महाबाहु संभाजी
लेखन © अनिकेत वाणी
वेरूळच्या
भोसले कुळाने महाराष्ट्रावर, भारतावर आणि हिंदूधर्मावर कधीही न फेडता
येणारे उपकार केलेले आहेत. आपल्या पराक्रमाच्या शर्थीने ह्या घराण्यातील
पराक्रमी कुलदिपकांनी हिंदुस्थानाची स्वतःची ओळख जीवंत ठेवलेली आहे.
‘शिवाजी महाराज झाले नसते तर, काशीला अवकळा आली असती, मथुरेची मशीद झाली
असती, आणि सर्वांची सुंता झाली असती आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते
तर पाकिस्तानाची सीमा तुमच्या-आमच्या घरांपर्यंत आली असती’ हे अनुक्रमे
कविराज भूषण आणि स्व. यशवंतराव चव्हाणांचे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांचे
महत्व सांगण्यास पुरेसे आहेत. याशिवाय ‘गोब्राह्मणप्रतिपालक मालोजी’,
‘हैंदवधर्मजिर्णोद्धारक शहाजी’ आणि ‘म्लेंच्छक्षयदीक्षित शिवाजी’ हे
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना वापलेले विशेषणं त्यांचे
कार्य, त्यांचे महत्व आणि त्यांनी केलेल्या उपकरांची जाणीव करून देतात.
पराक्रमी
राष्ट्रपुरुषांच्या ह्या वंशात असा एक वीर आहे, ज्याच्या इतिहास
त्याच्याविषयीच्या ज्ञात माहितीच्या अभावी असेल किंवा इतर कोणत्या
कारणांमुळे असेल, महाराष्ट्रीय जनतेसमोर आला नाही किंवा जास्त प्रमाणात
पोहचला नाही. त्याच वीराच्या पराक्रमाच्या इतिहासाचा मागोवा ह्या लेखात
घेण्याचे योजिले आहे. हा वीर म्हणजे शहाजीचा जेष्ठ पुत्र आणि छत्रपती
शिवाजी महाराजांचा जेष्ठ बंधु संभाजी होय.
ह्या संभाजीचा जन्म कधी
झाला, याबद्दल मतांतरे आहेत. ठोस साधनांच्या अभावी त्यात एकवाक्यता नाही.
जिजाबाई व शहाजीराजे ह्या दांपत्यास एकूण ६ पुत्र व १ कन्या झाली.
पुत्रांपैकी शंभु म्हणजेच आपल्या लेखाचा नायक संभाजी आणि शिवाजी हे दोघेच
जगले, अशी माहिती शिवभारत ह्या समकालीन साधनात येते. संभाजी हे नाव
शहाजीराजांचा चुलत भाऊ म्हणजेच विठोजीराजांच्या पुत्राचेही होते. निजामशाही
दरबार संपल्यानंतर एकदा एक हत्ती बेभान झाला. त्याला आवरण्यात जाधव व
भोसले या दोघी सरदारांमध्ये भांडण जुंपले. हि घटना खंडागळे हत्ती प्रकरण
म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यात विठोजीपुत्र संभाजी मारला गेला. हे प्रकरण १६२३
साली घडले. हा विठोजीपुत्र संभाजी १९ फेब्रुवारी १६२३ पर्यंत जीवंत होता.
२७ फेब्रुवारी १६२३ रोजी विठोजीच्या मुलांमध्ये वाटणी झाल्याचा कागद आहे.
ह्या विठोजीस एकूण ८ पुत्र. त्यापैकी ६ मुलांमध्ये वाटणी झाल्याचा एक कागद
आणि मालोजी नावाच्या एका मुलाचा दुसरा कागद उपलब्ध आहे. ह्यात संभाजीचा
उल्लेख नाही. यावरून १९ फेब्रुवारी १६२३ ते २७ फेब्रुवारी १६२३ ह्या
कालावधीत त्याचा मृत्यू झाला असावा. तत्कालीन रूढीनुसार, आपल्या सख्ख्या
चुलत भावाची स्मृति म्हणून शहाजीने आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले
असण्याची शक्यता आहे. शिवादिग्विजय बखरीच्या आधारे रियासतकार सरदेसाई
शहाजीपुत्र संभाजीचा जन्म १६१९ चा मानतात. वा. सी.बेंद्रे संभाजीचा जन्म
१६२०-२१ सालीचा मानतात. पण विठोजीपुत्र संभाजी १६२३ पर्यंत जीवंत असून तो
असतांना पुन्हा त्याचे नाव देणे, हे शक्य वाटत नाही. म्हणून वरील दोन्ही
साल चुकीचे वाटतात. देवीसिंह चौहान यांनी संभाजीचा जन्म १६२३ चा मानलेला
आहे. संभाजीचे १६२९ साली लग्न झाले. जर संभाजीचा जन्म १६२३ चा मानला तर
लग्नासमयी त्याचे वय फक्त ६ वर्षांचे येते. त्याचे वय ६ वर्षांचे असल्यास
त्याच्या वधूचे वय निदान ५ वर्षांचे मानावे लागेल. त्याकाळी लहान वयात लग्न
व्हायची. पण शिवाजी राजांचे पहिले लग्न आणि त्याचा मुलगा राजारामाचे लग्न
१०व्या वर्षी लग्न झाले. यांच्या वधू त्यावेळी ७ ते ९ वर्षांच्या असाव्या.
