विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 May 2023

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी भाग २

 

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर

भाग २
पेशव्यांचे व्याही म्हणून बाबूजींना पेशव्यांकडून सतत पाठींबा मिळत गेल्याने त्यांच्यावर सोपवलेल्या अनेक कामगिऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या.सत्तेच्या उच्चतम वर्तुळात सदा वावर होत राहिल्याने त्यांचा विविध मान्यवर व्यक्तींशी संबंध येत गेला.यातून त्यांना अनौपचारिक असे ` बाबूजी ` नांव प्राप्त झाले.बाबूजी नाईकांचा सत्तेच्या वर्तुळात भरपूर वावर असल्याने त्यांच्या मनात मराठेशाहीचा पेशवा होण्याच्या आकांक्षेने अंकुर धरला.त्यातून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा धावता आढावा घेऊ या.
१--थोरल्या बाजीरावांशी वितुष्ठ:बाळाजी विश्वनाथ एप्रिल १७२० मध्ये मृत्यू पावले.त्यांच्या पश्चात पेशवेपदी कुणाची नियुक्ती करायची यावरून सातारा दरबारात मोठ्या खेळ्या सुरु झाल्या.देशस्थ आणि कोकणस्थ दोन्ही गट आपले आपले उमेदवार रेटू लागले.बाळाजी विश्वनाथांच्या पिलाजी जाधवराव,नाथाजी धुमाळ,उदाजी पवार,अंबाजीपंत पुरंदरे,संताजी भोसले,कान्होजी आंग्रे यांसारख्या निकटवर्तीय सहकाऱ्यांची बाळाजींचे थोरले पुत्र बाजीराव यांना छ.शाहू महाराजांनी पेशवेपदी नियुक्ती करावे अशी इच्छा होती.बाबूजी नाईकांची पण अशीच इच्छा होती.त्यासाठी सातारा दरबारातील बऱ्याच मुत्सद्दी,राजकारण्यांचा रोष पत्करून त्यांनी छत्रपतींकडे बाजीरावांसाठी पूर्ण ताकद लावली छ.शाहू महाराजांनी पण बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट,समर्पण,प्रामाणिकपणा इत्यादी बाबी ध्यानात घेऊन बाजीराव बाळाजी(थोरले बाजीराव) यांची १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपदी नियुक्ती करून बाबूजी नाईकांस नवनियुक्त पेशव्यास सर्वतोपरी साह्य करण्याची आज्ञा केली.
बाजीरावांनी दिलेल्या सर्व कामगिऱ्या बाबुजींनी चांगल्या प्रकारे पार पडल्या.परंतु पुढे पुढे बाजीराव आणि बाबूजी यांच्यात कर्ज फेडीवरून कुरबुरी सुरु झाल्या.प्रकरण शाहू महाराजांकडे गेल्यावर त्यांनी बाबूजींना,” बाजीराव स्वतःच्या चैनीसाठी कर्ज उचलत नाहीत..वादात गुंतण्यापेक्षा सबुरी धरा”असा सल्ला दिला.बाबूजी नाईकांनी वेळोवेळी लष्करी मोहिमांसाठी पुरविलेल्या कर्जापोटी कृतज्ञता भावनेने बाजीरावांनी त्यांना मराठ्यांचे वकील म्हणून इ.स.१७२७ मध्ये निजामाकडे पाठविले.तिथे त्यांनी निजाम,मराठे,मोगल,रजपूत यांच्यातील किचकट परस्पर संबंधांचे चांगले निरीक्षण केले.निजामाचे वैभव,लष्करी ताकद,कावेबाजपणा,तेथील सावकारांचे महत्व आदींनी ते खूपच प्रभावित झाले.तरी पण त्यांनी आपली निष्ठा मराठा साम्राज्याशीच कायम ठेवली.बाबूजींच्या उत्तम कामगिरीवर खुश होऊन बाजीरावांनी त्यांना माळव्याची सुभेदारी दिली.बाबूजी नाईकांनी माळव्यातुन पाठविलेल्या खंडणी,नजराणे आणि चौथाईमुळे बाजीरावांनी युद्ध मोहिमांसाठी त्यांच्याकडून उचललेल्या कर्जाची परतफेड होऊन गेली.इ.स.१७३३ मध्ये बाबूजींना पेशव्यांनी पुण्यात बोलावून तीन पेठांची चौधरकी दिली.बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई १७३५-३६ मध्ये उत्तरेत तीर्थयात्रेला गेल्या होत्या.त्यांचे व्यवस्थापक म्हणून बाबूजी नाईक त्यांच्या बरोबर होते.नोवेंबर १७३७ मध्ये भोपाळ मार्गे दिल्लीला बाजीरावांनी काढलेल्या मोहिमेत बाबूजी नाईक पण होते.ह्या मोहिमे नंतर बाबूजींच्या ऐश्वर्यात प्रचंड वृद्धी झाली.आपल्या पैशाच्या जोरावर पेशवे लष्करी मोहिमा आखतात,कर्ज वेळेवर फेडत नाहीत पण नांव मात्र त्यांचे होते,असे विचार बाबूजींच्या मनात येण्यास सुरुवात होऊन ते पेशव्यांबरोबर बरोबरी तसेच कर्ज परतफेडीसाठी तगादे करू लागले.बाबूजी नाईक बाजीरावांच्या विरुद्ध जाण्याचे अजून एक कारण होते.बुंदेलखंड मोहिमेत बाबूजी नाईकांचा सहभाग होता.तेथून येताना लुटीत मिळालेला एक हत्ती आवडल्यामुळे त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला.लुटीत मिळालेला यच्चयावत ऐवज प्रथम सरकारात दाखल केला पाहिजे,मग त्याची नियमानुसार वाटणी होईल असा बाजीरावांचा शिरस्ता होता.त्यानुसार त्यांनी आपल्या मेव्हण्याला,धनकोला-बाबूजी नाईकांना लुटीत मिळालेला हत्ती ताबडतोब सरकारजमा करण्याचे आदेश दिले.पण डोक्यात हवा गेलेल्या बाबुजींनी तसे करण्यास साफ नकार दिला.बाजीराव सरकारी हुकुम मोडणाऱ्याला कधीच सोडत नव्हते.त्यांनी बाबूजी नाईकांच्या वाड्यावर चौकी पहारे बसविले.चिमाजी अप्पांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले गेले.असाच प्रकार बाबूजींचे चिरंजीव आबाजीपंत याने पण केला होता.दाभाडे सरदारांकडून मिळालेली लुट त्यांनी सरकारमध्ये जमा न करता परस्पर कर्ज वसुलीसाठी स्वतःकडे ठेवली होति.बाजीरावांचे धाकटे मेहुणे ( बहिण अनुबाईचे पती ) व्यंकटराव घोरपडे यांनी पण बाबूजी नाईकांकडून सैन्य उभारणीसाठी कर्ज घेतले होते,ज्याची परतफेड वेळेवर होत नव्हती.त्यामुळे बाजीरावांची नाईकांकडे दिलेली बहिण भिउबाईचे माहेरच्या लोकांबरोबर संबंध बिघडले.एप्रिल १७४० मध्ये बाजीरावांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...