भाग ४
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
6) चिक्कदेवरायावर हल्ला
प्रथम
आपण पाहुया चिक्कदेवराय याच्यासोबत झालेली लढाई. शंभूराजे कर्नाटक
मोहिमेवर असतांनाची हि गोष्ट. शंभूराजांनी चिक्कदेवरायावर हल्ला करण्याचे
योजिले परंतु, आपले सैन्यबळ कमी म्हणून शंभूराजांनी कुतुबशाही आणि बसप्पा
नाईक यांच्याशी तह करून त्यांच्या फौजांचा आधार घेतला आणि या एकत्रित फौजा
घेऊन शंभूराजांनी बाणावर येथे तळ ठोकला. चिक्कदेवरायावर हल्ला करण्याचा
मनसुबा मनात होताच आणि त्याच दृष्टीने सगळी योजना होत होती आणि एकाएकी
अचानक चिक्कदेवरायानेच शंभूराजांच्या फौजांवर आक्रमण केले.
सैन्याची
एकच दाणादाण उडाली आणि बऱ्याच सैन्यांनी माघार घेतली, कुतुबशाही
सैन्यदेखील पळते झाले आणि शंभुराजांना येऊन मिळणारे एकोजीराजांचे
सैन्यदेखील अजून पोहोचले नव्हते. परिणामी मराठी सैन्य एकटे पडले आणि
शंभूराजांनी माघार घेत त्रिचनापल्ली गाठली पण चिक्कदेवरायाचे सैन्य तेथेही
आले. अशातच एकोजीराजांचे सैन्य शंभुराजांना मिळाले आणि मग या एकत्रीत
फौजांनी चिक्कदेवरायाच्या फौजेचा धुव्वा उडविला आणि खुद्द चिक्कदेवरायलाच
कैद केले. कैदेत असलेल्या चिक्कदेवरायाला पुढे मग खंडणीच्या बदल्यात सोडून
देण्यात आले.
7 ) श्रीरंगपट्टणमची लढाई
दुसरी
लढाई जी आपण पाहणार आहोत ती सुद्धा चिक्कदेवराया विरुद्धच आहे.
चिक्कदेवरायाविरुद्ध झालेल्या पहिल्या लढाईत खंडणी घेऊन त्याला सोडून
देण्यात आले होते परंतु, शंभुराजांना इथेच थांबायचे नव्हते. कर्नाटक
मोहिमेवर असतांनाच शंभूराजांनी कर्नाटकातील स्थानिक नाईकांची साथ मिळविली
आणि चिक्कदेवरायाविरुद्ध मदतीचे आश्वासन घेतले. अखेर शंभूराजांनी हल्ला
करायचे ठरविले आणि श्रीरंगपट्टणम येथे हल्ला केला. हि श्रीरंगपट्टणमची
मोहीम राजांच्या कर्नाटक मोहिमेतील दुसरी सर्वांत मोठी आणि महत्वाची लढाई
गणली जाते.
हि
श्रीरंगपट्टणम ची लढाई साधारण महिनाभर सुरु असेल आणि एवढ्यातच
चिक्कदेवरायाला हि लढाई लढणे जड जाऊ लागले. लढाई म्हटली कि आगाऊ रसद,
शस्त्रसाठा आणि अशा अनेक गोष्टी आल्याच आणि त्यासोबतच अमाप खर्च देखील
आलाच. म्हणूनच हा खर्च भरून काढण्यासाठी चिक्कदेवरायाने चक्क त्याच्या
जनतेवर लढाईचा अतिरिक्त कर बसविला. चिक्कदेवरायाच्या या करवाढीचा त्याच्याच
जनतेकडून जोरदार विरोध झाला आणि जनतेनेच चिक्कदेवरायांविरुद्ध उठाव करत
मराठी फौजांशी संधान बांधले आणि चिक्कदेवरायालाच घेरले. चिक्कदेवरायाने
मदतीसाठी त्याच्या मदुरेच्या किल्ल्यातील सैन्याला बोलाविले. या सर्व
युद्धप्रसंगातच शंभुराजांना खबर लागली कि औरंगझेबाने विजापूरची मोहीम
आटोपली आणी पुढे तो पन्हाळा गडाला वेढा देण्याच्या बेतात आहे. याच खबरीमुळे
शंभुराजांना हि चिक्कदेवरायाची मोहीम सोडून नाईलाजाने स्वराज्यात माघारी
यावे लागले.
No comments:
Post a Comment