अफझलखान वध : शिवाजी महाराजांच्या चाली
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
प्रतापगडाच्या
पायथ्याशी इतिहास घडत होता. प्रत्येक मावळा मनातून प्रार्थना करत होता कि
स्वराज्यावरच हे अफझलखानाचा संकट टळू दे. मागील लेखात आपण वाचले कि
अफझलखानाने महाराजांना चिथावण्यासाठी किंवा त्यांचं मनोबल खच्ची करण्यासाठी
कोणकोणत्या चाली खेळल्या. या लेखात पाहू कि महाराजांनी त्या चालींना कसं
प्रत्युत्तर दिलं ते.
हा लेख तुम्ही विडिओ स्वरूपात खालच्या लिंकवर पाहू शकता:
१. मंत्रिगणांसोबत चर्चा:
जगात
जेव्हढे महान नेते होऊन गेले त्या सर्वांमध्ये एक गुण सामान होता ते
म्हणजे 'ऐकावे जनाचे करावे मनाचे'. कोणताही श्रेष्ठ नेता हा नेहमीच
सर्वांची मतं आधी विचारतो, सर्वांचे विचार लक्षात घेतो आणि मग जे योग्य
असेल तेच करतो. शिवाजी महाराजांनीही सर्वप्रथम आपल्या मंत्र्यांसोबत एक
बैठक घेतली. त्यात सर्वांनाच विचारले कि आपले मत काय आहे? सभासद बखरीमध्ये
उल्लेख आहे कि 'अफझलशी युद्ध करणे कोणालाच सोयीस्कर वाटले नाही आणि
सर्वांनीच एक मुखाने तह (सला) करावा असे सांगितले'. यावर महाराजांनी
सांगितले कि 'संभाजी राजियास जसे मारिले तसे आपणास मारतील. मारिता मारिता
जे होईल ते करणे, सला करणे (तह करणे) नाही.' याचाच अर्थ अफझलखानाला मारायचा
उद्देश आधीपासूनच महाराजांच्या मनात होता. येथे 'मारिता मारिता' म्हणजे
युद्ध करून असे महाराजांना अपेक्षित नाही तर अजून कुठल्या तरी मार्गे अफझल
मारावा हा उद्देश होता त्यांचा. येथेच महाराजांनी युद्धनिश्चय नक्की केला
हे दिसून येते.
२. तुळजापूर आणि पंढरपुरवर हल्ला:
साक्षात
'जगदंबेवर' घण घातल्यावर आणि पंढरपूरसारख्या धर्मक्षेत्राला तोशीस
पोहोचवल्यावर चिडले नसते तर ते आम्हा मराठ्यांचे महाराजच नाहीत. हो पण
चिडून जाऊन वेडं धाडस करतील तेहि आम्हा मराठ्यांचे शिवाजी महाराज नाहीत.
महाराजांना कळलं कि अफझलने हे मुद्दाम केलं आहे. उघड्या मैदानात बोलावून
अफझलला महाराजांचा समूळ नाश करायचा आहे. महाराजांनी संयम पाळला म्हणजे
महाराज हि गोष्ट विसरले नाहीत. त्यांनी हि आग मनात धगधगत ठेवली आणि योग्य
वेळी याचा ज्वालामुखी करून तो अफझलवर सांडला. हा एखाद्या नेत्याचा अजून
दुसरा गुण 'संयम'.
३. बजाजी निंबाळकर:
बजाजींना
भले ते स्वराज्याच्या बाजूने नसले तरी सोडवण्याचे काम महाराजांनी केले.
यासाठी सरदार पांढरेंना महाराजांनी एक पत्र पाठवले आणि ६०००० रुपये खंडणी
भरून बजाजींना सोडवले. संदर्भ: पत्रासारसंग्रह
४. शिवाजी महाराजांच्या प्रदेशांवर हल्ला:
जसा
अफझलखानाच्या सरदारांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला
महाराजांनी आपल्या सर्व सेनेला सपशेल माघार घ्यायला सांगितली. यामुळे हा
सर्व प्रदेश अफझलखानाला मिळाला आणि त्याला 'शिवाजी आपल्याला घाबरलाय' हे
जास्तच वाटायला लागलं. जे महाराजांना घडवून आणायचं होत ते आपसूकच होत होतं.
५. प्रतापगडावर किल्ल्यावर शिवाजी महाराज:
महाराजांनी
चंद्रराव मोरे यांनी आगाऊपणा आणि उन्मत्तपणा करायला सुरुवात केल्यावर
त्यांच्याकडून 'जावळी' जिंकून घेतली. 'जावळीचा' प्रदेश हा फारच कठीण आहे.
