मूळचा संगमनेरचा विठ्ठल सुंदर परशुरामी. प्रचंड हुशार आणि पराक्रमी होता. हैद्राबादच्या निजामाच्या दरबारात रामदास पंतांच्या वशिल्याने याचा प्रवेश झाला होता. तिथे आपल्या कर्तबगारीने मोठे नाव कमावले. हिंदू ब्राम्हणसमाजातील असूनही मुस्लिमाचा वरचष्मा असलेल्या निजामाच्या दरबारात त्याला मोठे महत्व प्राप्त झाले.
जेव्हा राघोबादादा यांनी पेशवाई बळकवण्याचे प्रयत्न सुरु केले तेव्हा चुलत्या पुतण्यांतील भांडणाची ही संधि साधून पेशव्यांचे राज्य उलथून पाडण्याचा विठ्ठल सुंदरनें प्रयत्न केला. त्यासाठी सातारच्या राजाराम महाराजांच्या जागी नागपूरच्या जानोजी भोंसल्याच्या हस्तें मराठेशाहीचा राज्यकारभार चालवावा व पेशव्यांनां हांकलून द्यावें असा बेत त्यानी बनवला.
साडेतीन शहाण्यापैकीच एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांच्या मार्फत जानोजी भोसले यांना पेशव्यांच्या विरुद्ध तयार केले. रघुनाथरावांच्या कारस्थानामुळे असंतुष्ट असणारे मोरोबा फडणीस, सदाशिव रामचंद्र शेणवी, गोपाळराव पटवर्धन वगैरे सरदारही पेशव्यांविरुध्द फितूर झाले. त्यांच्या बळावर निजामानें पुण्यावर चाल करून पुणें लुटलें व जाळले…
विठ्ठल सुंदर हे पेशवाईचे शत्रू होते मात्र ते मोठे बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी होते. त्यांनीच निजामअल्लीला गादी मिळवून दिली होती. ते लष्करी डावपेंचांतहि निष्णात होते. हैद्राबादच्या मुस्लिम राजवटीत विठ्ठलपंताना मोठा मान होता. त्यांना राजाबहादुर प्रतापवंत हा किताब दिला असून निजामशाहींत त्याची जहागीर ”गणेश” या नांवानें ओळखली जात होती.
No comments:
Post a Comment