विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 17 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग १७

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १७
दाभाड्यांच्या बखरीनुसार बाजीरावाने त्रिंबकरावाच्या कित्येक शिलेदारांना फितवले होते. हा आरोप खरा आहे कि नाही याची पडताळणी करण्यास प्रत्यंतर पुरावा नाही परंतु, बाजीरावसारखा सेनानी असला काही डावपेच वापरणारचं नाही असे समजणे चुकीचे ठरेल. बाजीरावाला हि लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असल्याने त्याने दाभाड्यांच्या फौजेत फितूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यात बाजीराव समर्थकांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. प्रत्यक्ष लढाईच्या वेळी दोन्ही बाजूच्या फौजा मोठ्या हिरीरीने लढल्या. स्वतः त्रिंबकराव हत्तीवर बसून तिरंदाजी करत होता. याप्रसंगी त्याचा माहूत मारला गेला तेव्हा स्वतः पायाने हत्ती चालवत त्याने सैन्याचे नेतृत्व केले. धनुष्य - बाण चालवताना त्याच्या बोटांची कातडी सोलून निघाली तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याने युद्ध चालूचं ठेवले. त्रिंबकराव जातीने लढत असल्याने त्याच्या फौजेत बळ संचारले व पेशव्याची सेना मार खाऊ लागली. बाजीरावाने देखील स्वतः आघाडीवर निवडक शिलेदार, बारगीरांसह दाभाड्याच्या फौजेवर अनेक हल्ले चढवले. परंतु त्यास म्हणावे तसे यश मिळाले नाही तेव्हा त्याने त्रिंबकरावास निरोप पाठवला कि, ' अशी लढाई शत्रूसोबत करून महाराजांना संतुष्ट करावे. आम्ही लढाई तहकूब करून भेटीस येतो.' परंतु त्रिंबकरावाने बाजीरावाचा सल्ला फेटाळला. बाजीरावाने आपल्या लोकांना लढाईपूर्वी किंवा लढाईदरम्यान सेनापतीवर शस्त्र न चालवण्याची आज्ञा केल्याचे उल्लेख मिळतात. यात कितपत तथ्य आहे ते या क्षणी सांगणे कठीण आहे. परंतु, दाभाड्यांच्या बखरीचा संदर्भ घेतला असता त्रिंबकरावाचा सावत्र मामा भावसिंगराव टोके हा पेशव्याला फितूर झाला असून त्याने आपल्या बारगिराकरवी त्रिंबकरावावर बंदूक चालवून त्यास ठार केले. त्रिंबकराव मरण पावताच दाभाड्यांची फौज पळत सुटली. पराभूत सेनापतीच्या फौजेची लूट करून करून बाजीराव परत मागे फिरला. कारण, डभईचा संग्राम जरी बाजीरावाने जिंकला असला तरी दभाड्यांची मोडलेली फौज परत एकदा एकत्र करून यशवंतराव दाभाडे बाजीरावावर चालून येऊ लागला. इकडून निजामही सुरतजवळ येउन थडकला होता. मिळून डभईची लढाई मारून देखील म्हणावा तसा लाभ पदरात न पडता बाजीरावाची कोंडी होण्याचा प्रसंग उद्भवला. तेव्हा त्याने दाभाडे व निजामाच्या फौजांना चकवत पुणे जवळ केले. दरम्यान सुरतच्या जवळ बाजीरावाच्या एका सैन्य तुकडीची व निजामाच्या पथकांची चकमक होऊन बाजीरावाच्या तुकडीचा पराभव झाला. परंतु, या क्षुल्लक विजयाचे भांडवल करून निजामाने, आपण माळवा व गुजरातमधून बाजीरावास हाकलून लावल्याच्या बढाया मारणारी पत्रे मोगल दरबारी पाठवली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...