लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
शिवाजी
महाराजांचे कट्टर शत्रू म्हटलं कि डोळ्यासमोर औरंगजेबाबरोबरच येतो तो
म्हणजे आदिलशहा. अफ़झलखान, सिद्दी जोहर, बाजी घोरपडे, रुस्तुमे जमा अश्या
सरदारांना सातत्याने शिवाजी महाराजांवर पाठवणारा आणि स्वतः मात्र ऐशोआरामात
बसून मजा बघणारा असा शिवाजी महाराजांचा शेजारी आणि सतत विलासात गुंतलेला
एक बादशहा म्हणजे आदिलशहा. इतिहासकार अगदी सहज म्हणून जातात कि या
परकीयांनी आपल्या भूमीवर आणि भूमिपुत्रांवर सतत अत्याचार केले. पण परकीय
म्हणजे हा आदिलशहा नक्की? कुठून आला हा आपल्या भारत देशात? याचे काही
ऐतिहासिक संदर्भ आहेत का त्याबद्दल आपण आजच्या भागात वाचूयात.
तुम्हाला जर हा भाग विडिओ स्वरूपात पाहायचा असेल तर खालच्या लिंकवर क्लिक करा:
तर
या आदिलशहाची कहाणी म्हणजे तो भारतात येऊन बादशहा कसा झाला याची कहाणी
एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटाला लाजवेल अशी काहीतरी आहे. बर आदिलशहा हि एक
पदवी आहे म्हणजे प्रत्येक आदिलशहाच स्वतःच असं वेगळं नाव होतं. शिवाजी
महाराजांच्या काळातच महंमद आदिलशहा, अली आदिलशहा आणि सिकंदर आदिलशहा असे
तीन आदिलशहा होऊन गेले. आपण आज सगळ्यात पहिल्या आदिलशहाची म्हणजे युसूफ
आदिलखानची गोष्ट ऐकूयात. हि नुसती काल्पनिक गोष्ट नसून फरिश्ता नावाच्या
इतिहासकाराने 'गुलशन-इ-इब्राहिमी' मध्ये याची नोंद १५९५ च्या सुमारास केली
आहे. यात आपण २-३ देशांचा आणि राज्यकर्त्यांचा उल्लेख ऐकणार आहोत. त्या
त्या राज्यकर्त्यांचा त्या त्या वेळी संदर्भ देऊन ओळख करून द्यायचा प्रयत्न
आता मी करतो.
तर
सगळ्यात पहिलं साम्राज्य आहे ऑटोमन साम्राज्य. पंधराव्या शतकात आजच्या
टर्की देशात ऑटोमन साम्राज्य अस्तित्वात होतं. सुमारे १२९९ ते १९२२ म्हणजे
जवळ जवळ ६२३ वर्ष हे राज्य अबाधीत होतं. पंधराव्या शतकाच्या मध्यात आगा
मुराद नावाचा सुलतान इथे राज्य करत होता. १४५१ ला हा आगा मुराद अल्लाला
प्यारा झाला. तो जिवंत असताना एका मुस्तफा नावाच्या माणसाने आगा मुराद खरा
सुलतान नसून तो स्वतः म्हणजे मुस्तफा खरा वारस आहे अशी बोंब उठवली होती.
त्यामुळे आगा मुरादला फार त्रास सहन करावा लागला होता. म्हणून आगा मुराद
मरताच त्याच्या मुलाने महमूदने आपल्या सगळ्या भावांना ढगात पाठवायचा निर्णय
घेतला. म्हणजे कोणी भाऊ जिवंत उरलेच नाहीत तर पुढे वारसा हक्काचा वादच
उदभवणार नाही. तर आपल्या गोष्टीतला आदिलशहा उर्फ युसूफ हा या होणाऱ्या
सुलतानाचा म्हणजे महमूदचा लहान भाऊ. महमूदने घेतलेल्या निर्णयानुसार सगळे
मंत्री युसुफला मारायला त्याच्या आईकडे आले. यावेळी युसूफ फारच लहान होता.
या सर्व मंत्र्यांनी युसूफच्या आईला युसुफला ठार मारायचंय हा निर्णय
सांगितला.
युसूफ
म्हणजेच पुढे आदिलशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्याची आई चतुर होती. तीने
युसुफला मरण्याआधी एक दिवस द्या अशी मागणी केली. मंत्रांना दया आल्याने
त्यांनी हि विनंती मान्य केली. या एका दिवसात युसुफच्या आईने सावा नावाच्या
खेड्यातील ख्वाजा इमादउद्दीन नावाच्या एका व्यापाऱ्याकडून युसूफ सारखा
दिसणारा आणि त्याच्याच वयाचा एक सिरकॅशियन गुलाम पोर विकत घेतला. सिरकॅशियन
म्हणजे कॉकसस नावाच्या पूर्व युरोपातील देशात राहणारे लोकं. याबदल्यात
राणीने व्यापारी ख्वाजा इमादउद्दीनला भरपूर पैसे दिले आणि युसुफला
राजधानीतून लांब घेऊन जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बिचारा तो सिरकॅशियन
गुलाम युसुफच्या नावाखाली उगाच मारला गेला. राणीने एका मंत्र्यालासुद्धा
भरपूर पैसे चारले त्यामुळे सुलतान महमूदला त्या मंत्र्याने पूर्ण खात्री
पटवून दिली की तुमचा भाऊ युसूफ मेला.
