प्रसंगी शत्रूची कबरही उद्ध्वस्त करणारे शिंदे*
मराठ्यांच्या शहान्नव कुळात मोडणार्या शिंदे घराण्याला प्राचीन इतिहास असून ते मुळचे सेंद्रक नावाने उदयास आले. सूर्यवंशी आणि नागवंशीय शिंदेचे देवक समुद्रवेल असल्याने त्यांचे सागरी परिसरातील साम्राज्य अधोरेखित होते. प्राचीन कालखंडात कर्नाटक, राजस्थान, खानदेश आणि देवगिरी परिसरात शिंदें घराण्याची सत्ता होती. शिवरायापासून स्वातंत्र्यापर्यंत शिंदे घराण्यातील अनेकांनी पराक्रमाची शर्थ करुन रुस्तूमराव, झुंजारराव, रविरावसारखे किताब मिळविले. शिंदें घराण्याचा झेंडा म्हणजे लाल रंगाच्या ध्वजावर सूर्यनारायण आणि बाजूला नागाचे चित्र होते. काळानुरुप शिंदेंच्या ताथवडकर, दसपटी, तोरगळकर, नेसरीकर, घेडवाडकर, म्हैसाळकर, कण्हेरखेडकर अशा अनेक शाखा तयार झाल्या. शिवरायांच्या प्रेमापोटी वेडात दौडलेल्या सात वीरांत विठोजी शिंदे अग्रभागी होते. तर छत्रपती शाहूंच्या पत्नी अंबिकाबाई शिंदेंच्या कन्या होत्या. आठराव्या शतकापासून कण्हेरखेडच्या वीरांनी शिंदे कुळाला वैभवाच्या शिखरावर नेले. राणोजीरुपाने कण्हेरखेडात उपजलेल्या वीराने स्वत:बरोबरच आपल्या जयाप्पा, दत्ताजी, जोतिबा, तुकोजी या पुत्रांना स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करायला प्रेरित केले. आपल्या डोळ्यादेखत बापासह चार भाऊ आणि पुतण्यांच्या मृत्यूनंतर महादजीबाबांनी शिंदे घराण्याला अजरामर केले. पानिपताच्या रणसंग्रामात शत्रूच्या घावाने कायमचे लंगडेपण आलेल्या महादजीने आपल्या घरातील आठ दहा विधवांचा सांभाळ करत जगाचाही संसार केला. पानिपत मैदानात देवदूत बनून आलेल्या राणेखानाला शिपायापासून थेट सेनापती बनवले. तर मूळचे रायमोहा येथील फकीर बीडचे शाहवली मन्सुरशाह महादजीपासून आजतागायत शिंदे घराण्याचे धार्मिक गुरु राहिलेले आहेत.
शिंदेंचे कण्हेरखेड म्हणजे वीरांची खाण, महादजीबाबांचे भाऊबंद साबाजी शिंदेंने राघोबासोबत पाकिस्तानच्या अटकेपार मराठ्यांचे झेंडे रोवले. त्यांचा नातू मानाजी म्हणजे तत्कालीन कालखंडातील भीम असून त्यांच्या अचाट पराक्रमाने मानाजीला फाकडा म्हटले गेले. पेशवेच नाहीतर इंग्रजही मानाजीला वचकून राहिले. नेमाजीही असेच पराक्रमी होते. महादाजीचे वारसदार दौलतराव शिंदे ग्वाल्हेरचा कारभार पहात असताना त्यांचे सासरे सर्जेराव घाडगेंनी किरकोळ कारणावरुन दौलतरावावर हात उचलताच मानाजीचा नातू आनंदरावाने भर दरबारात सर्जेरावाच्या खांडोळ्या केल्या होत्या. पानीपत युद्धात एकट्या कण्हेरखेडने आपले सोळा वीर खर्ची घातले, गावातील सोळखांबी स्मारक त्याची साक्ष आहे. पुण्यातील वानवडी, नगरजवळील श्रीगोंदा, जामगाव ही शिंदेंच्या जहागिरीची गावे आहेत.
