नेतोजी पालकर म्हणजेच 'प्रति शिवाजी'
lekhan :सुयोग सदानंद शेंबेकर
नेतोजी
पालकर म्हणजेच 'प्रति शिवाजी' यांचं हिंदवी स्वराज्याच्या सुरुवातीच्या
काळात फार मोठं योगदान आहे यात वादच नाही. अफझलखान स्वारी, सिद्धीजोहर,
शास्ताखानाची स्वारी या सगळ्यातच आपण पालकरांचं नाव अगदी सतत ऐकतो. पण
शिवाजी महाराजांकडचे सर्वच सरदार हे केवळ गुणवत्तेवर टिकून होते. गुणवत्ता
नसेल, दिरंगाई केली किंवा हरामखोरी केली तर मात्र शिवाजी महाराज अश्यांना
स्वराज्याच्या सेवेत ठेवत नसत. संभाजी कोंढाळकर आणि नेतोजी पालकर हि यातलीच
काही उदाहरणं. आजकाल काही कादंबऱ्या वाचून किंवा मराठी मालिका पाहून उगीच
लोकांना वाटतं की नेतोजी पालकरांनी हिंदवी स्वराज्याच्या सेवेतून निघून
जाऊन मुद्दाम आदिलशहाला मिळावं हा शिवाजी महाराजांचा आणि नेतोजी पालकरांचा
प्लॅन होता. पण असा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही. तसंच आपण खालील
उत्तरात वाचूयात की त्यावेळी काय काय घटना घडल्या होत्या म्हणून नेतोजी
स्वराज्यापासून दूर झाले.
हा लेख आता विडिओ स्वरूपात खालील लिंकवर उपलब्ध आहे:
पुरंदरच्या
दुर्दैवी तहानंतर शिवाजी महाराजांना, आदिलशाहीविरुद्ध मिर्झा राजांना, मदत
करणं भाग पडलं. पण शिवाजी महाराज इथे असल्यामुळे आदिलशाही जिंकता येत
नाहीये अशी बोंब दिलेरखानाने ठोकल्यामुळे मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना
पन्हाळयावर हल्ला करायला सांगितलं. 'Shivaji and His Times' नुसार १६
जानेवारी १६६६ ला शिवाजी महाराज पन्हाळयाजवळ पोहोचले. नेतोजी पालकरांनाही
महाराजांनी मदत करायला बोलाविले होते पण नेतोजी पालकरांनी दिरंगाई केली.
यामुळे महाराजांना हल्ला करायला उशीर झाला. मराठ्यांचा गनिमी कावा म्हणजे
अचानक हल्ला करून गड जिंकायचे पण नेतोजी पालकरांच्या दिरंगाईमुळे हे
'Element of Surprise' राहिले नाही. पन्हाळ्यावरचे आदिलशाहीचे सैनिक सावध
झाले आणि महाराजांना त्यांचे हजार मावळे गमवावे लागले. माघार घ्यावी लागली
ते वेगळेच. म्हणजे सरळ सरळ नेतोजींच्या दिरंगाईमुळे महाराजांना गड तर
जिंकता आला नाहीच पण, राजांच्या हजार मावळ्यांना नाहक आपला जीव गमवावा
लागला. महाराजांची खरी संपत्ती जर काही असेल तर ती त्यांनी कमावलेली माणसं.
तीसुद्धा एकदम हजार गमवावी लागल्याने महाराजांना काय यातना झाल्या असतील
त्याची आपण कल्पना करू शकतो.
महाराजांनी
नेतोजींस जाब विचारला 'समयास कैसा पावला नाहीस?' (संदर्भ: सभासद बखर).
याउपर महाराजांचे आणि नेतोजींचे काय बोलणे झाले हे ठाऊक नाही पण हा 'प्रति
शिवाजी' स्वराज्याची चाकरी सोडून आदिलशहाकडे निघून गेला. 'Shivaji and His
Times' नुसार आदिलशहाने नेतोजींना चार लाख होन दिले. हे सगळं जानेवारी
किंवा फेब्रुवारी १६६६ मध्ये झालं.
नेतोजी
पालकर पराक्रमाने शूर होते त्यामुळे मिर्झा राजांना नेतोजी आदिलशाहीत गेले
तर डोईजड होतील याची कल्पना होती. म्हणून त्यांनी नेतोजींची मनधरणी करायला
सुरुवात केली आणि २० मार्च १६६६ ला नेतोजी पालकर मिर्झा राजांच्या छावणीत
दाखल झाले. इथे त्यांना ५० हजार रुपये आणि पाच हजारी मनसब मिळाली. इथे
आदिलशाहीत नेतोजींनी जाऊन आदिलशाहीला मदत करावी असा जर शिवाजी महाराजांचा
कट असता तर नेतोजी पुढे मुघली मनसबदार का झाले असते? आणि सर्वात मोट्ठी
गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी आपला हा कट यशस्वी करण्यासाठी आपल्या हजार
मावळ्यांचा बळी पन्हाळगडावर दिला नसता. राजकीय फायद्यासाठी स्वकीयांचा बळी
द्यायला महाराज काही मुघलांचे वंशज नव्हते.
