विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 May 2023

बेलसर-पुरंदरची लढाई

बेलसर-पुरंदरची लढाई.. स्वराज्यस्थापनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेली मोठी लढाई.. फत्तेखानाने पुरंदरवर हल्ला केला. मराठ्यांची फौज निब्बर तडाखे देत होती. मुसेखानाला पाहून गोदाजीराजे जगताप यांनी त्याच्या छातीत भाला खुपसला, तरी तो लढण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून गोदाजीराजेंनी त्याला उभा चिरला.. खांद्यापासून कमरेपर्यंत..

अफजलखान वध झाल्यावर शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यापर्यंत मुलुख मारला. विजापूर अस्वस्थ होते. काहीतरी उपाय करावा म्हणून रुस्तुमेजमाला ससैन्य महाराजांवर हल्ला करण्यासाठी रवाना केले. कोल्हापूरनजीक लढाई झाली.. अफझलखानाला मातीत गाडल्याच्या महिन्याभरात झालेली लढाई.. मैदानात आदिलशाही सैन्य उर फुटेस्तोवर पळत होते. शिवछत्रपती स्वतः युद्धाचे नेतृत्व करत होते.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला, मिर्झाराजे जयसिंह यांच्या छावणीत शिवाजी महाराजांची गाठ पडते निकोलाओ मनूची सोबत.. शिवाजी महाराज आणि मनूची एकमेकांसोबत गप्पा मारतात. त्याच्या वेशभूषेविषयी चौकशी करतात, मनूचीच्या धर्माविषयी शिवाजी महाराज जाणून घेतात. मनूची लिहितो, शिवरायांची अशी समजूत होती, की तत्कालीन युरोपात पोर्तुगालच्या राजशिवाय दुसरा कुणी श्रेष्ठ राजा नसावा.

सुरतेच्या दुसऱ्या स्वारीहून परत येताना कांचनबारीच्या आसपास मोगलांचे सैन्य आडवे आले. समोर पसरलेल्या विस्तीर्ण मैदानात आपण मराठयांना सहज मारू शकू, हा फाजील आत्मविश्वास मोगलांकडे होता. पण वीरश्री म्हणजे शिवछत्रपती.. दहा हजार सैनिकांचे नेतृत्व करत स्वतः शिवराय दोन्ही हातात पट्टे चढवून उभे होते.

 आता विचार करा, हे जे घडलंय ते तसंच दाखवायचंय.. म्हणजे कांचनबारीच्या युद्धात दहा हजार सैनिकांच्या समोर आपला राजा उभाय.. दोन्ही हातात पट्टे चढवले आहेत आणि थोड्याच वेळात महाराजांचा पांढरा अंगरखा रक्ताने भरलाय, चेहऱ्यावर रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत, पट्ट्याच्या पात्यावरून कित्येक जणांचे रक्त ओघळत आहे..

तिकडे पुरंदरच्या लढाईत वाघासारख्या काळजाच्या गोदाजीराजेंनी आपल्या हातातल्या तलवारीने मुसेखान उभा चिरलाय.. खांद्यापासून कमरेपर्यंत त्याचे दोन भाग केलेत.. छातीत घुसलेला भाला उरलेल्या शरीरासोबत तसाच लटकतोय.. आजूबाजूला लढत असलेल्या मोगल सैनिकांनी ते दृष्य बघितलंय आणि त्यांची परिस्थिती काय झाली असेल, याचा आपण फक्त विचार करायचा..

रुस्तुमेजमासोबतच्या लढाईत महाराज मैदानात उतरून युद्ध करतायत. महिन्याभराखाली आपल्या मालकाने असा माणूस फाडलाय, ज्याचं नाव घेतलं तरी दक्खनच्या पोटात भीतीचा गोळा येत असे. काय हिम्मत असेल त्यावेळी प्रत्येकात, काय जोश असेल.. काय मर्दानी तडाखे बसले असतील आदिलशाही सैन्याला..

