पुलकेशी पहिला...
जयसिंह हा चालुक्य घराण्याचा मूळ पुरूष होय. एहोळे येथील प्रशस्ती मध्ये हा लष्करी बाण्याचा होता असा उल्लेख येतो. जयसिंह व त्याच्या नंतर गादीवर आलेला त्याचा पुत्र असणाऱ्या रणरागाने मिळून बदामीला आपले राज्य स्थापन केले. हे दोघेही अत्यंत लढवयै होते. त्यांनी राष्ट्रकूटराजा इंद्रयाचा पराभव करून संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रकूटांकडून जिंकून घेतला.
रणरागानंतर त्याचा पुत्र पुलकेशी (१) हा इ.स. ५३५ च्या सुमारास गादीवर आला. चालुक्य वंशाची मुद्रा खऱ्या अर्थाने इतिहासात उमटविणारा हा राजा होता असे म्हणता येईल.
राज्यपदावर आल्यावर त्याने बदामीच्या आसपासच्या प्रदेशांची भर आपल्या राज्यात घातली. वनवासीचा (गोवा) कदंब राजा हरीवर्मा याजपासून बदामीच्या पश्चिमेचा कर्नाटकचा बराचसा भाग याने जिंकून घेतला.आपल्या या विस्तारलेल्या राज्याची राजधानी त्याने वातापीपुर येथे स्थापन केली. चालुक्यांच्या ताब्यात येण्यापूर्वी वातापी वा बदामी हे पल्लव राजांचे उत्तरेकडील एक महत्त्वाचे ठाणे होते. आपली राजधानी सजविण्याचे, देखणी अशी चित्तहारी मंदिरे, विलोभनीय सरोवरे निर्माण करण्याचे श्रेय देखील पुलकेशीलाच जाते. चालुक्य वंशाने ज्या ज्या क्षेत्रात नाव केले, त्या त्या क्षेत्राचा पाया पुलकेशीने घातला.
महापराक्रमी असणाऱ्या या सम्राटाने अश्वमेध, अग्निष्टोम, वाजपेय, बहुसुवर्ण हे प्रतिष्ठेचे यज्ञ केले. हिरण्यगर्भ महादानाचा सोहळा देखील त्याने पार पडला,जो करण्याचा अधिकार फक्त सम्राटाला असतो. अश्या स्तुत्य कामगिरी नंतर त्यानं स्वतः पृथ्वीवल्लभ, सत्याश्रय, रणविक्रम अशी बिरुदे धारण केली. त्याने ' सत्याश्रय श्रीपुलकेशी वल्लभ महाराज ' अशी पदवी धारण केलेली दिसते.
अश्या या महापराक्रमी पुलकेशी नंतर त्याचा मुलगा किर्तीवर्मा गादीवर आला. त्याची माहिती पुढील भागात घेऊ...
क्रमशः
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ:-
१)महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास :
मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
२) प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास - डॉ. लिली जोशी.
३) प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
No comments:
Post a Comment