तिकडे
व्यापारी ख्वाजा इमादउद्दीन युसुफला घेऊन सावा गावात गेला. हे सावा
आत्ताच्या इराण देशात म्हणजे पूर्वीच्या पर्शियात होतं. तिथे वयाच्या १६
व्या वर्षापर्यंत युसूफला अतिशय उत्तम शिक्षण मिळण्याची व्यवस्था राणीने
ख्वाजा इमादउद्दीनकडून करून घेतली. राणी दर वर्षी युसूफसाठी भरपूर पैसेही
पाठवायची. तिने लहानपणीच युसूफसाठी एक दाई सुद्धा पाठवली होती. एकदा याच
दाईच्या निष्काळजीपणामुळे सावाच्या सुभेदाराला युसूफ खरा कोण आहे ते कळलं.
युसुफने त्याला ४०० तोमान इतकी लाच दिली. आता सावा मध्ये राहणं युसुफला
धोक्याचं वाटायला लागलं. युसुफचा पुढचा प्रवास आपण आजच्या गुगल मॅप्सवर
पाहुयात. हा इराण देशाचा नकाशा आहे. इथे सावा मध्ये युसूफ राहत होता तो
तिथून कूम शहरात गेला, कूम मध्येसुद्धा धोका वाटल्याने तो कशानं, इस्पहान
अशी गावं करत करत शिराजला येऊन पोहोचला. पुढे फरिश्ता म्हणतो कि युसुफला
इथे स्वप्नात खिज्र नावाच्या अवलियाने सांगितलं की तू पर्शिया म्हणजे इराण
सोडून हिंदुस्तानात जा तिथे तुझा भाग्योदय आहे. म्हणून मग युसूफ शिराज वरून
गोमरून च्या धक्क्यावर गेला आणि तिथून हा पठ्या डायरेक्ट बोटीने दाभोळला
महाराष्ट्रात आला. यावेळी युसूफचं वय १७ वर्ष होतं.
तेव्हा
उत्तरेत बहमनी बादशहाचे राज्य होते. म्हणजे थोडक्यात ज्या खिलजींनी
महाराष्ट्रातल्या यादवांचा नाश केला त्यांचं राज्य जाऊन ते तुघलकांना
मिळालं आणि तुघलकांकडून हे राज्य बहमनी बादशाहांना मिळालं.
हे
पंधरावं शतक म्हणजे बहमनींचा पडता काळ होता. यावेळी युसूफ ला बहमनी
बादशाच्या वजिराने महंमद गावानने एक जॉर्जियन गुलाम म्हणून विकत घेतलं आणि
बादशहाच्या शाही शरीररक्षकांमध्ये दाखल केलं. त्याला सावा येथे मिळालेलं
उत्तम शिक्षण याच्यामुळे तो लवकरच बादशहाच्या नजरेत भरला आणि घोडदळाचा
प्रमुख झाला. पुढे त्याने काही युद्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे
त्याला आदिलखान हि पदवी मिळाली. आपल्या अंगच्या गुणांमुळे आणि शौर्यामुळे दरबारात, खासकरून बाहेरच्या देशातून आलेल्या सरदारांचा युसूफ आदिलखानने विश्वास संपादन केला. कालांतराने बहमनी बादशहाचा मृत्यू झाला आणि त्याच्या कारभारात अंधाधुंद माजली पुढचा सुलतान महमूद शहा
याच्या पक्षातल्या अधिकाऱ्यांचा युसूफ आदिलखानवर विशेष राग होता तर सर्व
परकीय सरदारांनी युसुफचा पक्ष उचलून धरला. याच संधीचा फायदा घेत युसूफ
तिथून निसटून विजापूरकडे आला. इथे अखेर सर्वांच्या सहकार्याने युसूफ
आदिलखानाने स्वतःला १४८९ मध्ये आदिलशहा घोषित केलं. खुतब्यात आपलं बादशहा
म्हणून नाव वाचलं. अश्या रीतीने अखेर आदिलशाही सुरु झाली. पुढे जवळ जवळ २००
वर्षांनी १६८६ मध्ये औरंगजेबाने ही संपवली.
असो
हे सगळे आदिलशाह एखादा अपवाद वगळता क्रूरच होते. परक्या देशातून आलेले
असल्याने यांना इथल्या स्थानिक लोकांविषयी ना प्रेम होतं ना आस्था. त्यांना
इथल्या जमिनीतून येणारी पिकं, जनतेकडचा पैसा आणि अमर्याद सत्ता उपभोगायची
होती. ते स्वार्थी क्रूर आणि नीच होते यात वादच नाही, पण तरीसुद्धा जन्मताच
अंगावर टांगती तलवार असताना, दोन देशांमधून प्रवास करून हिंदुस्थानात
येऊन, गुलाम म्हणून सुरुवात करूनदेखील अखेर बादशहा होणाऱ्या युसुफच्या
चिकाटीचं कौतुक वाटतं. कठीण परिस्थितीसमोर गुढघे न टेकता परक्या देशात जाऊन
राज्य उभं करण्याची जिद्द या युसूफ आदिलशहाकडून जर त्यावेळचे भारतातले
राजे शिकले असते तर आज भारत कदाचित अजून वेगळा असता. दुर्दैवाने इतिहासात
जर तर नसतं म्हणून अधिक कल्पनाविलास न करता आज इथेच थांबतो. अशा करतो कि
आजचा विडिओ आपल्याला नक्कीच आवडला असावा. धन्यवाद.
संदर्भ:
- 'गुलशन-इ-इब्राहिमी'
No comments:
Post a Comment