विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 June 2023

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर (जन्म: १८ मार्च १८६७)

 

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर (जन्म: १८ मार्च १८६७)




.
धुरंधर, महादेव विश्वनाथ
चित्रकार व कलाशिक्षक
जन्मदिनांक : १ जानेवारी १८६७
मृत्युदिनांक : १ जून १९४४
कार्यक्षेत्र : दृश्यकला
जन्मस्थळ : मुंबई
.
राजा रविवर्मा यांच्यानंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या वास्तववादी कलाशैलीत तत्कालीन समाजजीवन व्यक्त करणारी चित्रे, तसेच पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित चित्रांद्वारे लोकप्रिय झालेले यशस्वी चित्रकार म्हणून धुरंधर यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांची विविध विषयांवरील चित्रे ओलिओग्रफ, पुस्तके, दिनदर्शिका एवढेच नव्हे, तर जाहिरातींसाठी छापल्या गेलेल्या पोस्टर्सद्वारे देशभर पोहोचली व त्यांच्या या कर्तृत्वाला जनमान्यतेसोबतच इंग्रज सरकारने दिलेल्या ‘रावबहादूर’ या पदवीमुळे राजमान्यताही मिळाली.
महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म मुंबईस, आजोळी झाला. त्यांच्या आई नर्मदाबाई व वडील विश्वनाथ कृष्णनाथ ऊर्फ भाईसाहेब धुरंधर हे कोल्हापुरात आदरणीय व्यक्ती म्हणून गणले जात. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्या काळात रविवर्मा यांच्या घरोघरी लागलेल्या चित्रांची मोहिनी त्यांच्यावर पडली.
शालेय जीवनात त्यांची चित्रकलेची आवड वाढू लागली. त्यांना वेळोवेळी प्रदर्शनांत बक्षिसेही मिळाली. याच काळात कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहिमान यांच्या प्रेरणेने त्यांना जलरंगाची आवड निर्माण झाली. आबालाल यांच्या निसर्गचित्रांचे प्रात्यक्षिकही पाहण्यास मिळाले. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी ते मुंबईला गेले असताना त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही कलाशाळा पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रेरित होऊन त्यांनी १८९० ते १८९६ या काळात तेथे कलाशिक्षण घेतले. १८९५ मध्ये त्यांचा विवाह बापूबाई यांच्याशी झाला. परंतु १८९७ मध्ये बापूबाईंचे निधन झाल्यावर १८९९ मध्ये धुरंधरांनी गंगूबाई यांच्याशी पुनर्विवाह केला.
हे शिक्षण सुरू असतानाच १८९३ मध्ये त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. अपार मेहनत व जिद्द ठेवून प्रत्येक परीक्षेत प्रथम क्रमांक व शिष्यवृत्तीही मिळवणाऱ्या धुरंधरांनी त्यांच्या बंधूंवर आपल्या शिक्षणाचा आर्थिक भार पडू दिला नाही. शिक्षणाच्या काळात त्यांना ‘वॉडिग्टन’ पुरस्कार (१८९१), ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ (१८९२), ‘मेयो’ पदक (१८९४) अशी पारितोषिके मिळाली. जे.जे.चे प्रिन्सिपल ग्रिफिथ्स यांनी १८९५ मध्ये धुरंधरांकडून विविध प्रकारच्या भांड्यांची सुमारे शंभर चित्रे काढून घेतली. ही सर्व चित्रे लंडनमध्ये, सरकारतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘इंडियन आर्ट जर्नल’मध्ये छापली गेली.
आर्ट स्कूलमध्ये उत्तम गुण मिळवून शिक्षण पूर्ण केल्यामुळे धुरंधरांची नेमणूक १८९६ मध्ये कलाशिक्षक म्हणून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये झाली. आपल्या कर्तव्यतत्परतेमुळे ते हेडमास्टर (विभागप्रमुख) झाले. त्यानंतर १९३० मध्ये प्रि.सॉलोमन यांच्या रजेच्या वेळी वर्षभर डायरेक्टर ऑफ आर्ट या पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर त्यांची नेमणूक इन्स्पेक्टर ऑफ ड्रॉइंग या पदावर करण्यात आली व १९३१ डिसेंबर अखेर ते निवृत्त झाले.
