‘ (नगरधन, नागपूर) आणि दुसरी शाखा ‘वत्सगुल्म‘ (वाशीम). पूर्व विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या भागावर याच नंदिवर्धन शाखेने राज्य केले. ही शाखा तशी फार प्रबळ. सुस्थितीत उभे असणारे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर बांधणारे हे घराणे.
या शाखेच्या ‘रुद्रसेन’ नावाच्या राजाबरोबर ‘प्रभावतीगुप्ता‘ चे लग्न झाले. भारताला सुवर्णयुग दाखवणारे राजघराणे म्हणजे गुप्त. प्रभावती याच घराण्यातील पराक्रमी राजा समुद्रगुप्त याची नात (चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी). वाकाटक राजवंश हा शैवधर्माचे आचरण करणारा तर गुप्त घराणे वैष्णव. परंतू, वाकाटकांच्या राजघराण्यात प्रवेश करूनही प्रभावतीगुप्तने अखेरपर्यंत वैष्णवधर्माचे पालन केले. तिला तीचे धार्मिक स्वातंत्र्य वाकाटक राजवंशाने देऊ केले होते. इसवी सन ‘चौथ्या’ शतकाच्या अखेरची ही घटना, पण ‘आधुनिक’ काळापेक्षाही प्रगत विचारसरणीचे लक्षण यातून दिसून येते.
प्रभावतीचा राज्यकारभार
पुढे काही काळाने तिचा नवरा ‘रुद्रसेन’ मरण पावला. तेव्हा प्रभावतीने सारा राज्यकारभार एकहाती चालवला, तोही तब्बल दहा वर्षे! हा राज्यकारभार करण्यासाठी तीने मातीचा शिक्का करून घेतला होता, ज्यावर “श्री प्रभावतीगुप्तयाः” अशी ब्राम्ही लिपीमधील अक्षरे कोरलेली आढळतात. पतीच्या निधनानंतर राजकारभार पाहण्याची ही परंपरा फार प्राचीन आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन सम्राज्ञी ‘नागणिका‘ ने पतीच्या निधनानंतर कशाप्रकारे राज्य चालवले, याचा संपूर्ण इतिहासच नाणेघाटाच्या गुहेत कोरलेल्या शिलालेखांमधून वाचायला मिळतो. या नागणिकानंतर महाराष्ट्रात प्रभावशाली महिला शासक म्हणून ‘प्रभावतीगुप्त’ ठळकपणे आपल्या नजरेस भरते.
रामटेक आणि मनसर या दोन ठिकाणी वाकाटकांच्या धार्मिक विविधतेची झलक आपल्याला पाहावयास मिळते. रामटेक येथे असणारे केवल नृसिंह मंदिर, रुद्र नृसिंह मंदिर, वराह मंदिर, त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील आद्य-वैष्णवांचे ठळक उदाहरण म्हणून पाहीले जातात. केवल नृसिंह मंदिराचा इतिहास समोर येण्यामागेही एक रंजक गोष्ट दडलेली आहे. १९८२-८३ मध्ये डॉ. अरविंद जामखेडकर आणि त्यांची टीम रामटेक येथे असणाऱ्या मंदिरांची साफसफाई करण्यासाठी पोहोचले. नागपूरकर भोसले यांच्या काळात बऱ्याच मंदिरांना जिर्णोध्दाराची किनार लाभली होती. ‘मारुती मंदिराच्या’ भिंतीवरील चुन्याचा लेप काढत असताना गर्भगृहात दोन आणि मंडपात एक, असे ३ शिलालेख उजेडात आले.
गर्भगृहात असणाऱ्या मारुतीच्या मूर्तीवरील शेंदूर काढला, तर त्याच्या आतमध्ये आसनस्थ नृसिंहाची मूर्ती प्रकट झाली. (वरच्या फोटोमध्ये देण्यात आलेली मूर्ती) सिंहासनावर बसलेली अशी मूर्ती याआधी पाहण्यात आली नव्हती. जवळ जवळ सहा फूट उंचीच्या नृसिंहाने सर्वांना आश्चर्यचकित केले. मंडपात असलेल्या शिलालेखाचे वाचन झाल्यानंतर हे मंदिर प्रभावतीगुप्तने बांधल्याचे समजले. हा शोध अत्यंत महत्वाचा होता. चौथ्या-पाचव्या शतकात बांधलेले हे मंदिर, गर्भगृहात असणारी प्रतिमा हे सर्वकाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-धार्मिक इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. बाजूलाच असणारे मंदिर ‘रुद्र नृसिंह’, आपल्या पतीच्या स्मरणार्थ प्रभावतीने हे मंदिर बांधले होते.
महाराष्ट्रात ‘नृसिंह ‘ पूजेची सुरुवात करणारी व्यक्ती म्हणून प्रभावतीगुप्त अजरामर झाली. पूर्व महाराष्ट्रात वैष्णव पंथाचा प्रचार-प्रसार होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे प्रभावतीगुप्त. याचे धडधडीत उदाहरण म्हणजे रामटेक इथे बांधलेली मंदिरे तसेच तिच्या शिक्क्यावर असणारा शंख.. जो विष्णूच्या आयुधांपैकी एक आहे.
आजच्या युगात महिला सशक्तीकरण, स्त्रीवाद, स्त्रियांना सर्वच क्षेत्रात समान अधिकार, स्त्रियांचे शिक्षण यासाठी आपण लढा देतोय.
अजूनही खेडोपाडी ‘चूल’ आणि ‘मूल’ पुढे स्त्रियांचे विश्व नाही. आणि दुसरीकडे इसवी सनाच्या पाचव्या शतकात मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि कर्नाटकच्या उत्तर भागावर प्रभावतीगुप्त राज्य करत होती.
तत्कालीन मध्यभारतातील अतिशय प्रभावशाली व्यक्ती म्हणून प्रभावतीगुप्तकडे पाहीले जाते. तब्बल दहा वर्षे एकहाती सत्ता राखत ताकदवान सम्राज्ञी म्हणून प्रभावतीगुप्त इतिहासाच्या पानांवर अमर झाली.
आपला इतिहास भविष्य उज्वल करण्यासाठी ऐन-केन प्रकारेन वाट दाखवतो, फक्त तो मार्ग पाहण्याची, समजण्याची आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची आपली कुवत असावी.
म्हणूनच प्रभावतीगुप्ताची कथा प्रत्येकाच्या कानावर घातली गेली पाहिजे.
–केतन पुरी (लेखक प्रसिद्ध इतिहासअभ्यासक आहेत.)
No comments:
Post a Comment