विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 June 2023

शिवशाहीतील स्त्रिया - मातोश्री जयंतीबाई / जैताबाई

 


शिवशाहीतील स्त्रिया -
मातोश्री जयंतीबाई / जैताबाई
शिवछत्रपतींचे थोरले बंधु, ज्यांच्या म्हणजे आपल्या वडील बंधुंच्या नावावरूनच महाराजांनी आपल्या पुत्राचं नाव संभाजी ठेवलं होत... ते थोरले संभाजी महाराज म्हणजे राजमाता जिजाई शहाजी राजांचे जेष्ठ पुत्र ...शहाजी राजे आणि जिजाईना एकूण सहा अपत्ये झाली , त्या पैकी चार जण अल्पजीवी ठरले त्यामुळे इतिहासात त्यांच्या बद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही.
संभाजी महाराजांच्या पत्नी , शहाजी राजे आणि जिजाउंच्या जेष्ठ स्नुषा आणि महाराजांच्या भावजय म्हणजेच जयंतीबाई .
जुन्नरचे विश्वासराव हे तालेवार घराणे होते , शिवनेरीचे किल्लेदार विजयराव विश्वासराव यांच्या कन्येचं स्थळ शहाजीराजांना आपल्या मुला करता योग्य वाटलं.... आणि मग लग्न अगदी सुरवातीच्या मुहूर्ताला म्हणजे चातुर्मासानंतर मार्गशीष महिन्यात [इ.स.१६२९ नोव्हेंबर]झाले...हे लग्न शिवजन्मा पुर्वी म्हणजे जेंव्हा शिवबा आईच्या पोटात होते त्या वेळेस झाले ...लग्न वेळेस संभाजी महाराज बारा वर्षांचे आणि जयंतीबाई ८-९ वर्षांच्या असाव्यात ... हा विवाह मोठ्या थाटात पार पडला.... शहाजीराजांचे बंधु शरीफजींच्या पत्नी दुर्गाबाई आणि जयंतीबाई दोघीही जुन्नरच्या विश्वासराव कुटुंबातुन भोसले परिवारात आल्या होत्या ...दुर्गाबाई आणि जयंतीबाईचे आत्या भाचीचे नाते , लग्ना नंतर एका अर्थाने सासु सुनेत बदलले...पण दुर्दैवाने त्या वेळेस दुर्गाबाईंच्या पतीचे म्हणजे शरीफजींचे निधन झालेले होते .
युवराज संभाजी वडीलां इतकेच कर्तृत्ववान आणि आदिलशाही मनसबदार होते, शहाजीराजां बरॊबर अगदी लहान वयात ते कर्नाटकात गेले होते आणि मग उर्वरित आयुष्य ते दक्षिणेतच होते . कर्नाटकात थोरले संभाजी राजे आणि शहाजीराजांचे वास्तव्य हे एखाद्या स्वतंत्र राजासारखे होते, जयंतीबाई पण विवाहानंतर संभाजी राजां बरोबर कर्नाटकात गेल्या.
भोसले घराणे श्रध्दाळू आणि शंकराचे भक्त , जयंतीबाई पण श्रध्दाळू होत्या , उभयतांना उमाजी नावाचा कर्तृत्ववान पुत्र झाला....
एका अर्थाने भोगत असलेलं ऐश्वर्य , सुख त्या नियतीला पहावल नसाव आणि १६५४ -५५ ला पराक्रमी संभाजी राजांचा कनकगिरीला अफजलखानानेने केलेल्या दगाफ़टक्याने अकाली मृत्यु झाला,...महाराजांनी पुढे जाऊन अफजलखानाचा कोथळा काढुन जेष्ठ बंधुच्या मृत्युचा बदला घेतला पण त्या क्षणाला जयंतीबाईंच्या नशिबी अकाली वैधव्य आलं ...तिथुन पुढची ३० -३५ वर्षे त्या हयात होत्या ... उर्वरित काळ कर्नाटक आणि रायगडावर व्यतीत केला , मुळात श्रध्दाळू स्वभाव असल्या मुळे अनेक देवस्थानांना दान दक्षिणा दिल्या ...मातोश्री जिजाईनी जेष्ठ सुनेला रायगडावर सन्मानाने ठेवलं ..
ही अशी राजघराण्यातील कन्या काळाच्या उदरात कधी गडप झाली कळलेच नाही , त्यांच्या अस्तित्वाची त्या वेळच्या बखरकारांनी फारशी दखलही घेतली नाही ...
बिपीन कुलकर्णी
संदर्भ - मराठी रियासत खंड १
मालोजी राजे आणि शहाजी महाराज ( वा सी बेंद्रे )
शिवछत्रपती एक मागोवा - डॉ जयसिंगराव पवार

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...