जे.जे.मधील शिस्तबद्ध अभ्यासक्रमामुळे पाश्चात्त्य पद्धतीच्या अकॅडमिक म्हणजेच वास्तववादी शैलीत धुरंधरांनी प्रावीण्य मिळविले. रेखाटन, व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रण या तीनही विषयांत ते दर्जेदार चित्रे काढत. यांच्याप्रमाणेच धुरंधरांनीही ऐतिहासिक व पौराणिक विषयांवर वास्तववादी व मानवाकृतिप्रधान चित्रे रंगविली.
त्यांच्या ‘म्युझिक लेसन’ या चित्राला १८९४ मधील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रोख रकमेचे पारितोषिक लाभले. विशेष म्हणजे चित्रकार राजा रविवर्मा यांना हे चित्र आवडून त्यांनी ते विकत घेतले. धुरंधरांच्या ‘गौरबाई तू आलीस’ या चित्राला १८९५ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात सुवर्णपदक लाभल्यामुळे ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. कारण प्रथमच एका भारतीय चित्रकाराला बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात सुवर्णपदक लाभले होते. धुरंधरांनी आपल्या कारकिर्दीत एकूण पाच सुवर्णपदके मिळवली. त्यांना १९०४ मध्ये मुंबईस भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनाच्या वेळी दुसरे सुवर्णपदक मिळाले. पंढरपूर येथे १९०७ मध्ये भरलेल्या फाइन आर्ट इंडस्ट्रिअल एक्झिबिशनमध्ये धुरंधरांच्या ‘नैवेद्य’ या चित्राला तिसरे सुवर्णपदक मिळाले. त्यांना १९१० मध्ये जळगावच्या औद्योगिक प्रदर्शनात ‘वऱ्हाडणी’ या चित्रासाठी चौथे सुवर्णपदक मिळाले. या चित्रात पाठारे प्रभूंच्या विवाहप्रसंगी नववधू व कुटुंबातील इतर स्त्रियांची लगबग दाखविली आहे. हे चित्र सांगलीच्या संग्रहालयात आहे. ग्वाल्हेर येथे १९१२ मध्ये भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात ‘होमेज टू देअर मॅजेस्टीज किंग अँड क्वीन’ या चित्रासाठी धुरंधरांना पाचवे सुवर्णपदक मिळाले. यांत ब्रिटिश सम्राट व सम्राज्ञी यांच्या भारतभेटीच्या प्रसंगी भारताच्या विविध प्रांतांतील स्त्री-पुरुष त्यांना नजराणे देताना दाखविले होते. याखेरीज १९२३ मध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या लंडनच्या वेम्बले येथील प्रदर्शनातील उत्कृष्ट जलरंगासाठी पारितोषिक मिळालेले त्यांचे ‘ग्लोरी ऑफ पंढरपूर’ हे चित्र गाजले. या चित्राची प्रशंसा ‘द ब्रिटिश एम्पायर रिव्ह्यू’ या वृत्तपत्रात आली होती.
धुरंधरांनी व्यक्तिचित्रांसोबतच भारतीय सण, उत्सव, परंपरा या विषयांवरही चित्रे रंगविली. उच्च मध्यमवर्गीयांच्या चालीरीती, विशेषत: त्यांच्या स्वत:च्या पाठारे प्रभू ज्ञातीतील रीतिरिवाज त्यांनी या चित्रांतून दाखविले. या सर्वांत तत्कालीन समाजजीवनाचे पुरेपूर प्रतिबिंब असल्याने इतिहासाच्या व सामाजिक जीवनाच्या अभ्यासकांच्या दृष्टीनेही या चित्रांचे महत्त्व आहे.
त्यांच्या चित्रांत नऊवारी साडी चोळी ल्यालेल्या, सुंदर केशरचना केलेल्या, दागदागिने परिधान केलेल्या प्रतिष्ठित घरांतील स्त्रिया अथवा राजस्त्रियाही दिसतात. कथेनुरूप वनश्रीने नटलेली पार्श्वभूमी अथवा भव्य प्रासाद अशा पार्श्वभूमीचा ते वापर करीत. लग्नप्रसंग रंगविताना वेगवेगळ्या तऱ्हेची उंची वस्त्रे परिधान केलेल्या स्त्रिया व रुबाबदार पेहरावाचे पुरुष ते रंगवत. यांत वस्त्रांच्या सुंदर चुण्या, तलम पोत, तजेलदार रंगसंगती व जलरंगाची सुंदर हाताळणी यांमुळे ही चित्रे लोकप्रिय ठरली.
