ग्वाल्हेरचे आलिजाबहाद्दर शिंदे यांचा हिंदुस्थानभर दबदबा होता. तसेच तरुणांमधे त्यांचेबद्दल आदरहि होता. कारण सैन्यभरतीच्या इच्छेने त्यांचे कडे गेलेला तरुण निराष होत नव्हता. त्यामुळेच ज्याला युद्धाची खुमखुमी आहे अन् आपले नशीब आपल्या बळकट मनगटातील तलवारीच्या बळावर अजमावयाचे, देवा धर्माचे रक्षण करण्यासाठी झटायचे आहे, परक्यांचा सुड घ्यायचा आहे असे मदोन्मत्त तरुण त्यांचेकडे सैन्यात नोकरीला येत अन् तिथे त्यांचा उचित सन्मान होई. कर्तृत्वाप्रमाणे पद प्रतिष्ठा मान मरातब मिळे. जे आपल्या रण कौशल्याने वा धन्याने दिलेल्या कामगिरीत यशस्वी झाले ते पागेतल्या हरकाम्यापायून वा साध्या शिपायांपासून ते सरदारीपर्यंत मजल मारते झाले होते. घरची पिढीजात देशमुखी असलेल्या सातारा जिल्ह्यातील अरफळी गावचे पवार कुटुंब असेच कर्तबगारीने शिंदे यांकडे सरदारी करते झाले होते. हे पवार म्हणजे मुळचे परमार.
हे परमार कुळ म्हणजे जन्मजात अग्निवंशी, क्षत्रिय कुळ. परमार म्हणजे शत्रुचा नाश करणारा. अर्थात हि पदवी वशिष्ठ ऋषींनी दिलेली कारण त्यांची पळवून नेलेली कामधेनू यज्ञातून उत्पन्न झालेल्या या वंशाचे मूळ पुरुषाने आपल्या पराक्रमाने शत्रूचा पराभव करुन सोडवून आणली होती. यानेच राजवंश स्थापन करुन राज्यविस्तार केला होता. उपेंद्र याचे नांव. माळव्यातील धारानगरी यांची राजधानी. म्हणून म्हणले जातात मालवाधिपती. या राज्याच्या अबू, वागड, जाबालीपूर, भिन्नमल अशा 35 हून अधिक शाखा उत्पन्न झाल्या. राजा वैरिसिंह, सीयक, वाक्पती, मुंज, सिंधुराज, भोज, जयसिंह, उदयादित्य, जगद्देव, नरवर्मा, यशोवर्मा या सारखे पराक्रमी, विद्वान, कुशल, धर्मप्रवण राजे या कुलातच जन्मले. राजा भोजाने सन १००८ मधे गझनीच्या महमंदाच्या स्वारी पासून रक्षणासाठी राजा आनंदपालचे मदतीसाठी आपले सैन्य पाठविले होते.
सन १८१८ मधे नुकतीच इंग्रजोची सत्ता हिंदुस्थानावर प्रस्थापित झाली होती. पण अद्यापी सर्वत्र संस्थानांचा कारभार चालूच होता. सरदारांच्या चढाया कमी झालया होत्या तरी सरदारकी चालू होती. संस्थानी सैन्य नोकरी चालू होती. पावसाळा येताच सैन्य सुट्टी घेवून गावाकडे जात होते. अन् पावसाळा संपताच पुन्हा नोकरीवर रुजू होत होते. अथात हा शिरस्ता स्वराज्य संस्थापक शिवरायांनी घालून दिलेपासून होता. इतर सरदारांबरोबरच सरदार हैबतीराव पवार ग्वाल्हेर हून सुट्टी घेवून आपल्या आरफळ गावाकडे चालता झाला. सोबत अर्थातच सरदारकी च्या जाेरावर मिळालेली धन - संपदा, सोने - नाणे होते.
सवेच्या सेनातुकडीसह ग्वाल्हेर ते सातारा अन् पुढे आरफळी असा प्रवास सुरु झाला. वाटेत सातपुड्याच्या डोंगर रांगेत भिल्लांनी हैबतरावाला अडविले. चकमक झडली. कमठयावरुन तिर सरसरले, भाला बरचा चमकल्या. पण हैबतरावाचे बळ रांगड्या डोंगरी भिल्लांपुढे तोकडे पडले. भिल्ल बळजोर झाले. त्यांनी हैबतीची संपदा लुटली. सरदाराला कैद केली. हातीपायी मार देवून गुहेत कोंडून टाकले. वर पळून जावू नये म्हणून तोंडावर भली मोठी शिळा लावून टाकली.
