म्हणून शिवरायांनी जावळी जिंकून घेतली...
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
जावळीच्या
जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा तर बाहेर काढलाच पण
त्याच बरोबर आदिलशहाच्या सैन्याची अशी काही लांडगेतोड केली की जावळी
म्हटली की आदिलशाही सैन्याच्या पोटात पुढे कित्येक वर्ष गोळाच यायचा.
जावळीला असामान्य भौगोलिक महत्व आह. जावळीचा भूभाग जर योग्य नियोजन करून
वापरला तर मूठभर शिबंदी हजारोंच्या फौजेला देखील धूळ चारू शकते. म्हणून
जावळीच्या स्वामीला 'चंद्ररावाला' महाराजांनी हिंदवी स्वराज्यात दाखल
करायचा प्रयत्न केला पण हा चंद्रराव फारच उर्मट. बघुयात आजच्या व्हिडिओत
की चंद्ररावाने महाराजांशी अशी काय बत्तमीजी केली की महाराजांना जावळीवर
हल्ला करून ती जिंकावी लागली आणि या चंद्ररावाचा शिरच्छेद करावा लागला.
हाच लेख व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
महाराष्ट्राच्या
भूगोलाची मदत घेऊन सपशेल कापली गेलेली, अफझलखानाची फौज हि काही पहिली फौज
नव्हती. पंधराव्या शतकात बहमनी सुलतानाची दहा हजारची फौज अशीच
शिर्क्यांनी आणि मोऱ्यांनी कापून काढली होती. यामुळेच जावळीच्या
प्रदेशालासुद्धा असच महत्व होतं. या जावळीवर मोऱ्यांचं परंपरागत राज्य
होतं. आदिलशहाने यांना 'चंद्रराव' असा 'किताब दिला होता. १६४७ मध्ये
चंद्ररावाचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे आणि त्याला कोणीच वारस नसल्यामुळे.
यामुळे आदिलशहा कोणा दुसऱ्याला जावळीचा प्रदेश देऊन टाकणार होता. यावेळी
या चंद्ररावाच्या आईने माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.
यावेळी मनात आणलं असतं तर अख्या जावळीवर कब्जा करण महाराजांना सहज शक्य
होतं. पण महाराजांचा स्वभावच दानशूर. महाराजांनी माणकाईला तिच्या पसंतीचा
मुलगा दत्तक म्हणून दिला, आता हा दत्तक मुलगा काही ४-५ वर्षांचा नव्हता,
चांगला तिशी पस्तिशीतला होता. याच नाव बहुदा 'यशवंतराव' होत. सोयीसाठी
याचा उल्लेख पुढे 'चंद्रराव' म्हणूनच करू. याला शिवाजी महाराजांनी मदत
केल्यामुळे जावळी मिळाली आणि तो स्वतः चंद्रराव म्हणजे जावळीचा मालकसुद्धा
झाला. महाराजांची अपेक्षा होती कि त्याच्यावर केलेल्या उपकारांमुळे तो
पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याला हातभार लावेल. पण कसलं काय? चंद्रराव बनताच
आणि जावळी सारखी दाट अरण्यातली गुहा मिळताच हा चंद्रराव भारीच माजला.
हळूहळू
तो आपले रंग महाराजांना दाखवायला लागला. गुंजण मावळची देशमुखी
शिळमकरांकडे होती. चंद्रराव त्यावर आपला हक्क सांगू लागला. महाराजांनी
निर्णय देऊन शिळमकरांना सांगितलं की हि देखमुखी तुमच्याकडेच राहील.
चंद्ररावाविरुद्ध निर्णय दिल्याने ते चिडले पण त्यांनी राग मनातच ठेवला.
याच दरम्यान मुसे खोऱ्यातल्या रंगो त्रिमल या कुलकर्ण्याने एका विधवेशी
हाऊबाईशी बदअमल केला. पूर्वी रांझ्याच्या पाटलाने बदअमल केल्यावर
महाराजांनी त्याची काय गत केली होती हे सर्वांनाच ठाऊक आहे. या भीतीने
रंगो त्रिमल घाबरला. आणि या रंगो त्रिमलला चंद्ररावाने पाठीशी घातलं.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून फक्त चंद्ररावाने या रंगो त्रिमलला
पाठीशी घातलं. महाराजांना कळलं आणि अतोनात संताप आला पण त्यांनी संयम
ठेवला. आणि तसही शिवाजी महाराजांच्या न्यायाचा रंगो त्रिमल सारख्या
गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये इतका दरारा होता की काही दिवसात या
भीतीनेच रंगो त्रिमल मेला. चंद्ररावाचा हा दुसरा गुन्हा झाला.
