स. १७३५ पर्यंत बाजीराव हा काहीसा स्वस्थ बसला. दिल्लीच्या राजकारणावर त्याची बारीक नजर असून होळकर - शिंदे तिकडचा व्याप सांभाळण्यास समर्थ असल्याने त्याला स्वतःला उत्तरेत जाणे आवश्यक वाटले नाही. दरम्यान चिमाजीआपा व पिलाजी जाधव यांनी माळवा, बुंदेलखंडात काही फेऱ्या मारून तिकडे आपला पाय भक्कम करण्याचे कार्य केले. स. १७३५ मध्ये मात्र आपल्या प्रमुख पथक्यांसह दिल्ली धडक देण्याचे बाजीरावाने निश्चित केले. राजकारणाच्या दोरांनी सर्व राजपूत राजांना त्याने आपल्यासोबत पक्के बांधून घेऊन दिल्ली मोहोम आखली. उत्तरेत गेल्यावर बाजीरावाने आपल्या प्रमुख मागण्या मोगल दरबारासमोर मांडल्या, त्या पुढीलप्रमाणे :- (१) माळव्याच्या सुभेदारीचे फर्मान (२) दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या सरदेशपांडेगिरीची सनद देणे (३) मांडवगड, रायसीन व धार हे तीन किल्ले आपल्या ताब्यात देणे (४) चंबळपर्यंतच्या प्रदेशापर्यंत मराठी राज्याची हद्द जाणावी (५) पेशव्याच्या कर्जफेडीसाठी बंगाल प्रांतातून पन्नास लक्ष रुपये देणे (६) मथुरा, आग्रा, काशी, प्रयाग हि तीर्थक्षेत्रे पेशव्यांच्या ताब्यात देणे (७) गुजरातची चौथाई देणे. या मागण्यांच्या बदल्यात पुढील अटींचे आपण पालन करू असेही बाजीरावाने कळवले. त्या अटी अशा :- (१) बादशहाची भेट घेऊ (२) माळव्या शिवाय इतर प्रांतास उपद्रव देणार नाही (३) इतर कोणाही मराठ्याची फौज नर्मदा उतरून देणार नाही याची जबाबदारी आमची (४) बादशाही सेवेसाठी एक सरदार ५०० स्वारांसह राहील (५) बादशाही फौज स्वारीस बाहेर पडल्यावर चार हजार स्वारांसह चाकरीस येऊ. मात्र फौजेचा खर्च बादशहांनी दिला पाहिजे. बाजीरावाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मोगल बादशाहने बाजीरावास माळव्याच्या सुभेदारीचे फर्मान देण्याचे मान्य करत बाकीच्या अटी फेटाळून लावल्या. मात्र यादरम्यान बराच काळ लोटल्याने आणि उन्हाळा नजीक येऊ लागल्याने बाजीरावास नाईलाजाने दक्षिणेत परतावे लागले. ( स. १७३६ )
No comments:
Post a Comment