या प्रदेशात गर्द झाडी, जंगली जनावरं, डोंगरमाथे, दऱ्या अशा नानाविध समस्या
होत्या. त्यामुळे महाराज जावळी नजीक असलेल्या प्रतापगडावर आले. यावरून असं
दिसून येतं कि महाराजांनी जी खानाला मारायची योजना बनवली होती त्यासाठी
महाराजांना जावळीचा मुलुख आणि पर्यायाने प्रतापगडाचा किल्ला योग्य वाटला.
येथे महाराजांना गनिमी काव्याने अफझलच्या १०००० च्या काय १००००० च्या
सेनेचासुद्धा फडशा पडता आला असता.
६. वकील गोपीनाथपंत बोकील:
अफझलखानाने
कृष्णाजीपंतांना मुद्दाम धमकीयुक्त पत्र घेऊन शिवाजी महाराजांकडे पाठवले
होते याचा उल्लेख मागील लेखात केलेला आहे. असे पत्र पाठवून महाराजांना
घाबरवण्याचं काम करावं असा अफझलचा मानस होता. यामुळे युद्ध न करता काम
सार्थकी लागेल आणि त्यात शिवाजी भेटायला आला तर त्याला तिथेच ठार करावं असा
दुहेरी उद्देश होता अफझलखानाचा. तसंच महाराजांच्या मनात अफझलखानाबद्दल
शंका होती कि हा दगा करणार कारण 'संभाजी राजांचा खून, शहाजी राजांची अटक
आणि शिऱ्याच्या कस्तुरीरंगाला खानाने बोलावून त्याचा केलेला खून यामुळे
महाराज त्याला चांगलेच ओळखून होते. परंतु या शंकेला खात्रीत परिवर्तित
करण्यासाठी आणि अफझलच्या पात्राला आपलं प्रत्युत्तर पाठवण्यासाठी
महाराजांना एक गोडबोल्या, मुत्सद्दी, राजकारणात मुरलेला वकील हवा होता.
गोपीनाथपंत बोकील यांची महाराजांनी या कामी निवड केली. पंत तसे
महाराजांच्या अगदी घरातलेच. महाराज त्यांना 'काका' म्हणत असत असा उल्लेख
पोवाड्यात आहे. महाराजांनी पंतांना एक पत्र दिले आणि अफझलखानाच्या छावणीतली
सर्व माहिती काढायला सांगितली. तसेच अमूल्य असे उपहारसुद्धा अफझलकडे
पाठवले. हे सर्व घेऊन पंताजीकाका अफझलकडे पोहोचले. पत्रातून महाराज फारच
घाबरले आहेत असा आव महाराजांनी आणला होता. त्या पत्राचा आशय शिवभारतात आहे
तो पुढीलप्रमाणे "ज्याने कर्नाटकातील सर्व राजांचा नाश केला आहे अश्या आपण
माझ्यावर एव्हढी दया दाखवलीत हे बरे झाले. आपले बाहुबल आणि पराक्रम
अग्नितूल्य आहे तसेच आपल्या पराक्रमाने आपण पृथ्वीला शोभा आणली आहे
त्यामुळे आपल्या ठायी कपट नाही हे मला ठाऊक आहे. आपण जावळीच वनवैभव
पाहण्यासाठी येथे यावे या गोष्टीने मला निर्भयता आणि वैभव दोन्हीही प्राप्त
होईल. आपल्याशिवाय आदिलशाहाचि सैन्य कस्पटासमान आहे. आपण येथे आलात कि मी
सर्व किल्ले आणि जावळी आपल्या हवाली करेन. तुम्ही येथे आल्यावर मी माझी
कट्यारसुद्धा आपल्यासमोर काढून ठेवेन (थोडक्यात माझा तुमच्यावर पूर्ण
विश्वास आहे)".
या
पत्रामधून महाराजांना अफझलखानाचा विश्वास संपादन करायचा होता आणि आपण किती
घाबरलो होतो ते दाखवायचे होते. याशिवाय गोपीनाथ पंतांनी जे अनमोल उपहार
अफझलखानाला महाराजांकरवी पेश केले त्याने तर त्याचे डोळेच फिरले. "इतना
नायब तोहफा? इतनी दौलत आई कहासे सिवाजी के पास?" यावर गोपीनाथ पंतांनी
साखरपेरणी केली "बादशाहाचीच दौलत आहे हि बादशाहाकडेच परत जाणार. जावळीला
आलात कि अजून नायब तोहफे द्यायचा महाराजांचा मानस आहे त्यामुळे आपले जवाहीर
तेव्हढे महाराजांकडे पाठवा" याने बऱ्याच गोष्टी साधल्या. अफझलच्या मनात
लोभ उत्पन्न झाला, अफझलखानाचे सोनार आणि जवाहीर प्रतापगडावर आले हे सुद्धा
शिवभारतात लिहिलेले आहे. त्यामुळे आयतेच हे जवाहीर राजांच्या हाती लागले.
