============================================
"The primary task of a leader is to bring a feeling of goodness into the people he leads. A true leader creates a renaissance – a reservoir of positivity that frees the best in people and allows them to achieve extraordinary results."
शाहू महाराज, म्हणजे मराठा साम्राज्याचे छत्रपती. शाहू महाराजांविषयी अनेक इतिहासकारांनी विविध पद्धतीने त्यांच्या इतिहासाची मांडणी केली. परंतु मला त्यांच्या छत्रपती म्हणून घडलेल्या इतिहासावर जास्त काही बोलायचं नाही. एखादा मनुष्य एवढे मोठे साम्राज्य उभे करतो त्याच बरोबर असंख्य सेनान्यांची फौज उभी करतो आणि त्यांच्याकडून असामान्य कर्तुत्व घडवून आणतो. यासाठी तो माणूस घडला कसा हे जाणून घेणं म्हत्वाच.
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ११ मार्च १६८९ रोजी झाली. परंतु मराठा राज्याची राजधानी रायगड काबीज केल्याशिवाय मराठयांच संकट संपूर्ण संपणार नाही याची जाण औरंगजेब बादशहास होती आणि त्याने झुल्फिकारखानास रायगडास वेढा देण्यास पाठवले.
२५ मार्च रोजी रायगडास वेढा पडला. किल्ला जोमाने लढवला, खजिन्यातला पैसा संपत होता, फौज मोडून पडत होती, अनुभवी माणसे मरून पडतं होती. किल्ला लढवणे शक्य नव्हते हे जेव्हा लक्षात आले त्यावेळी एक स्त्री जी खंबीरपणे निर्णय घेण्यास उभी राहिली ती म्हणजे "त्यागमूर्ती महाराणी येसूबाईसाहेब". पतीची झालेली क्रूर हत्या, राज्यात होत असलेल्या रयतेच्या कत्तली, पिकांची होत असलेली नासधूस, आणि खुद्द मोगल बादशहा औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी समोर उभा होता. स्वतःच पोरं (शाहू महाराज) ज्यांचे वय अवघे सात-आठ वर्षे आणि सावत्र दीर राजाराम महाराज यांचे वय एकोणविस. औरंगजेबाच्या हाती लागल्यावर जिवंत राहण्याची सूद्धा शक्यता नव्हती अशा वेळी महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांना किल्ल्याच्या बाहेर सोडण्याची धडपड सुरु केली.
अतिशय मुत्सद्दी झुल्फिकारखानाचा वेढा गडाला आहे. कधीही गड पडू शकतो याची जाण येसूबाईसाहेबांना होतीे. पतीला जाऊन एक महिना सूद्धा झाला नव्हता. काही महिन्यांपूर्वी मराठा राज्याची राणी असलेल्या येसूबाई आज तेच स्वराज्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. काय मानसिकता असेल त्यांची. स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या जीवाची काळजी न करता त्या आपले सावत्र दीर राजाराम महाराज यांना रायगडावरून बाहेर पडून कर्नाटकात जावून तिथून स्वराज्याचे कार्य चालू ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. व्यक्तिनिष्ठ असण्यापेक्षा राज्यनिष्ठ असावे हीच शिकवण शिवाजी महाराजांची होती जी पुढे येसूबाई साहेबांनी चालवली. परंतु येसूबाई साहेबांना मागे एकटे ठेवून जाण्यास नक्कीच राजराम महाराजांच्या जीवावर आले असणार ते म्हणतात,
“....राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीच तेच हे ऐसे लक्ष ठेवून, आम्ही कारभारी, आमचे आज्ञेत राहू .....”
शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून येताना काळजावर दगड ठेवून शंभू महाराजांना गुप्तपणे तिथेच ठेवून राजगडास आले तसेच येसूबाईंनी स्वतःच्या मुलाला आणि स्वतःला कैद होणार हे माहित असूनही राजाराम महाराजांना निसटून जाऊन राज्य चालवावे अशी विचारसरणी ठेवतात. या दोन्ही घटनांना इतिहासात एकाच पातळीचं स्थान आहे हे विसरून चालणार नाही.
वरील प्रसंग पाहता सात-आठ वर्षांच्या त्या बाल शाहुंवर काय परिणाम झाले असतील याचा विचार होणे अतिशय महत्वाचे आहे. वडिलांची झालेली क्रूर हत्या, आईची राज्य वाचवण्यासाठी चालेली धडपड, काकांचे गडावरून जाणे. पुन्हा भेट होईल की नाही याची कल्पना सुद्धा नाही. ज्या वयात एक राजशिक्षण होणे जरुरू होते त्या कोवळ्या वयात शाहू महाराज ज्या परिस्थितीतून जात होते तीच परिस्थिती त्यांना मानसिक दृष्ट्या बळकट बनवत होती.