दत्ताजी शिंदेंनी लग्नापूर्वीच हैद्राबाच्या निजामाला भिडून पराक्रम दाखविला होता. याशिवाय उत्तरेत मोहिम काढून राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश भागात मराठ्यांचा झेंडा फडकावत तेथील जाचक मुस्लिम शासकाला बाजूला सारून हिंदू जनतेला धीर दिला. रोहतकजवळील झज्जर गावात एकही मंदिर शिल्लक नसल्याचे दिसताच शिंदेंनी नव्याने मंदिराची उभारणी केली, त्याला आज बुढा शिवालय म्हटले जाते. या दत्ताजींनी उत्तरेतून परत येऊन नुकतेच लग्न केले होते. त्यावेळी बातमी समजली की, अफगाणिस्तानचा शासक अहमदशाह अब्दाली हिंदुस्थानवर चालून येतो आहे. हळदीच्या अंगाने दत्ताजी अब्दाली विरोधात लढत राहिले. ज्या बादशाहासाठी मराठे दिल्लीत गेले होते त्याचा कारभारी नजीबखान रोहिला अब्दालीला फितुर झाला होता. याच नजीबखानाने विश्वासघात केल्याने अब्दालीने दत्ताजीला बुरांडी घाटावर हालहाल करुन मारले. मृत्युशय्येवर असताना याच वाघाने शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून “ बचेंगे तो और भी लढेंगे” म्हणत दिल्ली परिसरात शिंदेकुळाचा उद्धार केला. याच दगाबाज नजीबखान रोहिल्यामुळे क्रूरकर्मा अहमदशाह अब्दाली हिंदुस्तानवर चालून आल्याने देशाच्या रक्षणासाठी मराठे पानिपतावर चालून गेले. 1761 साली पानिपत युद्धात महादजींच्या सख्या तीन भावासाह एकट्या कण्हेरखेड गावातील शिंदेंकुळातील 16 बहाद्दरांनी पानीपतवर बलिदान दिल्यानंतर महादजी हिंमतीने उभे राहिले.
दोनएक वर्षात वडीलासह चार भाऊ उत्तरेच्या राजकारणात बळी गेले. त्याचवेळी महादजीबाबा जबर जखमी होऊन मराठी मुलूखात परतले. पानिपत युद्धामुळे मराठी साम्राज्याला मोठा हादरा बसलेला होता. त्यामुळे स्वराज्याची घडी बसायला दहा वर्षाचा कालावधी गेला. यादरम्यान संपूर्ण हिंदुस्थानवर वेगळी छाप सोडणारे नेतृत्व म्हणून महादजी शिंदेंचा दबदबा निर्माण झाला. देशातील पहिली कवायती फौज उभी करुन त्यावर डी बॉयनसारख्या फ्रेंच सेनापतीची नियुक्ती केली. सोबत फ्रेंच, इंग्रज, जर्मन, डच, इटलीसारख्या प्रगत देशातील सैनिकांची भरती केली. याशिवाय रानेखान पठाणाच्या नेतृत्वात मराठी कुळातील सर्वांनाच त्यात सामील करुन घेतले. शिंदेच्या कारभाराचे ठिकाण आता ग्वाल्हेर झाल्याने उत्तरेच्या राजकरणात मराठ्यांचा टक्का वाढायला मदत झाली. याच डी बॉयनच्या फौजेचा मुक्काम आग्र्यात पडला असता त्याला ताजमहालच्या जतनाची कल्पना सुचली. त्यामुळे ताजमहालचे जतन अप्रत्यक्षरित्या महादजी शिंदेंनी केलेले आहे.
