विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 April 2023

कुडतोजी गुजर ते प्रतापराव गुजर बनण्याची अपरिचित कहाणी

 


कुडतोजी गुजर ते प्रतापराव गुजर बनण्याची अपरिचित कहाणी
लेखन : डॉ विवेक दलावे पाटील
कुडतोजी:- राजे.. हा मिर्झा. पुरंदरच्या पायथ्याशी आपल्या रयतेचा छळ करतोय..याला आवर घालायला हवा.
महाराज:- हो कुडतोजी.. दिलेरखानाने तर पुरंदरला वेढा दिला. व मिर्झाराजे जयसिंह यांनी रयतेचा छळ करायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने आपण संकटात सापडलोय.
कुडतोजी:- राजे, आदेश द्या फक्त आता जातो आणि त्याच्या छावणीवर हल्ला चढवतो..!
महाराज:- नाही कुडतोजी, अहो हल्ले तर आपले नेताजीराव देखील चढवतायत.. मात्र हा मिर्झा स्वराज्यात येताना पूर्ण तयारीनिशी आलाय.. हे लक्षात घ्या.
अहो आपल्या सरनौबतांनी तर कात्रज घाटात मिर्झाच्या निम्म्या फौजेची गनिमी काव्याने लांडगेतोड केली. तरी देखील त्याची शिबंदी कमी होईना..!
( कुडतोजी गुजर यांनी राजांचे पाय धरले आणि..)
कुडतोजी:- राजे, आता मला जाऊद्या.. जगलो वाचलो तर पुन्हा याच चरणांचे दर्शन आम्हास घडेल..! येतो राजे..!
असे म्हणून कुडतोजी राजगडावरून गडउतार झाले. महाराजांना बोलायची उसंत मिळायच्या आत कुडतोजी यांनी राजगड सोडला. छत्रपती शिवरायांना कुडतोजी यांची चिंता वाटू लागली. वेड्याच्या भरात हे कुडतोजी जीवावर बेतेल अस धाडस तर करणार नाहीत ना.. अशी काळजी शिवरायांना वाटू लागली.महाराजांनी गुप्तहेर बहिर्जी नाईक यांना राजगडी बोलावले. बहिर्जी नाईक यांनी शिवरायांचा निरोप घेतला व राजगड सोडला. पण एवढ्यात कुडतोजी यांनी त्यांचा घोडा काढला. हातात समशेर घेतली. पाठीवर ढाल अडकवली...आणि घोड्यावर स्वार होऊन एकटे कुडतोजी गुजर हे मिर्झाच्या पुरंदरच्या छावणीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले.त्यांच्या घोड्याचा वेग इतका होता की पुढच्या अल्पावधीतच त्यांनी पुरंदरचा पायथा गाठला.आणि त्यांनी पाहिलं की गडाच्या पायथ्याशी या मिर्झाराजे जयसिंह याने तळ ठोकला होता. त्याच्या छावण्यांचा खच पडला होता. जवळ जवळ ३ लाखांची गनिम फौज ही छावणीत तैनात होती. सर्व इस्तंभूत माहिती कुडतोजी गुजर यांनी काढली. विचार करण्याजोगी गोष्ट आहे की एका बाजूला आपले एकटे कुडतोजी गुजर अन् दुसऱ्या बाजूला मिर्झाची ३ लाखांची फौज..! पण नमतील ते कुडतोजी कसले. त्यांनी मनाशी निश्चय केला की जीव गेला तरी बेहत्तर पण आज या मिर्झाराजे जयसिंह याला यमसदनी पाठवणार म्हणजे पाठवणारचं..!
पण त्याच्यापर्यंत पोहोचायच म्हणजे हे ३ लाखांचे शत्रूचे चक्रव्यूव्ह भेदावे लागणार होते.गनिमी काव्याने ते शक्य नव्हते. इथे शक्ती पेक्षा युक्तीला प्राधान्य द्यावे लागणार होते हे कुडतोजी गुजर यांनी ओळखले. आणि ठरल्याप्रमाणे ते मोगली हाशामांजवळ पोहोचले. व तिथे कुडतोजी गुजर यांना २ शिपायांनी रोखले. विचारलं की कोण आहात आपण आणि इथे कशाला आलात..?