एकंदरीत मराठ्यांचा राजा शाहू आणि महाराणी येसूबाई यांची अशी दयनीय स्थिती झाली होती की ज्या राज्याचे ते स्वामी होते त्याच राज्यात त्यांना कैदी म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या आणि दुसऱ्याहून तिसऱ्या अशी भटकंती करावी लगत होते. तरीसूद्धा महाराणी येसूबाई यांनी स्वतःच्या आणि बालशाहुंच्या मानसिकतेवर जराही त्याचा परिणाम होऊ दिला नाही.
३ नोव्हेंबर १६८९ साली किल्ला मोगलांकडे गेला. मराठा राज्याची राजधानी त्याच राज्याची महाराणी एका कैद्याच्या रूपाने सोडावा? अशा परिस्थिती येसूबाई साहेबांचे शाहू महाराजांवरचे जे संस्कार होते आणि छत्रपती घराण्याचा वारसा ज्याला आपण रक्तातले गुण म्हणतो हे औरंगजेबाच्या कैदेत असताना सूद्धा दिसून येत होते. कैदेत असूनही राजाराम महाराजांना आपल्या वर्तमानाची बातमी पोहचेल अशी व्यवस्था लावून ठेवली होती आणि ती जबाबदारी भक्ताजी हुजरे व बांकी गायकवाड यांच्याकडे होती.
कुठेतरी येसूबाई साहेबांना एक आशा नक्कीच होती की राजाराम महाराज त्यांना कैदेतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील आणि तो पुढे त्यांनी केला सूद्धा. परंतु आपले आणि राजारामाचे सबंध चांगले आहेत याची खबर औरंगजेबाला लागू नये याची काळजी सदैव त्यांना घ्यावी लागत असे. आणे हेच मुत्साद्दीचे वागणे शाहू महाराजांना या कोवळ्या वयात सूद्धा दिसून येते.
एकदा औरंगजेब बालशाहुंना म्हणतो, “राजे तुमचे वडील मारले असता तुम्ही नेकीने चालता, तुमचे चुलते यांनी तुमचे राज्य दौलत आटोपून आम्हासी ते लढता त्यास तुम्हास त्याजकडे लाऊन देतो जावे.” यावर बालशाहुंनी दिलेले उत्तर म्हणजे भविष्यातील छत्रपतीचा एक गुणच झळकतो. यावर शाहू उत्तर देतात,
शाहू म्हणतात:
“पूर्वी आमचे वडील हयात असता त्यास नजर बंदीत ठेवून आपण राज्य करावे असा राजारामाने बेत केला होता. त्याचे पश्चात आमचे इलाखा सूद्धा रायगडी टाकीत आपले काबिलेखसूद्धा निघोन गेले ... गाडी व शिक्के आपले नावे करून घेतले. आम्ही स्थानाकडे गेले असता आम्हांस नजरबंद ठेवतील. आपण (औरंगजेब) त्यांचे पारिपत्यकरून आम्हास राज्यावर बसवाल तेव्हा राज्य करू.”
औरंगजेब बादशहाशी बोलताना एवढी चतुराई आणि ते ही या बालवयात !!! यावरून येसूबाई साहेबांचे संस्कार आणि एकूण परिस्थितीची जाणीव आणि त्यानुसार आपली वागणूक ठरवणारे बालशाहू. आणि अशाच आपल्या निरलस वागणुकीने येसुबाईसाहेब आणि शाहूंनी बादशहा आणि बेगम (औरंगजेबाची मुलगी) यांची मर्जी संपादन केली होती. याचे उदाहरण म्हणजे शाहू महाराजांना अक्कलकोट, इंदापुर्म सुपे, बारामती व नेवासे या पाच परगण्यांची जहागीर करून दिली. एक सोन्याची तलवार, शिवाजी महाराजांची भवानी तलवार व अफझलखानची तलवार अशी बक्षिसे दिली. औरंगजेबाने शाहू महाराजांना सप्तहजारी मनसब दिली व येसुबाईंना कारभार पाहण्याचा अधिकार दिला. यासाठी येसूबाईसाहेबांना एक शिक्का दिला होता जो पारसीमध्ये होता.
