प्रतापराव गुजर, हिंदवी स्वराज्याच्या घोडदळाचे तिसरे सरनौबत
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
प्रतापराव
गुजर, हिंदवी स्वराज्याच्या घोडदळाचे तिसरे सरनौबत यांचं नाव घेतलं की
कानात आपोआप 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे गाणं ऐकू यायला लागतं. यांचं
खरं नाव कुडतोजी गुजर होतं, पण त्यांचा पराक्रम, शौर्य पाहून शिवाजी
महाराजांनी त्यांना प्रतापराव हि पदवी बहाल केली होती. बेहेलोलखानाला
जिवंत सोडून प्रतापरावांनी चूक केली म्हणून राजे चिडले, म्हणून
प्रतापरावांनी चुकीची शिक्षा म्हणून आत्मार्पण केलं इतकी सरळ हि घटना
नाही. या आत्मार्पणाच्या आधी प्रतापरावांनी बराच पराक्रम केला पण तो
अज्ञातच राहिला. पाहुयात आजच्या लेखात की बेहेलोलला सोडल्यापासून ते
प्रतापरावांच्या बलिदानापर्यंत रावांनी काय काय प्रताप केले ते.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
कोंडाजी
फर्जंद आणि अनाजी पंतांनी फक्त ६० मावळ्यांच्या साथीने पन्हाळा घेतला.
राजांच्या या वाघांनी मोठा अचाट पराक्रम केला. सिद्दी जोहरच्या वेढ्यातून
१६६० ला शिवाजी महाराज निसटल्यानंतर २२ सप्टेंबर १६६० पासून ते ६ मार्च
१६७३ ला कोंडाजी आणि अनाजी पंतांनी गड घेईपर्यंत, म्हणजेच १३ वर्ष पन्हाळा
पुन्हा आदिलशाहीत होता. हा गड पडताच आदिलशाही हादरलीच. पण आता आदिलशाहीला
हादरे बसायची आणि ते पचवायची सवय झाली होती. आदिलशाहीतले लोकं नुसत्याच
मोहिमा काढायचे आणि आयते हत्ती, घोडे महाराजांच्या माणसांच्या हाती
लागायचे. यावेळी फक्त ४ वर्षांचा सिकंदर आदिलशाह बादशहा होता. सगळं कारभार
खवासखानच पाहत होता. याने बेहेलोलखान नावाच्या पठाण सरदाराला स्तुतीसुमने
उधळून हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. आणि शिवाजी भोसल्याला जर आता थांबवलं
नाही तर तो आदिलशाही संपवेल म्हणून महाराजांविरुद्ध नवी मोहीम दिली.
बेहेलोलकडे शौर्याची कमतरता नव्हती आणि एव्हढ्या तारिफीने त्याची छाती
अजूनच फुगून आली. बारा हजाराची फौज घेऊन खान तिकोट्याच्या मार्गाने पुढे
उमराणीला येऊन थांबला. इथे आणखी फौज जमवून मग स्वराज्यावर हत्यार उगाराव हा
विचार करून बेहेलोल इथे थांबला.
महाराजांचे
गुप्तहेर काही कमी थोडीच होते. हि सगळी इतंभूत बातमी महाराजांना कळली.
यावेळी महाराज नुकत्याच जिंकलेल्या त्यांच्या लाडक्या पन्हाळ्यावर होते.
राजांनी लगेच प्रतापराव गुजर, आनंदराव मकाजी वगैरेंबरोबर मसलत केली.
सर्वानुमते असं ठरलं की जोवर खानाजवळ फौज कमी आहे तोवरच त्याला ठेचायच.
महाराज म्हणाले "विजापूरचा बेहेलोलखान वळवळ फार करतो आहे त्यास मारून
फत्ते करणे".
प्रतापराव
लगेच सोबत विठ्ठल अत्रे, आनंदराव मकाजी, कृष्णाजी भास्कर, विसो बल्लाळ,
सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, दीपाजी राऊतराव यांना घेऊन सोबत पंधरा
हजारांची फौज घेऊन निघाले. रावांनी गनिमी काव्याचा डाव टाकला. उमरणी मध्ये
जिथे खानाची फौज थांबली होती तिथे पाणीपुरवठ्यासाठी फक्त एकच जलाशय.
प्रतापरावांनी या पाणवठ्यालाच गराडा घातला. जलाशयातलं पाणी आडवून
मराठ्यांच्या तलवारींचं पाणी पाजायची प्रतापरावांची इच्छा होती. गम्मत
म्हणजे बेहेलोलला या कशाचाच पत्ता नव्हता. प्रतापरावांनी विसाजी बल्लाळ आणि
विठ्ठल पिलदेव यांना बेहेलोलच्या छावणीला लांबून गराडा घालायला सांगितलं.
