विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 April 2023

शिवाजी महाराजांचा दुसरा राजाभिषेक का झाला?

 


शिवाजी महाराजांचा दुसरा राजाभिषेक का झाला?

लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजाभिषेक विधी ३० मे १६७४ ते ६ जून १६७४ म्हणजे ८ दिवस सुरु होता. राजाभिषेक संपताच एक गोसावी राजांकडे तरातरा चालत आला. मुद्रेवरून तो फारच संतप्त दिसत होता. तो चिडूनच राजांना म्हणाला "राजा हे कार्य सफल होणार नाही. हे सगळं चुकीचं सुरु आहे. लवकरच राजाभिषेकापासून तेरा, बावीस, पंचावन्न आणि पासष्टाव्या दिवशी तुला या राजाभिषेकात झालेल्या चुकांचे दुष्परिणाम दिसून येतील, तेव्हा तू माझ्याकडे ये" राजे पुढे काही बोलणार त्यापूर्वीच तो गोसावी आल्या पावलाने चिडून निघून गेला. हे गोसावी म्हणजेच निश्चळपुरी होते. मग शिवाजी महाराजांनी यामुळे त्यांचा दुसरा राजाभिषेक निश्चळपुरींकडून करून घेतला? गागाभट्टांनी आणि इतर ऋत्विजांनी ८ दिवस राबून केलेला राजाभिषेक चुकीचा होता का? खरच निश्चळपुरींनी अशी काही भविष्यवाणी केली होती का? पाहुयात आजच्या व्हिडिओत नेहमीप्रमाणेच ऐतिहासिक संदर्भांसहित.
हा लेख व्हिडिओ स्वरूपात खालील लिंकवर पाहू शकता:
शिवाजी महाराजांनी २४ सप्टेंबर १६७४ ला त्यांचा दुसरा राजाभिषेक तांत्रिक पद्धतीने करून घेतला. हा राजाभिषेक महाराजांनी निश्चळपुरींकडून करवून घेतला. कोण होते हे निश्चळपुरी तर हे उत्तरेतून दक्षिणेत आलेले एक पुरी पंथीय गोसावी होते. वाराणसी क्षेत्रातून हे दक्षिणेत प्रथम नाशिकात आले. त्यांचे फार शिष्य नव्हते. आणि गागाभट्ट यांचे नाव जसे अखिल भारतवर्षात विद्वान म्हणून प्रसिद्ध होते तसे निश्चळपुरी यांना फार कोणी ओळखत नव्हते. महाराजांचा दुसरा राजाभिषेक केल्यामुळेच काही लोक यांना ओळखू लागले. आता प्रश्न हा येतो की शिवाजी महाराजांनी दुसरा राजाभिषेक निश्चळपुरी कडून करून घेतला म्हणजे त्यांचा पहिल्या राजाभिषेकावर विश्वास नव्हता का? तर असं अजिबात नाहीये. शिवाजी महाराजांचा पहिला राजाभिषेक म्हणजे एक अभूतपूर्व सोहळा होता. पण सगळेच लोक दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होत नाहीत. या राजाभिषेकादरम्यान निश्चळपुरी हे गोसावी फार चिडले होते. त्यांनी राजांना भेटून खालील काही झालेले अपशकुन आणि भविष्यात होणारे अपशकून सांगितले.
१. गागाभट्ट रायगडावर येताच सेनापती प्रतापरावांचा फेब्रुवारी १६७४ ला आणि शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी काशीबाई यांचं मार्च १६७४ ला निधन झालं.
२. तुलापुरुषदानाच्या वेळी गागाभट्टांच्या नाकावर काष्ट पडले आणि बाळंभट्ट पुरोहितांच्या टाळूवर लाकडी कमळ पडले
३. राजाभिषेकापासून तेरा, बावीस, पंचावन्न आणि पासष्टाव्या दिवशी उत्पात होतील असं निश्चळपुरींचं भविष्य होतं. त्याप्रमाणे तेराव्या दिवशी राजमाता जिजाऊंच निधन झालं, बाविसाव्या दिवशी प्रतापगडावरील पागा जळाली, पंचावन्नाव्या दिवशी आणि पासष्टाव्या दिवशी घोडा आणि हत्ती मेले.