निकोलाओ मनूची सोबत बोलताना एक जाणकार राजा म्हणून शिवराय दिसतात.
राज्याभिषेकाच्या धामधुमीत सुद्धा गडावर आलेल्या हेन्री ओक्झेंडनची राहण्याची-खाण्याची व्यवस्था करण्याकडे महाराज जातीने लक्ष देतात, तेव्हा एखादा राजा किती चौकस असावा हे लक्षात येते.
सोन्याचांदीच्या नाण्यांचा होत असलेला पाऊस आणि कुंकूम-केशराने भरलेल्या रस्त्यावरून जेव्हा महाराज गोळकोंड्यात प्रवेश करतात, तेव्हा दक्खनेच्या स्वामींचा रुबाब आपल्याला लक्षात येतो..
आपला मुलगा पालथा जन्माला आला म्हणून अपशकुन म्हणणाऱ्यांना 'एक दिवस दिल्लीची पातशाही पालथी घालेल' असे उत्तर देत महाराज केवळ शांत करत नाहीत, तर आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय आणि आपल्या पोराचे उत्तरदायित्वसुद्धा सांगून टाकतात. (विशेष म्हणजे राजाराम महाराज ते पूर्ण करण्यासाठी वयाच्या 19व्या वर्षांपासून मैदानात उतरतातसुद्धा..)

किती मोठा कॅनव्हास आहे हा.. शिवरायांच्या आयुष्यात कितीतरी रंग आहेत. कितीतरी काळीज पोखरणारे, उर्मी जागवणारे, रक्त सळसळ होण्यास मजबूर करणारे प्रसंग आहेत.. हे जे काही घडलंय ते इतकं रोमांचक आहे, की आहे तसंच दाखवलं तरी कोणत्याही एक्शन-मसाला चित्रपटाला सहज धूळ चारेल..
त्यासाठी उचलेगिरी करून, अनैतिहासिक प्रसंग दाखवण्याची काय गरज?
शिवाजी महाराजांविषयी असलेल्या आदरातून कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते, हे मान्य.. पण ते करत असताना आपण नकळतपणे महाराजांचा अनादर तर करत नाही ना याची चाचपणी कधी करणार?

ज्या दरबारात साधे वर मान करून बघणे शक्य नव्हते, बोलणे तर लांबीची गोष्ट.. जागेवर गर्दन मारायला नंग्या तेगी घेऊन उलट्या काळजाचे हशम उभे असायचे.. त्या दरबारात मराठ्यांचा राजा डरकाळी फोडून आलाय, "तुम देखा, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाह देख्या । मै तुम्हारी मनसीब छोड्या । मेरा सिर काटके ले जावो तो ले जावो, मै पातशाहकी हजुरी नहीं चलता ।"

पण हा स्वाभिमानी बाणा बाळगणारा राजा दाखवण्यासाठी नसलेल्या कुबड्या घेण्याची काय गरज?
खरा इतिहास दाखवणे होत नसेल तर चित्रपट नाही बनवले तरी चालतील. चित्रपट मनोरंजन म्हणून पाहावा, असं कितीही म्हणलं तरी त्याच चित्रपटांमध्ये दाखवलेली छबी कायमस्वरूपी मनावर उमटते. चारेक वर्षांखाली शिवरायांच्या इतिहासावर असे किती चित्रपट आले होते? तरी भारताच्या कानाकोपऱ्यात शिवछत्रपतींचे नाव माहीत होते.

आणि जे आजकाल छाती पुढे काढून सांगत आहेत, की महाराजांचा इतिहास जगात पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.. त्यांच्या माहितीसाठी,
सतराव्या शतकात जगात प्रसिद्ध होणारा पेपर म्हणजे 'लंडन गॅझेट'.. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया खंडात ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांच्या वखारी होत्या, तेथे हे वृत्तपत्र प्रकाशित होत असे.. त्या गॅझेटमध्ये शिवाजी महाराजांचे नाव छापून आले होते, ज्यात महाराजांचा उल्लेख केला होता,
"Sivagee, the grand rebel, who defeated Moguls, in several battles, remains almost matter of that countrey.."
शिवछत्रपती जिवंत होते, तेव्हाच जगभर त्यांच्या पराक्रमाचा दरारा पोचला होता.

लेकहो, महाराजांच्या नावाचा वापर करून आपण स्वतःला जगभर पोचवतोय.. शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासाला आपल्यासारख्या दुबळ्या कुबड्यांची गरज नाही.

केतन पुरी


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...