विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ३२ बदामीचे चालुक्य घराणे..

 


प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग ३२
बदामीचे चालुक्य घराणे...
बदामीच्या चालुक्य घराण्याने मध्य भारतावर साधारणपणे इ. सनाचे ५ व ते ७वे शतक राज्य केले. तत्कालीन उत्तर भारतात अत्यंत प्रबळ असणाऱ्या वर्धन राजघराण्याच्या हर्षवर्धनाची संपूर्ण एक हाती एकवटलेली सत्ता असताना त्याला टक्कर देऊ शकेल अशी शक्ती चालुक्यांच्या रूपाने दक्षिणापथामध्ये उदयाला आली.
कर्नाटक राज्यातील त्याकाळची वातापी म्हणजेच आजची बदामी ही या चालुक्यांची राजधानी होय. इथूनच या राजघराण्याचा लौकिक सर्वदूर पसरला म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे संबोधले गेले.
चालुक्य हे मूळचे अयोध्येचे, त्यांच्या नावा मागील एक कथा अशी सांगितली जाते की, ब्रह्मदेव प्रात:संध्येस बसले असता इंद्र देवाने पृथ्वीतलावर यज्ञ-याग बंद पडल्याचा शोक केला, तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या हाताच्या चुळक्याकडे पाहिले व त्यातून एक पुरुष निर्माण झाला,तोच चालुक्यांच्या मूळ पुरुष. चालुक्य राजे देवांचा सेनापती असणाऱ्या कार्तिकेयाची आपल्यावर कृपा आहे , तर आपला वराह असणारा ध्वज स्वतः नारायणाने आपल्याला दिलेला आहे असे मानत. ध्वजासोबतच त्यांचा राजमुकुट ही वराहलांछीत होता. हा वराह त्यांचं कुलचीन्ह, अमर्याद शक्ती व साक्षात विष्णूच प्रतीक होतं.
या घराण्यात अनेक उत्तमोत्तम राजे झाले. त्यांनी अनेक अश्वमेध, अग्नीष्टोम, वाजपेय, बहुसुवर्ण असे प्रतिष्ठेचे यज्ञ केले. आपल्या उत्कर्षावर असताना संपूर्ण मध्य भारतावर चालुक्यांनी एकहाती सत्ता होती. इ. स. ६४० च्या सुमारास संपूर्ण भारत तीन श्रेष्ठ सम्राटांच्या अधिपत्याखाली होता. उत्तरेतील वर्धन घराण्याचा हर्षवर्धन, मध्य भारतात चालुक्यांचा पुलकेशी आणि दक्षिणेस पल्लवराज नरसिंहवर्मन.
या पराक्रमी चालुक्य राजांनी आपल्या जमिनी वरील सैन्या सोबतच आपले आरमार देखील उभारले. त्याची माहिती आपण पुढील भागात घेऊच.
पराक्रमा सोबतच चालुक्यांची सौंदर्यदृष्टीसुद्धा आपल्याला ठायी ठायी दिसून येते. बदामी येथे कोरलेल्या अत्यंत मनोहर अश्या लेण्या, त्यांच्या समोर खोदलेला अगस्त्य तलाव आणि शेजारील भूतनाथ मंदिर समूह हे याचे उत्तम उदाहरण आहे.
चालुक्यांच्या काळात मंदिर स्थापत्य व शिल्पकला यांचा परमोत्कर्ष झाला. नागर आणि द्राविड शैलीचे मिश्रण करून एक वेगळीच ' वेसर ' नावाची स्थापत्यशैली त्यांनी विकसित केली. आपल्याला ती पट्टदकल आणि ऐहोळे येथील नयनरम्य मंदिरांमध्ये दिसून येते.
बहुतेक सर्व चालुक्य राजे व राजपुत्र हे उत्तम शिक्षण प्राप्त केलेले असत. चार वेद, वेदांग, पुराण, महाकाव्य, अर्थ, राज्यशास्त्र त्यांना अवगत असे. संस्कृत ही राजभाषा आणि कन्नड ही लोकभाषा होती. सार्वजनिक ठिकाणी या दोनही भाषांतून मोठे लेख कोरलेले आढळतात. यावरून सामान्य लोकही शिक्षित असावेत असा अंदाज बांधता येतो. चालुक्य राजा विजयादित्याच्या एका लेखात वातापी नगरीत चौदा विद्यांमध्ये पारंगत असे काही हजार लोक होते असे म्हणले आहे. या काळात संस्कृत व कन्नड या दोन्ही भाषांमध्ये विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती झाली.
तर अश्या या महापराक्रमी चालुक्य राजांची, त्यांच्या पराक्रमाची माहिती पुढील भागात घेऊ.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ:-
१)महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास :
मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
२) प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास - डॉ. लिली जोशी.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...