कोण होता अफझलखान?
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
अफझलखान
म्हंटल कि डोळ्यासमोर एक धिप्पाड देह उभा राहतो. वागण्याबोलण्यातली
गुर्मी, बेफिकीर आणि अंगाअंगात भरलेली लबाडी अशी काहीतरी मूर्ती आपल्या
सर्वांसमोर उभी राहते. पण हा अफझलखान नावाचा आग्यावेताळ नक्की होता तरी
कोण? पाहुयात इतिहासात त्याचे काय संदर्भ आहेत.
आता तुम्ही हाच मजकूर या विडिओमध्ये सुद्धा पाहू शकता:
अफझल खानाची पारिवारिक पार्श्ववभूमी:
अफझल
खानाच्या पूर्वजांविषयी काही माहिती उपलब्ध नाही, परंतु तो सामान्य कुळात
जन्मला असावा असं ऐतिहासिक साधनांवरून दिसून येतं. अज्ञानदासच्या
पोवाड्यामध्ये शिवाजी महाराज अफझलखानाला उद्देशून म्हणतात "खाना जातीके
कोण, आम्ही जाणतो तुम्हाला, तू रे भटारणिका छोरा". चित्रगुप्त
बखरींमध्येसुद्धा 'तुझी माय भाटारीण' असे उद्गार महाराजांच्या तोंडी आहेत.
शिवकाव्यातसुद्धा "रे नीच रथ्याविहितान्नपाकनारीसुताज्ञातपिता त्वमेवम"
म्हणजे "अरे नीचा, शिजवलेलं अन्न रस्त्यात विकणारीच्या पोरा ...." असं
शिवाजी महाराज अफझलखानाला उद्देशून बोलताना मांडलेले आहेत. हा असा संवाद
झालाच असेल असे नाही परंतु अफझलखानाची कौटुंबिक पार्श्ववभूमी मांडण्याकरिता
बखरकारांनी हे उद्गार महाराजांच्या तोंडी घातले असावेत. औरंगजेबाने
शहाजहानला पाठवलेल्या पत्रामध्येसुद्धा त्याने 'अफझलखान नावाचा भटारी
रणदुल्लाखानाचा सरनोबत आहे आणि सध्या आदिलखानाने त्याला पुत्र म्हणून मोठी
दौलत दिली आहे" असा उल्लेख केला आहे (संदर्भ: अदब-इ-आलमगीरी). त्यामुळे
वरील बखरीतील उल्लेखही सत्य असावेत हे दिसून येते. याशिवाय अफझलखानाची
जन्मतारीख त्याचे बालपण यावर अजून माहिती उपलब्ध नाही.
लष्करी कामगिरी:
अफझलखान
हा आदिलशहाचा सरदार होता. अफझलखानाने रणदौलाखान याच्याकडे आपल्या कामाची
सुरुवात केली. १६३८-३९ नंतर तो स्वतंत्र सरदार झाला असं त्याच्या
पत्रांवरून कळते. अफझलखानाने कर्नाटकातील बऱ्याच राजांचा बंदोबस्त केला
होता हे दिसून येत. शिरे, बसवपट्टण, चिकनायकनहळ्ळी, बेलूर, टुमकूर आणि
जिंजी या ठिकाणांवरील स्वाऱ्यांमध्ये अफझलखानाचा हात होता. त्यासाठी पुढील
शिवभारतात श्लोक सुद्धा पुरेसा आहे. अध्याय १९ श्लोक ३.
समस्ता: समरे येन ध्वस्ता: कर्णाटभूमीपा:।
तस्य तेsदय मयि श्रेयानियानपि दयोदया:।।३।।
अर्थ:
ज्याने कर्नाटकातील समस्त राजे युद्धामध्ये नष्ट केले. अशा आपण आज माझ्यावर एव्हढीतरी दया दाखवलीत हे फार चांगले केले.