1771 ला दिल्लीच्या गादीवर शाहआलम दूसरा विराजमान असून नजीबखान रोहिल्यासह त्याच्या वंशजांनी बादशाहच्या नाकी नऊ आणले होते. नजीबखानाचा मुलगा झाबितखानाने दिल्लीत हैदोस घातल्याने शहाआलमने गादी सोडून इंग्रजांचा आश्रय घेऊन महादजीकडे मदतीची याचना करताच महादजीने दिल्लीत प्रवेश करुन शहाआलमला पुन्हा एकदा मोगलांच्या गादीवर बसवून 10 फेब्रुवारी 1771 ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचे भगवे निशाण फडकावून शिवरायांचे स्वप्न साकार केले. त्यानंतर झाबितखानाचा बंदोबस्त करण्यासाठी मराठे त्याच्या पाठलागावर गेले असता तो पत्थरगड किल्ल्यात जाऊन लपला. मधल्या काळात नजीबखान रोहिल्याचे निधन झाल्यानंतर याच किल्ल्यानजीक त्याची कबर बांधली होती. झाबीतखान महादजींना भिऊन पळून केल्यानंतर मराठ्यांची फौज नजीबखानाच्या कबरीकडे वळली. नजीबखानाच्या गद्दारीमुळेच दत्ताजीला वेदनादायक मृत्युला सामोरे जावे लागले होते. नजीबखानाची कबर दिसताच मराठ्यांचा राग अनावर होऊन त्यांनी त्याची कबर उद्धवस्त करत शिंदेंना भिडणार्या शत्रूला कबरीतून बाहेर काढून ते त्याला शिक्षा देतात हे जगाला दाखऊन दिले. दिल्ली आणि परिसराची नीट व्यवस्था लाऊन महादजी शिंदे मराठी मुलूखात परत आले.
पुढे दहा वर्षे दिल्लीचा बादशाह मराठ्यांच्या ओंजळीने पाणी पित होता. त्यानंतर नजीबखानाचा नातू गुलाम कादीर आजोबापेक्षा जास्त महत्वाकांक्षी निघून इसवी सन 1787 साली त्याने थेट शहाआलमवरच आक्रमण करुन त्याच्या छाताडावर बसून त्याचे डोळे काढून शाही परिवारातील बायकापोरांची बेअब्रू केली. तेव्हा पुन्हा एकदा महादजींच्या फौजेने दिल्लीवर धडक घेऊन बादशाहाला वाचविले. यावेळी बादशहाने खुश होऊन महादजीला अलिजाबहाद्दर आणि वकील ए मुतालिक या पदव्या दिल्या. गुलाम कादीरच्या बंदोबस्ताकरिता राणेखान गुलाम कादीरच्या पाठीमागे लागला, महादजींचा मुक्काम मथुरेत असता राणेखानाने गुलामला पकडून त्यांच्यासमोर उभे करण्यात आले. महादजीने गुलाम कादीरचे हातपाय काढून झाडाला उलटे टांगले. बादशाहाच्या विंनंतीवरुन नंतर त्याचे डोळे काढण्यात आले. यावेळी बादशाहने मराठ्यांचे विशेष आभारतर मानलेच शिवाय महादजींच्या सांगण्यावरून 4 सप्टेंबर 1789 रोजी संपूर्ण राज्यात गोहत्याबंदीचे फर्मानही काढले. अशारितीने शिंदे घराण्याने दिल्लीलाही आपल्या मर्जीप्रमाणे वागविले. मथुरा, वृंदावन सारखी हिंदूची पवित्र स्थाने आपल्या ताब्यात आणली. ग्वाल्हेरच्या रूपाने संपूर्ण उत्तर भारतात शिंदेंचा वचक बसला. एका बाजूला मुस्लिम फकिराला आपल्या गुरुस्थानी मानणार्या शिंदेंनी प्रसंगी उद्दाम वागणार्या मुस्लिम राज्यकर्त्यांना वठणीवरही आणले. त्यामुळे भाईचारा काय असतो हे शिंदे घराण्याकडे पाहून शिकावे.
Dr.satish kadam
With thanks
Satish Kadam sir
Tuljapur
No comments:
Post a Comment