असो
शिवाजी महाराज पुढे ऑगस्ट १६६६ मध्ये आग्र्याहून सुटल्यानंतर, 'प्रति
शिवाजीला' तरी हातचं सुटून जाऊ देऊ नये म्हणून औरंगजेबाने नेतोजींना अटक
करायला सांगितलं. मासिर-ए- आलमगिरी, House of Shiavji आणि आलमगीरनामानुसार
नेतोजींवर अतोनात अत्याचार करण्यात आले. शिवाजी महाराजांचाही सर्व राग
त्यांच्यावर काढण्यात आला. अखेर अतोनात हाल अपेष्टा सहन करून नेतोजींनी
'मुसलमान' धर्म स्वीकारण्याचा मार्ग अवलंबला. नेतोजींचा २७ मार्च १६६७ ला
मुहम्मद कुली खान झाला. औरंगजेबाला फार अनंद झाला शिवाजी महाराज नाही तर
नाही 'प्रति शिवाजी' तरी कचाट्यात सापडला. नेतोजींसोबत त्यांचा चुलता
कोंडाजीही होता त्यांचाही धर्म बदलला. यानंतर नेतोजींच्या तिन्ही बायकांना
दिल्लीला बोलावण्यात आलं. त्यांच्यातील दोघी आल्या तिसरीने नकार दिला. या
दोघींचाही दिल्लीला आल्यावर धर्म बदलला. धर्म न बदलतात तर एखाद्या मुस्लिम
स्त्रीशी लग्न कर असा हुकूम औरंगजेबाने नेतोजींना दिला. महाराज, हिंदवी
स्वराज्य सगळं सगळं लांब राहिलं. रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा
पश्चात्ताप नेतोजींना फार झाला असेल पण आता त्याला काहीच उपाय नव्हता.
नेतोजींचं धर्मांतर उरकल्यावर त्यांना महाबतखानाबरोबर काबुल, कंधारला
पाठवण्यात आलं. लाहोरला पोहोचल्यावर नेतोजींनी पळून जायचा एक प्रयत्न
करूनही पहिला, पण तो फसला.
पुढे
९ वर्ष त्यांनी काबुल कंधारमध्ये पराक्रम केला पण त्याचे ऐतिहासिक संदर्भ
नाहीत. पण त्यांनी हा पराक्रम करून बादशहाचा विश्वास मिळवला असावा म्हणून
औरंगजेबाने त्यांना पुन्हा शिवाजी महाराजांशी युद्ध करायला महाराष्ट्रात
पाठवलं. इथूनच जून १६७६ ला नेतोजी पसार झाले आणि राजांना येऊन रायगडावर
भेटले. पत्रासारसंग्रह लेखांक १८६३ नुसार नेतोजींना शिवाजी महाराजांनी
मोठ्या मनाने पुन्हा हिंदू धर्मात घेतले. नेतोजी पालकर महाराजांचे नातेवाईक
होते असा उल्लेख House Of Shivaji मध्ये आहे. महाराजांच्या पत्नी
पुतळाबाईंचे माहेर पालकर घराण्यातील होते. शिवाजी महाराजांनी पालकरांना
जनमानसाने स्वीकारावं यासाठी आपल्या मुलीचा कमलाबाईंचा विवाह जानोजी
पालकरांसोबत केला पण हे जानोजी नेतोजींचे कोण याचा काही संदर्भ सापडत नाही.
पुढे शिवाजी महाराज इहलोकीची यात्रा संपवून गेल्यानंतर संभाजी महाराजांनी
शाहजादा अकबराच्या आदरातिथ्यासाठी नेतोजी पालकरांना पाठवले होते असा संदर्भ
गो. स. सरदेसाईंनी मराठी रियासत खंड २ मध्ये दिला आहे. त्यांनी पुन्हा
मुसलमान धर्म स्वकारल्याचा ऐतिहासिक संदर्भ माझ्यातरी वाचनात आलेला नाही.
आता
तर मूळ प्रश्न राहतो कि शिवाजी महाराजांनी खरच ठरवून नेतोजींना आदिलशाहीत
पाठवलं होत का? तर नक्कीच नाही ते खालच्या कारणांवरून कळत.
१.
शिवाजी महाराज आणि नेतोजी पालकरांमध्ये बिघाड १००० मावळे धारातीर्थी पडले
म्हणून झाला. आपल्या राजकारणासाठी महाराजांनी १००० मावळ्यांचा बळी दिला
असेल हे चुकूनसुद्धा पटत नाही.
२. आदिलशाहीत जायला सांगितलं असत तर पुढे नेतोजी मुघलांकडे का गेले?
३.
शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटल्यानंतर फक्त रघुनाथपंत कोरडे आणि
त्र्यंबकपंत डबीर यांनाच सोडण्याची मागणी औरंगजेबाकडे का केली असती? नेतोजी
पालकरांनाही सोडावे असं सांगितलं असतंच की?
या
गोष्टींवरून कळतं कि नेतोजी स्वतःहून आदिलशहाकडे नोकरीसाठी गेले आणि मग
तिथून मिर्झा राजांनी मोठी मनसबदारी द्यायची म्हटल्यावर आदिलशाही सोडून
मुघलांकडे गेले. नेतोजींचं सर्वच आयुष्य फारच विचित्र दिसतं. प्रति शिवाजी
या ओळखीपासून ते मोहम्मद कुलीखानपर्यंतचा त्यांचा प्रवास फारच जीवघेणा
होता. पण स्वराज्यातील त्यांची कामगिरी आणि शिवाजी महाराजांनी नेतोजींना
पुन्हा हिंदू धर्मात घ्यायचा घेतलेला क्रांतिकारी निर्णय, यामुळे नेतोजी
पालकर हे नेहमीच लक्षात राहतील. धन्यवाद.
संदर्भ:
१. मासिर-ए-आलमगीरी
२. सभासद बखर
३. मराठी रियासत खंड २
४. Shivaji and His Times
५. House of Shivaji
No comments:
Post a Comment