भाग १
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
आग्र्याहून
सुटका हे महाराजांच्या आयुष्यातील एक अद्वितीय, अद्भुत आणि आव्हानात्मक
प्रकरणं होतं. तश्या महाराजांच्या आयुष्यातील सर्वच घटना आव्हानात्मक
होत्या, मग ते हत्तीएव्ह्ढ्या अफझलखानाची समुद्राएव्हढी फौज घेऊन स्वारी
असो कि चिकाटी आणि मुत्सद्दी सिद्दी जोहरचा पन्हाळ्याचा वेढा असो, क्रूर
शाहिस्तेखानाचा तीन वर्ष स्वराज्यावर घाला असो किंवा मिर्झा राजांचा
स्वराज्यावर 'सुलतानढवा' असो हे सर्वच प्रसंग महाराजांसाठी आव्हानात्मक
होते पण आपलं शौर्य, असामान्य बुद्धिमत्ता आणि कल्पकता, मुत्सद्देगिरी आणि
मुळातल्या निर्भीड स्वभावाने महाराजांनी या सर्व संकटांवर यशस्वीपणे मात
केली. पण या सर्वांमध्ये आग्र्याहून सुटका हा महाराजांच्या आयुष्यातील एक
सर्वात बाका प्रसंग होता कारण आधी सांगितलेले सर्व प्रसंग कठीण तर होतेच पण
निदान महाराज त्यावेळी भौगोलिक दृष्ट्या स्वराज्यात होते, आपल्या माणसांनी
वेढलेले होते. आग्र्यात तर देशही परका आणि आजूबाजूची माणसंसुद्धा कपटी आणि
कारस्थानी. त्यात भेटही कोणाशी तर जो शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू असा
औरंगजेब, ज्याने स्वतःच्या बापाला, भावांना आणि मुलालाही जिवंत सोडलं नाही.
भल्याभल्यांची तंतरली असती पण हे शिवधनुष्य देखील महाराजांनी आपल्या
निर्भीड स्वभावाला अनुसरून अगदी सहज पेललं. ते म्हणतात ना 'आपल्या गल्लीत
तर सगळेच शेर असतात' पण हा सह्याद्रीचा वाघ औरंगजेबाच्या दरबारातही
वाघासारखाच वागला. ऐकूयात महाराजांच्या याच आग्र्याहून सुटकेच्या
भेटीबद्दल, ऐतिहासिक संदर्भांसहित.
महाराजांची
आग्रा भेट आणि सुटका आपण दोन भागात समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. आजच्या
भागात हे समजून घेऊयात की महाराजांना आग्र्याला एव्हढी जोखीम उचलून
औरंगजेबाच्या दरबारात जायची गरजच काय होती? आणि आग्र्याच्या दरबारात
महाराजांची औरंगजेबाबरोबर गाठ पडल्यावर त्यांनी सिहगर्जना कशी केली?
का गेले शिवाजी महाराज आग्र्याला?
मिर्झा
राजे जयसिंगांनी स्वराज्यावर प्रचंड मोठ्या फौजेसह केलेला हल्ला हा तर
सर्वश्रुतच आहे. मिर्झा राजांनी लावलेल्या या आगीत स्वराज्य होरपळून जाऊ
नये म्हणून महाराजांनी मुघलांशी केलेला दुर्दैवी 'पुरंदरचा तहसुद्धा'
सर्वांनाच परिचित आहे. हा तह नक्कीच महाराजांनी राजीखुशीने केलेला नव्हता
हे न कळण्याइतके मिर्झा राजे काही दुधखुळे नव्हते. आज ना उद्या महाराज संधी
साधून पुन्हा 'मुघलांवर' पलटवार करतील याची मिर्झा राज्यांना खात्री होती.