त्याच्या
पराक्रमाची प्रचिती तर प्रत्यक्ष औरंगजेबालासुद्धा आली होती. २ ऑगस्ट १६५७
ला औरंगजेबाने विजापूरकरांचा बिदरचा आणि कल्याणी किल्ला जिंकला आणि मग तो
आजूबाजूच्या प्रदेशात धुमाकूळ घालू लागला. विजापूरहून खान महंमदाच्या
हाताखाली अफझलखान औरंगजेबावर आक्रमण करण्यासाठी आला. अफझलने पराक्रमाची
शर्थ करून औरंगजेबाला अगदी कात्रीत पकडलं. दुसऱ्या दिवशी औरंगजेब अफझलकडून
पकडला तरी जाणार होता किंवा मारला तरी. खान महम्मदाला विनवणी करून औरंगजेब
पळाला म्हणून वाचला. अश्या प्रकारे अफझल खान हा त्याच्या पराक्रमामुळे
आदिलशाहीचा एक आधारस्तंभ होता.
अफझलखानाचा स्वभाव:
कपटविद्या:
अफझलखान
म्हणजे कपट हे अगदी समानार्थी शब्द आहेत. आजकाल बऱ्याच लोकांना त्याचा
पुळका येतो आणि महाराजांनी फसवून भोळ्याभाबड्या अफझलला मारलं असा आव ते
आणतात. आता या भोळ्या भाबड्या अफझलच्या काही कारवाया पाहू. कनकगिरीच्या
लढाईमध्ये याच अफझलखानाने १६५६ मध्ये शिवाजी महाराजांच्या वरिष्ठ बंधूंना
संभाजी राजांना फसवून मारले. याचा उल्लेख सभासद बखरीमध्ये आहे.
"... संभाजी राजियांस जसे मारिले तसे आपणास मारतील. मारिता मारिता जे होईल ते करू..... "
वर
सांगितलेल्या औरंगजेबाच्या प्रसंगात खान महंमदाने औरंगजेबाला सोडले हे
कळल्यावर अफझलखानाने आदिलशाह आणि त्याची आई 'बडी साहिबा' यांचे कान भरले.
खान महंमद जसा विजापूरला आला तशी त्याची खांडोळी उडाली. (संदर्भ:
बसातीन्नुसलातीन). कर्नाटकात शिरेपट्टणचा एक राजा होता कस्तुरीरंग
त्याच्यावर अफझलखान हल्ला करायला गेला होता. कस्तुरीरंगानेसुद्धा त्याला
चांगलाच इंगा दाखवला. मग तो असा हातात येईना म्हणून अफझलखानाने त्याला
तहाची बोलणी करायला बोलवून फसवून मारले (संदर्भ: मुहम्मदनामा) अगदी
महाराजांना बोलावले होते तस्सेच. हेच दाखवून देतं कि महाराज अफझलखानाला कसे
पूर्णपणे जाणून होते.
क्रूरपणा:
अफझल
खाणामध्ये क्रूरपणा ठासून भरला होता. त्याने विजापुराहून निघताना आपल्या
६३ बायकांना विहिरीत बुडवून मारले होते. या ६३ कबरी अजूनही विजापूरहून
थोड्या पुढे पाहता येतात. ११ थडग्यांच्या ४ ओळी, ५ थडग्यांची १ ओळ, आणि ७
थडग्यांच्या २ ओळी अशी पूर्णपणे ६३ थडगी आहे विजापूर शहराबाहेर. याशिवाय
आपल्या एका पात्रत जे त्याने अफझलपूरच्या एका मोकादमास १६५४ ला लिहिले आहे
त्यात "जिथे असशील व जिथे जाशील तिथून खोदून काढू आणि जो तुला आसरा देईल
त्याला त्याच्या कुटुंबासमवेत कापून घाण्यात घालून पिळू हे निश्चित आणि
पक्के जाणून असणे." (संदर्भ: शिवचरित्र साहित्य) यातून त्याचा क्रूरपणा
दिसून येतो. याशिवाय "अफझलखानाच्या मृत्यूविषयी फार शोक झाला नाही कारण
त्याच्या सर्व कृत्यांमध्ये तो अतिशय क्रूर होता" असा उल्लेख ५ मे १६६०
रोजी पाठवलेल्या डच पात्रात आहे. यावरून सर्वसामान्य समाजातही तो क्रूरच
होता हे दिसून येते. याशिवाय शहाजी महाराजांना कैद केल्यानंतर विजापूरमध्ये
फिरवण्यासाठीसुद्धा अफझलखानच जबाबदार होता. शहाजीराजांवर रागच होता
त्याचा.