हैबतरावाचा पार्थ पराक्रम भिल्लांच्या माऱ्यापुढे तोकडा पडला. हातीची तलवार फिकी पडली. पदरी वनवासच नव्हे अंधाऱ्या गुहेचा वन वास पडला. कोणते पाप या जन्मी वा गतजन्मी घडले म्हणून हा गुहेचा वास, नरकवास भोगावा लागतोय असे हैबतरावाला वाटू लागले. आता यातुन सुटका अवघड असेहि वाटायला लागले. आता परमात्म्याशिवाय कोणी हि आपला वाली नाहि त्राता नाही हे हैबतरावांनी ओळखले. मराठमुलुखातला जन्म आणि तेच मराठी संस्कार रक्तात असल्यामुळे घराघरात म्हटला जाणारा हरिपाठ चा संस्कार त्याचेवर होता. त्यामुळे तो मुखोद्गत होताच. म्हणून हैबतरावानी हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. नव्हे दिवसरात्र त्याची पारायणेच केली.
भयकृत भयनाशनः। म्हणजे तोच भय निर्माण करतो आणि त्याचेवर श्रद्धा ठेवता त्या भयाचा संपुर्ण नाश हि तोच करतो. या प्रमाणे घडून आले. हैबतरावांचा नित्य आणि सतत हरिपाठाचा उच्चार चालू होता. दिवस कसला आणि रात्र कसली ते त्या अंधाऱ्या गुहेत कळायला मार्ग नव्हता. आपणच समजावे दिवस अन् रात्र सुरु झाली वा संपली म्हणून. अन्न नाहि पाणी नाहि. असे दिवसामागून दिवस उलटले. किती? ते माहित नाहि.
अन् चमत्कार झाला. इकडे भिल्ल नायकाची पत्नी प्रसवली. पुत्रप्राप्ती झाली. भिल्लंच्या गोटात आनंदि आनंदी उडाला. साखरा वाटल्या. बंदुकां उडविल्या. आनंदा प्रित्यर्थ कैद्यांना सोडायला गुहेची शिळा उघडली. आत किणकिण उजेड प्रवेशला. पण तो पहायला हैबतराव शुद्धीवर कोठे होते. अन्न पाण्यावाचून शरिर कृश झाले होते. दाढी वाढली होती. उंची कपड्यांची लक्तरे झाली होती. त्यांची शुद्ध हरपली होती. मात्र तोंडातून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। ..... कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित। उगा राहे निवांत शिणसी वाया।। .... हरि उच्चारण अनंत पापराशी | जातील लयाची क्षणमात्रे। ... हरि मुखे म्हणा हरिमुखे म्हणा । असा उच्चार स्पष्ट अस्पष्ट येत होता.
गुहेतले बाकीचे कैदी बाहेर पडले. पडले कसले त्यांना कसेबसे उचलून बाहेर काढले गेले. कारण ते अर्धमेले झाले होते. हैबतरावाला पाहून भिल्ल अन् त्यांचा नायक चकित झाला. मरणाच्या दाढात आणि दारात पडलेला हा मनुष्य तोंडातून अविरत भगवद्भक्ती वदत होता. भिल्लाला वाटले हो कोणी साधु पुरुष आहे. संत महात्मा आहे. याच्या कृपेनेच आपल्याला पुत्र झाला. आपण उगाच याला गुहेत टाकला.
आता एकदम दृष्य पालटले. कैदी असणारे हैबतराव नुसते गुहेबाहेर पडले नव्हे तर भिल्लांनीच त्यांची सेवा करायला आरंभ केला. हैबतरावाला पाणी अन्न दिले. कपडे दिले. शरपंजरी हैबतरावांवर भिल्लांनीच रानपाल्याचा औषणोपचार केला. भिल्लांच्या लेखी हैबतराव आता बाबा झाला. बळ धरु लागला. शरिराला हिडणे फिरणेचे बळ येताच बाबा तेथून बाहेर पडले. भिल्ल नायकानेही त्यांचा मोठा सन्मान करुन पाठवणी केली. दंडवत घालून सोबत रक्षणसाठी लोक देवून रवाना केले.