आता आदिलशाहीवर हल्ला करून ती जिंकण्याचा विचार मिर्झा राज्यांचा होता
अश्यावेळी जर शिवाजी महाराजही जाऊन आदिलशहाला मिळाले तर दक्षिणेतला सर्वच
कारभार डोईजड होईल हा विचार करून 'शिवाजी महाराजांना' औरंगजेबाकडे पाठवावं
असा मुत्सद्दी विचार मिर्झा राज्यांनी केला. 'आपण उत्तरेत औरंगजेबाची भेट
घ्यावी आणि त्याच्याकडून शक्य तितकी मदत मिळवावीत म्हणजे तुम्हाला दक्षिणेत
'आदिलशाही' आणि 'कुतुबशाही' जिंकता येईल' असा प्रस्ताव मिर्झा राजांनी,
शिवाजी महाराजांपुढे ठेवला. याच्या मागचा मुत्सद्दी विचार महाराजांना कळला
नाही असं नाही पण त्यांनीही विचार केला की हि जोखीम घेऊन जर 'पुरंदरच्या
तहात' गेलेले गड परत मिळवता आले आणि आदिलशाही आणि कुतुबशाहीचे काही प्रदेश
स्वराज्याला जोडता आले तर वाईट काय आहे. 'साधले तर राजकारण नाही तर
शिक्षण'. पण औरंगजेबावर महाराजांचा बिलकुल विश्वास नव्हता. हे मिर्झा
राजांना कळल्यावर त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवित रक्षणाची जबाबदारी
घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी अखेर उत्तरेत औरंगझेबाला
भेटायला जायचा निर्णय घेतला.
आग्र्याच्या रस्त्यावर :
महाराजांनी
आग्र्याला जायची तयारी सुरु केली. बरोबर ९ वर्षांच्या संभाजी महाराजांनाही
नेणार होते. जिजाऊंच्या काळजावर किती आघात झाले असतील त्याची कल्पनाही
करणं शक्य नाहीये. आग्र्याला जायच्या आधी महाराजांनी अचानक त्यांच्या
गडांना भेटी दिल्या १२ गड उरले असले तरी त्यावरची सर्व व्यवस्था योग्य आहे
ना हे पडताळून पाहिलं. याला म्हणतात शिवाजी महाराज 'अखंड सावध चित्त'. २३
गड गेले आता १२ गडांचं काय ते कौतुक असा हलका विचार महाराजांनी केला नाही.
फाल्गुन
शुद्ध नवमी शके १५८७ सोमवार दिनांक ५ मार्च १६६६ ला शिवाजी महाराज
राजगडावरून आग्र्याला जायला निघाले. औरंगजेबाने बहुत देखावा केला, सभासद
बखरीनुसार औरंगजेबाने महाराजांचा खर्च रस्त्यातील त्याच्या फौजदारांना
करायला सांगितलं आणि महाराजांची 'शाहजाद्याप्रमाणे' खातिरदारी करावी असं
सांगितलं. ६ एप्रिल १६६६ ला औरंगजेबाचे एक मजेशीर पत्र शिवाजी महाराजांना
आले. त्यातली हि शेवटची ओळ औरंगजेबाचा मनसुबा दाखवून देणारी आहे. औरंगझेब
लिहितोय 'खातरजमेने
मजल
दरमजल करील यावे. म्हणजे भेटीअंती बहुत सत्कार पाऊन माघारे जाण्याविषयीचा
निरोप दिला जाईल'. चक्क औरंगजेब महाराजांना परत पाठवण्यासंबंधी खात्री
देतोय. याहून हास्यास्पद ते अजून काय असणार?
असो
मजल दरमजल करीत महाराज ११ मे १६६६ ला आग्र्यात घाईघाईने येऊन पोहोचले कारण
१२ मे ला औंरंगजेब त्याचा वाढदिवस साजरा करणार होता. त्याचा बाप शहाजहान
जिवंत असे पर्यंत तो चुकूनही आग्र्यात येत नसे पण जस बापाला दफन केलं तसा
लगेच आपला ५० वा वाढदिवस साजरा करायला औरंगजेबाला आग्रा शहर आठवलं.
औरंगजेबसुद्धा इतर मुघल बादशाहांप्रमाणे त्याचा वाढदिवस दोनदा साजरा करीत
असे. औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या स्वागताची संपूर्ण जबाबदारी
रामसिंगवर' म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाच्या वरिष्ठ पुत्रावर सोपवली होती.
औरंगजेबाला शिवाजी महाराज म्हणजे एक साधा 'भूमिया' म्हणजे जमीनदार वाटत
असत. त्यांचा उल्लेखही तो मुद्दाम सीवा असा करत असे, शिवाजी म्हटलं तर आदर
द्यावा लागेल म्हणून मुद्दाम त्यांच्या नावातील 'जी' कटाक्षाने टाळत असे.