आता हि सगळी अशुभ लक्षणं निश्चळपुरी या गिसावींनी आधीच शिवाजी महाराजांना सांगितली होती हे कुठल्या संदर्भातून कळत? तर गोविंद बर्वे नामक एका व्यक्तीने 'शिवराज्याभिषेककल्पतरू' नामक ग्रंथात या सर्व अशुभ चिन्हांबाबत लिहिलेलं आहे. हे गोविंद बर्वे कोण तर जे काही थोडे फार शिष्य निश्चळपुरींचे होते त्यातलेच एक हे बर्वे. हे वाचलं कि वाटत निश्चळपुरी किती सिद्धपुरुष होते नाही? आता पुढची गम्मत ऐका हा ग्रंथ गोविंद बर्व्यांनी इ. स. वी. १७०० नंतर कधीतरी म्हणजे शिवराजाभिषेकाच्या तब्बल २६ वर्षानंतर लिहिलेला आहे. त्यामुळे या गोष्टी घडून गेल्यानंतर त्या निश्चळपुरींनी होण्याआधीच सांगितल्या होत्या असं बर्वेंनी लिहून याचं श्रेय निश्चळपुरींना दिलेलं आहे. बरं पण मी हे कोणत्या आधारावर सांगतो आहे? तर या गोविंद बर्वेंनी या सर्व अशुभचिन्हांची यादी दिलेली आहे आणि म्हणून दुसरा तांत्रिक राजाभिषेक गरजेचा होता असं म्हटलं आहे. पण ज्या तांत्रिक राजाभिषेकासाठी हा ग्रंथ लिहिला आहे त्या राजाभिषेकातील तपशील बर्वेंनी दिलेले नाहीत. गागाभट्टांनी केलेल्या राजाभिषेकाचे सर्व तपशील त्यांनी 'शिवराजाभिषेकप्रयोगः' या पोथीमध्ये दिलेले आहेत. एव्हढंच नाही तर जुन्या धार्मिक ग्रंथांचे संदर्भसुद्धा गागाभट्टांच्या या पोथीत मिळतात. पण २६ वर्षांपूर्वी झालेली एव्हढी अशुभचिन्ह दिवसांच्या क्रमासकट लक्षात असणाऱ्या बर्वेंना तांत्रिक राजाभिषेकातील काहीच तपशील कसे आठवले नाहीत? म्हणजे शिवराजाभिषेककल्पतरू हा तांत्रिक राजाभिषेकातील तपशील सांगण्यासाठी लिहिलेला आहे का पहिल्या राजाभिषेकादरम्यान आणि नंतर झालेल्या अशुभचिन्हांची यादी द्यायला? आणि निश्चळपुरी गोसावींनी दुसरा राजाभिषेक केल्याच्या दुसऱ्याच दिवशी २५ सप्टेम्बर १६७४ ला प्रतापगडावर वीज पडली आणि घोडे आणि हत्ती मेले, याचा उल्लेख बर्वेंनी केलेला नाही? मग बर्वेंच्या मते हे अशुभचिन्ह नव्हतं का जे दुसऱ्या राजाभिषेकाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी झालं. बरं या दुसऱ्या राजाभिषेकाचा साधा उल्लेखसुद्धा सभासदबखर आणि जेधे शकवलीसारख्या समकालीन साधनात नाही.
