शिवराजाभिषेक धार्मिक विधी
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
मराठशाहीचा
कळस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक. ६ जून १६७४, शनिवारी
हिंदवी स्वराज्याला पहिले छत्रपती मिळाले. जनतेच्या हृदसिंहासनावर शिवाजी
राजे त्याआधी कित्येक वर्ष अधिराज्य गाजवत होते, पण या राजाभिषेकाने
छत्रपतींना एक अधिकृत, अभिषिक्त हिंदू राजा बनविले. बर या विधीला
राजाभिषेक म्हणतात राज्याभिषेक नाही. सर्वसामान्यपणे शिवाजी महाराज ६ जून
१६७४ ला सिंहासनारूढ झाले म्हणजे हाच एक दिवस राजाभिषेक विधी होता अशी
धारणा असते. पण शिवराजाभिषेक हा विधी ३०मे १६७४ ला सुरु होऊन, ६ जून १६७४
म्हणजेच ८ दिवस सुरु होता. या पूर्ण धार्मिक विधीबद्दल सविस्तर माहिती
गागा भट्टांनी 'शिवराजाभिषेकप्रयोगः' या पोथीमध्ये दिली आहे. आजच्या
आपल्या व्हिडिओत आपण शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकात काय काय धार्मिक
विधी करण्यात आले आणि त्यामागची कारणं काय होती ते पाहण्याचा प्रयत्न
करूयात.
एखादा
विधी आणि तो विधी करण्यामागचं कारण बऱ्याचदा आपल्याला आपल्या घरी पूजा
करतानासुद्धा कळत नाही. हीच समस्या डोळ्यासमोर ठेऊन राजाभिषेकात काय काय
धार्मिक विधी करण्यात आले होते आणि त्यामागची कारणं काय होती हे सांगायचा
प्रयत्न आम्ही या व्हिडिओतून करणार आहोत. राजाभिषेकात काय विधी झाले हेच
फक्त यातून सांगायचं आमचा प्रयत्न आहे ते श्रेष्ठ, कि कनिष्ठ, उत्तम की
वाईट श्रद्धा की अंधश्रद्धा ही मतं ज्याची त्याने ठरवावित आणि ऐतिहासिक
दृष्टिकोनातून हा विडिओ पाहावा.
या
सर्व विधीची रचना गागाभट्टांनी केली होती आणि हा विधी शिवाजी महाराजांचे
राजपुरोहित बाळंभट्ट यांनी केला. गागाभट्टांची पार्श्वभूमी आमच्या मागील
व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक आटा स्क्रीनवर उजवीकडे दिलेली आहे.
राजाभिषेकाचा सर्व विधी हा सपत्नीक म्हणजे पत्नी बरोबर करायचा असतो. यामुळे
राजाचं लग्न झालेलं असणं गरजेचं आहे. लग्न होण्यापूर्वी क्षत्रिय आणि
ब्राह्मणांची मुंज होणं गरजेचं आहे. भोसले हे क्षत्रिय जरी असले तरी
त्यांच्यावरील संस्कार कित्येक पिढ्यांमध्ये लोप पावले होते त्यामुळे
शिवाजी महाराजांची मुंज झालेली नव्हती. पण मुंजीशिवाय महाराजांची ८ लग्न
झाली होती मग ते सगळे विवाह रद्द समजायचे का? तर नाही. यामुळे असं ठरलं की
शिवाजी महाराजांची आधी मुंज करावी आणि मग सर्व पत्नींशी पुनर्विवाह करावा.
याप्रमाणे २९ मे १६७४ ला जेष्ठ शुद्ध चतुर्थीला शिवाजी महाराजांची मुंज
झाली. याच दिवशी 'तुलादान' आणि ' तुलापुरुषदान' हे विधी झाले. हे का केले?
