विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 1 April 2023

धारचा प्राचीन इतिहास

 धारचा प्राचीन इतिहास

लेखन :सतीश राजगुरे

धारचा प्राचीन इतिहास सांगतो की येथे पूर्वी 'धारा-पद्रक' नावाचे गाव होते; जे आर्थिक, सांस्कृतिक आणि सामरिकदृष्ट्या संपूर्ण माळवा प्रदेशात एक वैभवशाली शहर म्हणून ओळखले जात असे. धारा-पद्रक गाव परमार वंशाच्या उदयाबरोबर आकाराला आले. पुढे 'धारा-पद्रक' पासून 'धारानगरी' व नंतर 'धारानगरी' पासून 'धार' असे नाव प्राप्त झाले.

धारच्या परमार राजवंशात राजा भोज हा पराक्रमी सम्राट होऊन गेला. माळवा प्रांतावर अंमल असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स. १३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून उध्वस्त केले. परमार कुलाबरोबरच या नगरीचे वैभवही लयास गेले.

त्यानंतर धारच्या परमार घराण्याचे वंशज वेगवेगळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. मध्य-भारतातील प्राचीन समृध्द शहर 'धार' येथून आल्यामुळे हे घराणे 'धारपवार' किंवा 'धारेचे पवार' म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाले.


साबुसिंग उर्फ साबाजी पवार हे या पवार घराण्यातील मूळ पुरुष म्हणून ओळखले जातात. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली तेव्हा साबाजी महाराजांसोबत होते. पुढे त्यांनी अहमदनगर सुभ्यात 'सुपे' हे गाव वसवले तसेच या गावची पाटीलकी मिळवली.

साबाजी यांना कृष्णाजी नावाचा मुलगा होता. अफझलखानाचा वध झाला त्यावेळी व त्यानंतर अफझलखानाचा मुलगा फाजलखान ह्याच्याशी ज्या झटापटी झाल्या, त्यात कृष्णाजी सामील होता. कृष्णाजीच्या कामगिरीवर खूष होऊन महाराजांनी त्याला कणगी व करणगाव इनाम दिले.

कृष्णाजी पवारांच्या हयातीतच त्याचे तीन पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी छत्रपतींच्या लष्करात चाकरीस राहून उत्तम कामगिरी बजावत होते. कृष्णाजी व त्याच्या पुत्रांची त्यावेळी शिवाजी महाराजांच्या दरबारात नामांकित सरदारात गणना होत होती.

संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर स्वराज्यावर कोसळलेल्या संकटात ज्या मराठा सरदारांनी मोगलांशी झुंज दिली, त्यात पवार बंधूंची नावे दिसून येतात.

छ्त्रपती राजाराम महाराजांच्या काळात या बंधूंनी मराठी साम्राज्याचा विस्तार करण्याच्या कामास सुरुवात केली. त्यांनी मुलखातील अनेक बंडे मोडून काढली व तापी तिरापर्यंत स्वराज्याचा अंमल बसवला.

बुबाजी व केरोजी यांच्या फौजांनी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी ह्या मुलखात घोडदौड करून चौथाई वसूल करत त्यांच्या सैन्याला हैराण करून सोडले आणि मराठ्यांचा दरारा निर्माण केला. इ.स. १६९४ मध्ये सेनापती संताजी घोरपडे यांना मोगल सरदार हिम्मतखान याने घेरले असता, बुबाजी पवार ह्यांनी आपल्या फौजेसह कोंडी फोडत संताजींची सुटका केली.

अशी मोठमोठी विश्वासाची कामे आणि कामगिरी बजावली म्हणून छ्त्रपती राजाराम महाराजांनी बुबाजी यास 'विश्वासराव' हा सन्मानाचा किताब व सरंजाम दिला. तसेच केरोजी यास 'सेनाबारासहस्त्री' ही बहुमानाची पदवी व वस्त्रे दिली. मात्र इ.स.१६९९ मध्ये खानदेश मोहिमेवर असताना मोगलांनी बुबाजीस पकडून बुऱ्हाणपूर जवळील अशीरगडावर भिंतीत चिणुन ठार मारले.

या तिन्ही भावांची घराणी अर्थात सुप्याचे बुबाजीचे मोठे घराणे, विश्वासराव रायाजी यांचे वाघाळे तसेच केरोजी यांचे खानदेशातील नगरदेवळे ह्या नावाने प्रसिद्धीस आली. १७०३ पासून मराठ्यांनी खानदेश व माळवा या भागात स्वाऱ्या करत चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळवत मराठ्यांचा दरारा वाढवला.

या प्रमुख सरदारात बुबाजी पुत्र काळोजी व संभाजी, केरोजी पुत्र धिराजी तसेच रायजी पुत्र मालोजी पवार ह्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विशेष उल्लेख होतो. काळोजी ह्यांचे पुत्र तुकोजी, कृष्णराव, जिवाजी व मानाजी यांनी पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत पराक्रम गाजवून मध्य भारतातील देवास येथे आपले ठाणे वसवले. तर संभाजी पवार ह्यांचे पुत्र उदाजीराव, आनंदराव व जगदेवराव यांनी मध्य भारतात मराठ्यांचे वर्चस्व गाजवत धार हे पवारांचे मुख्य ठाणे म्हणून प्रस्थापित केले.