धुरंधरांची रेखाचित्रे :
धुरंधरांनी विद्यार्थिदशेपासूनच नियमित रेखाटनाची सवय लावून घेतली होती. ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. लहानमोठ्या आकाराची त्यांची जवळजवळ ८० ते ८५ स्केचबुक्स त्यांच्या कन्या अंबिका धुरंधरांनी जपून ठेवली होती. त्यांच्या रेखाटनांत मुंबई व देशभरातील अठरापगड जातीचे लोक, त्यांच्या वेशभूषा, रस्त्यावरील तऱ्हेतऱ्हेची वाहने, स्थळवैशिष्ट्ये या सर्वांची रेखाटने आढळतात. या स्केचबुक्समधील पाने सुट्या स्वरूपात अनेक संग्रहालये व कलारसिकांच्या संग्रहांत आहेत.
त्यांचीही स्केचबुक्स वेगवेगळ्या आकारांची असत. प्रवासात ते ३’’द ६’’ किंवा ४’’द ६’’ आकारांची, खिशात राहतील अशी स्केचबुक्स वापरत. या सोबतच त्यांनी १०’’द १२’’ किंवा १२’’द १५’’ या आकाराची स्केचबुक्सही वापरली. अशा सर्वच स्केचबुकांमधील चित्रांखाली ते सहीच्या सोबत तारीख, स्थळ व शीर्षकही सुंदर अक्षरांत नोंदवीत असत. अशा प्रकारचे रेखाटन करताना ते पेन्सिल किंवा शाईने रेखाटन करून त्यातील काही भागांत जलरंगाचा वापर करून त्याचे सौंदर्य वाढवीत. अशी त्यांची विविध प्रांतांतील स्त्रियांची रेखाटने निवडून ‘विमेन ऑफ इंडिया’ हा अल्बम (चित्रसंग्रह) प्रसिद्ध झाला. ऑटो रॉथफिल्ड या अलिबागच्या कलाप्रेमी इंग्रज जिल्हाधिकाऱ्याने यासाठी लेखन व संपादन केले होते. हा चित्रसंग्रह कमालीचा गाजला.
अशाच प्रकारचा अप्रकाशित राहिलेला त्यांचा महत्त्वाचा चित्रसंग्रह म्हणजे ‘माय वाइफ इन आर्ट’ हा होय. यात त्यांनी आपली दिवंगत प्रथम पत्नी बापूबाई व द्वितीय पत्नी गंगूबाई यांची विविध आविर्भावातील अनेक रेखाटने केलेली असून तो या दोघींना प्रेमपूर्वक अर्पण केला आहे. या चित्रसंग्रहाच्या सुरुवातीलाच धुरंधरांनी अतिशय हृद्य अशी अर्पणपत्रिकाही स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिली होती. हा संपूर्ण संग्रहच धुरंधरांचा आपल्या दोन्ही पत्नींबद्दल जिव्हाळा व प्रेमभावना व्यक्त करणारा आहे. विशेषत: त्यांतील प्रथम पत्नीच्या निधनानंतर केलेले मृतदेहाचे चित्र व खाली लिहिलेले ‘बापू इज डेड’ हे शीर्षक अनुभवताना प्रेक्षक हेलावून जातो. आचार्य अत्रे यांनी या चित्रसंग्रहाचा गौरव ‘भावकाव्य’ म्हणून केला होता. धुरंधरांच्या काळात भारतात फाइन आर्ट व कमर्शिअल आर्ट असा भेद नव्हता. या दोन विभागांचे स्वतंत्र शिक्षणही १९३६ नंतर देण्यात येऊ लागले व जाहिरातकला त्यानंतरच्या काळात स्वतंत्र शाखा म्हणून विकसित झाली. परंतु धुरंधर यांनी या कलाशाखेच्या विविध अंगांसाठी भरपूर काम केले. त्या काळात जाहिरात कलेसाठी त्यांच्याएवढे काम केलेला कलावंत क्वचितच आढळून येतो.