तर उशिरा मुंज केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून शिवाजी महाराजांचे
'तुलादान' झाले या विधीत महाराजांच्या वजनाइतके म्हणजे १६० पौंड इतके
सोन्याचे होन म्हणजेच १६००० होन आणि १००० होन दक्षिण मिळून १७००० सोन्याचे
होन इतकं तुलादान केलं. याशिवाय चांदी, तांब, लोखंड, मसाले, धान्य या
वास्तूंचंही तुलादान करण्यात आलं. मग 'तुलापुरुषदान' म्हणजे काय? तर
विष्णू भगवंतांच्या सोन्याच्या मूर्तीचे दान. हे का करायचं? तर शिवाजी
महाराजांनी ज्या लढाया केल्या त्यात जर ब्राह्मणहत्या, स्त्रीहत्या किंवा
लहान मुलांची हत्या झाली असेल तर त्याच प्रायश्चित्त म्हणून हा विधी.
शिवाजी महाराजांनी दान केलेल्या या सोन्याच्या विष्णूच्या मूर्तीचे वजन ३३
पौंड होते. या दिवसानंतर पुढे राजाभिषेक विधी सुरु झाला.
३०
मे १६७४ या दिवशी ऑक्सिन्डन म्हणतो त्याप्रमाणे महाराजांचे पट्टराणी
सोयराबाई आणि इतर दोन स्त्रियांबरोबर म्हणजेच महाराजांच्या पत्न्यांबरोबरच
सामंत्रक विवाह झाले. चौथ्या पत्नीशी महाराजांनी काही वैयक्तिक अडचणीमुळे
नंतर ८ जूनला विवाह केला. म्हणजेच लग्नप्रसंगी महाराजांच्या ४ पत्नी
जिवंत होत्या असे दिसते. सर्व पूजांप्रमाणेच सर्वप्रथम गणेशाचे पूजन करून
महाराजांच्या राजाभिषेकविधीची सुरुवात झाली. यानंतर महाराजांनी
पुण्याहवाचन, मातृकापूजन नांदीश्राद्ध आणि विनायकशांती होम केला. हे सर्व
विधी का केले ते आपण एक एक करून पाहू. पुण्याहवाचनामध्ये वरुण देवाचे
म्हणजेच पाणी जे समृद्धीचं प्रतीक आहे त्याची पूजा केली जाते. यावेळी जी
कलशस्थापना होते त्या कलशात ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे सर्व सृष्टी
असल्याचे कल्पित करून त्या कलशाची पूजा केली जाते.
मातृका
म्हणजेच आई. देवी म्हणजेच स्त्रीशक्ती ही जगताची निर्माती आहे.
मात्रुकापूजनात कुलदेवतेची म्हणजेच महाराजांची कुलदेवता तुळजाभवानी हिची
पूजा करण्यात आली. याच सोबत तिच्या २७ अंगभूत देवतांचं म्हणजे सध्या भाषेत
सांगायचं तर तिच्या म्हणजे देवीच्या परिवारातील देवतांचंही पूजन
महाराजांनी केलं.
या
पुढील विधी नांदीश्राद्ध. नंद म्हणजे प्रसन्न आनंदी होणं. शुभ प्रसंगी
पितरांकडून आशीर्वाद मिळावेत ते प्रसन्न व्हावेत म्हणून नांदीश्राद्ध हा
विधी केला जातो जो शिवाजी महाराजांनी केला.
या
नंतर महाराजांनी विनायकशांती होम केला. विनायक शांती का केली? तर
भविष्यकाळात येणाऱ्या कुठल्याही अरिष्टांना किंवा विघ्नांना टाळण्यासाठी
विनायक शांती करतात. तसेच जर शुभ कार्यसमयी घरात कुठल्या निकटवर्ती
नातलगाचं निधन झालं तरी हि शांती करतात. शिवाजी महाराजांच्या पत्नी
काशीबाई यांचं राजाभिषेकाच्या अडीच महिने आधीच १६ मार्च १६७४ ला निधन झालं
होतं. या दोन मुख्य कारणांसाठी विनायक शांती करतात ती शिवाजी महाराजांनी
केली. मग अग्नी विसर्जित करून या दिवसाचा विधी संपला. महाराज यजमान
म्हणजेच पूजा करत असल्याने त्यांनी साधी राहणी आचरायची होती. त्यामुळे
त्या रात्री राजांनी फलाहार केला, भूशय्येवर म्हणजे जमिनीवर झोपले आणि
ब्रह्मचर्य पाळले.