अशाप्रकारे पवारांच्या प्राचीन राजधानीचे ठिकाण पुढे त्यांच्याच वंशजांनी म्हणजे तब्बल ४०० वर्षानंतर आपल्या पराक्रमामुळे परत मिळवले..!


मराठा साम्राज्याच्या विस्तराकरीता उदाजीरावांनी केलेल्या कामगिरीची त्रोटक माहिती उपलब्ध आहे, ती अशी -

माळवा आणि गुजरात या भागात सुरुवातीला मराठ्यांचा जम उदाजीराव यांनी बसवला. त्यांच्या अंगी विलक्षण धाडस, शौर्य तसेच हाती घेतलेले कार्य हिंमतीने व चिकाटीने तडीस नेण्याचे गुण अगदी अलौकिक होते. बादशाही मुलखात तर त्यांचा जरब इतका बसला होता की, त्यांचे नुसते नाव ऐकताच मुसलमान सरदारांची गाळण उडून ते घाबरून सैरावैरा पळत सुटत. उदाजीराव जेथे जातील तेथे विजय हा मिळायचाच, अशी त्यांची त्याकाळी ख्याती होती.

त्याकाळात माळवा प्रांतात एक म्हणही प्रचलित होती, "जिधर उदा, उधर खुदा!"

पवार घराण्याचे मूळ पुरुष साबुसिंग उर्फ साबाजी पवार यांचा उदय इ.स. १६४० ते १६४२ चे दरम्यान झाला. तेव्हापासून ते १८१५ पर्यंत या घराण्यांतील पुरुषांनी मराठा साम्राज्यासाठी युध्दात प्राण अर्पण केलेल्या राष्ट्रभक्त व स्वामिनिष्ठ वीर पुरुषांची यादी अशी आहे-

  • बुबाजी पवार - हे कृष्णाजी पवारांचे पुत्र होते. खानदेशात मोगलांच्या हातून मारले गेले.
  • दारकोजी पवार - हे उदाजीरावांचे ज्येष्ठ पुत्र होते. लढाईत मारले गेले.
  • मैनाजी पवार - उदाजीरावांचे द्वितीय पुत्र. १७३९ मध्ये मिरजेच्या लढाईत मारले गेले.
  • गोविंदराव पवार - उदाजीरावांचे तिसरे पुत्र. लढाईत मृत्यू पावले.
  • चंद्रराव पवार - उदाजीरावांचे चौथे पुत्र. बारभाईंच्या गर्दीत मृत्यू.
  • गोविंदराव पवार व दारकोजीराव पवार - जगदेवराव यांचे पुत्र. पंढरपूर/आनंदमोगरच्या लढाईत मारले गेले.
  • यशवंतराव पवार - आनंदराव यांचे पुत्र. यांनी १७६१ साली झालेल्या पानिपतच्या युध्दात आपल्या प्राणांची आहुती दिली.

धारचे महाराजा उदाजीराव द्वितीय पवार

धार राज्याचा नकाशा

(चित्रस्त्रोत: विकिपीडिया)

धार येथील ऐतिहासिक राजवाडा

(चित्रस्त्रोत: फेसबुक)

धारचा प्राचीन किल्ला - किल्ल्याबद्दल ऐतिहासिक महत्त्व असलेली एकमेव घटना म्हणजे पेशवा बाजीराव दुसरा यांचा १७७५ मध्ये जन्म झाला होता.

(चित्रस्त्रोत: khabarlahariya)

निष्कर्ष:-

सुमारे ४०० वर्षांच्या पारतंत्र्यानंतर इ.स. १७०० साली मराठ्यांनी माळवा जिंकला आणि मध्य भारतातील धार येथे पवार घराण्याचे राज्य सुरू झाले. सध्याच्या धार घराण्याची स्थापना १७२९ मध्ये उदाजीराव पवार (Udajirao Puar/Panwar) यांनी केली. महाराष्ट्रातील पवार हे कुलनाम परमारचाच अपभ्रंश आहे. ४०० वर्षानंतर धारमध्ये पुन्हा परमार कुलाचाच उदय व्हावा, हा योगायोग आश्चर्यकारकच म्हणावा लागेल.

पवारांकडे आश्रयाला असलेल्या एका हिंदी कवीने या दुर्मिळ योगायोगासंबंधी उद्गार काढले आहेत, ते असे -

जहँ पवांर तहँ धार, धार जहाँ परमार तहँ l

बिन पवांर नहिं धार, धार बिना परमार नहिं ll

याचा अर्थ-

जिथे पवार आहेत, तिथे धार असणारच आणि जिथे धार आहे, तिथे परमार असणारच. पवारांवाचून धार नाही आणि धारेवाचून परमार नाहीत!

ब्रिटिश राजवटीत धार हे भारतातील एक संस्थान होते. इ. स. १९४७ नंतर संस्थानांचे विलीनीकरण झाले, तेव्हा धारच्या पवारांचे राज्यही त्यावेळच्या मध्य-भारतात विलीन (१९४८) झाले.


संदर्भ व माहितीस्रोत:

१. धार संस्थानचा इतिहास- का. कृ. लेले व शि.का.ओक

२. भारतीय संस्कृति कोश

३. विकिपीडिया

४. Discover Maharashtra

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...