विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 April 2023

अफजलखानवध: तोडा, तोडा आणि तोडा...

 


अफजलखानवध: तोडा, तोडा आणि तोडा...

लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर


अफजल मेला पण आता त्याच्या सैनिकांवर 'तो मेला म्हणून सुटला तरी' असं म्हणायची वेळ आली.
खालील लेख आता विडिओ स्वरूपातही उपलब्ध आहे:
इशारत झाली तेव्हा अफजलखानाच्या पार गावातील सैन्याला वाटलं की भेट यशस्वी झाली म्हणून सन्मानार्थ इशारत झडली. इथे इशारत म्हणून तोफ झडली कि नगारे वाजले याबद्दल इतिहासात मौन आहे. दुपारची वामकुक्षी घेत काही सैनिक आणि सरदार निजले होते. महाराजांनी "अफझलखान वध : शिवाजी महाराजांच्या चाली" लेखात सांगितल्याप्रमाणे आपल्या माणसांची आधीच सर्व योजना करून ठेवली होती. त्यानुसार जेधे शकावली आणि जेधे करीना सांगतं, कान्होजी जेधे आणि बाजी सर्जेराव यांना पारच्या वाटा रोखायच्या होत्या, बांदल नाईक जावळीच्या आणि पारच्या झाडीत लपले होते. याशिवाय बाकीच्यांनाहि अफजलच्या सैन्याच्या वाटा रोखायला सांगितले होते. नेतोजींना सुद्धा इशारत झाल्यावर घाटमाथ्यावरून खाली उतरून खानाचं लष्कर तोडायला सांगितलं होतं. थोडक्यात काय 'दिसेल त्याला कापा' पण...जो शस्त्र खाली ठेवेल त्याला क्षमा करा असं महाराजांनी सांगितलं होतं. शिवभारत कमळोजी सोळंखे, तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, कोंडाजी वरखल, रामजी पांगारकर आणि कोणीतरी नारायण ब्राह्मण यांची नाव घेतं ज्यांनी शत्रू सैन्याला कापून काढलं.


शिवभारत पुढे म्हणतं कि मुसेखानाने मोठा बहाद्दूर असल्याचा आव आणला आणि आपल्या सैन्याला युद्धासाठी प्रोत्साहन दिलं. पण घोडदळाला युद्ध करण्यास कठीण असलेल्या त्या भागात मुसेखानाचासुद्धा शिवाजी महाराजांच्या वीरांनी पराभव केला. तेव्हा मुसेखान, अफजलचा मुलगा फाजलखान आणि याकूतखान यांनी युद्धातून पलायन केलं. अंकूशखान तर अनवाणीच पळाला. शिवाजी महाराजांचे काका 'मंबाजी भोसले' हे या युद्धात ठार झाले. मंबाजी भोसल्यांचा तसाही पुढे इतिहासात उल्लेख नाही. थोडक्यात काय पार गावात अफजलखानाच्या सैन्याची 'पार' दैना उडाली. शिवभारत असंही म्हणतंय कि हा प्रदेश घोडेस्वारांसाठी प्रतिकूल होता. छोटा रणदुल्लाखान, अंबरखानाचा पुत्र अंबर, राजाजी घाटगे आणि अफजलखानाचे २ मुलगे कैद झाले (शिवभारत अध्याय २३ श्लोक ४८ ते ५३). अफजलच्या या दोन मुलांच्या नावाचा उल्लेख कुठेच नाहीये. या सर्वांना महाराजांनी सोडून दिलं. पळून गेलेल्या फाजलखान, मुसेखान, याकूतखान यांना प्रतापरावाने जावळीतून बाहेर पडून वाईत पोहोचवण्याचा मार्ग दाखवला असं 'शिवभारतात' म्हटलेले आहे.

त्याचबरोबर आधीचा लेख "अफझलखान वध :अफझलखानाच्या चाली" यात वर्णन केल्याप्रमाणे जे प्रदेश फारसा विरोध न करता अफजलच्या सैन्याला मिळाले होते ते एका झटक्यात शिवाजी महाराजांच्या सैन्याने परत जिंकून घेतले असे शिवभारत सांगते. यातील सिद्दी हिलालच्या पुढाकाराने नाईकजी पांढरे, नाईकजी खराडे आणि कल्याणजी जाधव हे महाराजांना येऊन मिळाले. (शिवभारत)

आता हे झालं जवळीमधल्या युद्धाबद्दल. पुढे शिवभारतात असं म्हटलं आहे कि नेतोजी पालकर उशिरा पोहोचल्यामुळे, वाई मध्ये पोहोचलेला फाजलखान, याकूतखान, मुसेखान हे लष्कराला आणि त्यांच्या जनानखान्याला घेऊन पसार होऊ शकले. (शिवभारत)

यापुढे महाराजांनी जिंकलेल्या २३ गावांची नावं शिवभारतात दिलेली आहेत. आणि त्याचबरोबर पन्हाळगडसुद्धा जिंकला. पन्हाळगड घेतल्यामुळे चिडून आदिलशहाने आता रुस्तम-ए- जमान या आपल्या सरदाराला शिवाजी महाराजांवर हल्ला करायला पाठवलं. परंतु त्यांचाही शिवाजी महाराजांनी पराभव केला.

थोडक्यात शिवाजी महाराजांचा हल्ला हा त्रिवेणी होता. त्यांनी दक्षिणेतील २३ गाव जिंकली, नेतोजींना पूर्वेला आदिलशहाच्या मुलखावर पाठवले आणि दोरोजी यांना कोकणात पाठवले.

नेतोजी पालकरांनी पूर्वेला खालील गावांकडून लूट केली. हि गावं महाराजांच्या ताब्यात आल्याचा काही पुरावा दिसत नाही. केवळ खंडणी गोळा करण्याकरता नेतोजीने येथे चौक्या लावल्या होत्या. ती छत्तीस गावं (शिवभारत अध्याय २५ श्लोक ४-९):



दोरोजींनी कोकणात खालील स्थळे घेतली (दोरोजींचा उल्लेख पुढे फार आलेला नाही):

1. दाभोळचा किल्ला
2. जैतापूर
3. कुडाळचा किल्ला
4. खारेपाटण
5. राजापूरची इंग्रजांची वखार

आणि महाराजांनी २३ गावांना आपल्या अधिपत्याखाली आणले त्याचा उल्लेख वर दिला आहे. थोडक्यात बाबासाहेब पुरंदरेंनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा त्रिशूळ (तीन दिशांचे हल्ले) आदिलशाहीच्या छातीत घुसला. अश्या प्रकारे महाराजांनी अफजल वधानंतर परिस्थितीचा फायदा घेऊन स्वराज्य विस्तार केला. त्याचा नकाशा गजानन मेहेंदळेंनी खालीलप्रमाणे दिला आहे. (नकाशातील काळी रेषा महाराजांनी आदिलशाहीच्या राज्यातील घेतलेले नवीन भाग दाखवते आहे.) यातील शेवटच्या लेखात उद्या या पूर्ण अफजलखान वधाच्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊ.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...