विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 3 April 2023

सरदार बाणाजी शेटेंची ‘सोनई’

 





सरदार बाणाजी शेटेंची ‘सोनई’
लेखन ::सुमित अनिल डेंगळे
सोनई म्हणजे नगर जिल्ह्यातलं मोठं गाव. सध्या नेवासे तालुक्यात आहे. राहुरीहून शनीशिंगणापूरला जाताना हे गाव लागतं. नगरचे खासदार राहिलेले, ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख याच गावचे. त्यांचे पुत्र शंकरराव हे मागच्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मृद व जलसंधारण मंत्री होते.
1802 साली यशवंतराव होळकरांनी गंगाथडी भागात केलेल्या लूटीविषयी मी अभ्यास करत होतो. गंगाथडी म्हणजे गोदावरीच्या खोऱ्यात असणारा नाशिकपासून पैठणपर्यंतचा प्रदेश. प्रामुख्यानं आमचा उत्तर नगर जिल्हा. इथली काही गावं ग्वाल्हेरकर शिंदे व त्यांच्या सरदारांच्या जहागिरीतली होती. शिंदे आणि होळकरांचं वैर असल्यानं ही गावं यशवंतरावांच्या निशाण्यावर होती. त्यांनी रायाजी पाटील शिंदे, रामजी पाटील जाधव व बाणाजी शेटे या शिंद्यांच्या सरदारांची गावं लूटली असं वाचनात आलं. यापैकी रायाजी हे कोपरगाव तालुक्यातील वारीचे तर रामजी संगमनेर तालुक्यातील पानोडीचे, हे माहीत होतं. दोघांवर त्यांच्या घराण्यातील अनुक्रमे रमेशराव शिंदे (नाशिक) व विलासराव जाधव (संगमनेर) हे संशोधन करत आहेत. त्यांची चरित्रे आगामी काळात समोर येतीलच. बाणाजी नेमके कुठले वगैरे काही माहिती नव्हतं. तशी शेटे आडनावाची मंडळी सोनई, शनिशिंगणापूर भागात असल्याचं ऐकिवात होतं. पण बाणाजींचं नाव किंवा ते ठराविक घराणं बिलकुल लौकिकात नव्हतं. कदाचित वंश ग्वाल्हेरला असावा, असंच मी गृहीत धरलं होतं.
काही दिवसांपूर्वी सोनईला गेलो. गावातलं यादवकालीन महादेवाचं मंदिर आणि बालाजी मंदिर आम्हाला पहायचं होतं. माझ्यासोबत राहात्याचे इतिहास अभ्यासक अविनाश हजारे होते. बालाजी मंदिराजवळ एका बाईंशी बोलत होतो. ‘गावात शेटेंचा वाडा आहे का’ असं मधूनच मी त्यांना विचारलं. त्यांनी गावच्या पेठेत वाडा असल्याचं सांगितलं. सोनईची पेठ मोठी आहे. पेठेत गेल्यावर एक वाडा दिसला. वाडा पाहताच मी थक्क झालो. हा वाडा कुणा सामान्य वतनदाराचा नसणार हे निश्चित होतं. तो शेटेंचाच वाडा होता. आतून पडलेला. वाड्यात कुणीही राहत नव्हतं. त्याचे मालक सचिन शेटे पाटील गावात राहतात असं कळलं. मग विचारत विचारत त्यांच्या घरी गेलो. सचिनजी व त्यांच्या पत्नी वैशाली भेटल्या. ती मंडळी तर आश्चर्यचकितच झाली. त्यांनी आम्हाला जेव्हढी ऐकीव माहिती होती तेव्हढी सांगितली. इतर भाऊबंदांशी फोनवर वगैरे बोलणं झालं. त्यांच्या घराण्याचं पूर्वीचं मोठेपण व वाडा कसा होता हे त्यांनी सांगितलं. मग त्यांच्याकडे असलेली काही मोजकी कागदपत्रं दाखवली. बाणाजींचं नाव त्यात दिसलं नी बऱ्याच दिवसांपासून डोक्यात घोळत असलेल्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला. अलिजाबहाद्दर दौलतराव शिंद्यांनी जहागीर दिल्याचं त्यात धडधडीत म्हंटलं होतं.
माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, कृष्णाजी व बाणाजी हे दोन बंधू होते. सुरुवातीला ते शिंदेशाहीत (महादजींच्या काळात) साधे नोकर होते. कर्तृत्वाच्या जोरावर शिंद्यांचे सरदार झाले. पुढे दौलतराव शिंदेंच्या काळात त्यांचं स्थान खूप उंचावलं. मोठे कृष्णाजी वारले. तर बाणाजी उत्तरोत्तर सर्जेराव घाटगे आणि बाळोबा पागनीस यांच्यासारखे दौलतरावांचे निकटवर्तीय बनले. शिंद्यांचे कारभारी झाले. अहमदनगरच्या किल्ल्याचे ते किल्लेदार देखील होते.
बाणाजींवर संशोधनाला वाव आहे. असो. एखाद्या ऐतिहासिक घराण्याला भेट देणारे आपण पहिलेच इतिहास अभ्यासक असलो, काहीतरी नवं हुडकून काढलं, ऐकीव माहितीला भक्कम लिखित संदर्भ सापडला, सगळं काही आपल्या कल्पनेच्या साच्यात फिट्ट बसलं की होणारा आनंद काही वेगळाच असतो, हे मात्र खरं.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...