भाग ५
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
८ ) जुवे बेटावरील स्वारी
आता
आपण पाहूया जुवे बेटावरील स्वारी. गोव्यानजीक असलेल्या या बेटावरील
किल्ल्यावर हल्ला करण्याचे राजांनी ठरविले. या मनसुब्यानुसार दिनांक २४
नोव्हेंबर १६८३ रोजी शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी जुवे
बेटावरील किल्ल्याला वेढा दिला. वेढा दिल्यानंतर देखील प्रतिउत्तर म्हणून
किल्ल्यावरून काहीही हालचाल झालीच नाही शेवटी आपल्या मराठी सैनिकांची एक
छोटी तुकडी रात्रीच्या सुमारास किल्ल्यात शिरली आणि आश्चर्याची गोष्ट
म्हणजे किल्ल्यातील सैनिकांना साधी खबरही नव्हती कि ते मराठ्यांच्या
वेढ्यात अडकले आहेत. मग मात्र हा किल्ला घेणे सहज शक्य झाले आणि मग लगेचच
पुढल्या दिवशी गोव्याचा व्हॉइसरॉय त्याचे जवळपास ४०० सैन्य घेऊन
मराठ्यांवर चालून आला.
कितीही
संकटे आली तरी आपल्या मराठी फौजा काही माघार घेणार नाही हे तर वेगळे
सांगायला नकोच, अखेर आपले मराठी सैन्य गनिमी काव्याने लढले आणि पोर्तुगीझ
सैन्याची पूर्ण दाणादाण उडविली. मराठ्यांचा वार इतका जबरदस्त होता कि
शत्रूसैन्य जीव मुठीत घेऊन पळू लागले, इतकेच कशाला अहो खुद्द व्हॉइसरॉय
सैन्यासोबत पळ काढत होता.
व्हॉइसरॉय
पळतोय हे पाहून शंभूराजे अजूनच खवळले आणि आपल्या घोड्यावर स्वार होऊन
खुद्द शंभूराजे त्याचा पाठलाग करू लागले. व्हॉइसरॉयने त्याचा घोडा
पाण्याच्या दिशेने नेला आणि नेमकी त्याच दिवशी पाण्याला भरती आली होती
परंतु, त्याची परवा न करता आपले शंभूराजे त्यांचा घोडा घेऊन स्वतः पाण्यात
उतरले आणि कसलीही तमा न बाळगता पुढे जात राहिले. मागून आपल्या फौजादेखील
पाण्यात उतरत होत्या.
शंभूराजांचा
घोडा आता खोल पाण्यात पोहोचला आणि त्याचा तोल जाऊ लागला परंतु, लगेचच
खंडो बल्लाळांनी पाण्यात उडी घेऊन शंभुराजांना सावरले. शत्रूसैन्य त्या
भरतीचा फायदा घेऊन पसार झाले. इतिहासात या घटनेचा उल्लेख करताना म्हटले
जाते कि, ‘त्या दिवशी गोवा तर घेतलेच असते पण, फिरंग्यांचे दैव समुद्राने
राखले.’ पुढे मुअज्जम दक्षिण कोकणात येत असल्याने फार वेळ न दवडता
शंभूराजांनी जुवे बेट दोन दिवसात सोडले आणि कोंकणात रवाना झाले.
No comments:
Post a Comment