यावर कुडतोजी म्हणाले, आम्ही मिर्झाराजे यांच्या फौजेतील एक रजपूत सरदार आहोत.. एक अत्यंत महत्वाचा खलिता घेऊन आलोय त्यांच्यासाठी.अस म्हणताच त्या शिपायांनी कुडतोजी गुजर यांची वाट मोकळी केली. कुडतोजी गुजर यांनी आत प्रवेश केला. आणि प्रत्येक पहाऱ्यावर ते हेच कारण सांगू लागले. व हे अशक्य वाटणारे ३ लाखांचे चक्रव्यूह कुडतोजी गुजर यांनी पोखरून काढले. व मिर्झाराजे जयसिंह याच्या मुख्य तंबूपर्यंत पोहोचले. मिर्झाराजेच्या छावणीभोवती ५०-६० गनिम पहारा देत होते. आता यांचा सामना करूनच छावणीत शिरावे लागणार होते. व कुडतोजी गुजर यांनी तलवार बाहेर काढली. तसे ते एका एका शिपायावर वार करू लागले. कुडतोजी गुजर यांच्या तलवारीखाली छावणी बाहेरील एक एक गनिम घायाळ होऊन पडू लागले.१०-१५ गनिमांचा पाडाव कुडतोजी यांनी केला. एवढ्यात छावणी बाहेरील राहिलेल्या ३५ हशमांनी कुडतोजी गुजर यांना चारी बाजूने घेरले. मध्ये एकटे कुडतोजी व बाजूने ही ३५ लांडगी..!
व या ३५ गनिमांनी कुडतोजी गुजर यांच्यावर एकत्रित एकाच वेळी वार करायला सुरुवात केली. मात्र कुडतोजी गुजर हे सुद्धा तयारीनिशी आले होते. त्यांनी या टोळक्याचे वार स्वतःच्या ढालीवर घ्यायला सुरूवात केली. शत्रूसैन्याचे प्रत्येक वार कुडतोजी यांनी उधळून लावले. व त्यांनी त्या ३५ गनिमांवर पलटवार करायला सुरुवात केली. तसा एक एक गनिम हा मृत्युमुखी पडू लागला. रक्ताचे सडे पाडायला किल्लेदार कुडतोजी गुजर यांनी सुरूवात केली. आणि बघता बघता त्या सर्व राहिलेल्या ३५ गनिमांचा वध कुडतोजी गुजर यांनी केला. व थेट मिर्झाराजे जयसिंह याच्या छावणीतच प्रवेश केला. कुडतोजी तंबूत शिरले. त्यांनी अजून त्यांची तलवार म्यान केली नव्हती. व ते थेट मिर्झाराजे जयसिंह याच्याशी भिडू लागले. कुडतोजी गुजर यांनी मिर्झाराजे जयसिंह वर प्रहार केला. तसा मिर्झा रक्तबंबाळ झाला. कुडतोजी गुजर यांच्या पहिल्याच घावात या मिर्झाराजे याचं रक्त आपल्या पुरंदरच्या पायथ्याशी सांडले. व मिर्झालाही कळेना की नेमका हा काय प्रकार आहे. पण त्याच्या लक्षात आलं की हा सरदार आपला जीव घेण्यासाठी आलाय. मग मिर्झाने सुद्धा त्याची तलवार काढली. व तो देखील कुडतोजी गुजर यांच्याशी लढू लागला. मिर्झा कुडतोजी यांचे प्रत्येक वार उधळून लावू लागला. पण कुडतोजी गुजर त्याच्यावर वार करतच राहिले. व अजून एक कुडतोजी यांचा पुढचा वार इतका मोठा होता की त्या वाराचा जबरदस्त आघात मिर्झाच्या उजव्या दंडात झाला.इंच इंच जखमा मिर्झाच्या शरीरावर कुडतोजी गुजर यांनी केल्या होत्या.