आणि पाण्यासाठी बेहेलोलची फौज बाहेर पडताच प्रतापरावांसकट सगळे मराठे
बेहेलोलच्या फौजेवर तुटून पडले. भयंकर रणकंदन झाले. सिदोजी निंबाळकरांनी
खानाचा एक हत्ती जिंकून मराठ्यांच्या गोटात आणला. बेहेलोलचा सिद्दी महंमद
नावाचा सरदार पडला. पण असे खूप सरदार पडण्यापेक्षा बेहेलोलच्या आणि
त्याच्या सैन्याच्या घश्याला कोरड पडली होती. महिना एप्रिलचा आणि रावांनी
पाणी आडवलेलं. पाण्याशिवाय लढायचं कसं?
अखेर
घाश्यासाठी नाक मुठीत धरून बेहेलोल साफ शरण आला. 'मी पुन्हा
शिवाजीराजांशी दावा करणार नाही' असा करार खानाने केला. पठाणाची पार गोगलगाय
झाली. रावांनी द्या आली. पण गोगलगाय आणि पोटात पाय हे राव विसरले.
धर्मवाट देऊन प्रतापरावांनी खानाला मोकळा सोडला. खान आणि त्याची फौज माना
खाली घालून पण मनातून धुसपूसत निघून गेली. रावांनी झाला पराक्रम राजांना
कळवला आणि त्यांना वाटलं की महाराजांचं कौतुकाने भरलेलं पत्र येईल. पण
महाराजांची माणसांची पारख भारी होती. त्यांनी ओळखलं होतं की खान जिता सोडला
तर उलटणार. रावांना वाटलं एक पण झालं भलतंच महाराजांचं पत्र आलं 'सला काय
निमित्य केला? खानाला बुडविला का नाही?' आणि रावांचे डोळे खाड्कन उघडले
झाली चूक लक्षात आली पण आता उशीर झाला होता खान मोकळा झाला होता.
झाला प्रकार १५ एप्रिल १६७३ च्या आजूबाजूला झाला.
महाराज
चिडले म्हणून प्रतापरावांनी यावेळी चूक भरून काढायला सुरुवात केली. राव
विजापूरकरांच्या हुबलीमध्ये शिरले. हुबळीची पेठ साफ लुटून काढली.
ओल्याबरोबर सुकही जळतं याच न्यायाने हुबळीची इंग्रजांची वखारसुद्धा रावांनी
पुरुषभर खणून लुटली. पुढे प्रतापराव कडवाड प्रांतात घुसले. तीस हजार
रुपयांच्या वर दौलत रावांना गवसली. याशिवाय प्रतापराव भागानगरचा देश देवगड,
रामगिरी , बाजे असे मोगलाईचे प्रदेश सुद्धा मारून आले. पण बुंदसे गयी वह
हौदसे नही आती. प्रतापराव आदिलशाही मुलखावर छापे घालत राहिले पण खान काही
गवसेना. महाराजांच्या पत्रातले शब्द रावांच्या कानात शिश्याच्या रसासारखे
शिरले होते आणि काळजाला आग लावून गेले होते. ती आग बेहेलोलच्या रक्तानेंच
विझणार होती. बेहेलोलने महाराजांना वाटलं होतं तसंच केलं, तो
कोल्हापुरातच फिरत राहिला आणि स्वराज्यावर हल्ला करायला अजून अजून फौज
गोळा करत राहिला. पुरती फौज गोळा झाल्यावर आठ महिन्यांनी फ्रब्रुवारी १६७४
च्या दरम्यान खान कोल्हापूर मार्गाने स्वराज्यावर हल्ला करायला निघाला.
यावेळी प्रतापरावांची छावणी गडहिंग्लजला होती. महाराजांना कळलं बेहेलोल
पुन्हा येतोय. महाराजांचा संताप अनावर झाला हाच तो कृतघ्न बेहेलोल.
राजांनी प्रतापरावांना पत्र पाठवलं ' हा बेहेलोल घडोघडी येतो. तुम्ही
लष्कर घेऊन जाऊन बुडवून फत्ते करणे. नाही तर तोंड न दाखवणे' नाहीतर तोंड न
दाखवणे??? एका एका शब्दाने रावांच्या काळजाला छिद्र पडत होती.
स्वराज्याची इमानदारीने सेवा केली पण ही चूक रावांना महागात पडत होती.
बेहेलोलची गर्दन मारल्याविना रावांना शांतता मिळणार नव्हती. २४ फेब्रुवारी
१६७४ शिवरात्रीचा दिवस, प्रतापराव आपल्या सहा शिलेदारांसकट गस्तीवर
असताना त्यांना नेसरीच्या रोखाने बेहेलोलची फौज येते आहे हे कळलं.
