विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 May 2023

#परचुरे_वाडा (अन्नछत्रवाडा) -भाग २

 



























#परचुरे_वाडा
(अन्नछत्रवाडा) -भाग २
-अन्नछत्रासंबंधी सामान्य माहिती-
उत्तर पेशवाईत जी ऐतिहासिक घराणी पुढे आली त्यापैकी परचुरे घराण्यातील त्रिंबकरावभाऊ नारायण परचुरे हे ऐक असून ते घराणे उत्तर पेशवाईत मोठा नाव लौकिक संपादून पुण्यातील प्रसिद्ध मेहुणपुरा (आजही शनिवार पेठेत प्रसिद्ध आहे.) येथे राहात होते. त्यांनी भोरच्या सचिवांच्या भोर संस्थानाच्या हद्दीत मौजे खांबगाव येथे स्वकमाईतून एक जागा खरेदी करून तेथील प्राचीन पुरंदरेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार केला. तसेच आवश्यक तेथे धर्मशाळा, विहीर इ. साठी सुमारे २५ हजार रूपये पदरचे खर्च कले. श्रावणमास दक्षिणेच्या निमित्ताने कोकणातून मढे घाटाने शेकडो ब्राह्मण पुण्यात प्रतिवर्षी येत जात. (याच घाटातून नरवीर तानाजी मालुसरे याचे शव कोकणात त्यांच्या गावी नेण्यात आले आणि म्हणून त्याला पुढे मढे घाट असे नाव पडले अशी आख्यायिका आहे.) प्रवाशांना पोटभर मोफत अन्न आणि निवारा देऊन त्यांचा दुवा मिळावा ह्या हेतूने मौजे खांबगाव या ठिकाणी इ. स. १७८९ मध्ये त्रिंबकरावभाऊ यांनी अन्नछत्र सुरू केले असा उल्लेख तत्कालीन कागदपत्रात आढळतो. जवळच गुंजण मावळात ( राजगड पायथा) जे मढे घाट अन्नछत्र केळद या गावी होते ते आणि हे दोन्ही स्वतंत्र आहेत. खांबगावचे अन्नछत्र हे पूर्णपणे परचुरे यांच्या खाजगी मालकीचे होते. इ. १७८९ पासून पुढे ५० वर्षे त्रिंबकरावांनी या साऱ्याची व्यवस्था स्वखर्चाने चालू ठेवली. तथापि आपल्या पश्चातही अन्नछत्राचा कारभार व्यवस्थित चालू राहावा अशी त्यांची इच्छा होती. यासाठी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशव्यांना विनंती करून मौजे असनोली ता. कोरकडा तर्फ साकुरली प्रात कल्याण भिवंडी हा १५०० रू. महसुलाचा संपूर्ण गाव तसेच तालुके नेरळ उत्पन्नापैकी १५०० रू. आणि सिंहगड जवळील मौजे गोऱ्हे हा एक हजाराचा गाव असे एकूण ४००० रूपये ईनाम करार करून घेतले. येथील सर्व कारभार मुखत्यारीने आपला चुलत पुतण्या काशीनाथ गोपाळ याचे स्वाधीन केला तथापि काशीनाथाचे पोर वय म्हणून कारभारी म्हणून आबाजीपंत करमरकर प्रथम काही दिवस होते त्यानंतर य कामी महादेव जोशी यांचे नांव कागदपत्रातून आढळते. या दोघा कारभाऱ्यांनी काशिनाथरावास कारभार नीट समजून द्यावा आणि पुढे तो जाणता झाल्यावर त्याच्या इच्छेप्रमाणे कारभाऱ्यांनी वागावे, अशी त्रिंबकरावाची योजना होती. त्यानंतर कारभाऱ्यांनी व आपल्या त्रिवर्ग बंधूंनी कोणतीही दखल घेवू नये अथवा लोभही वा अभिलाषा ठेवू नये. अशी नीट व्यवस्था करून त्र्यंबकरावभाऊंनी श्री क्षेत्र काशीस इ. १७९९ मध्ये गमन केले. पुढे १८०२ मध्ये त्यांनी स्वर्गवास वयाच्या ६० व्या वर्षी केला. पुढे काशीनाथ गोपाळ यांनी त्रिंबकरावांच्या इच्छेनुरूप सुमारे २३ वर्षे पाहून काशीनाथही परलोकवासी झाले. त्यांना मूल बाळ नसल्यामुळे त्यांनी गुहागरच्या एका जोशी नामक सद्गृहस्थाचा मुलगा दत्तक घेऊन
त्याचे नाव रामराव असे ठेवले आणि अन्नछत्र संस्थानच्या सर्व कारभार त्याचेकडे मुखत्यारीने सोपवला.
सोपवला.
मूळ संस्थान संपादक त्र्यंबकराव यांचे तीन बंधू बापूजी, विठ्ठल आणि आनंदराव यांना आपण त्र्यंबकरावाचे प्रत्यक्ष वारस हयात असता अन्नछत्राची व्यवस्था मुखत्यारीने परकुलात गेली ही गोष्ट काही मान्य झाली नाही. त्यांनी रामराव काशीनाथ याजवर कंपनी सरकारात दावे - फिर्यादी करून आपली संस्थानावरील मालकी सिद्ध करण्याचा प्रयत्न दीर्घकाळ म्हणजे इ. १८४१ पर्यंत केला. तथापी त्र्यंबकरावांनी काशीहून पाठविलेल्या पत्रातील स्पष्ट आदेशावरून आणि त्यांचे मृत्यूपत्रातील विशेष - तरतूदी लक्षात घेऊन काशीनाथरावांचा दत्तक पुत्र रामराव यांचेकडेच संस्थानचा कारभार मुखत्यारीने रहावा असा हुकुन देऊन सरकारने हे प्रकरण संपविले आहे.
#संदर्भ -परचुरे घराण्याचे अन्नछत्र
#माहिती_साभार- विवेक परचुरे
-विकास चौधरी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...