उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर
बाबूजी नाईक बारामती स्थित उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ होते.त्यांनी ८२ वर्षांच्या आयुष्यात श्रीवर्धनकर भट घराण्यातील आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ पासून सवाई माधवराव( औट घटकेपुरता पेशवे झालेल्या राघोबा दादांसह)-अशा सात पेशव्यांची जवळपास ६४ वर्षांची कारकीर्द नुसती बघितली नाही तर अंगभूत शौर्य,पराक्रम आणि पिढीजात धन बळावर त्यांनी उत्तर मराठेशाहीत स्वतःचे एक वेगळे स्थान पण निर्माण केले होते.पंतप्रधान(पेशवा) होण्याच्या महत्वाकांक्षेपायी त्यांच्या राजकीय भूमिकांत सातत्य राहिले नाही.वेळोवेळी ते सामर्थ्यशाली पेशव्यांबरोबर संघर्ष करत राहिले. त्यांची पेशवा पदाची आस कधीच फलद्रूप झाली नाही.
कोकणातील केळशी गावचे रहिवाशी असलेल्या सदाशिव केशव जोशी आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या पोटी विश्वनाथ( बाबूजी नाईक) २३ मे १६९५ रोजी जन्मास आले.केशव जोशी हे काशी इथे सावकारीचा व्यवसाय करत असत.त्यामुळे सदाशिव जोशी सुद्धा पिढीजात सावकारीचा व्यवसाय चालविण्यासाठी सातारा इथे आले.सावकारी व्यवसायामुळे साताऱ्यात त्यांना ` नाईक (सावकार)जोशी ` म्हणून ओळखले जाऊ लागले.इ.स .१७०८ पासून म्हणजे छ.शाहू महाराज सातारा गादीवर तख्तनशीन झाल्यापासून सदाशिवराव जोशी महाराजांच्या लष्करी मोहिमा,फौज्फाट्यासाठी कर्जाऊ पैसा पुरवू लागले होते.त्यांचा मुलगा विश्वनाथ (जन्म २३ मे १६९५)यांनी तरुण वयात पिढीजात सावकारी व्यव्सायातिल खाचाखोचा माहित करून घेताना शस्त्रास्त्र,युद्ध कलेत पण प्राविण्य मिळविले.बाळाजी विश्वनाथ भट १७ नोव्हेंबर १७१३ रोजी छ.शाहू महाराजांचे पेशवे म्हणून नियुक्त झाले.त्यांनी नव्याने जन्मास आलेल्या मराठी राज्याला आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी खूप कष्ट घेतले.यातून त्यांचा आणि सावकार बाबूजी नाईकांचा स्नेह जुळला.राज्य चालविण्यासाठी कर्जाऊ रकमेची निरंतर व्यवस्था होण्याच्या दूरदृष्टीने बाळाजी विश्वनाथांनी आपल्या चारही अपत्यांचे विवाह सावकारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात केले होते.बाळाजींची धाकटी कन्या ( थोरल्या बाजीराव पेशव्यांची धाकटी बहिण) भिउबाई हिचा विवाह इ.स.१७१२ मध्ये बाबुजींचा धाकटा भाऊ आबाजी पंत याच्याशी होऊन बाबूजी आणि बाळाजी एकमेकांचे सोयरे झाले.बाळाजी विश्वनाथ बाबूजी जोशींना आपल्या बरोबर विविध लष्करी मोहिमांत नेऊ लागले.नोवेंबर १७१८ रोजी औरंगाबादहून पन्नास हजार मराठी फौज सय्यद बंधूंच्या मदतीसाठी दिल्लीला रवाना झाली.सय्यद बंधूंच्या मदतीने मराठ्यांना चौथाई,सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या अधिकृत सनदा मोगल बादशाह कडून मिळवायच्या होत्या.तसेच तीस वर्षे मोगलांच्या ताब्यात असलेल्या महाराणी येसूबाई आणि राजघराण्यातील अन्य सदस्यांची मुक्तता करून त्यांना स्वराज्यात आणायचे होते.बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला कूच केलेल्या मराठी फौजेत अंबाजीपंत पुरंदरे,संताजी भोसले,परसोजी भोसले,पिलाजीराव जाधव,उदाजी पवार.बाळाजी महादेव फडणवीस,बाळाजी विश्वनाथांचे पुत्र बाजीराव,व्याही बाबूजी नाईक,शेख मीरा,नारो शंकर सचिव,चिमणाजी मोघे यासारखी विजीगिषु इराद्याची पराक्रमी मंडळी होती.महाराणी येसूबाई आणि राजघराण्यातील अन्य सदस्यांना घेऊन मराठी फौज २० मार्च १७१९ ला दिल्लीहून साताऱ्याच्या दिशेने निघाली.छ.शाहू महाराज आणि मातोश्रीं १२ वर्षांनी एकमेकांना भेटले!
No comments:
Post a Comment