'त्यात राजे भितात' पंतांनी सांगितल्यावर अफझलखानाची अजूनच खात्री पटली कि
"शिवाजी पठ्ठया पुरता भ्यायलाय". गोपीनाथ पंत त्यादिवशी अफझलखानाच्या
छावणीतच राहिले आणि वेगवेगळ्या सरदारांच्या भेटी घेऊन काहींशी गोड बोलून
आणि काहींना भेटवस्तू देऊन त्यांच्याकडून चातुर्याने हि माहिती काढून घेतली
कि "अफझलखान शिवाजी महाराजांना भेटीसाठी बोलावून दगा करणार आहे कारण सरळ
मोकळ्या मैदानात शिवाजी मिळत नाहीये". हि महत्वाची बातमी घेऊन गोपीनाथ पंत
महाराजांकडे परत आले. महाराजांनी गोपीनाथ पंतांना परत अफझलखानाकडे पाठवले
आणि विनंती केली कि "महाराज फार भितात त्यामुळे आपण राजांना एकट्याने
भेटावं" त्यावरती सुद्धा गोपीनाथ पंतांनी अफझलखानाला आपल्या मुत्सद्दी
भाषणांनी पटवलं. भेटीचे खालील नियम ठरले होते जे शिवभारतात दिलेले आहेत:
१. अफझलखान आणि शिवाजी महाराजांनी सशस्त्र यावे.
२. दोघांबरोबर केवळ २-३ अंगरक्षक असावेत.
३. दोघांसमवेत १० सैनिक असावेत जे बाणाच्या टप्प्यावर उभे असावेत (म्हणजे शामियान्यापासून लांब उभे असावेत)
वरची
सर्व पार्शवभूमी पाहता अफझलखानाला पूर्ण खात्री पटली होती कि शिवाजी
महाराजांच्या कुलदैवतावर हल्ला केला महाराजांनी काहीच केलं नाही, प्रदेशावर
हल्ला केला तो प्रदेश सहज मिळाला कारण सैन्य पळून गेलं, नातेवाईकाला पकडलं
खंडणी भरून सोडवून घेतलं, आणि एक धमकीच पत्र पाठवलं तर हा 'नायब तोहफे'
द्यायला लागला, विनवण्या करायला लागला. आणि आत्ता याला भेटून पकडलं नाही तर
अजून घाबरून कुठेतरी पळून जाईल हा. हा सगळा विचार करून अफझलखानाने या
'एकांतातील' भेटीला मान्यता दिली. खान वाईवरून जवळीकडे निघाला.
इथे महाराजांनी आपल्या सेनेला खालील सूचना दिल्या:
१. नेतोजी पालकरांना अफझलखानाचे सैन्य जावळीत शिरल्यावर महाबळेश्वरकडे जायचे मार्ग रोखून धरायला सांगितले.
२. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक बसवले.
३. कान्होजी नाईक आणि बाजी सर्जेरावांना पार ते जावळीच्या वाटा रोखायला सांगितल्या.
अफझलखान
जावळीत पोहोचला. त्याच्या छावण्या पडत होत्या आणि दुसऱ्याच दिवशी त्याची
महाराजांशी भेट ठरली होती. मावळ्यांना, महाराजांच्या आप्तस्वकीयांना आणि
स्वराज्यातल्या जनतेला हा अफझलखान म्हणजे स्वराज्यावरच आणि महाराजांवरच
संकटच वाटत होता. पण महाराजांना हि संधी दिसत होती, स्वराज्य वाढवायची.
प्रतापगडाच्या सज्जात उभे राहून महाराज गडाखाली पसरलेल्या खानाच्या
छावणीकडे शांत नजरेने पाहत होते. महाराजांना आठवत होते कनकगिरीच्या लढाईत
अफझलखानामुळे ठार झालेले संभाजी राजे, आठवत होते साखळदंडाने बांधलेले शहाजी
राजे ज्यांना अफझलखानाने विजापुरात फिरवले होते आणि आठवत होती तुळजाभवानी
जिला याच खानाने फोडले होते. त्या भवानीच स्मरण होताच महाराजांचा हात
त्यांच्या कमरेवरच्या 'भवानीवर' म्हणजेच भवानी तलवारीवर गेला. स्वराज्याचा
यज्ञ सफल करायची आणि मनातला सूडाचा अग्नी शांत करायची वेळ आली होती.
तालवारीवरचा हात घट्ट होत गेला आणि मनातला निश्चय सुद्धा. महाराज आता वाट
पाहत होते उद्याची, उद्या अफझलला भेटायची....
संदर्भ:
१. पत्रासारसंग्रह
२. शिवभारत
३. सभासद बखर
४. श्री राजा शिवछत्रपती गजानन मेहेंदळे
५. राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे
No comments:
Post a Comment