शाहिस्तेखानाची स्वारी, चाकण किल्ल्याला वेढा, मराठ्यांनी गाजवलेला अतुलनीय पराक्रम तसेच शिवछत्रपतींनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला आणि शाहिस्तेखानाची झालेली फजिती हा इतिहासात जवळपास सर्वांना माहीत आहे.
शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लामाबाद ठेवले, पण याच चाकणच्या वेढयात फ्रांसच्या एका जडजवाहीरच्या व्यापाऱ्याच्या धमकीने मात्र शाहिस्तेखानच्या तोंडचे पाणी पळवले होते. या घटनेची हकीकत अशी की फ्रांसचा Jean baptiste tavernier नावाचा व्यापारी शाहिस्तेखानाला आपल्याकडील रत्ने विकण्यासाठी चाकण येथे आला होता. त्याआधीही १६५३ साली Jean baptiste tavernier याने शाहिस्तेखानास काही माल विकला होता.
चाकणच्या वेढ्यात आलेला Jean baptiste tavernier लिहतो " मी चाकणचा पोहचलो. युरोपहुन आणलेला बहुतेक माल मी शाहिस्तेखानाला विकला. तो म्हणाला, " माझ्या सैन्याला पगार देण्यासाठी मी सुरतेहून खजिना मागवला आहे. खजिना येताच मी तुमच्या जवाहिराची किंमत देऊन टाकीन. माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना. इतके मोठे सैन्य आणि त्याची पगार देण्यासाठी लागणारा पैसाही हा आपल्याजवळ बाळगून नाही. माझ्या मालाची पूर्ण किंमत देण्यात तो खळबळ केल्याशिवाय राहणार नाही"
शाहिस्तेखान याने या व्यापाऱ्याचे आदरथित्य करण्यास कसलेही कमी केली नाही पण शाहिस्तेखान हा मालाचे पैसे देण्याचे नाव मात्र काढेना. पैसे आज मिळतील उद्या मिळतील या आशेवर Jean baptiste tavernier हा वाट पाहू लागला. एकेदिवशी मात्र वैतागून हा व्यापारी शाहिस्तेखानाच्या तंबूवर गेला त्यावेळी ही शाहिस्तेखान हा त्या व्यापाऱ्यास तिरसटपणे बोलला, तू येथून निघून गेलास तर उद्या तुला ती रक्कम कोण देणार आहे हे शाहिस्तेखान याचे उद्गार.
यावर Jean baptiste tavernier याने दिलेले उत्तर म्हणजे शाहिस्तेखानाच्या कानशिलात मारल्यासारखे आहे, व्यापाऱ्याने जे उत्तर दिले त्याबद्दल तो व्यापारी लिहतो " आमच्या रकमा आपल्याकडून वसूल करणे आमच्या राजेसाहेबांना मुळीच जड नाही. आमचे राजेसाहेब दोनतीन युद्धनौका सुरत बंदरावर अगर त्या किनाऱ्यावरील इतर स्थळांवर पाठवतील. मक्केच्या यात्रेहुन तुमची जहाजे येतील. त्यांची लूट करावी म्हणून वाट बघतील "
Jean baptiste tavernier याचे हे उत्तर ऐकून मात्र त्यास शाहिस्तेखानाला तिरसटपणे बोलण्याची हिंमत झाली नाही. शाहिस्तेखान याने लागलीच आपल्या खजिनदारास बोलवून त्या व्यापाऱ्याच्या मालाच्या रकमेची हुंडी देण्यास लावली, दुसऱ्या दिवशी रक्कम त्या व्यापाऱ्याला मिळाली.
तो काळ म्हणजे मोगलांच्या वैभवाचा, शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा शिवाय फौज घेऊन आलेला तरीही या व्यापाऱ्याच्या नुसत्या धमकीने हा शाहिस्तेखान गारद झाला. मोगलांचे नाजूक मर्मस्थान म्हणजे आरमार अभाव आणि त्याच मर्मस्थानावर Jean baptiste tavernier याने बोट ठेवले.
संदर्भ - समग्र सेतु माधवराव पगडी
- राज जाधव
No comments:
Post a Comment