पुण्यातला डेंगळे पूल
लेखन ::सुमित अनिल डेंगळे
‘डेंगळे पूल’ पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. शिवाजीनगरहून रेल्वे स्टेशन, कँप, हडपसरकडे जायचं म्हंटलं की या पूलाचा वापर केला जातो. परंतु अनेकांना ज्यांच्या नावानं हा पूल आहे ते ‘डेंगळे’ नेमकी कोण हे माहीत नसतं.
ते डेंगळे म्हणजे शेवटच्या पेशव्यांचे सरदार ‘त्रिंबकजी डेंगळे’. त्यांनीच एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला (म्हणजे 1800-1818 मध्ये कधीतरी) हा पूल बांधला. पूर्वी या पूलाजवळ सतराव्या शतकातला एक जुना पूल होता. त्रिंबकजींनी तिथं दगडाचा नवा पूल बांधून घेतला. त्यावेळी पुण्याचा विस्तार आजच्यासारखा नदीच्या उत्तरेला नव्हता. पुणं हे मुठा नदीच्या दक्षिणेला होतं. पलीकडं भांबुर्डा (भांबवडा) नावाचं गाव होतं, ज्याला आज आपण शिवाजीनगर म्हणतो. तिथं पेशव्यांचा तोफखाना होता. ते या पूलानं जोडलं गेलं.
अर्थात डेंगळे पूल हे नाव काही त्या पूलाला त्यावेळी देण्यात आलं नव्हतं. तो बांधल्यानंतर काही वर्षांतच मराठ्यांचं राज्य गेलं. परंतु लोक डेंगळेंनी बांधला म्हणून त्याला डेंगळे पूल म्हणू लागले. आणि ते नाव रूढ झालं. 1970 ला पुणे महापालिकेने या पूलावर नवा पूल बांधला, जो आपल्याला आज दिसतोय. 2016 मध्ये हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला. अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. त्याच्याजवळ समांतर नव्या पूलाची उभारणी करण्यात आली. त्या पूलाला ‘शाहू सेतू’ असं नाव देण्यात आलं. त्यानं वाहतुक बरीचशी विभागली गेली.
आता डेंगळे पूलाच्या डागडुजीचं काम सुरू होणार आहे. पूलाच्या रचनेबरोबर त्याच्या नावाचीही डागडुजी व्हायला हवी. त्याचं नाव ‘सरदार त्रिंबकजी डेंगळे पूल’ व्हायला हवं. इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या, अखेरच्या काळात मराठेशाही सावरून धरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, राज्यात भिल्ल, मातंग, रामोशी समाज ब्रिटिशांविरुद्ध संघटित करणाऱ्या त्रिंबकजी डेंगळे यांच्या स्मृती त्यानिमित्तानं जतन व्हायला हव्यात.
No comments:
Post a Comment