“येसूबाई इ वालिदा शाहू राजा सन अहद” मराठीत “शाहू राजाची आई येसूबाई वर्ष पहिले”.
प्रशाषण आणि राज्यकारभार याचे शिक्षण येसूबाईसाहेब शाहू महाराजांना देत होत्या हे यावरून सिध्द होते. आणि एकूणच नाजूक परिस्थितीमध्ये योग्य ते शिक्षण व संस्कार घेवून शाहू महाराज घडत होते. कोणी एका सरदारामुळे किंवा प्रधानामुळे मराठा साम्राज्य उभे करण्यात शाहू महाराजांना यश आले असे म्हणणे ज्यांचे आहे त्यांनी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
एकंदरीत शाहूंचे कैदेतील जीवन हे पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे होते. त्यांना कुठेच बाहेर मोकळीक नव्हती. त्यांना औरंगजेबाने अनेक भेटवस्तू दिल्या परंतु पहारा हा सक्तच होता. जवळ-जवळ सर्व उमेदीचे आयुष्य हे कैदेत गेले परंतु येसूबाई साहेब ही एकमेव व्यक्ती होती जिने शाहूंना योग्य मार्गदर्शन करून स्वतःची ओळख विसरू दिली नाही.
४१ वर्षे राज्यकर्ते शाहू महाराज समजून घ्यायचे असेतील तर त्यांचे अटकेतील दिवस आणि येसूबाईसाहेबांचे संस्कार आणि त्यांची जडणघडण समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने शिवरायांना जिजाऊसाहेबांनी घडवले तसेच श्रेय येसूबाईसाहेबांना जात शाहू महाराजांना घडवण्यात.
राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांचे सबंध म्हणजे या जगाला एक नात्यातला गोडवा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे उदाहरण आहे, २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराज मरण पावले. त्यावेळी रामचंद्रपंत त्यांच्या जवळ होते, त्यावेळी त्यांना महाराज म्हणतात,
“तुम्ही थोरले महाराजापासून राज्याचे साधनास श्रमसाहस करीत आलात व करीत आहात. आमचा तो काळ समीप आला. आमच्यामागे सर्वत्र मिळोनी हल्ली करता तसे करावे. शिवाजी महाराज (शाहू महाराज) सुटोन येत ते करावे ...” त्यांच्या एका पत्रात एक उल्लेख अगदी स्पष्ट आहे ...”कारण चिरंजीव राजश्री (शाहू) काळे करून तरी श्री देसी आणील .. ते (शाहू महाराज) मुख्य, सर्व राज्यास अधिकार, आम्ही करतो तरी ते त्याचे साठीच आहे.”
राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांच्यातील प्रेम दाखवणारी अजून एक घटना म्हणजे ज्यावेळी राजाराम महाराज गेले ही बातमी येसूबाईसाहेबांना आणि शाहू महाराजांना कळली त्यानंतर शाहू महाराजांना खूप ताप आला होता आणि आजारी पडले होते, हे ऐकून बेगम खूप घाबरली आणि त्यामुळे स्वतः औरंगजेब बादशहा शाहूंना भेटायला आला होता, त्यावेळी तो म्हणतो:
“मुमचा चिचा मर गया, उस वास्ते तुमरी ताबियेत बिघड गयी, आजार हुवा?” खरे कारण जरी हेच असले तरी शाहू महाराज अशा क्षणी सूद्धा अगदी मुत्सद्दीपणे औरंगजेबास उत्तर देतात ते म्हणतात “आमचा बाप व चीच्या आब खुदावंत! दुसरे कोणी ठाऊक नाही. जर आमचे काका असते तर आमचा कबिला रायगडी ठेवून का जाते?”.
हे ऐकून औरंगजेब खुश झाला आणि म्हणाला ..
“तुम चिंता मत करो, दख्खनमें सब चोर, तुम साहू तुमारा राज तुमकु देऊंगा. तुम हमारे बेटीके बेटे हो. कूच फिकीर मत करो|”
कोणत्याही परिस्थिती शाहू महाराजांनी त्यांचे व राजाराम महाराजांचे संबंध औरंगजेबाला समजू दिले नाहीत. नेहमी औरंगजेबाची मर्जी राखली. कारण औरंगजेब केव्हा काय करेल याची कल्पना नव्हती. एखादा मनुष्य खडतर जीवनात यशस्वी होतो तो योग्य संस्कारांमुळे जर त्याला योग्य संस्कार मिळाले तर तो कोणत्याही संकटांना डगमगत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहू महाराज. कारण अशा बिकट परिस्थिती स्वतःला समतोल ठेवून वागावे लागते आणि यासाठी समतोल दृष्टी, धैर्य यांची गरज असते जे फ़क़्त संस्कारातून मिळते जे महाराणी येसूबाईसाहेबांनी केले.
