पदवीधर होण्याचा मान मिळवणारे पहिले मराठा संस्थानिक.
भारतावर इंग्रजांची राज्य आल्यावरही काही संस्थानांचा कारभार हा त्या संस्थानिकांच्या अधिपत्याखाली चालू होता. अर्थात इंग्रजांच्या प्रतीनीधी हे त्यांच्या दरबारी असतच.
या संस्थानांमध्ये धार व देवास (देवास मध्ये ही दोन भाग मोठी पाती व छोटी पाती) या ठिकाणी धारपवार राजांच्या अंमल होता. याच काळामध्ये एकोणीसाव्या शतकात देवास संस्थानचे राजे विक्रमसिंह (थोरली पाती) यांनी त्यांच्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला होता.
राजे विक्रमसिंह पवार यांचा जन्म 4 एप्रिल 1910 रोजी झाला ते कोल्हापूर( करवीर) चे छत्रपती शाहू महाराज यांचे नातू होते.
1932 मध्ये मुंबई विश्वविद्यालयाची बीएची परीक्षा पास झाले , पदवीधर होण्याचा मान मिळवणारे पहिले मराठा संस्थानिक राजे विक्रमसिंह पवार हेच होते.
देवास राजे तिसरे तुकोजीराव पवार वारल्यानंतर विक्रमसिंह महाराज देवाचे राजे झाले. दिनांक 18 मार्च 1938 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला.
श्रीमंत विक्रमसिंह महाराज राजे झाल्यानंतर देवास साठी नवी राज्यघटना त्यांनी बनवली , तसेच देवास धाकटी पाती व इंदुर संस्थानांशी राज्यकारभाराच्या सोयीसाठी प्रादेशिक प्रदेशांची आदलाबदल त्यांनी चर्चेद्वारे कोणालाही मध्यस्थी न करता करून दाखवली. प्रादेशिक पक्षांची चर्चेद्वारे कोणतेही वादविवाद न होता आदलाबदल झाली ही घटना इतिहासातील एकमेव घटना होती.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर , विक्रम महाराज यांनी दुसर्या महायुद्धात भाग घेण्याची इच्छा इंग्रजांना कळविली. इंग्रजांनी परवानगी दिल्यानंतर ते 29 ऑक्टोबर 1941 रोजी उत्तर अफ्रीकेत जाण्यास निघाले ते 16 नोव्हेंबरला 2/5 मराठा पलटणीत हजर झाले.
उत्तर अफ्रीकेचे वाळवंट व इजिप्त या व इतर ठिकाणी मराठा पलटण बरोबर विक्रमसिंह महाराज यांनी पराक्रम गाजवला.
त्यांच्या महायुद्धातील कामगिरीबद्दल त्यांना दि 1935-45 स्टार , दि आफ्रिका स्टार , दि इटली स्टार , दि डिफेन्स मेडल व दि वाॅर मेडल अशी पदके मिळाली.
इंदूर राज्याचा राज्य कारभार सांभाळला.
इंदुरकर राजे श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी अमेरिकेत जाण्याची ठरविल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत इंदुर राज्याची सर्व सूत्रे सर्व अधिकार्यांसह श्रीमंत विक्रमसिंह महाराज यांच्याकडे सुपूर्त केली होती . विक्रम महाराजांनी इंदूरचा ही राज्यकारभार फार हुशारीने व समाधानकारक चालवला, इंदूरच्या राज्यकारभाराची जबाबदारी सोडताना त्यांच्या निरोप समारंभात क्षत्रिय धनगर समाजाने प्रामुख्याने भाग घेतला होता.
छत्रपती होण्याचा मान मिळाला.
कोल्हापूर (करवीर) चे छत्रपती श्री राजाराम महाराज दिनांक 26 नोव्हेंबर 1940 रोजी वारले. ते दत्तक न घेता व स्वता नंतर कोल्हापूरच्या गादीवर कोणास बसवावे यासंबंधी काहीही मत न दर्शविता एकाएकी वारले.
कोल्हापूर (करवीर ) गादी चे जे हकदार होते त्यापैकी विक्रमसिंह महाराज हे छत्रपतींच्या सर्वात जवळचे (भाचे) नातलग होते. त्यांनी आपला हक्क त्यासमयी सांगितला पण महाराणी ताराबाई साहेबांनी चावरेकर भोसले घराण्यातील श्री. नानासाहेब भोसले यांचे तृतीय पुत्र प्रतापसिंह यांना दत्तक घेऊन गादीवर बसवले. त्या समई महाराणी ताराबाईंनी प्रतापसिंह यांचे नाव शिवाजी ठेवले .बाल छत्रपती शिवाजी महाराज यांचे लवकरच 28 सप्टेंबर 1946 रोजी निधन झाले.
यावेळी महाराणी ताराबाई यांनी श्रीमंत विक्रमसिंह महाराज यांना दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानंतर विक्रमसिंह महाराजांचे दत्तकविधान कोल्हापूर येथे 31 मार्च 1947 रोजी झाले. त्यांचे नाव शहाजी असे दत्तक विधानाच्या प्रसंगी ठेवण्यात आले.
शाहू महाराजांचे हे नातू. कोल्हापूरच्या राजकन्या आणि देवासच्या महाराणी राधाबाईसाहेब ऊर्फ अक्कासाहेब यांचे पुत्र. विक्रमसिंहाचा जन्म, बालपण आणि शिक्षणही कोल्हापुरातच झाले.