या
नंतर ३१ मे १६७४ ला ऐंद्रीशांतीला सुरुवात करण्यात आली. ऐंद्री म्हणजेच
इंद्राणी म्हणजेच इंद्राची शक्ती. हिंदू धर्मात राजाला देव मानलं गेलं आहे
आणि देवांच्या राजाच्या पदाच नाव इंद्र आहे. त्यामुळे इंद्राच्या आणि
इंद्राणीच्या पूजेचा हा विधी आहे. हा विधी ३१ मे, १ जून, ३ जून आणि ५
जूनला करण्यात आला. ३१ मे च्या दिवशी इंद्र आणि इंद्राणीची पूजा करून होम
करून मग बळी देण्यात आला. १ जूनला ऐंद्रीशांतीबरोबर ग्रहयज्ञ* आणि
नक्षत्रहोम* करण्यात आला. नऊ ग्रहांच्या अंतर्गत ४८ देवता असतात. शुभ
कार्याला जास्तीत जास्त ग्रहांची अनुकूलता मिळावी म्हणून 'ग्रहयज्ञ' केला.
ग्रहांप्रमाणेच २७ नक्षत्रंची अनुकूलता लाभावी म्हणून नक्षत्रहोम करण्यात
आला. यादिवशी ब्राह्मणांना गाय, शंख आणि तूप हे दक्षिणा म्हणून देण्यात
आले.
२
जून ला मंगळवार आणि नवमी हे दोन्हीही राजाभिषेकासाठी निषिद्ध असल्याने हा
दिवस भाकड गेला म्हणजेच या दिवशी राजाभिषेकासंबंधी काहीच विधी केले गेले
नाही. ३ जून १६७४ ला हि ऎद्रीशांती करण्यात आली.
४
जून १६७४ ला निऋतीयाग करण्यात आला. यजमानाला म्हणजेच शिवाजी महाराजांना
बाहेरची बाधा अर्थात अघोरी बाधा, करणी बाधा, भूत बाधा होऊ नये म्हणून हा
विधी करण्यात आला. यावेळी कृष्णवस्त्र म्हणजे काळी वस्त्र परिधान करून,
काळ्या फुलांनी निऋती याग करण्यात आला. मग स्नान करून शुक्ल म्हणजे पांढरी
वस्त्र परिधान करून पुण्याहवाचन करण्यात आले.
५
जूनला सर्वप्रथम ऎद्रीशांतीचा विधी संपवण्यात आला. मग राजांनी शत अथवा
सहस्र ब्राह्मण भोजन केले. ५ जूनपासून पुढे ६ जून पहाटे पर्यंत मुख्य
राजाभिषेक विधी तीन टप्प्यात करण्यात आला.
१. राजाभिषेक
२. सिंहासनारोहण
३. राजदर्शन
१.
राजाभिषेकाची सुरुवात पुन्हा एकदा गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन,
नांदीश्राद्ध आणि होमाने करण्यात आली. यानंतर मंडपपूजेनंतर चार दिशांना
प्रत्येकी चार कुंभ ठेवण्यात आले. पूर्वेला ४ सुवर्णकुंभ, पश्चिमेला ४
तांब्याचे कुंभ, उत्तरेला ४ मातीचे कुंभ आणिदक्षिणेला ४ चांदीचे कुंभ
ठेवण्यात आले. या सगळ्या दिशांमधील ४ कुंभांमध्ये प्रत्येकी तूप, दूध, दही
आणि पाणी भरण्यात आले. हे पाणी सप्तगंगांचे म्हणजे सात नद्यांचे होते.