म्हणून शहाजीपुत्र संभाजीचे वयाच्या ६ व्या वर्षी लग्न योग्य वाटत नाही.
संभाजीच्या जन्मकालाची निश्चिती साधनांच्या अभावी करता येत नाही.
१६२४
साली निजामशाही आणि आदिलशाही यांच्यात भातवडी येथे लढाई होऊन त्यात
शहाजीने पराक्रम दाखवला आणि शरीफजी मृत्यूमुखी पडला. यावेळी उभयता बंधु
निजामशहाकडून लढले. १९ डिसेंबर १६२५ रोजीच्या मजहरात ‘साहाजी भोसला
येदीलशाही’ असा उल्लेख येतो. त्यावरून डिसेंबर १६२५च्या पूर्वी शहाजी
निजामशाही सोडून आदिलशाहीत गेला. शहाजी आदिलशाहीत जुलै १६२५ च्या आधी गेला
असावा. आदिलशहाने त्यास ‘सरलष्कर’ हा खिताब दिला. त्याने स्वतःस सरलष्कर
म्हटल्याचा जुना उल्लेख जुलै १६२५ चा येतो. त्यावरून तो आदिलशाहीत जुलै
१६२५ च्या सुमारास गेला असावा. शहाजी आदिलशाहीत सुमारे १६२८ पर्यंत होता.
कारण शके १५४९ च्या फाल्गुन शु.१५ (८-३-१६२८) रोजी त्याने स्वतःस सरलष्कर
म्हटलेले आहे. त्यानंतरच्या शके १६५०च्या श्रावणातील कागदावर(२५-७-१६२८)
त्यास सरलष्कर हा किताब नाही. त्यानंतर शहाजी निजामशाहीत आला.
‘नंतर
काही दिवसांनी तो (संभाजीच्या लग्नाचा) समारंभ आटोपल्यावर व्याह्याच्या
संमतीने आपल्या गरोदर पत्नीस स्वजनांसह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजी राजा
दर्याखानास जिंकण्यास निघाला’, असा उल्लेख शिवभारतात येतो. दर्याखानाची
स्वारी १६२८ची आहे. त्याच वेळी जिजाबाई गरोदर होती. त्यामुळे संभाजीच्या
लग्नाचे वर्ष १६२९-३० चे असावे. संभाजीचे लग्न विश्वासराजाच्या कुळांतील
सिद्धपालाचा मुलगा विजयराज याच्या कन्येशी- जयंतीबाईशी- झाले. हा विजयराज
निजामशाही सरदार असून तो शिवनेरी किल्ल्यावर राहत असे. शहाजीचा कनिष्ठ बंधु
शरीफजीचा विवाह विश्वासराजाच्या मुलीशी झाला होता, ती मुलगी ह्याच
कुळातील असावी. तोच ऋणानुबंध लक्षात घेऊन शहाजीने आपल्या मुलाचे लग्न
जयंतीबाईशी केले असावे आणि त्याच ऋणानुबंधामुळे अत्यंत विश्वासाने जिजाबाईस
आणि इतरांस शिवनेरीवर ठेवले असावे.
पुढे २५ जुलै १६२९ साली
लखुजीराव जाधव आणि त्याच्या ३ मुलांचा निजामशाही दरबारात खून झाला.
त्यामुळे इतर जाधव मंडळींनी निजामशाही सोडून मोगलांची नोकरी पत्करली.