छत्रपती शहाजीराजे उत्तम लष्करी अधिकारी होते. इंग्रज सरकारने त्यांना ‘मेजर जनरल’ किताब देऊन गौरवले होते. फुटबॉल, टेनिस हे त्यांचे आवडते खेळ. राजाराम कॉलेजच्या फुटबॉल टीमचे ते कॅप्टन होते. शिकार हाही त्यांच्या आवडीचा प्रांत. वाघाची शिकार त्यांना विशेष आवडे. संस्थान १९४९ साली विलीन झाले. छत्रपती शहाजीराजे कोल्हापूरच्या समाजजीवनात फारसे मिसळले नाहीत. त्यांच्या काळातच दत्तकविधानावरून कोल्हापुरातील जनतेच्या नाराजीला त्यांना सामोरे जावे लागले.
समाजापासून काहीसे दूर राहिलेल्या या राजाने आपल्या एकांतमय जीवनात वेगळ्या गोष्टीचा ध्यास घेतला होता. तो म्हणजे इतिहासप्रेम आणि ग्रंथप्रेम. मराठय़ांच्या इतिहासाला चालना देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. करवीरचा इतिहास आणि मराठय़ांच्या इतिहासाची साधने उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इतिहास संशोधक मा. वि. गुजर यांच्याकडून त्यांनी करवीर व देवास घराण्याच्या कागदपत्रांच्या प्रसिद्धीचे काम करवून घेतले. त्यांची दुसरी महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी म्हणजे स. मा. गग्रे यांनी लिहिलेला ‘करवीर रियासत’ हा बृहद्ग्रंथ. छत्रपती शहाजींच्या प्रेरणेतूनच हा ग्रंथ सिद्ध झाला. इतिहासप्रेमातून त्यांनी कोल्हापुरात इतिहास चर्चा मंडळ चालविले. यात त्यांच्यासह स. मा. गग्रे, मनोहर माळगांवकर, ले. ज. एस. पी. थोरात, रत्नाकरपंत राजाज्ञा, खंडेराव गायकवाड व यशवंतराव रास्ते ही जाणकार मंडळी होती. वर्षांतून सात-आठ वेळा ही मंडळी राधानगरीच्या निसर्गरम्य परिसरात शिवाजी व्हिला या वास्तूत जमत आणि त्यांच्यात इतिहासावर अनौपचारिक चर्चा झडत. त्यातून काही नवे विषय त्यांना सुचले. त्याची पूर्तता त्यांनी केली.
शिकार व ग्रंथप्रेम ही शहाजी महाराजांची खासीयत होती. इतिहास, धर्म, युद्ध, शिकार या विषयांवरचे बारा-तेरा हजार ग्रंथ त्यांनी जमवले होते. १९६२ साली डॉ. जॉन फ्रिअर या अभ्यासकाने ‘न्यू अकाऊंट ऑफ ईस्ट अॅण्ड पíशया’ नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने पाहिला त्याचे अनुभवकथन आहे. हे पुस्तक मोठय़ा कष्टाने व जिद्दीने शहाजी महाराजांनी मिळवून त्याचा आनंदोत्सव साजरा केला.
१९७४ साली शहाजी महाराजांनी शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टची स्थापना केली व राजवाडय़ात भव्य असे संग्रहालय उभे केले. या संग्रहालयात राजघराण्यातील अनेक मौल्यवान वस्तू, नकाशे, पत्रे, चित्रे, पोशाख, तलचित्रे, राजचिन्हे, शिकार, ट्रॉफीज्, हत्तीवरील चांदीची अंबारी, मराठेशाही पगडय़ा, राजघराण्यातील स्त्रियांची कलाकुसरीची कामे, पेंटिंग्ज, तलवारी, भाले, बंदुका, वंशावळी, साठमारीची हत्यारे अशा वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. तसेच त्यांनी पशुपक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवडीपोटी न्यू पॅलेस येथे प्राणिसंग्रहालयही उभारले आहे. इतिहाकार स. मा. गग्रे यांनी शहाजी महाराजांबद्दल म्हटले आहे की, ‘त्यांच्या सहवासात इतिहास संशोधनाबरोबरच माझ्या जीवनाच्या अनुभवकक्षाही विस्तारल्या.’ शहाजी महाराजांचे निधन ९ मे १९८३ रोजी राधानगरी येथे झाले.
सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत छत्रपती शाहूमहाराज. नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. याआधीचे महाराज छत्रपती शहाजीराजे (विक्रमसिंह महाराज) यांच्या मुलीचे ते चिरंजीव. पूर्वीचे नाव दिलीपसिंह. जन्म : मुंबईस.. ७ ऑगस्ट १९४८ चा. नागपूर व बंगलोर येथे बिशप कॉटन हायस्कूलमध्ये शिक्षण. इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशात्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.
छत्रपती शाहूमहाराजांचे दोन्ही पुत्र राजकारणात आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र मालोजीराजे हे २००४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले होते. २००९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांचे ज्येष्ठ पुत्र युवराज संभाजीराजे हे राज्यसभचे खासदार होते !
महेश पवार
७३५०२८८९५३
No comments:
Post a Comment