विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 June 2023

सरलष्कर सुलतांनराव निंबाळकर यांचा शिलालेख !!!!

 




सरलष्कर सुलतांनराव निंबाळकर यांचा शिलालेख !!!!
पोस्तसांभार ::अनिल दुधाने 
सुंदरेश्वर महादेव मंदिर गुंज (बु) शिलालेख
मुर्तीगंज येथील शिलालेख..
हा शिलालेख जालना जिल्यातील ता.घनसावंगी या गोदावरीच्या नदीच्या काठावर वसलेल्या मौजे गुंज( बु ) गावाच्या पुर्वैला असलेल्या श्री. सुंदरेश्वर महादेव मंदिरात आहे सदरील. मंदिर पुर्वमुखी असुन शिलालेख मंदिराच्या सभामंडपातील छताच्या खाली. गर्भगृहाच्या भिंतीवर डाव्या बाजुला आहे..सदर शिलालेख उठावाच्या स्वरूपाचा असून ५ ओळीचा देवनागरी मराठी संस्कृत मिश्र भाषेत आहे सुशोभिकरणाच्या नावाखाली ग्रामस्थांनी त्यास रंग दिल्यामुळे शिलालेखाची अक्षरे झिजत असून पुसट होत चालली आहेत.परंतु अक्षरे ठळक असल्यामुळे लेख सहजपणे वाचता येतो .
गावाचे नाव : मौजे गुंज बु ता.घनसावंगी जि.जालना
शिलालेखाचे वाचन :
१ || श्री सुवा मध्ये श्रेष्ठ दशभुज पंचानन हरु ||तया पादार्वी
2 || दि दृढ सुरतान निंबाळकर||तयाची जे भार्या परमस-
3 ||ति सुंदर नाम जिचे||तयेचा सुपुत्र राव हनमंत देवा
4 ||ज्य सिवांचे ||१ ||सके १६१४अंगीरानाम सवछरे हेमंत रु
5 ||तु मार्गेश्वर मासे कृ .पक्ष पंचम्यात दिने देवालय सिध्यर्थ||
जी.पी.एस. :१९ ३० ” ६७ ९७ ,७६ ०९ ’’५ ६ ’८८
शिलालेखाचे स्थान :- शिलालेख मंदिराच्या सभामंडपातील छताच्या खाली. गर्भगृहाच्या भिंतीवर डाव्या बाजुला आहे.
अक्षरपद्धती : उठावाचा स्वरूपाचा लेख आहे
भाषा : देवनागरी मराठी संस्कृत मिश्र स्वरूप
प्रयोजन : देवालयाचे बांधकाम पूर्ण झालेची स्मृती जपणे .
मिती / वर्ष : –सके १६१४अंगीरानाम सवछरे हेमंत रु तु मार्गेश्वर मासे कृ .पक्ष पंचमी
काळ वर्ष : १७ वे शतक -१८ डिसेंबर १६९२ रविवार
कारकीर्द :-निजामशाही –महाराणी ताराराणी कालखंड
व्यक्तिनाम : सुरतान निंबाळकर, हनमंतराव निंबाळकर
ग्रामनाम :-
शिलालेखाचे वाचक : यू . म पठाण सर
शिलालेखाचे संशोधक ;-श्री रामभाऊ लांडे
शिलालेख सुलेखन :-श्री सचेतन दळवी
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६१४ व्या वर्षी अंगीरानाम संवत्सरात हेमंत ऋतू मध्ये मार्गेशिष महिन्याच्या कृष्ण पक्ष पंचमी ला सर्व देवामध्ये श्रेष्ठ असलेला कि ज्याला दहा हात व पाच मुखे (तोंड )असलेल्या भगवान शिव शंकर च्या चरणी तत्पर व दृढ असलेले सुलतानराव निंबाळकर व त्याची अतिशय सुंदर असलेली पत्नी व त्यांच्या मुलगा राव हनुमंत यांनी श्री शिवाचे देवालय बांधले
शिलालेखाचा आशय :
सर्व सुरांध्ये म्हणजे देवांमध्ये श्रेष्ठ दहा हात आणि पाच मुख असलेला शिव शंकर.त्याच्या चरणकमलाशी दृढ (श्रद्धा)असलेला सुरतान निंबाळकर, त्याची अतिशय सुंदर असलेली पत्नि, तिचा मुलगा रा.हनमंत देव. ज्या शिवाचे, शके १६१४ अंगीरस नाम संवत्सरात हेमंत ऋतुमध्ये.मार्गशिर्ष मासामध्ये कृष्ण पक्षात पंचमी तिथीला हे देवालय पूर्ण झाले.
निंबाळकर घराणे
सुलतानजी निंबाळकर या घराण्याचा मुळ पुरुष हा निंबराज परमार ( १२९५ ) . त्यामुळे निंबाळकर म्हणजेच धारचे परमार ( पवार ) . महाराष्ट्रात आल्यानंतर फलटणजवळील निंबळक गावी राहिले म्हणून यांना निंबाळकर हे नाव पडले . अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरच्या आदिलशाहीत निंबाळकर हे आपल्या कर्तत्वाने खूप गाजले . त्यामुळे सुरूवातीला महमद तुघलकाने व नंतर अदिलशाहाने या घराण्याला नाईक पदवी दिली . तेव्हापासून त्यांना नाईक निंबाळकर म्हटले जाते . मोगल , निजाम व आदिलशाही दरबारात निंबाळकरांनी आपली तलवार गाजविली . " वनंगपाळ निंबाळकर म्हणजे बारा वजीराचा काळ " अशी त्याकाळी म्हण होती .
सुलतानराव निंबाळकरहे मुळचे फलटण येथील नाईक निंबाळकर घराण्यातील महाराणी सईबाई साहेब याच्या कुळातील आहेत . सुलतानराव हि त्यांना पदवी होती छत्रपती शिवरायांची शेवटची स्वारी म्हणजे जालना स्वारी होय . स्वारीहून परत येत असताना त्यांच्यावर मोगलांनी आक्रमण केले . त्यात सिधोजी निंबाळकर संगमनेर हे ठार झाले . ( १६७९ ) याच सिधोजीचे चिरंजीव हणमंतराव निंबाळकर हे सुरूवातीला मोगलाकडे गेले . तेव्हा त्यांना पुणे जिल्ह्याचे ठाणेदार केले . त्यांचा मुक्काम बारामती येथे होता .