शहाजीनेही तोच मार्ग अनुसरत नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखानामार्फत मुघलांची
नोकरी पत्करली. त्यास व त्याच्या भावांस बादशहाने मनसबी दिल्या. त्यात
शहाजीस ५ हजार जात/ ५ हजार स्वार आणि त्याचा पुत्र संभाजीस २ हजार स्वार/ २
हजार जात अश्या मनसबी मिळाल्या. शहाजीला एक मानाचा पोशाख, एक हत्ती, घोडा,
खंजीर, झेंडा, नगारा व दोन लाख रुपये तर संभाजीस एक मानाचा पोशाख व घोडा
अश्या भेटी आजमखानाने दिल्या. पुढे बादशहाने शहाजीची जहागीर फत्तेखानास
दिली. याची त्याला चीड येऊन त्याने मोगलांविरुद्ध बंड पुकारलं. ह्या बंडास
आदिलशहाचाही पाठिंबा असावा. म्हणून २३ जुलै १६३२ रोजीचं मुहम्मद आदिलशहाने
गदगच्या देसायांना पाठवलेले एक फर्मान आहे. त्यात मीर अली रजा याच्याकडे
असलेला गदग परगण्यातील सर्व गावाचा मोकासा संभाजीच्या नावे केलेला आहे.
कदाचित हि शहाजीला आर्थिक मदत असावी. मुघलांनी पुढे दौलताबादचा किल्ला
जिंकल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर १६३३ मध्ये १० वर्षाच्या मूर्तजा नावाच्या
निजामशहाच्या वंशास पेमगिरी किल्ल्यावर गादीवर बसविले.
पुढे शहाजीने
शिवाजीराजे, जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांसह पुण्यास पाठविले. त्यावेळी
दादोजीने पुण्यात शिवाजीराजांसाठी लाल महाल बांधला. त्याच प्रमाणे
संभाजीसाठीही एक वाडा बांधला. वेदमूर्ति खंडभट शालिग्राम यांच्या
वाड्यापर्यंत उत्तराभिमुख जोते असलेला हा वाडा होता.
शहाजीच्या
एवढ्या हालचालीत आणि धामधुमीच्या राजकारणात संभाजीच्या सक्रिय सहभागाचे
उल्लेख आढळत नाही. शहाजी मुघलांकडे जातो, त्यावेळी संभाजीसही मनसब मिळते,
याचा उल्लेख वर आलेला आहे. याव्यतिरिक्त संभाजीच्या नावाचा उल्लेख या
शहाजीच्या हालचालींमध्ये फारसा आढळत नाही. याचा एक अर्थ असा असावा की
यावेळीपर्यंत संभाजीचे वय राजकारणात किंवा लढायांमध्ये सक्रिय सहभाग
घेण्याचे नसावे. पण साधनांच्या अभावामुळे कोणताही तर्क किंवा कोणताही
निर्णय करता येत नाही.
शहाजहान बादशहा १६३६च्या आरंभी दक्षिणेत आला.
त्याने शायिस्ताखानास शहाजीचा मुलुख घेण्याचा आदेश दिला. फेब्रुवारी-मे
१६३६ मध्ये आठ हजार स्वारांच्या फौजेसह नाशिक, त्रिंबक, संगमनेर हा प्रदेश
काबीज करण्यासाठी शायिस्ताखान निघाला होता. अहमदखानाने शाहजीच्या
लोकांकडून रामसेजचा किल्ला घेतला. पुढे ८ मार्च १६३६ रोजी शायिस्ताखान
संगमनेरास पोहचला. त्याने त्या बाजूचे परगणे संभाजीकडून हस्तगत करण्यास
सुरवात केली. शत्रू नासिककडे गेल्याचे समजताच त्याने आपली माणसे त्या भागात
पाठवली. खान-इ-खानान यास जुन्नरकडे पाठविले. अहमदनगरचा मुलुख
सैनिकांवाचून मोकळा आहे तेव्हा शायिस्ताखानास तिकडे जाण्याचा हुकूम
मिळाला. तो निघताच त्यास बाकिरच्या लिहिण्यावरून कळून आले, कि बाकिर
शाहजीच्या मुलाच्या पाठलागावर कोकणच्या बाजूस गेला आहे व जुन्नरास फार थोडे
लोक शिल्लक असल्याने ५०० लोक सय्यद अली अकबरच्या हाताखाली पाठविले. बंडखोर
माहुलीकडे गेल्याचे समजताच बाकिर तिकडे गेला. यावेळी संभाजी
चांभारगोंद्याकडे होता म्हणून बाकिर तिकडे गेला. तिकडून बाकीर जेथे शहाजीची
मुलेमाणसे होती तेथे - जुन्नरकडे आला. येथे उभयपक्षाची लढाई सुरू झाली.