पुस्तक सजावटीचे काम :
धुरंधरांनी त्या काळात पुस्तक सजावटीसाठी भरपूर काम केले. त्यांनी इतिहासतज्ज्ञ व साताऱ्याचे जिल्हाधिकारी सी.ए. किंकेड यांच्या ‘टेल्स ऑफ विक्रमादित्य’ व ‘डेक्कन नर्सरी टेल्स’ या पुस्तकांची इलस्ट्रेशन्स केली. मुंबईचे पोलीस आयुक्त एस.एम. एडवर्ड यांचे ‘बाय द वेज ऑफ बॉम्बे’, जॉर्ज फ्रान्सिस एनॉक यांचे ‘डिझायर ऑफ ऑल नेशन्स’ (बायबल), पी.सी. स्ट्रीप यांचे ‘पीपल्स ऑफ बॉम्बे’, ऑलिव्हिया स्ट्रीप यांचे ‘कॉल ऑफ ब्लड’ आणि फ्रिटझेराल्ड यांनी इंग्रजीत भाषांतरित केलेले ‘उमरखय्याम’ ही पुस्तके धुरंधरांच्या चित्रांनी सजली होती.
१९०१ ते १९१४ या काळात श्रीमान शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी यांच्या ‘सुवर्णमाला’ या मासिकासाठी ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भागवत’, ‘भगवद्गीता’, ‘गणेश पुराण’, ‘शिव पुराण’, ‘विष्णू पुराण’ व जयदेवाचे ‘गीतगोविंद’ या विषयांवर त्यांनी इलस्ट्रेशन्स केली. यांत संबंधित विषयाची कथा व त्या सोबतच धुरंधरांचे एक रंगीत व सात-आठ कृष्णधवल चित्रे असत. विशेष म्हणजे हे मासिक अगदी छोट्या पॉकेटबुकपासून ते मोठ्या पुस्तकाच्या आकारापर्यंत काढले जाई. त्यामुळे ते सर्वसामान्यांपासून श्रीमंत कुटुंबांपर्यंत समाजाच्या सर्वच स्तरांत पोहोचत असे. धुरंधरांचे कौशल्य असे, की अगदी छोट्या आकाराच्या चित्रांतूनही ते चित्रविषय अत्यंत चांगल्या प्रकारे खुलवत.
श्रीमान शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी यांच्या ‘शिवछत्रपती चरित्र’ व ‘मेन अॅण्ड विमेन इन इंडियन हिस्टरी’ या प्रेरणादायक पुस्तकांची कृष्णधवल चित्रे धुरंधरांचीच होती. सध्या यांतील काही चित्रे सांगलीच्या चित्रसंग्रहात पाहावयास मिळतात. अशीच चित्रे त्यांनी हाजी मुहंमद शिवजी अल्लारखिया यांच्या ‘वीसमी सदी’ या गुजराती मासिकासाठी, तसेच चापसी उदेसी यांच्या ‘नवचेतन’ व मराठी ‘नवयुग’साठी काढली. विजय प्रेसतर्फे प्रकाशित झालेले ‘गीतगोविंद’ हे जयदेवाचे काव्य धुरंधरांच्या २४ चित्रांनी सजले होते. ‘शारदा’ या मासिकासाठीही त्यांनी ४ द ३ फूट आकाराची सहा चित्रे खास रंगवली होती. अ.का. प्रियोळकरांचे नल-दमयंती आख्यान औंधचे संस्थानिक बाळासाहेब पंत-प्रतिनिधींनी छापले. त्यातील रंगीत चित्रे धुरंधर यांनीच रंगविली होती. याशिवाय महाकवी कालीदासाच्या शाकुंतल, ऋतुसंहार, मेघदूत, पुरुरवा-उर्वशी या महाकाव्यांची तत्कालीन प्रकाशित पुस्तके धुरंधरांच्या चित्रांनी सजली होती. या सोबतच भास, भवभूती यांच्या नाटकांची व ‘रत्नावली’ या पुस्तकांतूनही धुरंधरांची चित्रे होती.
धुरंधरांनी अनेक हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती, तेलुगू, उर्दू मासिके व दिवाळी अंकांसाठी चित्रे काढली. लाँगमन्स ग्रीन अॅण्ड कंपनी व मॅकमिलन अॅण्ड कंपनीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रांतून धुरंधर घराघरांत पोहोचले होते.