हैबतराव पवार आता सातपुड्यातून बाहेर पडले. पावले मराठी मुलुखाकडे चालती झाली. हळू हळू आपला मुलुख आला. आपली भाषा लागली. पण बाबांची पावले आरफळी कडे न जाता ती वळाली आळंदीकडे.
क्षेत्र आळंदी.
अलंकापुरी.
होय तीच ज्ञानोबारायांची आळंदी.
देवाची आळंदी.
८४ सिद्धांची भुमी.
पावन भुमी.
पवित्र स्थान.
आळंदी.
मरणाच्या तोंडावरुन आपण माघारी आलो ते केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने. त्यांचे भावबळे आकळे एरवी नाकळे। या बळामुळेच आपण केवळ जीवंतच नव्हे तर हातीपायी धड माघारी आलो या विचाराने हैबतरावांनी आळंदी कडे आपला तोंडवळा वळविला.
मनातुन पंढरीराची अन् माऊलींची भक्ती होतीच. आता ती पर्जन्यकाळाच्या आकाशा सारखी दाटून आली. दोन्ही डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी। कळिकाळ त्यासी न पाहे।। हे मुखाने हरिनाम गायल्याने चारी मुक्ती मिळतीलहि पण आज मात्र हरिनाम गायल्याने आपली कैदेतून मुक्ती, झाली मरणाचे वाटेवरुन मुक्ती झाली हे कळत होते. माऊलींच्या वचनाप्रमाणे हरिनाम गायल्याने चारी मुक्ती मिळतातच पण जिवंतहि राहता येते याची प्रचिती हैबतरावांना आली होती. संतवचनाची पुरेपुर सत्यता त्यांना मनोमन कळून आली होती. त्यामुळेच पंढरीश पांडुरंग आणि त्याची किर्ती सांगणारे, गाणारे ज्ञानेश्वर माऊली यांचेवरची हैबतरावांची निष्ठा तिळातिळाने नव्हे मणामणाने वाढली.
लगबगीने हैबतराव आळंदीला आहे. इंद्रायणी स्नान केले. अन् धावत धावतच मंदिरात समाधीपुढे आले. दर्शन केले. समाधीवर ठेवलेले डोके कितीतरी वेळ तसेच होते. डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांच्या गंगा यमुनांनी समाधीला अभिषेक झाला. त्या दिसत तरी होत्या पण हृदयातून उचंबळून वाहणाऱ्या गंगा यमुना कशा दिसाव्यात. कोणा कळाव्यात. त्या कळाल्या केवळ हैबतरावांना. माऊलींना आणि भक्तकामकल्पद्रुम पंढरीरायांला.
हैबतराव भानावर आले. हो खऱ्या अर्थाने भानावर आले. त्यांनी आळंदीतच मुक्काम ठेवला. अगदि कायमचाच. त्यांनी गाव त्यागला. अुपनाव त्यागले. पद, प्रतिश्ठा, धन, संपदा, नाती गोती सारे सारे त्यागले.
आता वस्ती अरफळी नाहि, आळंदी.
आता पवार नाहि, आरफळकर.
आता सरदार नाही, सरदारी नाहि, हरिभक्त.
आता हत्यांराची लढाई नाहि तर कामक्रोधाषी लढाई.
आता राऊतगिरी नाहि तर साधुत्व. विरागीपणा.
आता ढाल तलवार नाहि विणा अन् चिपळ्या.
आता षस्त्राचा खणखणाट नाहि तर टाळाचा खुळखुळाट वीणेचा झणत्कार.
आता राजधानी ग्वाल्हेर ची ओढ नाहि त्याचे जाणे नाहि, आता राजधानी पंढरी ओढ.
तेच खरे सुख.
तेच माहेर.
तेच सर्वस्व.
सरदार हैबतराव पवार आता हरिभक्त हैबतबाबा आरफळकर झाले. वीणा, टाळ, चिपळ्या, ज्ञानेश्वरी अन् गाथा हेच त्यांचे धन बनले.
हैबतरावांचा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचा दरबार संपला, अलंकापुरीतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांचा दरबार सुरु झाला.
राजसत्तेचे सरदार पद संपले. संतदारीचे भक्तपद विराजू लागले.
रणांवरच्या नरमुंडमाला वा सन्मानाच्या मौक्तिकमाला संपल्या, त्याच गळ्यात भक्तीमार्गी तुलसीमाला रुळू लागली.