शायिस्ताखानास
हि बातमी समजताच त्याने ७०० लोकांची कुमक जुन्नरकडे पाठवली. कुमक जुन्नरात
पोहचू नये, म्हणून विरुद्ध पक्षाने प्रयत्न केले. तरी कुमक जुन्नरास
पोहचली. पण या लोकांस रसदेची कमतरता जाणवल्याने त्यांनी शायिस्ताखानाकडे
मदत मागितली. खान आपल्या थोड्याच सैनिकांसह शहरात आला आणि शत्रूस परगंदा
केले. भिवरेच्या तिरापर्यंत पाठलाग करून कित्येकास कापून खान माघारी फिरला.
जुन्नरचा किल्ला जिंकणे शक्य वाटत नसल्याने त्याने बाकिरास बोलावून
शहराच्या रक्षणास ठेवले व स्वतःने जुन्नर व संगमनेर हे परगणे जिंकले. पुढे
निजामशाही प्रदेश जिंकून शहाजहानने शहाजीस पराभूत केले आणि याचबरोबर
निजामशाहीचा अंत झाला.
निजामशाहीचा अंत झाल्यावर शाहजी आदिलशाहीत
आला आणि रणदौलाखानाच्या नेतृत्वात त्याने दक्षिणेत ३ वेळा स्वारी केली.
१६३७ मध्ये पहिली स्वारी करून ह्या उभयतांनी इक्केरीच्या विरभद्र नायकाचा
पराभव केला. दुसऱ्या स्वारीत रणदौलाखानाबरोबर अफजलखान आणि शाहजी होते.
अफजलखानाची रवानगी शिऱ्यास झाली तर शाहजी बंगलोरवर चालून गेला. अफजलखनाने
शिऱ्याच्या कस्तूरीरंग नायकास दग्याने मारून त्याचा पराभव केला आणि शाहजीने
केपगोंडा नावाच्या अंमलदारास पराभूत करून बंगरुळ हस्तगत केले. नंतर
रणदौलाखान स्वतः तेथे गेला आणि बंगरुळावर शहाजीची नेमणूक केली. यावेळी
बंगरुळास इसलामपुर नाव देण्यात आले. १६३९-४० मध्ये तिसरी स्वारी झाली त्यात
बसवापट्टण, चिक्कनायकहळ्ळी, बेलूर, टुमकुर इ. स्थळे काबीज केली.
शहाजीने
बंगरुळ जिंकल्यानंतर तो बंगरुळासच राहत असे. बंगरुळास त्याची राहणी अत्यंत
विलासी होती. त्याची दिनचर्या एखाद्या राजाला शोभेल अशी होती. त्याने
आपल्या पदरी अनेक कवी बाळगलेले होते. जयराम पिंड्ये कृत राधामाधवविलासचंपूत
त्याचे अत्यंत रसाळ वर्णन कवीने केलेले आहे. शहाजीच्या ह्या राजेशाही
थाटास शोभेल अशी एक गोष्ट म्हणजे, त्याने आपल्या पुत्राचा यौवराज्याभिषेक
केलेला असावा. संभाजीस युवराज पद असावे. याव्यतिरिक्त आदिलशहाने शहाजीस
पाठवलेल्या अनेक फर्मानांमध्ये त्यास ‘फर्जंद’ म्हटलेले आहे. ‘फर्जंद’ हि
उपाधी बादशहाच्या उच्च सरदारांस बादशहा लावत असे. फर्जंद’ म्हणून शाहजीचा
आदिलशहाने केलेला जुन्यात जुना उल्लेख हा ३० जानेवारी १६४२ चे असून, त्यास
‘फर्जंद’ हा किताब त्या आधी मिळाला असावा.
१६४३-१६४४ मध्ये
रणदौलाखानाचा मृत्यू झाला. रणदौलाखान हा शाहजीचा मित्र होता. त्याचा मृत्यू
झाल्यानंतर त्याच्या जागेवर मुस्तफाखान खानबाबा याची नेमणूक केली. इकडे
शाहजीचे वाढते महत्व, हिंदु नायकांस त्याचा वाढता पाठिंबा बघता दरबारातील
काही लोकांस तो अडचणीचा वाटू लागला. मुस्तफाखान हा कडवा मुसलमान होता.