. संताजी घोरपडेच्या हत्त्येनंतर हणमंतराव निंबाळकर स्वराज्यात दाखल झाले) येथील सरदेशमुखी व चौथाई वसुलीचे अधिकार होते .पुढे थोरले शाहूंच्या कारकिर्दीत सुलतानरावाचे पुत्र हनुमंतराव निंबाळकरहे मराठ्याचे सरलष्करसेनापती होते . व त्यानंतर सेनापती धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली गंगथडी ( गोदावरी ) भागात त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले . १७०५ साली जेव्हा हणमंतराव निंबाळकराचे निधन झाले तेव्हा मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना म्हणतो की , " हणमंतराव निंबाळकराचा मृत्यू झाला बादशहाचे नशिबच . "
हणमंतरावाच्या कारकिर्दीतच त्यांचा मुलगा हैबतराव निंबाळकर हे स्वराज्यासाठी काम करत होते . सुरूवातीला ताराबाई आणि त्यानंतर छत्रपती शाहूसाठी त्यांनी खूप कष्ट सोसले . शाहूना स्थिर करण्यात हैबतरावांचे फार मोठे योगदान होते . त्यामुळे छत्रपती शाहूनी त्यांना आपले सरलष्कर केले होते . अनेक मोहिमेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती . अश्याच प्रकारे चांदयाच्या मोहिमेवर असताना १७१४ साली हैबतराव निंबाळकर कमी आले . हैबतरावाच्या निधनानंतर छत्रपती शाहूनी त्यांचे सरलष्कर पद त्यांचा मुलगा सुलतानजी निंबाळकरांना दिले . छत्रपती शाहूंच्यावतीने त्यांना गोदावरी काठी चौथाई व सरदेशमुखीची वसूली करण्याचे अधिकार दिलेले होते
१७२४ ला निजामाबरोबर झालेल्या साखरखेडल्याच्या लढाईत व त्यानंतर १७२५ ला काढलेल्या श्रीरंगपट्टणम च्या लढाईत सुलतानजी निंबाळकरांनी फार मोठी कामगिरी बजावली होती .
.हणमंतराव निंबाळकर यांचा मुलगा हैबतराव निंबाळकर स्वराज्यासाठी हिरिरीने काम करत होते. सुरुवातीला ताराबाई व नंतर शाहू महाराजांच्या फौजेत दाखल झाले, त्यात त्यानी शाहू महाराजांना स्थिर करण्यासाठी फार कष्ट घेतले त्यामुळे शाहूंनी त्यांना “सरलष्कर” केले.
याच वेळी स्वराज्याचे दोन भाग झाले एक सातारची गादी व दुसरी कोल्हापूरची गादी, या संघर्षात कोल्हापूरचे राजे संभाजी हे हैदराबादच्या निजामाला सामील झाले.
यावेळी शाहू दरबारात बाळाजी विश्वनाथ व त्यानंतर पहिले बाजीराव यांचे महत्त्व वाढले, त्यामुळे शाहुराजांना सोडून काही मराठी सरदार निजामाकडे गेले, त्यात चंद्रसेन जाधव, नेमाजी शिंदे, रावरंभा निंबाळकर, उदाजी चव्हाण, हे नावाजलेले सरदार होते, परंतु याही परिस्थितीत सुलतानराव निंबाळकर, शाहू महाराजानसाठी झटत होते. त्यावेळी चंद्रसेन जाधव शाहू महाराजांना संकटात आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत होते. चंद्रसेन जाधव यांचा सुलतानरावांनी पराभव केला.
पण पुढील मोहिमेत त्यांना न पाठवता त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यात आला, एवढेच नाही तर त्यांची जहागिरी काढून घेण्यात आली. सुल्तानराव कंटाळून निजामाला जाऊन मिळाले. त्यांची पदवी त्यांचा भाऊ शीधोजीस देण्यात आली. तर तिकडे निजामाने त्यांना सात हजारी मनसबदारी बहाल केली, व बीड, अंबड, धारूर व पाथरीची जहागिरी दिली. त्यांनी बीडला भव्य असा वाडा बांधला, येथे खंडोबा मंदिर बांधले, हे हेमाडपंती शैलीतील आहे. त्यांनी खर्डा येथे अतिशय भव्यदिव्य अशी किल्लेवजा गढी बांधली आहे.
त्याला त्यानी सुलतान दुर्ग हे नाव दिले आहे.1795 रोजी मराठे व निजाम यांच्यात मोठी लढाई झाली याचात निजामाचा पराभव झाला.तीलाच खर्ड्याची लढाई म्हणतात. किल्ला बांधून झाल्यावर ते फार काळ जगले नाहीत.1748 रोजी ते मरण पावले
संदर्भ -१. खर्डाची लढाई आणि सुलतानजी निंबाळकर लेख –प्रा डॉ.सतीश कदम सर
२. ( IE VI -187 ) ,
@ माहिती व संकलन: अनिल दुधाणे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...