पूर्वेच्या सुवर्णकुंभातील एका कुंभात पाण्याऐवजी मध भरले आणि मग या सगळ्या
कुंभांच्या गळ्याला वस्त्रवेष्टन करण्यात आले. या वेळी पूर्वेला मोरोपंत
प्रधान हातात तुपाचा सुवर्णकुंभ घेऊन उभे राहिले, आग्नेयदिशेला अनाजीपंत
छत्र घेऊन उभे राहिले, दक्षिणेला हंबीरराव मोहिते दुधाने भरलेला चांदीचा
कुंभ घेऊन उभे राहिले, नैऋत्येला त्र्यंबकपंत पंखा घेऊन तर पश्चिमेला
रामचंद्रपंत दुधाने भरलेला तांब्याचा कुंभ घेऊन उभे ठाकले, वायव्येस
दत्ताजीपंतांनी हातात मोर्चेल घेतले होते, उत्तरेला रघुनाथपंत मधाने भरलेला
सुवर्णकलश घेऊन उभे होते आणि ईशान्येला निराजीपंत दुसरे मोर्चेल घेऊन उभे
होते. यावेळी हंबीररावांच्या मुंज न झाल्याने त्यांचे सेनापती म्हणून
अधिकृत पट्टाबंधन करता आले नाही.
यानंतर
होम करून शिवाजी महाराजांना अभिषेकशालेत नेऊन सुगंधी तेल, चूर्ण आणि
उष्णोदकांनी स्नान घालण्यात आले. सोबत महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजी
राजे होते. मग श्वेत म्हणजे पांढरी वस्त्र परिधान करून महाराजांना मंत्र
घोषात पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी अभिषेक करून
पुन्हा एकदा स्नान झाले. पुन्हा एकदा नवीन श्वेत वस्त्र धारण करून सामंत्र
अभिसिंचन करण्यात आले. इथे राजांना अभिषेक करून राजे प्रति इंद्र झाले.
यानंतर सगळ्या कुंभांमधील द्रव्याने अभिसिंचन करून पुन्हा एकदा शिवाजी
महाराजांचे स्नान झाले. मग राजांनी तुपात स्वतःचे मुखावलोकन केले म्हणजे
स्वतःचा चेहेरा तुपात पहिला. यानंतर राजे गागाभट्टांसोबत रथावर आरूढ होऊन,
छत्र आणि ध्वज उभारून रथ चालविते झाले. हा रथ राजाला पृथ्वी जिंकण्यासाठी
दिला आहे अशी इथे कल्पना आहे.
२. सिंहासनारोहण:
रथयात्रेवरून
परत आल्यावर राजे सिंहासनावर आरूढ झाले आणि गागा भट्टानि 'तो क्षत्रिय
राजा अभिषिक्त' झाल्याचे घोषित केले. गागाभट्टांनी स्वतः छत्रपती शिवाजी
महाराजांच्या डोक्यावर छत्र धरले. सर्वांनी पृथ्वी दुमदुमून टाकणारा गजर
केला. 'मऱ्हाटा राजा पातशहा जाला ही काही साधी गोष्ट झाली नाही'. यानंतर
राजांनी गागाभट्टांना नमन केले आणि सवत्स गायीची म्हणजे वासरू असणाऱ्या
गाईची, घोड्यांची आणि हत्तीची पूजा केली. हत्तीवर बसून नगरास प्रदक्षिणा
घालून देवाचे दर्शन घेऊन राजे स्वगृही गेले. येथे महाराजांना सुवासिनींनी
ओवाळले. महाराजांनी सपत्नीक जिजाऊंचे दर्शन घेतले. ज्या शिवबाला स्वराज्य
उभं कर म्हणून लहानाचं मोठं केलं, संस्कार दिले, शिकवण दिली तो शिवबा आज
क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज झाला होता आभाळातून मोठा झाला
होता. त्या माऊलीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. हे सर्व विधी होईपर्यंत
६ जूनची पहाट झाली होती.
३.