मग या गागाभट्टांनी केलेल्या राजाभिषेकाच्या द्वेषाचं खरं कारण काय आहे? तर ते स्वतः गोविंद बर्व्यांनी 'शिवराज्याभिषेककल्पतरू' या ग्रंथात दिलेलं आहे. तुलादान आणि तुलापुरुषदान या दोन्ही विधींमधून गागाभट्टांनी, निश्चळपुरींना आणि त्यांच्या सारख्या गोसाव्यांना वगळलं आणि तेव्हापासून हा राजाभिषेक निश्चळपुरींना चुकीचा वाटायला लागला. आणि मग गागाभट्टांच्या नाकावर पडलेलं काष्ट आणि बाळंभट्टांच्या टाळूवर पडलेलं लाकडी कमळ निश्चळपुरी किंवा बर्वेंना दिसायला लागलं. आम्हाला दानातून वगळल्यामुळे ही शिक्षा गागाभट्टांना आणि बाळंभट्टांना मिळाली हे म्हणणं अगदीच बालिश वाटतं.
शिवरायांच्या पत्नी काशीबाई यांचा मृत्यू आणि सेनापती प्रतापरावांचा मृत्यू हा गागाभट्टांच्या अशुभपावलांमुळे झाला असं म्हणणारे गोविंद बर्वे याच काळात आनंदरावांनी तीन हजार बैलांवर लादून आणलेली लूट आणि हंबीररावांनी मुघलांविरुद्ध केलेला पराक्रम सोयीस्कर रित्या विसरले. राजमाता जिजाऊंचं निधन हे दुर्दैवी होतं पण त्या आईने आपल्या शिवबाला 'श्री राजा शिवछत्रपती' झालेलं पाहिलं म्हणून समाधानाने त्यांनी डोळे मिटले असावेत असेही असू शकतं. बरं सभासद बखरीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जन्माच्या वेळी राजाराम महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे दुसरे चिरंजीव पालथे जन्माला आले हे सर्वांनाच अशुभ वाटल, पण जे शिवाजी महाराज यावर म्हणतात की "पालथा जन्माला आला म्हणजे, दिल्लीची पातशाही पालथी घालील" ते शिवाजी राजे असल्या कोणा निश्चळपुरीच्या सांगण्यावरून या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतील का? एव्हढा पैसा आणि वेळ खर्च करून एखादा राजा राजाभिषेक करून घेत आहे अश्यावेळी एखाद्या गोसाव्याने 'हे सगळं मुसळ केरात गेलं, हा राजाभिषेक चुकीचा झालाय' असं सांगण्याची हिम्मत केली असेल की 'राजाभिषेकाच्या' २६ वर्षानंतर हे लिहिणारे गोविंद बर्वे यांचा हा निव्वळ कल्पनाविलास आणि आपल्या गुरूंचं आणि त्यांनी केलेल्या राजाभिषेकाचं महत्व वाढवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न याचा निर्णय मी तुमच्यावर सोडतो.
मग राजांनी हा दुसरा राजाभिषेक का करून घेतला याच उत्तर फार सोप्प आहे. शिवाजी महाराज हे संत, साधू, गोसावी यांना उगाच कधीही दुखावत नसत. पहिल्या राजाभिषेकानंतर जर निश्चळपुरींनी राजांना तांत्रिक पद्धतीने राजाभिषेक करवून घ्या असं सुचवलं असेल तर राजांनी त्यांचे मन न दुखावण्यासाठी तो करवून घेतला एव्हढंच. बाकी या राजाभिषेकाला राजकीयच काय धार्मिक महत्वही नव्हतं म्हणून कोणत्या समकालीन संदर्भात याचा साधा उल्लेखसुद्धा दिसत नाही. आजच्या काळात जे लोक पहिला राजाभिषेक फसला आणि त्यानंतर महाराजांना खूप संकटांना सामोरं जावं लागलं म्हणून त्यांनी राजाभिषेक करवून घेतला असं म्हणतात त्यांना असल्या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवणारे शिवाजी महाराज कधी कळलेच नाही असं मला अगदी प्रामाणिक पणे वाटतं. याउपर या राजाभिषेकाची चर्चा करावी असं मला तरी वाटत नाही. धन्यवाद.
संदर्भ:
१. शिवराजाभिषेकप्रयोगः- लेखक: वा. सी. बेंद्रे (मूळ ग्रंथकार: गागाभट्ट)
२. शिवराज्याभिषेककल्पतरू - लेखक: गोविंद बर्वे
३. सभासद बखर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...