चंद्ररावाचा
कारभारी हणमंतराव मोरे तर त्याचे अजूनच कान भरू लागला. मोऱ्यांच हे
स्वैराचारी वागणं पाहून राजांच्या ध्यानात आलं की चंद्रराव मोरे स्वतःला
राजे समजायला लागलेत आणि केलेलं उपकार विसरायला लागलेत. त्यांच्या
स्वाराचारालाआळा घालावा आणि जमल्यास त्यांचं डोकं ताळ्यावर आणावं म्हणून
शिवरायांनी आधी सामोपचाराचा मार्ग निवडला. त्यांनी जावळी आणि चंद्ररावावर
हल्ला न करता एक खरमरीत पत्र पाठवलं. पत्रात राजे म्हणतात
"....तुम्ही
मुस्तफद राजे म्हणविता. म्हणजे तुम्ही स्वतःला राजे समजायला लागलायत)राजे
आम्ही! आम्हास श्री शंभुंनी राज्य दिधले. तरी तुम्ही राजे न म्हणवावें.
नाही तर बदफैल करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हांस कैद करून ठेवू....."
आता खरं शहाण्याला शब्दांचा मार पुरे असतो. पण गुर्मी चंद्ररावाच्या
नसानसात शिरली होती. त्याने आपल्या कारभाऱ्याच्या हनुमंतरावाच्या
सल्ल्याने पत्राच उर्मट उत्तर लिहिलं. हा दीड शहाणा शिवाजी महाराजांना
म्हणे
".......तुम्ही
काल राजे जाहला तुम्हास राज्य कोण्ही दिधले! (म्हणजे ज्या माणसाला शिवाजी
महाराजांनी जावळी मिळवून चंद्रराव केलं तो राजांनाच विचारतोय तुम्हाला
राज्य कोणी दिलं, काय म्हणावं आता याला) मुस्तफद राजा आपले घरी
म्ह्टलीयावर कोण मानितो? (आहे राजांनाच विचारतोय तुम्हाला कोण राजा मानतय
म्हणून?) तुम्ही लिहिले की जावळीत येऊ ! येता जावळी जात गोवळी ! पुढे एक
मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. उदईक येणार ते आजच या !" हि हिम्मत
मोऱ्यांची पुढे चंद्रराव म्हणे "आम्हास श्रीचे कृपेने बादशहाने राजे
किताब, मोर्चेल, सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. आम्ही दरपिढी राज्य जावळीचे
करतो. येथे उपाय कराल तर अपाय होईल" ज्या माणसावर उपकार करून महाराजांनी
दत्तकविधी पूर्ण करवला, त्याला जावळी दिली तो महाराजांवरच उलटला आणि जो
बादशहा हि जावळी दुसऱ्या कोणाला देऊ पाहत होता त्यानेच ती आपल्याला दिली
असं हा चंद्रराव म्हणे. महाराजांनी आता शेवटच निकराच पत्र लिहिलं महाराज
म्हणाले
"...जावळी खाली करून, हात रुमाल बांधून, राजे न म्हणवून हुजुरची चाकरी करणे. बदफैली केलिया मारले जाल..."
पण
या मोऱ्यांचा अंत जवळ आलेला त्यांना दुर्बुद्धीच सुचली या अखेरच्या
चेतावणीलासुद्धा चंद्ररावाचा उद्धट जवाब आला तो म्हणे "...जावळीस येणारच
तरी यावे. दारुगोळा महझूद आहे..." आता या शिशुपालाचे शंभर अपराध भरले.
महाराजांचा निश्चय झाला चंद्रराव बद्तमीज जावळीच्या अवघड जागेची आणि हजार
स्वारांची नशा चढली. ती उतरावयला पाहिजे. महाराजांनी लगेच कान्होजी जेधे,
हैबतराव शिळमकर, संभाजी कोंढाळकर, रघुनाथपंत सगळ्यांना बोलावण धाडलं आणि
जावळीवर हल्ला करायचं निश्चित केलं.