औरंगजेबाचं ठरलं होतं कि आपल्या ऐश्वर्याने महाराजांचे डोळे दिपवून टाकायचे
आणि या सध्या जमीनदाराला त्याची जागा दाखवून द्यायची. त्याने मुद्दाम ११
मे ला रामसिंगला काही कामामध्ये अडकवून ठेवलं. राजस्थानी रेकॉर्डस् सांगतात
कि रामसिंगला काम आसल्यामुळे त्याने आपल्या मुन्शीला गिरिधरलालला शिवाजी
महाराजांच्या भेटीला पाठवलं. एका महाराजांच्या भेटीला कोणी जावं याचे काही
शिष्टाचार असतात. इथे महाराजांचा पहिला अपमान झाला. पण पुढचा होणार फायदा
पाहून महाराजांनी हा अपमान मुकाट्याने गिळला.
महाराजांना
आणि त्यांच्या सैन्याला मुलूकचंद सराई मध्ये ठेवण्यात आले. हि एक साधी
धर्मशाळा होती. हा दुसरा अपमान पण महाराजांना मोठं यश मिळवायचं होतं म्हणून
त्यांनी पुन्हा एकदा याही गोष्टींकडे कान्हा डोळा केला. महाराजांनी भेटीला
आलेल्या मुन्शीला २०० रुपये देऊन त्याचा यथोचित सन्मान केला. दुसऱ्या
दिवशी पुन्हा एकदा औरंगजेबाने रामसिंगला मुद्दाम काही कामात अडकवले म्हणजे
ती कामे करताना साहजिकच त्याच शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष होईल. आणि तसेच
झालं या कामांमुळे महाराजांना दरबारात आणण्यासाठी पुन्हा एकदा 'गिरधारललला'
रामसिंगने पाठवलं. आता 'दिवाने-आम' मधला दरबार संपला होता महाराजांना
दिवाने-खासमध्ये औरंगझेबाला भेटायला न्यायचं ठरलं. पुन्हा घोळ झाला
'गिरधारालालने' चुकीच्या रस्त्याने महाराजांना दरबारात न्यायला सुरुवात
केली, रस्त्यात त्यांना रामसिंग भेटायचा होता या चुकामुकीमुळे अजून उशीर
झाला, सगळा मुघली गलथान कारभार. महाराज निमूटपणे हिं दिरंगाई पाहत होते.
अखेर रामसिंग महाराजांना भेटला. इथून निघून दरबारात पोहोचेपर्यंत दिवाने
खासमधला दरबारही संपला होता. आता रामसिंग महाराजांना घाई घाईने घुसलखान्यात
घेऊन गेला. इथे अखेर अबुल मुजफर मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आणि
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली.
औरंगजेबाचं बक्षी आसदखान महाराजांना औरंगजेबासमोर घेऊन आला. यावेळी
महाराजांनी औरंगजेबाला १००० मोहरा २००० रुपये नजर केले आणि ५००० रुपये
निसार म्हणजे दान दिले तर संभाजी राजांनी ५०० मोहरा आणि १००० रुपये नजर
केले तर २००० रुपये निसार केले असा उल्लेख राजस्थानी रेकॉर्डस् मध्ये आहे.
औरंगझेबाच्या चेहेऱ्यावरची रे
षही
हलली नाही की त्याने महाराजांची दखलही घेतली नाही. इथून महाराजांना
मुद्दाम पंचहजारी मानसबदारांच्या रांगेमागे आणून उभं करण्यात आलं आणि
रामसिंग स्वतः अडीच हजारी मानसबदारांच्या रांगेत जाऊन उभा राहिला.