कर्नाटकातील नायक शाहजीच्या आज्ञेत वागू लागले. म्हणून मुस्तफाखानाने
शाहजीचा विश्वास संपादन केला आणि एके रात्री आपल्या सरदारांस बोलावून
शाहजीच्या अटकेची योजना आखली. पहाटे मुस्तफाखानाचे लोक शाहजीवर चालून गेले.
बेसावध असलेल्या शाहजीच्या तुकडीने प्रतिकाराचा प्रयत्न केला. त्या लढाईत
शहाजी बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला. त्या अवस्थेत मुस्तफाखानाने शहाजीस
कैद केले. शहाजीस कैद केल्याची बातमी संभाजीस कळताच त्यास मुस्तफाखानाचा
अत्यंत संताप आला. त्यावेळी तो बंगरुळास होता. शिवाजीनेही हि बातमी ऐकून
आदिलशहाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. ‘बंगरुळी राहणारा माझा भाऊ तेथे
युद्ध करेल आणि मी ह्या गडांचे रक्षण करीत शत्रूशी ससैन्य लढेल’ असे वाक्य
शिवाजीराजांच्या तोंडी शिवभारत ह्या समकालीन ग्रंथात आहेत.
शहाजीस
कैद करून त्यास बादशहाकडे नेण्यात आले. बादशहाने शहाजीचा प्रदेशाचा ताबा
घेण्यासाठी फत्तेखानास शिवाजीराजांविरुद्ध पाठवले तर बंगरुळ घेण्यासाठी
मुस्तफाखानाने तानाजी डूरे, विठ्ठल गोपाळ आणि फरादखान यांची संभाजीवर
रवानगी केली. ह्या सर्वांचा संभाजी व शिवाजीने पराभव केला. फरादखानाचा मोड
केल्याबद्दल शिवभारतकार आदिलशहाच्या तोंडी अत्यंत मार्मिक वाक्य टाकतो.
फरादखानाचा पराभव केल्यानंतर आदिलशहा विचार करतो, “आपल्या पित्यासाठी
संभाजीने तिकडे फरादखानाचा पराभव केला आणि इकडे शिवाजीने युद्धामध्ये
फतेखानासहि पळवून लावले. त्या विजयी संभाजीने तिकडे फरादखानाचा मोड केला
नाही तर माझेच मन आज ह्याने भग्न केले आहे. केवढे मोठे त्याचे सामर्थ्य
हे!” आदिलशहाच्या शिवाजीराजांवरील फत्तेखानाच्या स्वारीची बरीच माहिती
मिळते पण, संभाजीवरील फरादखानाच्या स्वारीचा शिवभारत सोडून इतरत्र कुठेही
उल्लेख नाही. फत्तेखानास पराभूत करून शिवाजीराजांनी शहाजहानचा मुलगा
मुरादबक्ष याच्याशी पत्रव्यवहार केला. त्या पत्रात त्याने शहाजीने
मुघलांविरुद्ध केलेल्या बंडाच्या गुन्ह्याची माफी मागून जुन्नर व अहमदनगर
येथील देशमुखीची मागणी केलेली आहे. ह्या शिवाजी-मुरादबक्ष यांच्या
संपर्काचा सुगावा आदिलशहास लागला असावा. त्यामुळे त्याच्यावर दडपण आले
असावे. याशिवाय संभाजी आणि शिवाजी यांनी अनुक्रमे फरादखान आणि फत्तेखानाचा
पराभव केल्याने आदिलशहाने शाहजीच्या सुटकेचा निर्णय घेतला. शिवाजीने सिंहगड
आणि संभाजीने बंगरुळ देऊन शाहजीची सुटका करून घ्यावी, अशी अट बादशहाने
घातली. त्यानुसार देऊन १६ मे १६४९ रोजी शहाजीची सुटका झाली.
यापुढील
संभाजीच्या आयुष्याविषयी निश्चित माहिती मिळत नाही. संभाजीचा मृत्यू नक्की
कधी झाला, याबद्दल मतांतरे आहेत. ९१ कलमी बखर, चिटणीस बखर, शिवादिग्विजय
बखर, शेडगावकर भोसले बखर ह्या बखरी संभाजीराजे कनकगिरीच्या लढाईत तोफेचा
गोळा लागून मारले गेल्याचे सांगतात. अज्ञानदासाच्या पोवाड्यात अफजलखानाने
दगा केल्याचे उल्लेख आहेत. २५ फेब्रुवारी १६५४ रोजी संभाजीस उमाजी नावाचा
पुत्र झाल्याचा उल्लेख जेधे शकावलीत आहे. याचा अर्थ संभाजी फेब्रुवारी
१६५४ पर्यंत जीवंत असावा. ४ एप्रिल १६५४ रोजीचे संभाजी राजे नावाचे एक इनाम
पत्र उपलब्ध आहे. जर तो शहाजी पुत्र संभाजी असेल तर, संभाजीची आयुमर्यादा ४
एप्रिल १६५४ पर्यंत वाढवता येते. याशिवाय १४ मे १६५७ रोजी शिवाजीराजांना
पुत्र होऊन त्याने त्याचे नाव संभाजी ठेवले. आपला सख्खा मोठा भाऊ जीवंत
असतांना त्याचे नाव आपल्या मुलास ठेवण्याची प्रथा त्याकाळी नव्हती.