सर्वप्रथम
महाराजांनी काही फौज मॅपमध्ये दिसतेय तिथून रदतुंडीच्या घाटाने जावळीच्या
दिशेने धाडली. चंद्रराव मोऱ्यासकट सगळे तिकडे धावले. याचा फायदा घेऊन
राजे स्वतः निसणीच्या घटकडून कडून जावळीत शिरले. इथेच महाराजांना मुरार
बाजी हे रत्न सापडलं. मुरार बाजींच्या तलवारीची धार पाहून राजे बहुत खुश
झाले. त्यांनी मुरार बाजींना समजावलं कि तुमची समशेर हिंदवी स्वराज्यासाठी
चालवा. शत्रूच्या गोटातूनही योग्य माणस हेरून निवडायचं कसब महाराजांमध्ये
होतं. असो जावळी महाराजांच्या हाती जाताच मिश्यांना उगाच पीळ देणारे शूर
मोरे रायगडावर पळून गेले. यावेळी रायगड मोऱ्यांकडे होता त्यावेळी याच नाव
रायरी होतं. महाराजांनी रायगडाला वेढा घातला. एक महिन्यानंतर मोऱ्यांनी
तलवार ठेवली पण तेही नाटकच. तलवार ठेवली आणि लेखणी उचलून आदिलशाहीत
घोरपडेंशी सूत जुळवायचा प्रयत्न चंद्रराव करू लागले. महाराजांना एव्हढं
होऊनसुद्धा चंद्रराव हिंदीव स्वराज्याच्या बाजूने आले तर हवेच होता, पण
त्यांनी घोरपडेंना लिहिलेली पत्र पकडली जाताच महाराजांचा निश्चय झाला.
राजांनी चंद्ररावाची आणि त्याच्या दोन्ही मुलांची गर्दन मारायची आज्ञा
दिली. यातील एक मुलगा पळून गेला. या चंद्ररावाचा भाऊबंद प्रतापराव पळून
आदिलशहाकडे गेला आणि पुढे काही महिन्यांनी अफझलखानसोबत परत स्वराज्यावर
चालून आला. असो शिवाजी महाराजांनी संयम राखून चंद्ररावाचा आणि
त्याच्यासारख्या कित्येक मराठी माणसांचा उद्धटपणा सहन करून त्यांना हिंदवी
स्वराज्याच्या कार्यात सामील करून घायचा प्रयत्न केला पण काही लोक
कर्मदरिद्रीच राहिली. मोर्यांची जावळी आयटी हातात येऊनसुद्धा महाराजांनी
चंद्ररावाला ती बहाल केली यातून शिवाजी महाराज शत्रूला दगा देत, शत्रूचा
विश्वासघात करीत पण आपल्याच आप्तस्वकियांचा विश्वासघात त्यांनी कधीच केला
नाही हे स्पष्ट दिसून येत. अशारितीने जावळी महाराजांच्या ताब्यात आली.
जावळी हाताशी असेल तर शत्रूची हजारोंची फौजसुद्धा त्यासमोर नामोहरम होईल.
आणि याची प्रचिती लगेच आदिलशाहीला आली. अफझलखान याच जावळीत मारायला
स्वतःहून आला आणि आपल्या फौजेलाही आणलं. पुढे शिवाजी महाराज आणि त्यांच्या
सैन्याने काय इतिहास घडवला हे आपल्याला ज्ञातच आहे. जस शिवधनुष्याचे बरेच
उपयोग होते पण ते पेलण्याचं सामर्थ्य आणि कसब हे फक्त प्रभू
रामचंद्रांमध्येच होतं त्याचप्रमाणे जावळी आणि सह्याद्री यांचे भौगोलिक
फायदे बरेच होते पण त्यासाठी या सह्याद्रीला त्याचा स्वामी म्हणून केवळ
शिवाजी महाराजांनाच निवडावे लागले. धन्यवाद.
संदर्भ:
१. मोऱ्यांची छोटी बखर
२. शिवभारत
३. पत्रसारसंग्रह
४. जेधे शकावली
No comments:
Post a Comment