विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 April 2023

⚔️🧡पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजीराव गोळे🧡⚔️

 


⚔️🧡पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजीराव गोळे🧡⚔️
लेखन : डॉ विवेक दलावे पाटील
पिलाजी गोळे यांचा जन्म १० जून १६४० रोजी जावळी खोऱ्यातील गोळे गणी या गावी झाला.
लहानपणापासूनच पिलाजी गोळे यांना स्वातंत्र्याचे वेड लागले होते. १६५६ साली छत्रपती शिवरायांनी चंद्रराव मोरे याचा वध करून जावळी खोरे जिंकून घेतले. तेव्हा जावळीतील काही घराणी स्वराज्याशी एकनिष्ठ झाली. त्यातच जावळीतील या गोळे घराण्याची नाळ स्वराज्याशी आणि छत्रपती शिवरायांशी जोडली गेली. १६५६ साली छत्रपती शिवराय व पिलाजी गोळे यांची १ ली भेट झाली. महाराजांनी १६ वर्षांच्या पिलाजी गोळे यांना हिंदवी स्वराज्याच्या सेवेत रुजू केले. कान्होजी जेधे देशमुख यांच्या हाताखाली पिलाजी गोळे यांना सोपवले. पुढे १६५९ पर्यंत पिलाजी गोळे यांनी युध्दकलेचे प्रशिक्षण पूर्ण केले.
१६५९ साली प्रतापगडच्या युद्धात कान्होजी जेधे यांच्या तुकडीत स्वतः पिलाजीराव गोळे सहभागी होते. महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर पिलाजीराव गोळे यांनी खानाच्या फौजेला पिटाळून लावले.
१६६३ साली लाल महालात छापा टाकताना छत्रपती शिवरायांनी पिलाजी गोळे यांना सोबत घेतले होते. महाराजांनी शाईस्त्याची बोटे छाटल्यानंतर पिलाजीराव गोळे यांनी सरदार कोयाजी बांदल व सर्जेराव जेधे यांच्यासोबत गनिमांची दाणादाण उडवली होती. लाल महालाबाहेर मोगली सैन्याची भयंकर कत्तल पिलाजीराव गोळे यांनी केली.
१६६४ साली सुरतेच्या लुटीत सुद्धा पिलाजीराव गोळे हे महाराजांसोबत होते. तिथे येसाजी कंक यांच्याबरोबरीने पिलाजी गोळे यांनी खूप मोठी लूट मिळवली होती. व लोहगड ते राजगड पर्यंत सुरतेची पहिली लूट ही याच पिलाजीराव गोळे यांनी सुखरूप पोहोचवली.
१६७४ साली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये पिलाजीराव गोळे उपस्थित होते. त्यांच्या या पराक्रमामुळे महाराजांनी त्यांना स्वतंत्र सरदारकी बहाल केली.
१६८० साली छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर फितुरांनी स्वराज्यात गदारोळ माजवला. रायगडाला वेढा टाकला. त्या वेळेस सरदार पिलाजी गोळे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजे यांना पाठिंबा दिला.
१६८१ साली छत्रपती शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये रायगडी सरदार पिलाजी गोळे उपस्थित होते. तेव्हा त्यांची स्वराज्यनिष्ठा पाहून शंभूराजे यांनी त्यांना हिंदवी स्वराज्याचे २ रे पायदळ प्रमुख सरनौबत बनवले.
१६८१ साली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी बऱ्हाणपूर मोहीम हाती घेतली. तेव्हा सोबत पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजी गोळे यांना घेतले होते. बऱ्हाणपूर प्रांतात पिलाजी गोळे यांनी खूप मोठी लुटालूट केली.. दिलेरखानाच्या फौजेची दाणादाण उडवली.
१६८९ साली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचे तुळापूर येथे बलिदान झाले. व रायगडावर राजारामराजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हा देखील सरनौबत पिलाजी गोळे उपस्थित होते. रायगडावरून छत्रपती राजाराम राजे हे काही एकनिष्ठ शिलेदारांसोबत गडउतार झाले. तेव्हा सरनौबत पिलाजी गोळे यांना त्यांनी सोबत घेतले होते.
सरनौबत पिलाजी गोळे यांनी छत्रपती राजाराम राजे यांना रायगड ते प्रतापगड पर्यंत सुखरूप पोहोचवले.
१६८९ साली सर्व मंडळी साताऱ्यात दाखल झाली. अन् प्रतापगडाला कातरखानाने वेढा दिला. त्या समयास सरनौबत पिलाजीराव गोळे त्याच्यावर चालून गेले. त्यांनी प्रतापगडाचा वेढा फोडून काढला आणि कातरखानाचा दारूण पराभव केला. प्रतापगडावर पुनर्विजय मिळवला.
डिसेंबर १६८९ साली छत्रपती राजाराम राजे जिंजीला पोहचले. पिलाजी गोळे देखील त्यांच्या सोबत जिंजीत दाखल झाले.
जिंजी ही स्वराज्याची ३ री राजधानी बनवली. व छत्रपती राजाराम राजे यांनी त्यांच्या रक्षणार्थ सरनौबत पिलाजी गोळे यांना जिंजीत थांबवून घेतले.
१६९३ साली झुल्फिारखानाने जिंजीला वेढा दिला. तेव्हा सरनौबत पिलाजी गोळे यांनी २ वर्षे गड लढवत ठेवला. शेवटी संताजी धनाजी या जोडगोळीने त्याचा वेढा फोडून पराभव केला.
१६९५ साली त्यांच्या या पराक्रमामुळे खूश होऊन छत्रपती राजारामराजे यांनी त्यांना जिंजीचे "तटरक्षक" म्हणून नेमले.
१६९७ साली छत्रपती राजाराम राजे यांच्या सोबत सरनौबत पिलाजी गोळे महाराष्ट्रात परतले. त्यावेळेस त्यांचे वय ५७ वर्षे इतके झाले. सततच्या दगदगीमुळे ते आजारी पडले. म्हणून तेव्हा त्यांनी पायदळ प्रमुख म्हणजे सरनौबत पदाचा राजीनामा दिला. व ते काही काळ त्यांच्या पिरंगुट या गावी वास्तव्यास गेले.
१६९७ ते १७०७ पुढची १० वर्षे ते स्वराज्यापासून दूर गेले. पिरंगुट या गावीच त्यांचं वास्तव्य राहिलं.
छत्रपती राजाराम राजे यांच्या शेवटच्या काळात व महाराणी ताराबाई यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांना स्वराज्य सेवा करता आली नाही.
मात्र १७०८ साली त्यांना पुन्हा उस्संत मिळाली. व ५ वे छत्रपती शाहू राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये ते सहभागी झाले. तिथे त्यांचा योग्य तो मान सन्मान झाला.
पुढे १७०९ साली छत्रपती शाहू राजे यांनी पिलाजीराव गोळे यांना पिसाळ देशमुख यांचा वाद मिटवायला सांगितला असा उल्लेख छत्रपती शाहू राजे यांच्या एका पत्रात आढळतो.
१७११ साली वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांच्या पिरंगुट या गावी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...