याच काळात शाहू महाराजांनी आपली धर्मनिष्ठा दिसून येते, बेंद्रे म्हणतात इ.स. १७०० अखेरची नोंद अशी की, शाहूंबरोबर आलेले हिंदू कैदेत असताना शिजवलेले अन्न खात नाहीत. राजा शाहूही शिजवलेले अन्न न खाता फ़क़्त मेवामिठाईवरच जगतो. तेव्हा हमिदउद्दीन खानाबरोबर शाहू महाराजांना निरोप आला की, “तू कैदी नसून आपल्या घरीच राहत आहेस. तेव्हा तू अन्न शिजवून खाण्यास मोकळा आहेस. खाण्यात निर्बंद पाळण्याची आवश्यकता नाही.....” यावरून शाहू महाराज आणि इतर मंडळींनी आपला व्यवहार धर्मनिष्ठेने कसा करीत होते हे दिसून येते.
जसजसे शाहू मोठे होऊ लागले होते तसतसे त्यांच्यावर रखवाली करणे कठीण जाऊ लागले आणि हा धोका औरंगजेबास कळून आला आणि त्यावर एकच उपाय म्हणजे “धर्मांतर”.
९ मे १७०३ ची नोंद आहे. बादशाहने हमीदोद्धीनखानास सांगितले की “तुम्ही शाहुकडे जां, त्याला म्हणावे तू मुसलमान हो.” पण याचा कडाडून शाहू महाराजांनी विरोध केला आणि बादशाहने आज्ञा केली की “शाहुवर कडक नजर ठेवा.” धर्मांतराबाबत शाहू महाराज आणि महाराणी येसूबाईंनी बेगमची मदत घेऊन मध्यस्थी करावयास लावले. यावर औरंगजेबाने शाहू महाराज ऐवजी दुसरे दोन कोणीही प्रसिद्ध पुरुष जर धर्मांतरास तयार होत असतील तर शाहूपुरता हा निर्णय मी मागे घेतो असे सांगितले. धन्याच्या बचावासाठी खंडेराव गुजर व जगजीवन गुजर हे दोघे गुजर बंधू पुढे आले. १६ मे १७०३ रोजी मोहरमच्या मुहूर्तावर त्यांस मुसलमान केले आणि नावे अब्दुर्रहीम व अब्दूर्रहमान अशी ठेवली. हे उपकार शाहू महाराज विसरले नाहीत आणि पुढे साताऱ्यात आल्यावर त्यांना सालगाव हे गाव इनाम दिले. परळी (सातारा) येथे त्यांचे वंशज आजही आहेत.
( खंडेराव व जगजीवन गुजर म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजरांचे पुत्र होत. आणि छत्रपती राजाराम महाराजांचे मेव्हणे.)
इथे फ़क़्त एकच विचार करा....”जर औरंगजेब शाहू महाराजांना मुसलमान करण्यात यशस्वी झाला असता तर इतिहास काय घडला असता” मगच या घटनेचे गांभीर्य कळेल.
असा ठाम निर्णय घ्यायची ताकत शाहूमहाराजांना कुठून आली असेल हो? त्याचा विचार करता आपले लक्ष जाते ते म्हणजे फ़क़्त महाराणी येसूबाई साहेबांवर ! सतत १८ वर्षे महाराणी येसूबाईसाहेब अगदी सावली सारख्या शाहू महाराजांबरोबर राहिल्या.
शाहू महाराजांचा कैदेतील १८ वर्षांचा काल यावर खरच एक पुस्तक लिहिता येईल एवढे काही आहे. पुढच्या पोस्टमध्ये वैचारिक शाहू मांडेन त्यावेळी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू उजेडात येतील. एकंदरीत १८ वर्ष्यांच्या काळात त्यांच्यावर झालेले संस्कार आणि एकूण परिस्थितीचा पडलेला त्यांच्यावर प्रभाव व त्यातून झालेली त्यांची जडणघडण व त्यांची बनलेली वैचारिक दृष्टी राजनैतिक बैठक, त्यांच्या भावी आयुष्यास व मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.
============================================
संदर्भ : शोध प्रबंध : "छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा चिकित्सक अभ्यास: १६८२ ते १७४९"
संशोधक: दीपक वामनराव सूर्यवंशी.
No comments:
Post a Comment