एवढ्यात ही घटना बाहेरील काही शिपायांनी पाहिली.त्यांना कळलं की मिर्झाराजे जयसिंह यांचा जीव धोक्यात आहे. म्हणून २० ते २५ शिपाई हे मिर्झाराजे यांच्या छावणीत शिरले. व कुडतोजी गुजर यांना त्यांनी मागून कैद केले. आपले कुडतोजी जेरबंद झाले. घडणारी घटना नाईकांचे हेर तिथून बघत होते.
मात्र काही करता येत नव्हते. शेवटी ते फक्त हेर होते. मिर्झाचे नशीब बलवत्तर म्हणून कुडतोजी गुजर कैद झाले... आणि मिर्झाचे प्राण वाचले.
मिर्झाराजे:- कोण आहेस तू..? आणि एवढ्या ३ लाखांच्या गराड्यातून आत कसा काय शिरलास..?
कुडतोजी:- कुडतोजी गुजर म्हणत्यात आम्हास..! आम्ही चाकणचे किल्लेदार आहोत.
मिर्झाराजे:- तू शिवाजीराजांचाच मावळा आहेस ना..?
कुडतोजी:- होय.. त्यांचाच मावळा आहे मी..!
मिर्झाराजे:- अरे पण मला मारून तुला किंवा तुझ्या राजांना काय मिळणार आहे..?
कुडतोजी:- ओ मिर्झाराजे.. मिळणार काय हे माहीत नाय.. पण तुमच्या अन् दिलेरखानाच्या रूपात स्वराज्यावर चालून आलेले राहू केतू नष्ट होतील.. एवढं मात्र खरं आहे.मिर्झाराजे या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला रजपूतांचं रक्त नाय सांडायचं.. म्हणून तुम्हाला वेळीच सावध करतोय... आल्या पावली परत आग्र्याला निघून जा.
मिर्झाराजे:- मला आपला पराक्रम आवडला कुडतोजी..! माझी एक विनंती आहे तुमच्याकडे..!
कुडतोजी:- बोला.
मिर्झाराजे:- कुडतोजी तुम्ही माझ्या पदरी यावे असे मला वाटते..!
कुडतोजी:- काय..? म्हणजे शिवरायांचा विश्वासघात करायचा.. हिंदवी स्वराज्याशी फितुरी करायला आपण सांगताय.. अन् ते या कुलत्पंन कुडतोजी गुजरास..! अरे हाट... जीव गेला तरी बेहत्तर पण असले यवनी विचार माझ्या काय स्वराज्यातील कोणत्याच शिलेदारांच्या जवळ पास सुद्धा फिरकत नाहीत.अहो माझ्या हाता पायात काढण्या घातल्या.. मला जेरबंद केलं म्हणून आमची निष्ठा तुम्ही जेरबंद करू शकत नाही...! माझी निष्ठा अढळ आहे.
मिर्झाराजे:- कुडतोजी मागाल ते तुमच्या पायाशी आणून ठेवू..! विचार करावा.
कुडतोजी:- मिर्झा, या क्षणाला माझं मस्तक जरी कलम केलं तरी त्याची मला पर्वा नाही. या कुडतोजी गुजराचे मस्तक फक्त शिवरायांसमोरचं झुकणार..! आमची निष्ठा ही फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणाशी आहे. लोळण घालायची तर ती आम्ही आमच्या राजांच्या चरणाशी घालू.. कुणा यवनाच्या नाही..!
मिर्झाराजे:- कुडतोजी, तोंड सांभाळून बोला.. आम्ही साक्षात प्रभू श्रीरामचंद्राचे थेट वंशज आहोत.. पराक्रमी रजपूत आहोत..!
कुडतोजी:- ओ मिर्झा, तुम्ही आमच्या रामरायाचे वंशज आहात हे आम्हा सर्वांचं दुर्दैव आहे. आपण चाकरी त्या यवनांची करता.. मग आपण देखील आमच्यासाठी यवनचं..!
तंबूत पूर्ण शांतता पसरली होती. शत्रूच्या गोटात असून देखील कुडतोजी त्या मिर्झाला जशास तशी उत्तरे देत होते. शेवटी अक्षरशः मिर्झाराजे जयसिंह कुडतोजी यांना शरण आला. तो गुडघ्यावर बसला. त्याच्याकडे बघून त्याचे शिपाई देखील अचंबित झाले.
