अफझलखान वध: आणि गाठ पडली
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
महाराजांनी
सर्वांची तातडीची बैठक बोलावली. उद्या अफजलला भेटायला जायचं होतं.
महाराजांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आधीच तयार होत्या तर काही गोष्टींची
त्यांनी या बैठकीत चर्चा केली.
आता हा लेख विडिओ स्वरूपातही उपलब्ध आहे:
मुळात
महाराजांचं गुप्तहेर खातं हे हि फार सक्रिय होतं. महाराजांना उद्याच्या
भेटीसाठी अफजल त्याच्यासोबत ठरल्याप्रमाणे २, ३ पृष्ठरक्षक आणणार नसून फक्त
एकट्या 'बड्या सय्यद'लाच आणणार आहे हे कळलं. याचं नाव 'बडा सय्यद' होतं
बरका सय्यद बंडा नव्हे. अफजलला त्याच्या ताकदीवर भलताच विश्वास आणि गर्व
होता हे सर्वश्रुतच आहे. परंतु महाराजांनी हि परिस्थिती नीट पडताळली आणि
स्वतः बरोबर २ पृष्ठरक्षक घेतले.
१. संभाजी कावजी कोंढाळकर आणि
२. जिवा महाला
आता
हेच दोघे का? तर खानाबरोबर येणारा बडा सय्यद हा दाणपट्टा म्हणजेच पट्टा
चालवण्यात पटाईत होता. '१० हातावरील माणूस सहज कापतो' अशी त्याची ख्याती
त्यामुळे महाराजांनी बरोबर जिवा महाला घेतला कारण जिवा महालासुद्धा पट्टा
चालविण्यात पटाईत. या उपर संभाजी कावजी घेतले कारण ते अफजलसारखे
अंगापिंडाने बलिष्ट होते. तसंच सगळ्या चर्चेअंती महाराजांनी अंगाला 'सील'
करायचे ठरवले म्हणजे अंगात चिलखत घालायचे ठरवले. चर्चा आटोपल्यावर सर्व
सरदार मागील लेखात सांगितले होते तसे आपापल्या जागांवर जाऊन थांबले.
महाराजांनी त्यांना सांगितले होते कि अफजल मारल्यावर इशारत झाली कि
ठरल्याप्रमाणे फक्त कापा कापा आणि फक्त कापा. महाराजांनी आपल्याबरोबर घेतलेल्या १० लोकांची नावं शिवभारतात दिलेली आहेत ती अशी:
१. संभाजी कावजी कोंढाळकर
२. जिवा महाला
३. कोंडाजी कंक
४. येसाजी कंक
५. कृष्णाजी गायकवाड
६. सूरजी काटके
७. विसाजी मुरंबक
८. संभाजी करवर
९. इब्राहिम सिद्दी
१०. काताजी इंगळे
याशिवाय अफजल बरोबरही १० लोक आले होते परंतु त्यातील सहा लोकांचीच नाव शिवभारतात दिलेली आहेत:
१. बडा सय्यद
२. अब्दुल सय्यद
३. रहिमतखान (अफजलचा पुतण्या)
४. पहिलवानखान
५. पिलाजी मोहिते
६. शंकराजी मोहिते
या शिवाय अजून ४ यवन असा उल्लेख आहे शिवभारतात.
शेवटी
भेटीचा दिवस उजाडला. १० नोव्हेंबर १६५९. महाराजांनी सकाळीच गोपीनाथ
पंतांना अफजलकडे पाठवले. तो ठरलेल्या नियमांचं पालन करतो आहे कि नाही हे
पाहायला. सभासद बखरीमध्ये लिहिलं आहे कि. अफजलला १५०० बंदूकधारी बरोबर
न्यायचे होते परंतु गोपीनाथपंत बोकीलांनी 'इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धाशत खाईल. माघारा गडावरी जाईल. भेटी होणार नाही. शिवाजी म्हणजे काय? यास इतका सामान काय करावा' वगैरे सांगून त्याच्या लबाडीपासून त्याला परावृत्त केले.
शेवटी
लबाडी सोडून अफजल मुकाट्याने बरोबरच्या १० लोकांसोबत आणि कृष्णाजीपंत
वकिलांसोबत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या त्या सुंदर शामियान्यामध्ये
येऊन पोहोचला. अफजलखानाने महाराजांची वाट पाहत थांबावं मग शिवाजी महाराज
येतील असं ठरलं होतं. शामियान्यात पोहोचल्यावर अफजलखानाचे डोळेच फिरले असे
वर्णन सभासद बखरीमध्ये आहे. आशय असा कि 'एव्हढं अमूल्य सामान शिवाजीसारख्या
शहाजीच्या सध्या पोराकडून कुठून आलं?" यावर परत गोपीनाथपंतांनी साखरपेरणी
केली 'पादशाही माल पादशाहाकडे जाईल'
हि
सदर किंवा हा शामियाना महाराजांनी मुद्दामच चांगला सजवला होता अशी सभासद
बखरीमध्ये लिहिलेलं आहे. मुळात सदर पाहण्यात अफजल गुंतावा लोभात अडकावा आणि
त्याचं बाकी काही डोकं चालू नये हा उद्देश.
महाराज थोडसं
जेवून प्रतापगडाच्या पायथ्याशी निघाले. सदरेजवळ पोहोचल्यावर त्यांना आत
बडा सय्यद अफजलखानाबरोबर दिसला. सभासद बखर म्हणते राजांनी अफजलखानास निरोप
धाडला 'जैसे महाराज तैसे खान .आपण खानाचा भतीजा होय .ते वडील बडा
सय्यद खानाजवळ आहे याकरता शंका वाटते .हा बडा सय्यद इतका यातून दूर
पाठवणे'. अफजलने आता महाराज इथवर आलेत ते एव्हढ्या कारणाने परत जाऊ नयेत म्हणून बडा सय्यदला शामियानाबाहेर पाठवले.
