बहादूरखानला मराठ्यांचा गनिमी कावा कळलाच नाही
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
बहादूरखानाकडे
एक हशम धावत धावत आला आणि जवळ जवळ ओरडुनच म्हणाला "हुजूर हुजूर वोह सैतान
मरहट्टे आ रहे है। जिना हराम कर कर रख्खा है इन लोगोने।" बहादूरखान
त्वेषात म्हणाला "कितनी फौज है दुश्मन की?" हशम म्हणाला "हुजूर दो हजारसे
ज्यादा नही होंगे?" उगाच मिश्यांना पीळ देत बहादूरखान म्हणाला "बस? सिर्फ
दो हजार? फौज तय्यार करो, आज इन मरहट्टोन्को सबक सिखाते है।" हा बहादूरखान
कोकलताश म्हणजे खुद्द औरंगजेबाचा दूधभाऊ. खास शिवाजी महाराजांचा बंदोबस्त
करण्यासाठी याला नुकतंच औरंगजेबाने दख्खनेत पाठवलं होतं. या बहादूरखानाला
शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकानंतर महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी
एकदा नाही तर दोनदा 'मामा' बनवलं. बहादूरखान आणि त्याच्या फौजेला
मराठ्यांनी पहिल्यांदा कसं पाणी पाजलं ते पाहुयात आजच्या भागात,
नेहमीप्रमाणेच ऐतिहासिक संदर्भांसहित.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
औरंगजेबाने
१६७४ मध्ये दिलेरखानाला परत बोलावून आपला दूधभाऊ बहाद्दूरखान कोकलताश
याला दक्षिणेत पाठवलं. आता औरंगजेबाची झाली होती पंचाईत. जस भगवान
श्रीकृष्णाच्या चरित्रात मामा कंसाने त्यांना मारायला अनेक दैत्य पाठवले
पण एकही यशस्वी झाला नाही तशीच काहीशी अवस्था औरंगजेबाची झाली होती.
आजपर्यंत त्याने शाहिस्तेखान, कारतलबखान, दिलेरखान, मिर्झा राजा जयसिंग
अश्या बऱ्याच लोकांना शिवाजी माहाराजांवर पाठवलं पण मिर्झा राजे सोडले तर
बाकी कोणीही यशस्वी होईना. औरंगजेबाचं असं झालं होतं की
सरित्पतीचे जल मोजवेना, मध्यान्हीचा भास्कर पाहवेना,
मुठीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना
अश्यात
शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला रायगडावर हिंदू धार्मिक पद्धतीने
राजाभिषेक करून घेतला आणि ते क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज झाले.
सभासद बखरीनुसार औरंगजेबाला फार दुःख झालं दोन दिवस त्याने अन्नपाणी
ग्रहण केलं नाही. याच्या काही दिवस आधी त्याने बहादूरखान कोकलताश म्हणजे
त्याच्या दूधभावाला दक्षिणेत पाठवलं होतं. बहादूरखानाला शिवाजी महाराज
पेंडीचे गुरु म्हणत असत. याचे तीन अर्थ मला सापडेल 'पेंडी' याचा अर्थ
जुन्या मराठीप्रमाणे धान्याची दारू होतो म्हणजेच दारू आणि अय्याशीचा गुरु
बहादूरखान, दुसरा अर्थ बहादूरखान याच्या हालचाली मुघली पद्धतीला अनुसरून
अगदी संथ असायच्या म्हणून 'पेंडीचे गुरु' म्हणजे गुरांसारखा चाऱ्याचं रवंथ
करीत राहून वेळकाढूपणा करण्यात गुरु असलेला बहादूरखानआणि तिसरा अर्थ
'पेंडीची गुरे' म्हणजे लाच खाणारे लोक अर्थात बहादूरखान लाचखाऊ भ्रष्ट आहे
असं शिवाजी महाराजांना म्हणायचंय असं दिसतं. कोणत्याही अर्थाने शिवाजी
महाराज बहादुरखानाची गणना कोणात करत होते हे अगदी स्पष्ट दिसून येतं.
दक्षिणेत येताच बहादूरखानाने पुण्याजवळ पेडगावी आपला मुक्काम पक्का केला,
तिथे एक गड बळकट करून घेतला आणि त्याला बहादूरगड असं नाव दिलं.