बेहेलोलच नाव ऐकताच प्रतापराव भान विसरले शिवरात्रीच्या दिवशी रावांमध्ये
रुद्र संचारला. राव तसेच आपल्या सहा शिलेदारांना घेऊन नेसरीच्या दिशेने
सुटले. फक्त सात जण हजारोंच्या फौजेवर तुटून पडायला बेफामपणे सुटले.
मेंदूवर भावनांनी विजय मिळवला, शौर्याने विवेकाला दडपून टाकलं, सूड
घेण्याच्या विचाराने गनिमी काव्याला बासनात गुंडाळून ठेवलं. प्रतापराव
निघाले फक्त सहा शिलेदारांसह. दुर्दैवाने इतिहासाला या सहा शिलेदारांची
नाव ठाऊक नाहीत. कुठल्याच साधनात प्रतापराव सोडून बाकी या सहा वीरांची
नावांची नोंदच नाही. रावांचा आणि सहा शिलेदारांचा एकच निश्चय बेहेलोलची
गर्दन. या सात जणांच्या फौजेने बेहेलोलच्या फौजेला नेसरीच्या खिंडीत
गाठलं. पुरंदरवर मुरार बाजीला लढताना पाहून दिलेरखानाने तोंडात अंगुली
घातली होती, तीच गत बेहेलोलची झाली. फक्त सहा शिलेदारांसोबत हजारोंच्या
फौजेवर प्रतापराव चालून येतायत? त्याचा विश्वासच बसेना. या सात
तलवारींच्या तडाख्यात जे सापडले ते कापले गेले. एकच गोंधळ उडाला. सातही
वीरांनी धुमाकूळ घातला. पण शेवटी होते तर सातच ना? फक्त शौर्य, धाडस आणि
अभिमानाच्या बळावर लढाया जिंकता आल्या असत्या तर मुघलांना कधीच भारत सोडून
जावं लागलं असतं. एक एक वीर गळायला लागला आणि अखेर प्रतापरावही हि पडले.
'कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, वेडात मराठे वीर दौडला सात'. त्यानंतर
चार महिन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राजाभिषेक झाला, पण या
सप्तऋषींनी शिवरात्रीच्या दिवशीच या स्वराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक
घातला. राजांची अजून एक बाजू पडली, अजून एक बाजी पडला.
प्रतापरावांच्या
बलिदानाचा बदला पुढे आनंदराव मकजींनी घेतला. बेहेलोलच्या जहागिरीवर झडप
घालून दीड लाख होन पळवले, खानचे पेंच गाव सुद्धा लुटले. एकूण तीन हजार
बैलांवर सगळी लूट लादून आनंदराव घेऊन आले. पण अशी कितीही लूट आणून, कितीही
सोनं आणून महाराजांचा जो हिरा गमावला तो कधीच परत येणार नव्हता.
प्रतापराव चुकले का? भावनाविवश होणं चुकीचं आहे का? डोळयांसमोर मृत्यू
दिसत असतानाही त्या मार्गावर चालणं चुकीचं आहे का? असेलही कदाचित पण असाच
विचार बाजी प्रभूंनी केला असता तर राजे विशाळगडावर पोहोचले असते का? मुरार
बाजींनी केला असता तर पुरंदर अजिंक्य राहिला असता का? तान्हाजींनी केला
असता तर सिंहगड स्वराज्यात आला असता का? शेवटी काय साधलं तर शौर्य, नाही
तर वेडं साहस. असो प्रतापरावानंतर महाराजांनी हंसाजी मोहिते म्हणजेच
हंबीररावांना घोडदळाचा पुढचे सरनौबत केले. भले प्रतापरावंचं हे साहस
महाराजांच्या गनिमी काव्याला धरून नसलं तरी यामुळे त्यांच स्वराज्यावरच
प्रेम, स्वराज्यासाठी आणि महाराजांच्या शब्दासाठी केलेला त्याग आपणच काय
प्रत्यक्ष शिवाजी महाराजसुद्धा विसरू शकले नसतील. इतिहासात जर तर किंवा
कयास नसतात पण या प्रसंगानंतर राजांना नक्कीच वाटलं असेल की 'प्रतापराव
शिपाईगिरीत अतुल्य शौर्य दाखवलंत पण मला परत तोंडही दाखवायचं नाही म्हणून
माझा सरनौबत गमावलात राव माझा सरनौबत गमावलात'. धन्यवाद.
संदर्भ:
१. पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान
२. सभासद बखर
३. पत्रसारसंग्रह
No comments:
Post a Comment