अशातऱ्हेने
महाराजांनी बडा सय्यदचा काटा हळुवारपणे बाहेर काढला. आता यापुढे महाराज
शामियानात आले आणि समस्त कादंबरीकारांनी महाराजांच्या आणि अफजलच्या तोंडी
वेगवेगळे उद्गार घातले आहेत. त्याचा संदर्भ आणि सत्य पारखणे अशक्य आहे.
थोडक्यात स्वभावानुसार अफजलखानाने दमदाटी केली असणार आणि मुत्सद्दी आणि
हजरजवाबी महाराजांनी त्याची सडेतोड उत्तरं दिली असणार हा त्यातील मतितार्थ.
शेवटी अफजलने महाराजांना पत्रात जसे म्हटले होते तसे 'तुम्हाला आदिलशहाकडे
नेवून अभय आणि मोठी जहागिरी देतो' वगैरे सांगून आता भांडण मिटले म्हणून
आलिंगन द्यायला बोलावले असणार. आलिंगन देताना महाराज सडपातळ आणि अफजलसमोर
उंचीने कमी असल्याने ते अफजलच्या छातीपर्यंतच पोहोचले. अफजलने याचा फायदा
घेत महाराजांचं डोकं बगलेत दाबलं आणि त्यांच्या डाव्या कुशीत खंजीर खुपसला.
महाराजांनी चिलखत घातलेलं असल्याने अफजलचा तो वार फुकट गेला. शिवभारत
म्हणतं कि महाराजांनी यानंतर त्यांच्याकडील तलवार अफजलच्या पोटात खुपसली तर
सभासद बखर म्हणते क्रमाने आधी डाव्या हातातील 'वाघनख' आणि मग उजव्या
हातातील 'बिचवा' पोटात घालून महाराजांनी खानाची आतडी बाहेर काढली.
शिवभारतात पुढे असेही म्हटले आहे कि पट्ट्याच्या वराने महाराजांनी अफजलच्या
डोक्याचे दोन तुकडे करून अफजल मारला. विश्वासार्हतेच्या दृष्टीने शिवभारत
हे महाराजांच्या आज्ञेने रचले असल्याने अफजल शिवाजी महाराजांनीच मारला हे
आपण सत्य समजू शकतो.
हे
झाल्यावर बडा सय्यद आणि बाकीच्यांनी आत येऊन महाराजांवर हल्ला केला.
महाराजांनी तलवार आणि पट्ट्याने ते सर्व वार परतवले. आता महाराजांचे
सैनिकही शामियानात आले आणि त्यांनी अफजलच्या पृष्ठरक्षकांवर पलटवार करायला
सुरुवात केली. बडा सय्यद महाराजांवर वार करणार एव्हढ्यात जिवा महालने
त्याचा हात तोडला थोडक्यात त्याला मारले. या बाबतीत शिवभारत आणि सभासद बखर
यांचे एकमत आहे. अफजलकडचे दहाच्या दहा लोकं मारले गेले आणि महाराजांचा एकही
माणूस यात पडला नाही. यानंतर कृष्णाजीपंतांचे काय झाले याबाबत शिवभारत आणि
सभासद बखर मौन राखते. जेधे करीन्यामध्ये नोंद आहे कि अफझलच्या हेजिबाने
राजश्रींवर (शिवाजी महाराजांवर) हतेर म्हणजे हत्यार धरले म्हणजे हल्ला
केला. पुढे महाराजांचे लोकं येऊन हा हेजीब मारला गेला. पण याला कोणी मारले
ते सांगितले नाहीये. अफ़झलखानाचा हेजीब हा कृष्णाजी भास्कर होता.
थोडक्यात
महाराजांनी अफजल मारला. पण हे मिळालेलं यश भोगत बसतील ते शिवाजी महाराज
कुठले? शिवाजी महाराज मिळालेल्या यशाचे गोडवे ऐकत बसत नाहीत तर पुढच्या
यशाची तयारी करतात. महाराजांच्या डोक्यात पुढे काय करायचं याची योजना आणि
नियोजन आधीच करून झालं होतं. जितक्या संयमाने महाराजांनी हे शिवधनुष्य
उचललं तेव्हढ्याच संयमाने त्यांना आता अफजलच्या वधाचे फायदेही घ्यायचे
होते. आता त्यांना दिसत होती संधी स्वराज्य वाढवायची आणि शत्रूच्या मनात
जरब निर्माण करायची. आता महाराजांच्या प्रत्येक मावळ्याला गनीम तोडायचा
होता, तर शिवाजी महाराजांना आदिलशहाचा मुलुख त्याच्या राज्यातून तोडायचा
होता. राजे गडावर पोहोचले, इशारत झाली. इतके दिवस स्वराज्यावरचे अन्यायाचं
उत्तर देण्यासाठी फुरफुरणाऱ्या मनगटांनी आणि सुडाने पेटलेल्या मावळ्यांनी
'हर हर महादेव' च्या डरकाळीने आसमंत दुमदुमून सोडला. अफजल संपला होता पण
त्याच्या फौजेची साडेसाती काही संपली नव्हती. पाहुयात पुढील लेखात.
संदर्भ :
१. शिवभारत
२. सभासद बखर
३. जेधे करीना
No comments:
Post a Comment