अचाट धाडस, अतुलनीय शौर्य आणि बळकट स्वराज्यनिष्ठा असलेले सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करून गेले..!!
स्वराज्यसेवेत असलेल्या नरवीरांच्या मांदीयाळीतले तानाजीराव आणी सूर्याजीराव हे दोघेही मालुसरे बंधू मुळचे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडीच, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले.
तानाजी हे हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत शिवाजी महाराजांबरोबर होते. सन १६५९ च्या आदिलशाही सरदार अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनीही ह्या सैन्याच्या बरोबरीने प्रतापगडाच्या जंगलात खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती.
सन १६६१ मध्ये महाराजांनी कोकण प्रांतातील स्वारीत दाभोळ, संगमेश्वर काबीज करून तानाजी मालुसरे, त्र्यंबक भास्कर, पिलाजी निळकंठराव सरनाईक ह्यांना तेथे ठेवले होते. त्यावेळी दाभोळचे जहागिरदार जसवंतराव दळवी आणि शृंगारपुरचे सूर्यराव सुर्व्यांनी तानाजीच्या फौजेवर अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी सरनाईक पळत होते. परंतु तानाजींनी न डगमगता अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून त्यांच्या फौजेचा पराभव करून त्याना पळवून लावले आणि मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजींवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना पुढे त्यांनी स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाही सहभाग होता.
सन १६७० मध्ये स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी राजगडावर आलेले असताना फक्त जिजाऊ साहेबांच्या इच्छेखातर, जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला.
एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते.
त्यांच्याबरोबर बंधू सुर्याजीरावही साथीला होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा मागच्या बाजूला असलेला प्रचंड असा डोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे चिवट मावळ्यांबरोबर हा कडा चढून जाऊन त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या डाव्या हातात असलेली त्यांची ढाल तुटली. पण क्षणातच त्यांनी डाव्या हाताला शेला गुंडाळून तशाच परिस्थितीत उदयभानवर पुन्हा हल्ला केला. पण शेला गुंडाळलेल्या हातावर दुधारी तलवारीचे किती घाव सोसावणार..?? तानाजीरावांचा हात काकडी चोचवावी तसा चोचवला गेला.
उदयभानचे वार तानाजीरावांच्या वर्मी लागत होते पण तरीही शेवटच्या ही क्षणात उदयभानाला निपचित पाडूनच तानाजींनी प्राण सोडले. ही घटना माघ वद्य ९, शुक्रवारी ४ फेब्रुवारी १६७० रोजीच्या मध्यरात्री घडली.
तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.
अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे.
कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात परत आणताना नरवीर तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
*नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्यासह स्वराज्यकामी धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात वीरांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम..!!!*
© विवेक जोशी
ऐतिहासिक लेख वाचण्यासाठी आमच्या whats app group ला जॉइन करा..!
इतिहास विषय app download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
No comments:
Post a Comment