विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग २२

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग २२
मोगलांनी याचवेळी बाजीरावाचा पाठलाग न केल्याने त्याचा बराच बचाव झाला. तसेच या मोहिमेस जयपूरच्या सवाई जयसिंगाचा अंतस्थ पाठिंबा बाजीरावास असल्याचे उघड गुपित मोगल मुत्सद्द्यांना माहिती होते. त्यामुळेचं बाजीराव राजपुतान्यात जात असल्याचे पाहून त्यांनी पेशव्याच्या पाठलागाचा नाद सोडला. या दिल्लीवरील स्वारीने बाजीराव देशी - विदेशी सत्ताधीशांमध्ये चर्चेचा विषय ठरला व इतकाचं लाभ पेशव्याच्या पदरी पडला. ना त्याला मोगलांची राजधानी लुटता आली ना मोगल बादशहाकडून त्याला आपल्या मागण्यांना मंजुरी मिळवता आली. फक्त मी कधीही, केव्हाही येउन तुमच्या बादशाहीच्या चिंधड्या उडवू शकतो व तुम्ही मला रोखू शकत नाही अस संदेश मात्र त्याने या आपल्या स्वारीने मोगल बादशहास दिला. ( स. १७३७ )
दिल्ली मोहीम आटोपून बाजीराव पुण्यास येण्यासाठी निघाला त्याचवेळी निजाम उत्तरेत जाऊ लागला होता. या उभयतांचा मुक्काम सुमारे पाउण महिना भोपाळ - सिरोंजच्या आसपास होता परंतु ना त्यांनी एकमेकांची भेट घेतली ना परस्परांवर हल्ले चढवले. वस्तुतः बाजीरावाच्या बंदोबस्तासाठीचं निजामाला दिल्ली दरबारने पाचारण केले होते व हि वस्तुस्थिती बाजीरावास माहिती नव्हती अशातला भाग नाही. परंतु, काही कारणांस्तव त्याने लागलीच निजामावर चाल करणे टाळले. बाजीरावाच्या या कृत्याचे समर्थन करताना इतिहासकार लिहितात कि, दिल्ली मोहिमेने बाजीरावाची सेना थकलेली होती. पर्जन्यकाळ जवळ आला होता. गनिमी काव्याचे युद्ध करण्यासाठी वेळ आणि परिस्थिती अनुकूल नव्हती. निजामाचा तोफखाना जय्यत तयारीत होता. त्याशिवाय निजाम असा वाटेत आडवा येईल याची पूर्वकल्पना नसल्याने बाजीरावाने आपल्या सरदारांना ठिकठीकाणच्या कामगिऱ्या आधीचं सोपवल्या होत्या. तसेच हटकून यश येण्याची खात्री असल्याशिवाय बाजीरावाने कधी युद्धप्रसंग अंगावर ओढवून घेतले नाहीत इ. हि कारणे जरी समर्पक अशी असली व वस्तुस्थितीवर कितीही आधारीत असली तरीही पूर्णतः ग्राह्य धरता येत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण असे कि, निजामाला आपल्या नाशासाठीचं मोगल दरबारने बोलावले आहे तर त्यास दिल्लीला जाउन बळ बांधून आपल्यावर चाल करून येण्याची संधी देणे हे कितपत समर्थनीय व योग्य आहे ?
याक्षणी निजाम एकटा आहे, इतर मोगल सरदारांच्या फौजा त्यास मिळाल्या नाहीत तोच त्यास बुडवणे त्यामानाने सोपे आहे. पण एकदा का तो दिल्लीला गेला कि, मोगल दरबारातील उमरावांचा पाठिंबा मिळून तो प्रबळ होईल. त्यावेळी त्याचा पराभव करणे हे अतिशय अवघड होणार होते. परंतु बाजीरावाने हा विचार केल्याचे दिसून येत नाही. पण असे म्हणणेही सयुक्तिक होणार नाही. माझ्या मते, बाजीरावाच्या काळात सरंजामशाही मराठी राज्यात चांगली रुजली होती व पन्नास पन्नास हजार फौजांचे जरी बाजीराव नेतृत्व करीत असला तरी त्या फौजेवर अखेरची हुकुमत त्या त्या पथक्यांची होती. लागोपाठ लढाया करण्यास त्याचे सरदार व सैन्य नाखूष असल्याने त्याने याक्षणी तरी निजामाशी संघर्ष टाळला. त्याउलट, निजामाची देखील लढण्याची तयारी नसल्याने त्यानेही प्रकरण निकरावर येऊ दिले नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...