विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 May 2023

#सरदार_शितोळे_वाडा- (कसबा पेठ, पुणे) भाग-१

 

(कसबा पेठ, पुणे)
भाग-१
पोस्तसांभार ::विकास चौधरी 


छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आधीपासून शितोळे घराणे प्रसिध्द होते. पुणे परगण्याची देशमुखी शितोळ्यांकडे होती. शितोळ्यांचा भव्य वाडा कसब्यात होता. कसबा गणपतीकडून सरळ तांबट आळीकडे जाताना उजव्या हाताला जवळच धडफळ्यांची घरे होती. हे धडफळे पाषाणचे पाटील होते. धर्माधिकारी हे उपाध्याय होते. त्यांचा वाडाही जवळच होता. निरगुडकर हे शितोळ्यांचे कारभारी होते. जवळपासच्या बऱ्याचश्या जमिनी ह्या शितोळे-देशमुखांच्या होत्या. मुख्यतः परगण्याखालील शेतीची सर्व जमीन लागवडीला आणणे, परगणा संपन्न राखणे हे काम देशमुख-देशपांड्यांचे. देशमुख म्हणजे मांडलिक राजाच. राज्य चालवण्यास राजाला जो पैसा व धान्यादी सामग्री पाहिजे, ती देशमुख- देशपांडे वतनदारांकरवी मिळायची. राजकीय मानापेक्षा समाजातील देशमुखीचा मिळणारा मान श्रेष्ठ होता. देशमुखांच्या सल्ल्याने मुजुमदार व सुभेदार यांची निश्चिती होत असे. मोकासदाराप्रमाणे देशमुखांच्या पदरी फौज पायदळ असे. जवळजवळ बाराशे वर्षांपेक्षाही अधिक काळ शितोळ्यांकडे पुण्याची देशमुखी होती.
श्रीमंत बाजीरावांनी शनिवारवाड्यासाठी नदीकाठी जी जागा निवडली ती जागा तसेच काळ्या वावरापर्यंतची जागा शितोळे-देशमुखांची होती. ही सर्व जागा श्रीमंत पेशवे यांनी वस्ती करण्यासाठी घेतली. त्याबद्दल बाणेर व पुनवळ ही गावे शितोळ्यांना बहाल करण्यात आली.
शितोळे शिसोदिया रजपुतांचे वंशज असून, त्यांचे काही पूर्वज दख्खनमध्ये आल्यावर शितोळे म्हणून ओळखले जाऊ लागले. सरदार शितोळे यांना मिळालेल्या सनदा व इतर कागदपत्रांवरून या घराण्याने बाराशे वर्षांपेक्षाही जास्त काळ देशमुखी उपभोगली, असे दिसते. तीनशे वर्षापूर्वी या कुटुंबाचे तीन शाखांमध्ये विभाजन झाले. सातभाई-शितोळे, नाईक -शितोळे आणि नरसिंगराव-शितोळे नरसिंगराव-शितोळे घराण्याचे संस्थापक आबाजीराव शितोळे, हे विजापूरच्या अदिलशहाच्या पदरी होते. त्यांना इ. स. १६०५ मध्ये देशमुखीचे हक्क परत मिळाले. उत्तम सेवाचाकरी करून मालोजीराव शितोळ्यांनी शाहूमहाराजांची मर्जी संपादन केली. त्यांना इ. स. १७१८ मध्ये देशमुखीच्या उत्पन्नातील तिजाईचा हक्क प्राप्त झाला. त्याच मालोजीरावांनी पेशव्यांच्या काळात लढाईमध्ये उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना दख्खनमध्ये बरीच वतने मिळाली. त्याच घराण्यातील सिद्धोजीरावबीन खंडोजीराव यांनीही मर्दुमकी गाजवली. महादजी शिंदे आणि त्यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. महादजींनी उत्तरेत गाजविलेल्या शौर्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडे सिद्धोजीरावांच्या सेवेची मागणी केली, त्यांना आपल्या पदरी ठेवण्याची विनंती केली. अशा प्रकारे या दोन्ही कुटुबांचे ग्वाल्हेरमध्ये वास्तव्य झाले. उत्तरेकडील यशानंतर महादजी दक्षिणेत परत आले. श्रीमंत पेशव्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपली मुलगी बाळाबाई हिचा विवाह सिद्धोजीरावाचा मुलगा लाडोजीराव याच्याशी मुक्रर केला. हे लग्न पुण्यातच झाले. दोन्ही घराण्यातील मित्रत्वाचे नाते आणखी दृढ झाले. या लग्नामध्ये कन्यादान म्हणून महादजींनी उज्जयिनी आणि ग्वाल्हेरमधील काही गावे लाडोजीरावांना आंदण दिली;तसेच त्यांना प्रथम दर्जाची सरादारकी व वार्षिक दीडलाख रूपये तनखा देण्यात आला. (डाॕ.मंदा खांडगे)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...