गर्विष्ठपणा:
खालील कवितांच्या दोन ओळीतूनच अफझलखानाचा गर्विष्ठपणा दिसून येतो.
"गर अर्ज कुनद सिपिहर अअला फजल फुजला व फजल अफजल
अज हर मलकी बजाए तसबिह आवाज आयद कि अफजल अफजल"
वरील मोकादमास पाठविलेल्या पात्रात हा शिक्का आहे. याचा अर्थ आहे
"जर
उच्चं आकाशने उत्कृष्ट व्यक्तींची उत्कृष्टता आणि अफझलची उत्कृष्टता
तुलनेकरिता प्रदर्शित केली तर प्रत्येक देवदूताकडून ईश्वराच्या स्तुतीऐवजी
आवाज येईल कि अफझल अधिक उत्कृष्ट आहे. केव्हढा हा गर्व. ३ गावांना अफझलपूर
आणि एका गावाला अफझलनगर अशी नाव त्याने दिलेली होती.
हिंदू धर्माची चीड:
अफझलखानाने वाईला येण्यापूर्वी तुळजाभवानी फोडली आणि जात्यात भरडली असा उल्लेख अगदी स्पष्टपणे पुढे सभासद बखरीमध्ये दिला आहे.
"....श्री भवानी कुलदेवता महाराजांची, तीस फोडून, जातीयता घालून, भरडून पीठ केले......"
पंढरपूरलाही
त्रास दिला असे म्हटले आहे परंतु मूळ देवळाला त्रास दिल्याचा उल्लेख नाही.
अफझलपुरातील एका शिलालेखात त्याने स्वतःला 'शीक्नन्दा इ बुतान' म्हणजे
मूर्ती फोडणारा तसंच 'कातिल- इ मुतमर्रीदान व काफिरान' म्हणजे बंडखोरांची
आणि काफ़िरांचि कत्तल करणारा, अशी विशेषण लावलेली आहेत. चौलमधील हिंदूंची
सर्व मंदिरे पडण्याचा हुकूम अफझलने दिला होता.
हे
सर्व असले तरी तो रयतेची काळजी घेत असावा असे वरील मोकादमास लिहिलेल्या
पात्रातून तरी दिसते. "रयत आमची लेकरे आहेत असे आम्ही जाणतो. आमच्याकडून
रयतेला अणुमात्र उपद्रव व तसवीस होणार नाही" असे त्याने पत्रात लिहिलेले
आहे. खरतर तुळजाभवानी आणि पंढरपूरला तसवीस दिली त्यावेळी हि दोन्ही गावं
अदिलशाहाच्याच अखत्यारीत होती.
त्याच्या
अंगी व्यावहारिक शहाणपण होते असा उल्लेख बसातीन्नुसालातीनमध्ये आलेला आहे.
आदिलशहाने शहाजहानला एकदा फार चिडून पत्र लिहिले होते तेव्हा अफझलखानाने
त्याला समजावले कि शहाजहानच्या शक्तीपुढे होत्याचे नव्हते होईल तेव्हा
आदिलशहाने आपले पत्र वेगळ्या प्रकारे पाठवले.
असा
होता अफझलखान कपटी, पाताळयंत्री, विजय मिळावा यासाठी कोणत्याही थराला
जाणारा, धर्मवेडा, आणि क्रूर. पराक्रमी होता पण तितकाच गर्वीष्टसुद्धा. या
अश्या माणसाला शिवाजी महाराजांसारख्या नेत्याने योग्यपणे हेरले. त्याची हि
सर्व कारकीर्द ऐकली कि एक गोष्ट नक्कीच कळते कि तो भोळा आणि दुधखुळा तर
नव्हताच, पण इतक्या मुरब्बी आणि पाताळयंत्री माणसाला महाराजांनी आपल्या
मुत्सद्दीपणाने संपवले. औरंगजेबसुद्धा ज्याच्यासमोर हरला त्याला राजांनी
स्थिरवृत्ती, संयम आणि शौर्याच्या बळावर यमसदनाला पाठवले.
संदर्भ:
१. मुहम्मदनामा
२. शिवभारत
३. बसातीन्नुसालातीन
४. सभासद बखर
५. श्री राजा शिवछत्रपती- गजानन मेहेंदळे
No comments:
Post a Comment