हातीच्या तलवारीने समोर उभ्या शत्रू ऐवजी अंतरंगातील शत्रूवर आम्ही वीर झुंजार । करु जमदाडे मार । म्हणत वार होवू लागले.
रणांगणवर चमकणाऱ्या तलवारीच्या वाराने शत्रु रुधिरस्नान होणे ऐवजी भक्तीरसधारेत बाबा न्हावू लागले.
कधि गळ्यात वीणा धारण करावा माऊलींच्या पुढे दगडी मंडपात भजन करित तासोन तास उभे रहावे. दिवसभर केवळ भजन करावे. हाच दिनक्रम झाला. कधी ज्ञानेश्वरीचे वाचन करावे. त्याचे पारायण करावे. हाच जिवनक्रम झाला. कधी माऊलींपुढे चालणाऱ्या भजनात, किर्तनात टाळ घेवून भजनरंगात लोटून द्यावे. भक्तीरंगात न्हावून चिंब व्हावे. रणांगणात विजेप्रमाणे चालणारे पाय आता भजनरंगात नाचू लागले. आणि हात टाळ विण्यावर जोर करु लागले. लोक आता आदराने हैबतबाबा म्हणू लागले. अन् माऊलींच्या समोरच्या मंडपाला वीणामंडप म्हणू लागले. कारण हैबत बाबा तिथे सदैव विणा घेवून भजन करित असतात.
अनेक गोष्टि बदलल्या. मात्र एकाच गोष्टीत साम्य होते ते म्हणजे खांद्यावरची भगवी पताका.
कालपर्यत हाती ढाल तलवार घेवून हिच भगवी पताका रक्षण करणारे हैबतराव भजन कीर्तन करुन धर्मरक्षणात गुंग झाले. कालपर्यंत धारकरी असणारे हैबतराव आता वारकरी बनले. काल आणि आजहि ते खांद्यावर तीच भगवी पताका घेत होते. कालपर्यंत धारकरी म्हणून आजपासून वारकरी म्हणून.
हि भगवी पताका खांद्यावर घेवून लढणे आणि तीच खांद्यावर घेवून पंढरीची वारी करणे दोन्ही तेवढेच सारखे. समसमान. पुण्यप्रद. मोक्षप्राप्तीचे.
पुज्य हैबतबाबांना आता लागला टकळा पंढरीचा। असे झाले. त्यातून त्यांनी आळंदी पंचक्रोशी परिक्रमा केली. एकट्याने नाही. समुदायासवे. दिंडीने. हाती टाळ, पखवाज, वीणा अन् खांद्यावर पताका घेवून. जयघोषात. जयजयकाराने दुमदुतम.
बाबांना एक गोष्ट सतावू लागली. एवढा मोठा संत सम्राट मात्र वारकऱ्यासवे पंढरीला जाताना गळ्यातले उपरण्यात बांधून त्याच्या पादुका न्याव्यात. हे त्यांना पटेना. त्यांच्या मनाला चैन पडेना. यावर उपाय काय याचा विचार करुन बुद्धिचा भुगा पडला. त्यांचे डोस्के नांगरुन पार तडतडायला लागले.
अन् उपाय सापडला. ज्ञानियाच्या राजाला या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराजाला आपण राजेशाही लवाजम्यात, टाळपखवाजाने वाजत गाजत, भक्त गराड्यात, मोठ्या सरंजामाने, समारंभाने राजासारखे पालखीतून हत्ती घोड्यांवरुन पंढरीला न्यायचे.
हैबतरावांनी त्यासाठी चंग बांधला. जीवाचा आटापीटा केला.