राजाभिषेकानंतर
जुलै १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी आपली पहिलीच मोहीम या 'पेंडीच्या
गुरूंविरुद्ध' काढली. एकूण नऊ हजारांची फौज देऊन एका सरदाराला या
बहादुरखानाच्या छावणीवर हल्ला करायला पाठवलं. दुर्दैवाने इतिहासाला या
सरदाराचं नाव ठाऊक नाही. या सरदाराने पुन्हा एकदा मुघलांना म्हणजे
बहादूरखानाला मराठी गनिमी काव्याचा एक उत्तम नमुना दाखवला. या
सेनाधुरंधराने आपल्या नऊ हजारांच्या तुकडीचे दोन भाग केले एक सात हजारांची
तुकडी आणि दुसरी दोन हजारांची. सात हजारांची तुकडी पेडगावापासून थोडी दूर
गुपचूप दडून राहिली आणि दोन हजारांच्या फौजेने तडक बहादुरखानाच्या छावणीवर
हल्ला केला. ही दोन हजारांची फौज हा हल्ला बहादुरखानाच्या फौजेला
खेळवायला करणार होती. म्हणजे काय? तर मुघलांच्या फौजेची दक्षिणेत
मराठ्यांसमोर सतत दैना उडत होती, नुकतेच राजाभिषेकापूर्वी सेनापती हंबिराव
मोहित्यांनी मुघलांच्या मुलखात शिरून थैमान घातले होते. यामुळे बहादूरखान
चिडून त्वेषाने या दोन हजारांच्या फौजेवर सर्व शक्तीनिशी तुटून पडेल हे
मराठ्यांना चांगलंच ठाऊक होत. आणि झालही तसच बहादूरखान जवळ जवळ सगळ्या
फौजेनिशी मराठ्यांच्या या दोन हजारांच्या तुकडीवर तुटून पडला. पण ही तुकडी
युद्धाला उभीच राहिली नाही. हल्ला करत करत ही तुकडी हळू हळू माघार घेत
राहिली. एक साधी नैसर्गिक मानसिकता आहे. ज्यावेळी एखादी फौज संख्येने,
ताकदीने मोठी असते आणि तुलनेने ताकदीने आणि संख्येने कमी फौज ज्यावेळी
अश्या ताकदवान फौजेला त्रास देऊन पळू लागते तेव्हा ताकदवान फौज आपोआप आपली
ताकद दाखवण्यासाठी आणि या फौजेला इंगा दाखवण्यासाठी नकळत त्यांच्या
पाठलागावर जाते. हे अगदी नैसर्गिक आहे. ही या ताकदवान फौजेला त्यांच्या मूळ
स्थानापासून लांब नेण्याची योजना असते. आणि ती इथेही यशस्वी झाली. या
तुकडीने लढाई देत आणि माघार घेत बहादुरखानाला आणि त्याच्या फौजेला
पेडगावापासून पंचवीस कोस दूर ओढून नेल.
आता
सात हजारांची लपून बसलेली मराठ्यांची तुकडी पेडगावच्या बहादुरखानाच्या
छावणीवर तुटून पडली. आता मराठ्यांचा प्रतिकार करायला पेडगावच्या छावणीत
असं उरलंच कोण होतं? गवताच्या पात्यासारखी उरलीसुरली मुघलांची पेडगावातील
फौज कापली गेली. मराठ्यांनी पेडगावची छावणी सगळी धुऊन काढली. मराठ्यांना
एकूण पंचवीस लाख होनांची म्हणजेच एक कोटी रुपयांची लूट मिळाली. एकाच
झटक्यात राजाभिषेकाचा खर्च निघाला. याशिवाय मराठ्यांना २०० उत्तम घोडे
मिळाले. हे घोडे बहादूरखान साहेबांनी खास औरंगजेबाला भेट देण्यासाठी विकत
घेतले होते. ही सगळी लूट घेऊन पेडगावच्या छावणीला आग लावून मराठ्यांनी धूम
ठोकली. ज्या दोन हजार मराठ्यांच्या मागे बहादूरखान आणि त्याची फौज गेली
होती त्या तुकडीनेसुद्धा पंचवीस कोसांवर गेल्यानंतर पोबारा केला आणि दाही
दिशांना पसार झाले. थकला भागला बहादूरखान पेडगावला परत आला आणि बघतो तर
काय अग्निदेवांनी आणि मराठ्यांनी पेडगावच्या छावणीची पूर्ण राखरांगोळी
केलेली. स्वतःच्या दैवाला आणि मराठ्यांना दोष देत बहादूरखान बोंबलत बसला.
पण यात मराठ्यांना दोष देण्यापेक्षा खुद्द बहादूरखानाचा बेसावधपणा त्याला
नडला हे खरं. पण यात काही नवीन नव्हतं मुघलांच्या शास्ताखान, कार्तलबखान,
दिलेरखान या खानांच्या गणनेमध्ये आज बहादूरखानाची भर पडली. थोडक्यात काय
मुघल आपल्या जुन्या चुकांमधून काहीच शिकत नव्हते. नुसतं गडाला 'बहादूर'
नावं देऊन माणूस 'शूर' होत नसतो, तर प्रसंगावधान, योग्य ठिकाणी धाडस, अखंड
सावधपण, जुन्या चुकांमधून शिकण या गुणांमुळे माणसाचं नाव इतिहासात
'छत्रपती' म्हणून प्रसिद्ध होत. अन्यथा घटनेच्या ३५० वर्षांनीसुद्धा
कुठल्याश्या युट्युब व्हिडिओत आपलं नाव 'पेंडीचे गुरु' म्हणून घेतलं जातं.
बरं बहादुरखानसाहेब हे पहिल्यांदा फसवले गेले 'शस्त्राने', महाराजांच्या
मुत्सद्देगिरीने त्यांना दुसऱ्यांदा कसं मूर्ख बनवलं पाहुयात पुढच्या
भागात. धन्यवाद.
संदर्भ:
१. पत्रसारसंग्रह
२. सभासद बखर
No comments:
Post a Comment