त्यामुळे शहाजी पुत्र संभाजीचा मृत्यू संभाजीचे बारसे होण्यापूर्वी मे-जून
१६५७ पूर्वी झाला असावा. कनकगिरीच्या ज्या मोहिमेत संभाजीचा मृत्यू
झाल्याचे काही साधने सांगतात, ती कनकगिरीची मोहीम जानेवारी १६५५ पूर्वी
झाली असली पाहिजे. कारण १६ जानेवारी १६५५ रोजीचे आणि २१ जानेवारी १६५५ च्या
पत्रात पुणे परगण्यात कनकगिरीपट्टी नावाचा कर बसविल्याचा उल्लेख आहे.
मोहिमेचा खर्च भागवण्यासाठी अश्या प्रकारचा कर पूर्वी बसवत असत. संभाजीचा
मृत्यू कनकगिरीच्याा वेढ्यात झाला, असे गृहीत धरल्यास त्याचा मृत्यू
जानेवारी १६५५ पूर्वी झाला असला पाहिजे. सिद्धी जौहरचा वेढा सुरू असतांना
नेतोजी पालकर हा कर्नाटकात होता. तो राजगडास आल्यानंतर जिजाबाईने त्याची
निर्भत्सना केली व माझ्या ‘एकुलत्या एक पुत्रास’ मी स्वतः सोडवून आणीन, असे
जिजाबाई नेतोजीस म्हणाली, हि माहिती शिवभारतात येते. सिद्दी जौहरचा
पन्हाळ्यास १६६० साली वेढा होता. याचा अर्थ संभाजीचा १६६० पूर्वी मृत्यू
झाला असला पाहिजे.
वा.सी.बेंद्रे यांनी आपल्या ‘छत्रपती शिवाजी
महाराजांचे वडीलबंधु संभाजीराजे भोसले’ या पुस्तकात संभाजीचा मृत्यू १६६३
पर्यंत ओढलेला आहे. त्यासाठी त्यांनी शिलालेखांचा आधार दिलेला आहे. या
शिलालेखात संभाजीस ‘श्रीमद राजाधिराज महाराज’ यांसारखे विशेषणं वापरलेले
आहेत. शहाजी जीवंत असतांना असे राजा असल्यासारखे विशेषण संभाजी स्वतःस
लावणार नाही असे वाटते. यावरून हा तोच संभाजी असावा का याबद्दल शंका येते.
हि शंका आणखी बुचकळ्यात टाकणारा एक उल्लेख सापडतो. हा उल्लेख म्हणजे
जयिताबाई नावाच्या स्त्रीने भाऊजीपंत यास जमीन इनाम दिल्याचा शिलालेख आहे.
ह्या जयिताबाईचा उल्लेख शिलालेखात ‘संभाजी राजाची पत्नी’ असा करण्यात आलेला
आहे. संभाजीच्या पत्नीचे नाव जयंतीबाई होते, असे शिवभारतात आलेले आहे.
त्यामुळे इतर शिलालेखात उल्लेखित संभाजी शहाजीपुत्र असावा का, असा संशय
वाटतो. ह्या शिलालेखात उल्लेखित संभाजीराजाचा शेवटचा उल्लेख १६६३ च्या
दानाच्या शिलालेखात आढळतो. जसा १६६३ चा संभाजीचा शेवटचा उल्लेख आढळतो,
त्याच्याच विरुद्ध एक उल्लेख १६६२ च्या एका शिलालेखात आढळतो. हा शिलालेख
एकोजी राजाचा असून त्यात ‘ during the government of Enkoja-Raja: — the
havaldar of Rahadurga, Baranaji-Raja, granted a nettara-kodige for
Simangala Chikka-Deva's son Tiramapa.’ असा उल्लेख येतो. जर संभाजी १६६३
पर्यंत हयात होता तर १६६२ सालच्या शिलालेखात ‘एकोजीराजाच्या काळात’ असा
उल्लेख का येतो?