अन् प्रारंभ झाला आच्या पालखी सोहळ्याला. सन १८३२ ला हैबतरावबाबांच्या प्रयत्नाला यश आले. मुर्त स्वरुप प्राप्त होवून पहिला सोहळा पार पडला. पहिली काहि वर्षे औंधच्या पंतप्रतिनिधीनी माऊलींसाठी हत्ती, घोडा, पालखी, तंबूचा सरंजाम पाठविला. मात्र काहि काहातच तो बंद पडला. तेव्हा हैबतराव बाबांनी शिवकाळापासून पराक्रमी म्हणून गाजलेले अन् पंढरीची वारी निष्ठेने घराण्याची परंपरा म्हणून चालविणारे अंकलीकर शितोळे यांना आपला शब्द टाकला. श्रीमंत सरदार सेनादुसहस्त्री अप्पाजीरावांनी हि मोठ्या मनाने हि जोखीम पत्करली. तेव्हापासून शितोळे सरदारांचे तंबू अश्व जरिपटका नैवेद्यादी खर्चाने माऊली पंढरीस मोठ्या ऐश्वर्या ने येवू लागले. ते आजतागायत. त्यामुळेच हैबतरावांना भक्त समाज आदराने मालक म्हणून म्हणू लागला. हैबतबाबांनीहि सोहळ्यात समाविष्ट होणारे मान्यवर, संत, महंत, सेवेकरी, मदतकर्ते यांना मानाचे नारळ देण्यास आरंभ केला. स्वत: बाबां आळंदी पंढरपूर पायवाटेत गळ्यात वीणा घेवून दिंडीत सामील झाले. आजही पालखी सोहोळ्यात वीणा आरफळकरांकडे आहे.
एवढ्यावर थांबतिल ते हैबतबाबा कसे? माऊलींच्या समाधी सोहळ्याला येण्यासाठी म्हणून पंढरीश विठोबारायाला आमंत्रण देणेसाठी बाबा दिंडीने येवू लागले. आळंदिहून अश्विनात निघावे व।। ९ ला पंढरीस पोहोचावे प्रल्हाद महाराज बडवेंकडे देव असतात म्हणून आधी तिथे त्यांचे घरी जावे समाधीचे आमंत्रण करावे मग मुख्य मंदिरात आरती करावी हा प्रघात बाबांनी पाडला. नवमी पासून पंढरीच्या सभामंडपात नित्य जागर करावा. पलंग निघताच बडव्यांकडून पागोटे नारळ प्रसाद घ्यावा मग जागर संपवावा. अगदि दीपावलीही घरी न करता पंढरीत करावी हा बाबांचा नियम होता.
त्याचप्रमाणे तुकोबारायांचे बीजे निमित्ताचे उत्सवात दिंडीसवे आळंदीहून जावे संमिलित व्हावे, पिंपळनेरलर निळोबारायांचे समाधी उत्सवाला जावे त्र्यंबकेश्वराला दिंडीने जावे यावे, सर्व देवस्थानी संत स्थानी पुजा अर्चना करावी भजन कीर्तन करावे हा त्यांचा आयुष्य क्रम झाला.
माऊलींच्या समाधी सोहोळ्याचे आरंभदिनी बाबांनी आपला देह कार्तिक व।। ८ चे दिवशी आळंदीतच ठेवला इतके ते एकरुप झाले. माऊलीमय झाले. अगदि समाधीहि माऊलींच्या मंदिराचे पहिले पायरीलाच त्यांनी घेतली. जशी पंढरीत नामदेवपायरी तशी आळंदित हैबतबाबांची पायरी आजही आहे.
माऊलींच्या मंदिरात बाबा रहायचे ती ओवरी हैबतबाबांची ओवरी म्हणूनच ओळखली जातो. आजही ता ओवरी बाबांच्या वारसांकडे आहे. बाबांचा मंडपातील माऊलीच्या समोरच्या नित्य भजनाचा अन् आरतीचा शिरस्ता आजही त्यांचे वारस चालवित आहेत.
बाबांच्या माघारी त्यांच्या साऱ्या परंपरा त्यांचे पुत्र मार्तंडराव, पौत्र नारायणराव, प्रपौत्र निवृत्ती यांनी अव्याहत चालविल्या. वाढविल्या. मग भले त्यासाठी काहिही यातना पडो. वर आकाष पडो पाहे। ब्रह्मगोळ भंगा जाये। वडवानल त्रिभुवन खाये। परि मी .... या निष्ठेने त्यांनी या परंपरा जपल्या आहेत. आज बाबांचे विद्यमान वंशज बाळासाहेब अन् त्यांचे हसतमुख पुत्र राजाभाऊ हे बाबांची भक्तीपरंपरा चालवित आहेत. बाबांइतक्याच निष्ठेने त्याचे अनुसरण करित आहेत. आपल्या पुढच्या पिढीलाहि त्याचे धडे ते देत आहेत. हाच बाबांच्या कार्याचा खरा आदर्श आहे. खऱ्या अर्थाने त्यामुळेच वारकरी संप्रदास वर्धिष्णु होत आहे.
© ® आशुतोष अनिलराव बडवे पाटील . पंढरपूर
No comments:
Post a Comment