विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 May 2023

#फर्जंद_भोसले_पाटीलांचा_वाडा- (खांबगाव मावळ) पुणे

 














#फर्जंद_भोसले_पाटीलांचा_वाडा
-
(खांबगाव मावळ) पुणे
पोस्तसांभार :विकास चौधरी 
पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर गावापासून वेल्हे येथे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला (पूर्वेस) खांबगाव हे एक छोटे गाव आहे. त्यास मावळ खांबगाव असे म्हणतात, तेथे शिवकालीन भोसले घराणा 'पाटील" म्हणून नांदत आहे. त्या ठिकाणी दोन पाटील बंधूंचे जवळजवळ एक एकराच्या परिसरात समोरासमोर दोन वाडे होते. त्यांपैकी एक वाडा पूर्णपणे नाहीसा झालेला असून त्या ठिकाणी नवीन घरे झाली आहेत. परंतु एक वाडा मात्र अजून आपल्या पाटीलकीच्या जुन्या खुणा दाखवीत जराजर्जर अवस्थेत तग धरून उभा आहे.
वाड्याजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा त्या वाड्याच्या विस्तृतपणाची कल्पना आपणास येत नाही. जुन्या मोडकळीस आलेल्या दरवाजातून आपण जेव्हा आत
जातो तेव्हा वाड्याची मातीच्या भिंतींनी युक्त बरीच दालने दिसतात. आता अनेक कुटुंबे तेथे राहत असल्यामुळे आतील भागाची विभागणी झाली आहे. वाड्याच्या बाहेर येऊन आपण चारही बाजूंनी फिरलो की साध्या दगडात आणि कुठे कुठे पक्क्या विटात बांधलेल्या, मध्येच कुठेतरी पडझड झालेल्या अशा भिंती पाहिल्यावर मावळातील पाटील गढीच्या मोठ्या वाड्यात जरी राहत नसला, तरी साध्या बांधकामातील परंतु विस्ताराने मोठ्या असलेल्या वाड्यात राहत असावा या गोष्टीचा प्रत्यय येतो. वाड्याच्या मागील भागातील दुसऱ्या चौसोप्यांची जोती मातीच्या ढिगाऱ्यात पूर्णपणे गाडली गेली आहेत. या गावचा पाटील छ. शिवाजीमहाराजांच्या आग्राभेटीच्या वेळी त्यांच्याबरोबर असल्याचे सांगण्यात येते. रायगडचा भगवा ध्वज बरीच वर्षे या वाड्यात जतन करून ठेवला होता असे सांगण्यात येते. आज त्यांचे वंशज या ठिकाणी राहत आहेत. या गावात भोसल्यांव्यतिरिक्त दुधाणे, थोपटे, लोहकरे ही घराणी वास्तव्य करीत आहेत.
खांबगावकर भोसल्यांच्या घराण्याची काही कागदपत्रे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी शिवचरित्र साहित्यखंड - २ मध्ये प्रसिद्ध केली आहेत. त्यात बकाजी फर्जद यास खांबगावची पाटीलकी दिल्याचा उल्लेख दि. १३ सप्टेंबर १६७५, १८ सप्टेंबर १६७५ या तारखांच्या पत्रांमध्ये आढळतो.
बकाजी फर्जंद साहेबाचा कदीम इतवारी फर्जंद याच्या बापाने साहेबाचेये कस्तमशागत केली आहे व बकाजीही साहेबकामावरील कस्तमशागत बहुत करीतो याकरिता साहेब यावरील मेहेरबान आहेती. मेहेरबानीने बक्षीसही पावतो. याउपरी बहुतच मेहेरबानीने साहेबाच्या मनी जाले की यास यक काम करून द्यावे म्हणून त्यावरून मौजे खांबगाव बु।। ता।। का।। मावळ येथील पाटीलकी...बकाजी फर्जद यास वतन महरमत केले असे. पाटीलकीचे काम घेत जाणे. पाटीलकीचा महजर बकाजीस करून देणे.'
बकाजी फर्जद यांसकडे २५ सप्टेंबर १६७५ ची छत्रपती शिवाजीमहाराजांची मुद्रा असलेली दोन पत्रे पाहावयास मिळतात.
१० ऑक्टोबर १६७५ रोजी या संदर्भात खांबगाव येथे एक महजर आला.
त्यावर मावळातील करंजावणे येथील देशमुख, जैतजी नाईक, बिनमल्हारजी नाईक तसेच कोंढवे, कात्रज, नांदेड, खडकवासले, नांदोशी, वडगाव, आंबेगाव, बावधन, हिंगणे, खेरडी, गोऱ्हे ,लवळे, कोथरुड इ. गावच्या पाटलांच्या निशाणी तसेच परीट-मोगरी, सुतार-वाकस, तेली-पहार, महार-विळादोरी, गुरव, कुंभार, लोहार, तराळ यांच्याही निशाण्या मजहरावर आहेत. छ. राजाराममहाराज व छ. शाहूमहाराज यांची काही पत्रे या घराण्याच्या कागदपत्री पाहावयास मिळतात. गावचे सर्व पारंपरिक मानपान भोसले घराण्याकडे आहेत. कसब्याप्रमाणेच या गावात बारा बलुती असून त्यांची सेवा पारंपरिक पद्धतीने आजही चालू आहे.
अमृतेश्वर हे ग्रामदैवत असून सिंहगड किल्ल्यासमोर रामकड्याजवळ भवानी मातेचे स्थान गावचे दैवत म्हणून मानले जाते. दत्तात्रय जोगळेकर हे ग्रामपुरोहित म्हणून काम पाहतात. गावचे सर्व पारंपरिक मानपान भोसले घराण्याकडे आहेत.
या गावचे एक सुपुत्र श्री. कैलास भोसले हे असि. कमिशनर (सेल्स टॅक्स) म्हणून शासनसेवेत आहेत. पुणे येथील जयश्री गार्डनचे मालक श्री. यशवंतराव भोसले हेही या घराण्यातीलच एक सुपुत्र आहेत.
मावळातील एक शिवकालीन घराणे म्हणून या घराण्यास खचितच एक वेगळा मान आहे. त्यांच्या वाड्याची स्थिती कालपरत्वे जरी जीर्ण झाली असली तरी छ. शिवाजी महाराजांच्या #प्रतिपश्चंद्रलेखेव या मुद्रेच्या पाटीलकीच्या अस्सल सनद या मात्र सदैव त्यांना सन्मान देणाऱ्याच ठरतील.
१) शिवचरित्र साहित्य खंड- २, ले.२७५ ते २७७, २८० ते २८५ (ले.- वि. का. राजवाडे).
(महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे)
#फोटो -विकास चौधरी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...