जसे संभाजीचे हे शिलालेख सापडलेले आहेत,
त्याचप्रमाणे जयिताबाईचेही (जयंतीबाई ?) शिलालेख सापडलेले आहेत. तिचे १६९३
पर्यंतचे शिलालेख सापडलेले असून काही शिलालेखात तिला शिवाजीचा मुलगा
संभाजीची बायको म्हटलेले आहे. पण ते चूक असून ती शहाजीपुत्र संभाजीची बायको
असावी.
संभाजीस उमाजी नावाचा एक मुलगा होता. त्याचा जन्म २५
नोव्हेंबर १६५४ रोजी झाला. संभाजीस सुरतसिंह नावाचा मुलगा असल्याचे
रियासतकार गो. स. सरदेसाई सांगतात. पण त्याला पुरावा त्यांनी दिलेला नाही.
कर्नाटकात सापडलेल्या शिलालेखांमध्ये संभाजीस मालुकोजी किंवा माणकोजी
नावाचा एक मुलगा असल्याचा उल्लेख येतो.
संभाजी आणि शिवाजीराजांचा
फारसा संबंध येत नाही किंवा तसे सांगणारे कागदपत्र उपलब्ध नाहीत.
शिवाजीराजांनी संभाजीस एक गाव दिल्याचा उल्लेख सापडतो. इंदापूर परगण्यातील
मौजे बोरी हे गाव ३०-१०-१६४६ रोजी शिवाजीराजांनी संभाजीस दिले. इंदापुरचा
मोकासा शिवाजीस अर्जानी झाला म्हणून मोकदमीचे हक्क कायम केल्याची दोन पत्रे
३०-१०-१६४६ ची आहेत. संभाजीचा मुलगा उमाजी यास बहादूरजी नावाचा मुलगा
होता. उमाजी पुढे आपल्या बायकोसह – मकुबाई- आपल्या मुळ जहागिरीकडे
महाराष्ट्रात आला असावा. त्याने जिंतीची आपली देशमुखी घेण्याची खटपट केली.
महादजी व बाजी देवकर यांना देशमुखीवरून हाकलून ती हडपण्याचा प्रयत्न केला.
पण त्याला त्या उद्योगात काही यश येण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला असावा.
पुढे १६८९ मध्ये औरंगजेब बादशहाकडून त्याच्या शक्क्यानिशी पत्र आणवून
बहादूरजीने आपली वडीलोपार्जित जहागीर ताब्यात घेतली. उमाजी आपल्या जुन्या
वतनी गावी आला तरी, जयंतीबाई मात्र आपल्या इतर मुलाबरोबर कर्नाटकातच होती.
१६९३ पर्यंतचे तिचे दानाचे शिलालेख आढळले आहेत. पुढे मकुबाई म्हणजे उमाजीची
बायको हिचे शाहूशी सख्य असल्याचे दिसून येते. १७०३ सालचा मकुबाई भोसलेचा
मोकदम म्हणून उल्लेख एका मजहरात येतो. कदाचित १७०३ सालच्या आधी
बहादूरजीचाही मृत्यू झाला असावा. त्यामुळे देशमुखीचा कारभार मकुबाई पाहत
असावी. तीचा देशमुखीचा शिक्काही उपलब्ध आहे. शाहू किंवा बाळाजी पेशवा तीचा
उल्लेख ‘मातुश्री’ म्हणून करत असत. १७२३ साली छत्रपती घराण्यात कोणाचे तरी
लग्न असावे. त्या लग्नासाठी शाहूने मकुबाईस बोलावले होते व वाटखर्चाबद्दल
४६ रुपये दिले. हि शेवटपर्यंत जिंतीसच राहत असावी.जिंतीस तिची समाधी आहे.
यानंतर मात्र ह्या वंश्याविषयी फारशी माहिती मिळत नाही.
