विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 June 2023

#श्रीमंत_सरदार_संत_हैबतबाबा_पवार_आरफळकर.

 


#श्रीमंत_सरदार_संत_हैबतबाबा_पवार_आरफळकर
.
(आषाढी पालखी सोहळ्याचे मालक)
परमार वंशिय धार संस्थानच्या पवारांची एक शाखा आरफळ (ता.जि. सातारा) येथे आली. वरकरणी पाहता आरफळ गाव पवारांनीच वसवल्याचे लक्षात येते. पवारांचे कुलदैवत असणारी धारची गडकालीका माता अर्थात काळुबाई हेच गावचे ग्रामदैवत ! पवारांच्या निंबाळकर, धारेराव, जगदाळे अशा अनेक उपशाखा महाराष्ट्रभर आहेत.
आरफळकर घराणे सरदार संत हैबतबाबांमुळे नावारुपाला आले. हैबतराव पवार ग्वाल्हेरकर शिंद्यांकडे आघाडीचे सरदार होते. लष्करात असुनही बाबांची पांडुरंग आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींवर नितांत श्रद्धा होती. याच भक्तभावनेतून लष्कर सोडून ग्वाल्हेरहून आरफळकडे परतताना त्यांना एका भिल्ल राजाने कैद केले. हा भिल्ल राजा निपुत्रिक होता. हैबतबाबांना कैद केले असता पांडुरंगाने त्या राजास स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांना मुक्त करायला सांगितले. त्यांना मुक्त केल्यावर राजाला पुत्रप्राप्ती झाली आणि राजाला व हैबतबाबांना त्यांच्या भक्तिचा महिमा समजला अशी कथा आहे.
तेथुन आरफळला आल्यावर हैबतबाबांनी पालखी सोहळा सुरु करण्याचे ठरविले. पुर्वीपासून अनेक दिंड्या पंढरपुरी जात असत. संत तुकाराम महाराजांच्या घरात वारीची प्रथा होती, ती पुढे त्यांचे बंधू कान्होबा यांनी तुकारामांच्या पादुका घेऊन सुरू ठेवली. माऊलींचा पालखी सोहळा सुरु होण्यापूर्वी माऊलींच्या पादुका जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर पंढरीला जात असत. पण कालांतराने काही मतभेद झाल्याने हि वारी खंडीत झाली. हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ साली माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरु केला.
हैबतबाबा पवार-आरफळकर हे महादजी शिंदे यांच्या सैन्यात सरदार होते. साहजिकच सैन्याची शिस्त त्यांच्या नसानसांत भिनली होती. तीच त्यांनी या पालखी सोहळ्यात उतरवली आहे. प्रथम हैबतबाबा पादुका डोईवर घेऊन प्रवास करत. पण नंतर कर्नाटकातील अंकलीचे सरदार शितोळे सरकार, आळंदीकर, वासकर, खंडोजीबाबा यांनी त्यांना मदत केली. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा कायम आहे. आजही पालखी सोहळ्यात माऊलींचा अश्व आणि शामियाना असतो तो शितोळे सरकारांचाच असतो.
इथूनच या सोहळ्याच्या अनुशासनाला सुरुवात होते. शितोळे सरकारांचा अश्व अंकलीवरुन निघून रोज तीस किलोमीटर अशी मजल मारत आळंदीच्या वेशीवर येतो. भुईंज संस्थानीसुद्धा अश्व एक दिवस मुक्कामी असतो. आळंदीत बिडकर सरदारांच्या वाड्यात त्याचे औक्षण करुन स्वागत केले जाते. हे बिडकर सरदार शीख संप्रदायाचे आहेत. वर्दी देऊळवाड्यात गेली की संस्थानचे प्रतिनिधी निमंत्रण घेऊन शितोळे सरकारांकडे येतात आणि मग अश्व माऊलींकडे निघतो. आज त्यांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार हे सोहळ्याचे मालक असून त्यांच्या अधिपत्याखाली सोहळा चालतो. पालखी सोहळा प्रस्थान ठेवीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी माऊलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर यांच्या स्वाधीन करते. आळंदी ते पंढरपूर व परत आळंदीला माघारी येईपर्यंत त्या त्यांच्या ताब्यात असतात . साताऱ्यात प्रवेश करताना नीराच्या शाही स्नानाचा मानही त्यांच्याकडेच आहे.
सोहळ्यात माऊलींच्या पुढे मानाच्या बरोबर सत्तावीस (२७) आणि मागे १५१ दिंड्या असतात (याशिवाय नोंदणी न झालेल्या साधारण साडेतीनशे). नोंदणी करण्यासाठी किमान सात वर्षे सातत्याने वारीत सहभाग असावा अशी शिस्त आहे. यात पहिल्या क्रमांकाचा मान आरफळच्या दिंडीला आहे. प्रत्येक दिंडीत एक वीणेकरी असतो. त्याच्या निर्देशनानुसारच संपूर्ण दिंडी वाटचाल करते. संपूर्ण सोहळा एका चोपदाराच्या आदेशावर चालतो. तीन वेळा जी आरती होते त्यासाठी चोपदाराने हातातला चांदीचा चोप (दंड) उंचावून एक आरोळी ठोकली की अवघा लाखोंचा विष्णुदासांचा मेळा शांत होतो. अगदी टाचणी पडावी तरी आवाज व्हावा एवढा शांत ! सामुदायिक अनुशासनाचे याहून मोठे उदाहरण या भूमंडळी दुसरे आहे काय? सर्व टाळकरी चोपदाराच्या हाताच्या इशार्यावर टाळ-मृदंगाचा ताल वर-खाली करत असतात. टाळ वाजवत वाजवत, माऊली माऊली उच्चारत नाद टिपेला पोहोचतो आणि आता नाद भंगणार तोच चोपदाराच्या इशार्यावर पुढचा ठेका धरला जातो. सायंकाळी समाजाआरतीच्या वेळी टाळ वाजवले जातात. पण एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर त्यांचा टाळाचा आवाज सुरुच राहतो. मग पालखी सोहळा मालक आरफळकर आणि अन्य मान्यवर त्यांची तक्रार ऐकून तिचे निराकरण करतात.
चौघड्याचा रथ, जरीपटका निशाणाचा अश्व, मग स्वाराचा अश्व, त्यामागे माऊलींचा अश्व त्यामागे काही अंतरावर रथ आणि मानानुसार दिंड्या हा क्रम संपूर्ण वाटचालीत पाळला जातो. या अनुशासनाचा परमोच्च बिंदू गाठला जातो तो रिंगण सोहळ्याच्या वेळी. या अनुशासनामुळेच आजवर संपूर्ण वारीदरम्यान एकही दुर्घटना घडल्याचे उदाहरण ऐकिवात नाही आणि खात्री आहे की असे कधी होणारही नाही.
ह्या सर्वांचे निर्विवाद श्रेय जाते ते फक्त सोहळ्याचे मालक सरदार हैबतबाबांना..! आरफळकरांनाही हैबतबांबाचा खुप अभिमान आहे, गावात सुरुवातीलाच हैबतबाबांचे भव्य समाधी मंदिर आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री.स्वप्निल जाधवराव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...