मावळभूमी...वीरांची,लढवय्यांची आणि निष्ठावंतांची .मावळची भौगोलिक सुरवात होते ती रोहिडखोर्यातून .रोहिडखोर्याच्या पुरातन काळापासून दोन तर्फा पडतात उत्रौली तर्फे रोहिडखोरे आणि भोर तर्फे रोहिडखोरे.शिवचरित्राची सुरवात ज्या कालखंडापासून होते त्या कालखंडात ह्या रोहिडखोर्याच्या देशपांडे वतनदाराचे नाव दादजी नरसप्रभू गुप्ते असे येते."हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा "ह्या सुप्रसिद्ध आशयाचे पत्र महाराजांनी त्यांनाच लिहले.गुप्ते हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीचे.शिवपूर्वकाळात मावळात अनेक प्रभू घराणी स्थायिक झाली.बाजीप्रभू देशपांडे हि प्रभूच.ह्या प्रभू घराण्यांनी शेवटपर्यंत छत्रपतींच्या घराण्याचा ज्वाज्वल्य अभिमान धरला.प्रभू एकंदर तलवारीला तिखट .कलमदानाच्या कर्तबगारीत इतरांपेक्षा काकणभर सरसच.गुप्त्यांकडे रोहिडखोर्यासोबत धुमाळ देशमुखांच्या वेळवंड मावळचे हि देशपांडेपणाचे वतन होते.कारीत गुप्त्यांचा वाडा होता.
त्यांच्याच पिढीत इ स वी सनाच्या १८०० साली रंगो बापूजींचा जन्म झाला.
पेशवाई शेवटचे आचके देत होती.छत्रपतींच्या गाद्यांचे अधिकार मर्यादित झाले होते.नवीन पेशव्यांना वस्त्रे पाठवण्याचे सोपस्कार छत्रपती पार पाडतं.राजाराम छत्रपती जिंजीवरून आल्यानंतर शंकराजी नारायण पंतसचिव ह्या देशस्थ ब्राह्मणाने गुप्तेंचं वेळवंड खोर्याचं देशपांडे वतन बळकावले.दादाजी हा दत्तक होता ह्या सबबे खाली हे वतन पंतसचिवांने लाटले माधवराव पेशव्यांच्या समयी रामजीबाबा हा गुप्ते घराण्याचा वंशज पानिपतावर कामी आला.पण पेशवे कधीच कायस्थांना अनुकूल नव्हते ह्याचा प्रत्यय पुन्हा आला.वतन पंतसचिवाकडेच राहिले एवढा अन्याय होऊन सुद्धा हे घराणे कायमच स्वराज्य सेवेत राहिले हे विशेष.
रियासतकार सरदेसाई प्रतापसिंह महाराजांची कैफियत मोठ्या हळवेपणाने मांडतात.खर तर त्या काळात भारताच्या राजघराण्यात प्रतापसिंह महाराजांसारखा उमदा,सुशिक्षित आणि दूरदृष्टी असलेला राज्यकर्ता शोधूनही सापडणार नाही.शिवछत्रपतींच्या कर्तुत्वाच्या जवळ जाणारा हा वारस मात्र दुर्दैवी आणि अभागी ठरला.खर तर शिवछत्रपतींच्या राजाभिषेकावेळेस कायस्थधर्मप्रदिप्त ग्रंथाची निर्मिती होऊन .प्रभूंचे ग्रामण्य निकालात निघाले होते.नंतर हा वाद नारायणराव पेशव्यांच्या कारकिर्दीत जोरात वाढला.पेणच्या प्रभूंवरील ग्रामण्याचं निमित्त करून कायस्थांवर पुन्हा बंधने लादली.प्रतापसिंह महाराजांनी प्रभूंना न्याय देण्याच्या प्रयत्न केला. बाळाजीपंत नातू आणि चिंतामणराव सांगलीकर सारख्या कर्मठ ब्राह्मणांनी इंग्रजांना हाताशी धरून छत्रपतींच्या क्षत्रियत्वाला आव्हान दिले. आणि दुसर्या बाजीरावाच्या जाचातून सुटून इ स १८२२ साली अधिकारावर आलेल्या प्रतापसिंह महाराजांचे राज्य १८३९ साली खालसा झाले.