लेखाच्या
समाप्तीकडे जाण्याच्या आधी संभाजीच्या जन्मासालाबद्दल आणि लग्नासालाबद्दल
साधनांच्या अभावी वर जो थोडा गोंधळ झालेला आहे, त्यास सोडविण्याचा अल्पसा
प्रयत्न येथे करतो. विठोजीपुत्र संभाजी हा १९ फेब्रुवारी १६२३ ते २७
फेब्रुवारी १६२३ ह्या कालावधीत खंडागळे हत्ती प्रकरणात मृत्युमुखी पडला, हे
वर सांगितलेले आहे. याचा अर्थ शहाजीपुत्र संभाजीचा जन्म फेब्रुवारी १६२३
नंतरचा आहे. पण १६२३ सालचा संभाजीचा जन्म जर मानला तर शिवभारतकाराने
दिलेल्या संकेतानुसार १६२९ साली ह्या संभाजीचे लग्न झाले.पण ह्यावेळी
त्याचे वय केव्ळ ४-५ वर्षांचे येते. त्या काळात बालविवाहास संमती असली तरी
इतक्या लहान वयात लग्न होईल, असे वाटत नाही. त्यामुळे हा घोळ कसा सोडवावा,
याबद्दल येथे विचार करू. हा घोळ सोडविण्याचा एक मार्ग आहे.
बुसातीन-उस-सलातीन ह्या फारसी ग्रंथात संभाजीच्याा लग्नाचा उल्लेख आहे.
त्याआधी दिलेल्या घटनांचा विचार करता ह्या फारसी ग्रंथावरून संभाजीच्या
लग्नाचे वर्ष १६३३ येते. १६३३ हे साल जर संभाजीच्या लग्नाचे मानले आणि १६२३
साल जन्माचे मानले, तर लग्नाच्या वेळी संभाजी १० वर्षांचा असला पाहिजे.
शिवाजी महाराजांचे पहिले लग्न १० वर्षांचे असतांना झाले होते. त्यामुळे
संभाजीच्या वयाचा आणि त्याच्या पूर्वायुष्यातील विवाहादि घटनांचा बरोबर
मेळ बसतो. पण बुसातीन-उस-सलातीन मध्ये दिलेल्या घटनांचा इतर साधनांशी
पडताळून पाहिल्यास क्रम चुकीचा वाटतो. त्यामुळे गुरुवर्य ग. भा. मेहेंदळे
यांनी १६३३ हे साल चुकीचे मानले आहे. संभाजीच्या जन्माबद्दल आणि लग्नाबद्दल
अधिक खुलासा साधनांच्या अभावी करता येत नाही. जर १६३३ साल त्याच्या
लग्नाचे मानले तर हा घोळ सुटतो, पण विश्वसनीयतेचा प्रश्न उभा राहतो. असो.
संभाजीचे
एकंदरीत आयुष्य पाहता, तो अत्यंत पराक्रमी दिसतो. शहाजीराजांची रसिकता
त्याच्याही अंगी असली पाहिजे. मराठी, संस्कृत, फारसी इ. भाषा त्यात अवगत
असाव्या. पण त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एक-दोन घटना सोडल्या, तर इतर
कोणतीही घटना निश्चित होत नाही. संभाजीचे वंशज सध्या जिंती ता.करमाळा जि.
सातारा येथे वास्तव्यास आहेत. शहाजीराजे भोसले, त्यांच्या पत्नी सवितादेवी
भोसले व युवराज शिवाजी राजेभोसले हे आपल्या पिढीजात वाड्यात वास्तव्यास
आहेत.
शहाजीच्या चरित्रात संभाजीचे जेवढे उल्लेख येतात, त्यावरून
त्याच्या चरित्राचा सांगाडा बांधावा लागतो. कदाचित त्यामुळेच वा.सी.बेंद्रे
यांनी लिहिलेले चरित्र सोडले, तर इतर त्याचे स्वतंत्र चरित्र नाही.
त्यामुळे संभाजीचे एक स्वतंत्र चरित्र लिहून बेंद्रेंनी एक महत्वाचं काम ५७
वर्षांपूर्वी केलेले आहे. संभाजी आणि त्याच्या वंशजांबद्दल संशोधनास वाव
आहे. त्याबद्दल तंजावरच्या ग्रंथालयात शोध घेतला पाहिजे.
शिवाजी-संभाजी-राजाराम ह्या भोसल्यांच्या शाखेने स्वतःच वेगळं राज्य
उभारलं, त्यामुळे त्यांस एक वेगळं महत्व प्राप्त झालं. कर्नाटकात
व्यंकोजीची शाखाही प्रसिद्ध आहे. पण ह्या संभाजीच्या जिंती शाखेबद्दल
जनमानसात तितका प्रचार आणि प्रसिद्धी नाही. ह्या शाखेची प्रसिद्धी कदाचित
साधनांच्या अभावी असलेल्या माहितीच्या अभवामुळे खुंटली असावी. जनमानसात
ह्या शाखेचाही प्रचार व्हावा, यास्तव हा लेखप्रपंच.
No comments:
Post a Comment