पानिपतच्या युध्दाच्या वेळी पेशव्यांना नऊ लाख मोहरांचे कर्ज दिले म्हणून दीक्षितांना 'नवलाखे दीक्षित' असेही म्हणत असत. पानिपतच्या दारुण पराभवामुळे हे कर्ज काही फिटले नाही, म्हणून त्याबदल्यात परगणे नाशिकची जहागिरी आणि प्रांत संगमनेरची सरदेशमुखी पेशव्यांनी त्यांना दिली. तसेच खानदेशात पाचखेडला जहागिरी. असे म्हणतात की, कर्जनिवारण झाले नाही म्हणून दीक्षितांच्या घरातील पुरुषाने जिवंत समाधी घेतली. ती समाधी वाईला आहे. तेथे रोज तेलवात होते . वाईला वाडा होता. तो विकला.मूळ पुरुष हरभट दीक्षित यांची समाधी आजही ओंकारेश्वराजवळ आहे. पेशवाईनंतर दीक्षितांच्या सातव्या पिढीपर्यंत म्हणजे सदाशिव माधव यांच्या पर्यंत सावकारी चालू होती; परंतु त्यांच्या सावत्र भावाने केलेल्या कर्जापायी वाडा गहाण टाकावा लागला. परातभर दागिने आणि सोन्या-चांदीचे वैभव उपभोगलेल्या दीक्षितांच्या वैभवाला उतरती कळा लागली. वाड्यातच त्यांनी मंगल कार्यालय सुरू केले . कुटुंबघटक समजल्या जाणाऱ्या भाडेक-्यांकडून आठ आणे भाडे घेण्यास सुरवात केली. गहाण पडलेला वाडा मात्र त्यांना सोडवता आला नाही. सदाशिव माधवांचे मित्र अमरावतीचे पाथरी येथील दत्तात्रय शंकर मोटे. त्यांचा वडलांपासूनचा सराफीचा व्यवसाय होता. ते सावकारीही करीत. त्यांनी सदाशिव माधवांना कर्ज दिले होते. वाडा विकून कर्ज फेडावे म्हणून त्यांनी मोटे यांना सांगितले की, माझी ही वास्तू तुम्हीच घ्यावी अशी इच्छा आहे पंचेचाळीस हजारांच्या किंमतीत इ. स. १९३३ मध्ये वाडा मोटे यांच्या ताब्यात आला.
वाड्यावर आता मोटे मंगल कार्यालय अशी पाटी आहे. मोट्यांनी काही दुरुस्त्या करून तिसरा मजला चढवला. पुराच्या वेळी वाड्याचा दर्शनी दरवाजा निखळून वाहत गेला. पण तो सापडला. तो परत बसवला. ७६ वर्षांचे दत्तात्रय शंकर मोटे भेटले. त्यांनीही तीस वर्षापूर्वी कात्यायन सूत्रानुसार अग्निहोत्राची दीक्षा घेतली आहे. वाडा विकल्यावर सदाशिव माधव दीक्षित इतरत्र रहावयास गेले. वाड्यातील 'कुसरीच्या महालात' चालणारा गणपतीउत्सव बंद झाला. चिंचवडच्या मोरया गोसावींना मिळालेल्या मोरेश्वराची प्रसादमूर्ती दरवर्षी भाद्रपद शुध्द प्रतिपदा व माघ शुध्द प्रतिपदेला चिंचवडहून मोरगावला जात असताना तिचा पहिला मुक्काम पुण्यात भाद्रपदात सरदार रास्ते यांच्या वाड्यात व माघ महिन्यात निवडंग्या विठोबाच्या मंदिरात असे. इ. स. १९३५-३६ मधील गोष्ट. त्यावर्षी काही कारणाने सरदार रास्ते यांच्याकडे पालखी उतरण्याची सोय होण्यासारखी नव्हती, म्हणून चिंचवड देवस्थानचे एक ट्रस्टी रामभाऊ दंडवते यांनी मोटे यांना विचारले. त्यानुसार मोटे यांनी पालखीची व्यवस्था वाड्यात केली. दीक्षितांचा गणपती ज्या 'कुसरीच्या महालात ' बसत होता, त्याच ठिकाणी पालखीची व्यवस्था झाली आणि तेव्हापासून जवळजवळ पस्तीस- चाळीस वर्षे पालखी तेथे उतरत असे. आता ती एकनाथ मंगल कार्यालयात उतरते. पालखी संध्याकाळी येई. तेथे आरास करण्यात येई. पहाटेपर्यंत दर्शनाला रीघ लागत असे. रात्री आरती-धूपारती होई. पहाटे पालखी पुढच्या मुक्कामाला निघे. दीक्षितांनी सुरू केलेले कार्यालय मोटे यांनी पुढे चालू ठेवले. साठ वर्षांपूर्वी मंगलकार्यालयाचे भाडे होते दहा रुपये. काही दिवस भारत हायस्कूलची प्राथमिक शाळा या वाड्यात भरत असे. आज दीक्षित त्या वाड्यात राहत नाहीत; पण वाड्याच्या वैभवाच्या खुणा इतरत्र आहेत. दीक्षितांना पालखीचा मान होता. ती पालखी कसबा गणपतीला दिली आहे. गणपतीपुढे झेंडा नाचवण्याचा मान दीक्षितांकडे आहे. पुरुषभर उंचीच्या, एकावेळी सव्वाशेर तेल मावेल अशा दोन समया दीक्षितांनी मोरगाव गणपतीला दिल्या आहेत. एक शिसवी छपरी पलंगही देवाला दिला आहे. शनिवारवाड्याच्या बरोबरीने बांधलेली ही वास्तू पुराच्या तडाख्यातून वाचून आजही उभी आहे. काही भाग मोडकळीला आला आहे, पण मोटे यांनी डागडुजी करून वास्तू जतन केली आहे. ज्या श्रध्देने दीक्षितांनी हे पेशवेकालीन वैभव हाती दिले, त्याच श्रध्देने ही वास्तू जतन करणार आहे, असे मोटे यांनी सांगितले. श्रध्देमुळेच ही पेशवेकालीन वास्तू आज उभी आहे.
लेखिका- डाॕ. मंदा खांडगे (वैभव पेशवेकालीन वाड्यांचे)-१९९२.
-विकास चौधरी
No comments:
Post a Comment