मिर्झाराजे:- कुडतोजी, आम्हास देखील स्वराज्यावर आक्रमण करायचे नाही पण मला आग्र्याचा तसा आदेश.. मी तरी काय करणार.. पण आपण स्वामिनिष्ठेचे कळस आहात. हे मी ओळखले. आपल्या राजावरची निष्ठा काय असते हे आपण दाखवून दिलंत..! म्हणून आम्ही आपणास अभय देत आहोत.
कुडतोजी:- अभय.?
मिर्झाराजे:- हो कुडतोजी, अभय..! अहो लढाईत कैद झालेला सरदार हा पुढच्याला शरण येतो. व तो पुढचा त्याला अभय देतो.मात्र या लढाईत कुडतोजी तुम्ही कैद झालात तरी देखील आम्ही तुम्हाला शरण आलो..! जा कुडतोजी.. बिनधास्त जा.. माझा एकही शिपाई तुम्हाला अडवणार नाही. आणि हो जाताना पायी जायचं नाही. तर तुम्हाला मी एक घोडा भेट देत आहे.त्याच्यावर स्वार होऊन जावे अशी विनंती आहे तुमच्याकडे..!
असे म्हणताच किल्लेदार कुडतोजी गुजर नव्या घोड्यावर स्वार झाले.. व राजगडाच्या दिशेने दौडू लागले. लगेच पुढे बहिर्जी नाईक हेरांना घेऊन राजगडी गेले. तिथे त्यांनी कुडतोजी यांची सगळी हकीकत सांगितली. एवढ्यात कुडतोजी गुजर देखील राजगडावर आले. व तिथे महाराज आणि किल्लेदार कुडतोजी गुजर यांचा संवाद सुरू झाला.
महाराज:- कुडतोजी हे काय ऐकतोय आम्ही.. आपण एकटे मिर्झाच्या ३ लाखांच्या छावणीत शिरलात. तेही आम्हाला न सांगता.
कुडतोजी:- राजे याबद्दल आम्हास क्षमा करा. मात्र जे केले ते स्वराज्य हितासाठीच..! यात आमचा कोणताच हेतू नव्हता.
महाराज:- अहो कुडतोजी ते आम्ही जाणतो. त्याबद्दल आम्हाला शंकाच नाही. मात्र हे वेड धाडस कशासाठी? आपल्या जीवाचं काही बर वाईट झालं असतं म्हणजे..!
कुडतोजी:- राजे आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही.. आम्हाला फक्त स्वराज्य हित दिसतं.
महाराज:- हो पण एका मिर्झासाठी आपल्या सारख्या पराक्रमी योद्ध्याने खर्ची पडणे हे आम्ही कधीही सहन करणार नाही. अहो आमच्या नेताजीरावांनंतर तुम्ही ज्येष्ठ आहात.. जवळचे आहात. त्यांच्यानंतर आम्ही तुमच्याकडेच पाहतो. त्यामुळे परत हे असे वेडे धाडस करू नये अशी आमची आज्ञा आहे.
कुडतोजी:- ठीक आहे राजे.. परत अशी आगळीक घडणार नाही. आमचे वचन आहे आपणास.. आज्ञा असावी आता.
महाराज:- थांबा कुडतोजी.. असं मोकळ्या हातांनी परत जाणार का.?
कुडतोजी:- म्हणजे?
महाराज:- अहो तुमचा सारा पराक्रम आम्हास बहिर्जी नाईक यांनी ऐकवलाय. अहो शत्रूने आपणास अभय दिले.. आपण मृत्यूच्या दाढेतून परत आलात कुडतोजी ही काय साधी सुधी बाब नाही. याची कदर आम्ही करणारच..! आम्ही तुम्हाला "प्रतापराव" असा किताब बहाल करतोय. आजपासून तुम्ही प्रतापराव गुजर या नावाने ओळखले जाल..!
कुडतोजी:- राजे.. धन्य आहात आपण..! व नशीबवान आहोत आम्ही..! ऐसा धनी आम्हास लाभला..!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...