ह्याच काळात रंगो बापूजी प्रतापसिंह महाराजांची बाजू इंग्लंडला मांडण्यासाठी परदेशी गेले.खर तर हि मावळप्रांतासाठी अभिमानाची बाब.रंगो बापूजींनी लंडन मध्ये आपल्या धन्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.सलग १४ वर्ष लंडनला राहून जमेल तशी आपली बाजू इंग्रज सरकार ला ते सांगत राहिले विशेष म्हणजे हि सर्व हकीकत ते ब्रिटीशांपुढे मातृभाषेतून मांडत.जॉन टॉम्पसन नावाचा त्यांचा मित्र ती बाजू इंग्रजीतून मांडत.रंगो बापूजींचा विलायतेतील पेहराव हि मराठी वेशभूषेचाच असायचा.सन १८४७ ला प्रतापसिंह महाराजांचे काशी मुक्कामी निधन झाले .सन १८४८ ला प्रतापसिंह महाराजांच्या नंतर गादीवर आलेले त्यांचे बंधू ही निजधामास गेले.आपल्या छत्रपतींना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या वारसदारांना न्याय मिळवून देण्यासाठी रंगो बापूजी आणखी चार वर्ष विलायतेत झटत राहिले...!!आपल्या लंडन च्या रहिवासात रंगो बापूजींनी ब्रिटिश रयत,पार्लामेंट,बोर्ड ऑफ डारेक्टर्स ,कमिटी ऑफ इंडियन टेरिटरीझ ह्या सारख्या संस्थाना सनदशीर मार्गाने आवाहन केले.ब्रिटिश जनतेतल्या रंगो बापूजींच्या बावीस मित्रांनी त्यांच्या स्वामीकार्याची आणि चिकाटीची दखल घेत त्यांना चांदीचे तबक प्रदान केले.
रंगो बापूजी सन १८५३ च्या अखेरीस इंग्लंडवरुन मायदेशी निघाले.लॉर्ड डलहौसीच्या आक्रमक धोरणांमुळे दिग्गज संस्थाने खालसा होत होती.डिसेंबर १८५६ पासून सातारा राज्यात बंडाचे वारे वाहू लागले.रंगो बापूजींनी आपल्या मुलासहीत सिताराम व मेहुण्यासहीत ह्या बंडात सामील झाले.त्यांच्यासमवेत मागं ,रामोशी,कोळी ह्या जातीतील लढवय्ये होते.आजही चौकशी जेव्हा मी आमच्या भागात करतो तेव्हा आमच्या भागातील मौजे नाटंबी ,मौजे नाझरे,मौजे बाजारवाडी ह्या गावातील रामोशी ह्या बंडात होते ह्याची मौखिक माहिती मिळते पण दुर्दैवाने लिखित पुरावा मात्र भेटत नाही.
पंढरपूरच्या सरकारी खजिन्यावरच्या दरोड्याचं निमित्त होऊन हे कटवाले पकडले गेले.काही जण तोफेच्या तोंडी काही काळ्यापाण्यावर तर त्यातील १७ जणांना सातारच्या गेंडा माळावर फाशी देण्यात आले.स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्याचा इतिहास माझ्या मावळच्या मातीने राखला.कटानंतर रंगो बापूजी काही वर्ष जिवंत होते.कसे होते,कुठे होते,ह्यात इतिहासात एकमत नाही त्यांचा मृत्यूही गूढ च मानावा लागेल.
इतिहासाच्या पटलावर काही थोर पुरूष धुमकेतू सारखे झळकून जातात.आपल्या निष्ठेपायी घरादारावर तुळशीपत्र ठेवतात.मावळमातीचं सौभाग्य शिवछत्रपतींनी चिरंजीव केलं .तिच्या कुशीतून रंगो बापूजींसारखे लढवय्ये जन्माला आले.लाखाचा पोशिंदा जगावा म्हणून ह्याच मातीतल्या लेकरांनी गजापूरच्या खिंडीत मरणाला मात दिली.त्याच पोशिंद्याचा अंश अभिषिक्त सार्वभौम रहावा म्हणून ह्याच मातीतल्या लेकरांनो आपल्या श्वासांचा त्या स्वराज्यापायी येळकोट केला...अजूनही हि माती भाळाला लावली ना तर आयुष्याच्या राजाभिषेकाचा भास होतो...!!
माझ्या मावळ मातीत
रूजे बंडाचे बियाणे
• किती निजली वादळे
• हिच्या धुळीच्या भयाणे...!!
सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
बारा मावळ परिवार.
No comments:
Post a Comment