विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 17 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग १६

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १६
इकडे त्रिंबकराव दाभाड्याने बाजीरावाच्या द्वेषाने परिस्थितीचे अवधान सोडून निजामाची मदत मागितली. निजामालाही पालखेडच्या अपयशाचा बदला घ्यायचा होता. त्यानेही सेनापतीला मदतीचे आश्वासन दिले. तसेच बंगशला देखील बाजीराव विरोधी आघाडीत सामील करून घेण्याच्या उद्देशाने नर्मदेच्या किनारी भेटीस बोलावले. संभाव्य धोक्याची हि पूर्वसूचना समजून बंगशला अडवण्याची जबाबदारी बाजीरावाने मल्हाररावावर सोपवली. इकडे निजाम नर्मदेकडे जात असल्याचे पाहून चिमाजीआपा तातडीने मही नदीच्या उत्तरेस मेमदाबाद येथे गेला. त्या ठिकाणी जोधपुरच्या अभयसिंगाशी त्याची भेट होऊन उभयतांचा सलोखा झाला. प्रसंग पडला तर राजपुतांची मदत घेऊन निजाम - दाभाडेचा सामना करण्याचा पेशवेबंधूंचा निश्चय झाला. वास्तविक, या अभयसिंगाला गुजरात प्रांत हवा होता पण दाभाडे जबरदस्त असल्याने त्याची डाळ शिजत नव्हती. तेव्हा पेशव्याच्या मदतीने गुजरात ताब्यात घेण्याचा त्याने डाव आखला तर गुजरात हाताखाली घालण्यासाठी व दाभाडेच्या पक्षाला आणखी एक सत्ताधीश जाउन्न मिळू नये यासाठी पेशवे बंधूंनी अभयसिंगास तात्पुरते जवळ केले. दरम्यान इकडे नर्मदेवर निजाम - बंगश यांची भेट होऊन २८ मार्च १७३१ रोजी बंगश माळव्यात परतला तर निजाम दाभाड्यांच्या मदतीसाठी सुरतेस निघाला.
निजामाचा तोफखाना व दाभाड्यांची फौज एकत्र झाल्यास आपला निभाव लागणार नाही हे ताडून बाजीरावाने त्वरेने १ एप्रिल १७३१ रोजी डभईजवळ भिलापूर येथे दाभाड्यांवर हल्ला चढवला. बाजीरावाने कितीही त्वरा केली असली तरी निजामाची एक तुकडी मोमीनयारखानाच्या नेतृत्वाखाली दाभाड्यांना येउन मिळाली होती. डभईच्या संग्रामात मोमीनयारखानाने सहभाग घेतला व लढत असताना तो मारला गेला. या लढाईमध्ये पेशवा व सेनापती यांचे बळ काय होते याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही पण, दाभाड्यांच्या तुलनेने बाजीरावची फौज कमी होती हे निश्चित ! तसेच सेनापतीच्या बाजूने उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे, चिमणाजी दामोदर हे सरदारही लढण्यास सिद्ध झाल्याने बाजीरावास यश मिळणे तसे दुरापास्तचं होते. दरम्यान सेनापती व पंतप्रधानातील तंटा सामोपचाराने मिटावा म्हणून छत्रपती शाहू दोन्ही बाजूला आज्ञापत्रे पाठवत होता. परंतु, उभयतांनी एकमेकांवर फितुरीचे आरोप करून, आपण लवकरचं शत्रूचा पाडाव करून आपल्या भेटीस येतो असे शाहूस कळवले. सारांश, बसल्या जाग्यावरून आज्ञा सोडणाऱ्या छत्रपतीला त्याची जागा दाखवून देण्याचे अप्रत्यक्ष कार्यदेखील या निमिताने दोन्ही प्रधानांनी करून दाखविले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...