राजदर्शन: ऑक्झेंडनने म्हटल्याप्रमाणे सकाळी ७-८ वाजण्याच्या सुमारास
राजाभिषेकाचा तिसरा विधी राजदर्शन सुरु झाला ज्यावेळी राजांनी लोकांना
दर्शन दिले म्हणून हे राजदर्शन. यावेळी मोरोपंत प्रधानांनी ८००० सोन्याचे
होन राजांच्या शिरावर अभिषेक म्हणून ओतले, तर निळोपंडितांच्या मुलाने
७००० सोन्याच्या होनांचा अभिषेक राजांना केला. या वेळी संभाजी राजे,
मोरोपंत आणि गागाभट्ट सिंहासनाच्या पायरीवर बसले होते असा उल्लेख
ऑक्झेंडनने केला आहे. यावेळी ऑक्झेंडनने छत्रपती शिवाजी महाराजांना एक
अंगठी, एक हिरेजडित शिरपेच, एक हिरेजडित सलकडी आणि २ मोती दिले याबरोबर एक
खुर्चीसुद्धा दिली. तर संभाजी महाराज जे युवराज झाले होते त्यांना आठ
हिऱ्यांची कंठी आणि २ सलकडी दिली. याशिवाय मोरोपंत, अनाजीपंत आणि
निराजीपंत यांनापण ऑक्सिन्डन ने नजराणे दिले. एकूण २६९० रुपये खर्च
इंग्रजांनी केला.
याचवेळी
महाराजांनी राजाभिषेक शक सुरु केले. राजा किती थोर बघा त्याने शकाला आपले
नाव न देता राजाभिषेकाचे नाव दिले. राजा शिवछत्रपती अशी नावं असलेली
तांब्याची आणि सोन्याची नाणी पाडण्यात आली. स्वराज्यासाठी भगवा ध्वजच
ठरवण्यात आला. राज्यव्यवहारकोश सिद्ध करायची आज्ञा रघुनाथपंतांना केली,
ज्यात फार्सी शब्द काढून त्याजागी संस्कृत शब्द योजण्यात आले.
अष्टप्रधानमंडळाची फार्सी नाव बदलून त्यांना संस्कृत नावं देण्यात आली, ती
अशी.
१. मोरोपंत पिंगळे: मुख्य प्रधान
२. हंबीरराव मोहिते: सेनापती
३. रामचंद्र नीलकंठ: अमात्य
४. अण्णाजी दत्तो: सचिव
५. दत्ताजी त्र्यंबक: मंत्री
६. रामचंद्र त्र्यंबक: सुमंत
७. रावजी निराजी: न्यायाधीश
८. रघुनाथ: पंडितराव
अश्याप्रकारे
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक हिंदू धर्मातील सामंत्रक पद्धतीने
अतिशय थाटामाटात पार पडला. मराठी जनतेच्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्या
राजांनी त्यांना स्वराज्य दिले, त्यांचे रक्षण केले त्यांना त्यांचा
स्वाभिमान परत दिला असा त्यांचा लाडका, जाणता राजा आज सिंहासनाधिश्वर झाला
होता. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक हा विधीच इतका स्फुरणदायक आहे की आजही
हा विधी ऐकला की आपल्या अंगाचा रोम रोम हर्षित होऊन जातो. राजाभिषेक
म्हणजे फक्त ३२ मणांचे सोन्याचे सिंहासन बनवून त्यावर विराजमान होणं नसून
त्या सिंहासनावर बसण्याची पात्रता स्वकर्तृत्वाने कमवून हिंदू धर्माच्या
मंत्रांच्या घोषात त्यावर आरूढ होणं. ते आपल्या राजांनी साधलं. आशा करतो
राजाभिषेकाचा हा विस्तारपुर्ण विधी ऐकून आपल्यालाही काही नवीन माहिती
मिळाली असावी. धन्यवाद.
संदर्भ:
१. शिवराजाभिषेकप्रयोगः - वा. सि. बेंद्रे
२. मराठी रियासत खंड १ - सरदेसाई
३. राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे
४. English Records on Shivaji
No comments:
Post a Comment