प्पावलापावलावर झालेल्या या सर्व अपमानांमुळे आता मात्र शिवाजी महाराजांचा
संयम संपला. त्यातच महाराजांना त्यांच्या मावळ्यांकडून सतत मार खात आलेला
महाराजा जसवंतसिंग रांगेत त्यांच्या पुढे दिसला. आता महाराज फारच संतापले
आणि ओरडले 'रामसिंग हा माझ्यापुढे कोण उभा आहे?' रामसिंग घाबरून आपल्या
अडीच हजारी मानसबदारांच्या रांगेतून पळत महाराजांकडे आला. मुघली दरबारात
कसं वागायचं त्याची वेगळीच नाटकं होती. कोणीही बादशाहासमोर बसायचं नाही,
नजर बरकदम म्हणजे नजर पायावर ठेऊन माना खाली करून उभं राहायचं, काही
बोलायचं असेल तर तोंडावर रुमाल ठेऊन पण बादशहाला ऐकू जाईल इतक्याच आवाजात
बोलायचं. इथे हा रुद्राचा अवतार बादशहाच्या डोळ्यात डोळे घालून ओरडून
विचारात होता 'रामसिंग हा माझ्यापुढे कोण उभा आहे?' रामसिंगाच्या तोंडच
पाणीच पळालं तो म्हणाला 'आप है महाराजा जसवंतसिंग' महाराज संतापाने म्हणाले
'अरे ज्या माणसाने आमच्या मावळ्यांना फक्त पाठ दाखवली त्याच्या पाठी आम्ही
उभं राहायचं?' 'माझा मुलगा ९ वर्षांचा आहे तरी पंच हजारी मानसबदार आहे
माझा सेनापती नेतोजी पालकर सुद्धा पंच हजारी मनसबदार आहे आणि मी त्यांचा
राजा असून या जसवंतसिंगच्या मागे? तुमच्या बादशहाला काही व्यवहार ज्ञान आहे
कि नाही?' पुढे राजस्थानी रेकॉर्डस् मध्ये लिहिलंय महाराज म्हणाले 'तू
बघितलंस, तुझ्या बापाने बघितलं, तुझ्या बादशहाने बघितलं मी काय चीज आहे ते?
तरी मला इथे उभं करता? अरे नको तुमची मनसब' असं म्हणून मुघलांच्या
मयूरसिंहासनाला पाठ दाखवून महाराज निघून गेले. औरंगजेबाला कळलं शिवाजी
महाराजांचे डोळे दिपवण्याऐवजी माझेच डोळे या रुद्रावताराने दिपले. तरी
चेहऱ्यावर काही भाव न दाखवता औरंगजेबाने रामसिंगला बोलावून विचारलं
'रामसिंग त्योरिया क्यू चढी है?' म्हणजे भुवया का उंचावल्यात चिडून?
'रामसिंग काय सांगणार कप्पाळ त्यालाच कळत नव्हतं की हे काय झालं आणि आता
काय सुरु आहे? औरंगजेबाने रामसिंगला महाराजांची समजूत काढायला पाठवलं पण
शिवाजी महाराज चिडून निघून गेले. हि औरंगजेबाची आणि महाराजांची पहिली आणि
शेवटची भेट. पण ती येणाऱ्या कित्येक पिढ्यांना लक्षात राहील अशी झाली.
दिल्लीच्या तख्ताने आजवर दरबारात फक्त मिंधे आणि लाळघोटे लोंबते पाहिले
होते पण आज प्रत्यक्ष सह्याद्रीचा स्वाभिमान अनुभवला. शिवाजी महाराजांचा
अपमान करण्याचा प्रयत्न औरंगजेबाच्या चांगलाच अंगाशी आला. पण औरंगजेब
आतल्या गाठीचा होता, त्याने मनात लागलेली आग चेहेऱ्यावर येऊ दिली नाही.
त्याने शिवाजी महाराजांना असं सोडायचं नाही हे अगदी मनाशी पक्क केलं होतं
तरी त्याचा लवलेशही चेहेऱ्यावर येऊ दिला नाही.
इथे
आपला शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा पूर्वार्ध संपतो. आता औरंगजेबाने
महाराजांवर चौक्या कश्या बसवल्या आणि महाराजांनी कशी शक्कल लढवली हे
पुढच्या भागात पाहू. इतिहासाला भावना नसतात पण हि घटना ऐकताना लहानपणापासून
माझ्या मनात एकच विचार येतो की 'मोडेन पण वाकणार नाही' ही म्हण
महाराष्ट्रात कदाचित याच प्रसंगावरून सुरु झाली असावी. जिथे भले भले आपला
मान तर सोडाच पण आपलं सर्वस्व मुघलांच्या दरबारात अर्पण करायचे तिथे आपल्या
महाराजांनी आपल्या जिवाचीही पर्वा न करता आपला आणि समस्त मराठ्यांचा
स्वाभिमान जपला. कदाचित यामुळेच 'शिवाजी महाराजकी' असं कोणीही म्हटलं कि
आपसूकच तोंडून 'जय' येतं.
संदर्भ:
सभासद बखर
तारिखे दिलकुशा
राजस्थानी रेकॉर्डस्
जेधे शकावली
पत्रसारसंग्रह
राजस्थानी रेकॉर्डस्
जेधे शकावली
पत्रसारसंग्रह
No comments:
Post a Comment