धुरंधरांची कॅलेंडर्स व पोस्टर्स :
रविवर्मा यांच्या नंतरच्या काळात धुरंधर हेच सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले कलावंत होते. धुरंधरांची पौराणिक, ऐतिहासिक विषयांवरील चित्रे रविवर्मा प्रेस, चित्रशाळा प्रेस व रविउदय प्रेस अशा तत्कालीन प्रसिद्ध छापखान्यांनी छापली. यांत राम, लक्ष्मण, सीता, देवदेवता, विश्वामित्र-मेनकेसारख्या पौराणिक कथांसोबत महाराष्ट्रातील व भारतातील संतांची चित्रे होती. ब्रिटिश सम्राट सातवे एडवर्ड व क्वीन मेरी १९०७ मध्ये आणि पंचम जॉर्ज १९११ मध्ये भारतभेटीवर आले तेव्हा त्यांची धुरंधरांनी रंगविलेली अर्ध व पूर्णाकृती व्यक्तिचित्रे दिनदर्शिकांवर छापली गेली. जनतेने ती चित्रे फ्रेम करून घरांत, दुकानांत किंवा कार्यालयांत लावून राजनिष्ठा व्यक्त केली. गंमत म्हणजे धुरंधरांकडून तत्कालीन नेते व स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचीही चित्रे काढून घेतली गेली व विविध छापखान्यांत ती छापली जाऊन तीदेखील घरे, मंदिरे व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली.
धुरंधरांनी भारतातील रेल्वे कंपन्यांसाठी बनविलेल्या पोस्टर्समुळे धुरंधर हे नाव देशात सर्वत्र पोहोचले. रेल्वेच्या जाहिरातींसाठी त्यांनी रंगविलेल्या या चित्रांतून भारतातील प्रसिद्ध स्थळे, पवित्र तीर्थक्षेत्रे, तसेच शहरे यांचे महत्त्व व्यक्त केले होते व त्यातून पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट होते. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मंदिर, मशीद किंवा इतर वास्तूंसोबतच त्या भागातील पारंपरिक वेषभूषा परिधान केलेल्या स्त्री-पुरुष प्रतिमांचाही समावेश असे. याशिवाय सुबक अक्षरातील मजकूर हेदेखील त्यांचे वैशिष्ट्य होते. अशी एकूण चौदा जाहिरातचित्रे धुरंधरांनी रेल्वेसाठी रंगविली. शिवाय त्या काळातील ट्राम व बस कंपन्यांनीही धुरंधरांच्या चित्रकौशल्याचा त्यांची जाहिरात व नियम समजावून सांगण्यासाठी वापर केला.
मुंबई इलाख्याच्या शिक्षणखात्याने धुरंधरांकडून लोहार, सुतार, चांभार, पोस्टमन अशा विविध पेशांच्या मंडळींची त्यांच्या पोशाख व व्यावसायिक वैशिष्ट्यांसह चित्रे काढून घेतली होती व पोस्टकार्डाच्या आकारात छापून मुलांना दाखविण्यासाठी सर्व शाळांना वाटली होती.
धुरंधरांची व्यावसायिक चित्रे :
एखादा विषय खुलविणे व त्याचे वास्तववादी शैलीत, नाट्यमय चित्र काढणे हे धुरंधरांचे वैशिष्ट्य होते. प्रमाणबद्ध मानवाकृती व छाया-प्रकाशाचा नाट्यपूर्ण वापर यामुळे त्यांचे चित्र सर्वसामान्य जनमानसाला आकर्षित करत असे. या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्याकडून अनेक संस्थानिकांनी विविध विषयांवरील चित्रे रंगवून घेतली. यात त्या संस्थानिकांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग (उदा. राज्याभिषेक, मिरवणूक इ.) किंवा त्यांच्या राजवाड्याच्या सजावटीसाठी त्यांना आवडणाऱ्या विषयांवरील चित्रे असत. त्यांनी १९३४ मध्ये छोटा उदयपूर-गुजरातच्या संस्थानिकांसाठी पौराणिक विषयांवरील सोळा भित्तिचित्रे रंगविली होती. धुरंधरांना १९३६ मध्ये बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या हीरक महोत्सवी समारंभाचे चित्र काढण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पॅरिस येथील बडोदा पॅलेससाठी व बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेससाठी धुरंधरांनी ४ x ७ फूट आकाराची दोन चित्रे रंगविली. अशा संस्थानिकांपैकी औंधचे महाराज भवानराव पंतप्रतिनिधी यांच्याकडून त्यांना विशेष आदर व प्रेम मिळाले. औंधच्या महाराजांनी धुरंधरांकडून व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे यांसोबत भगवद्गीता, नल-दमयंती आख्यान व शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अशी अनेक चित्रे रंगवून घेतली.
दिल्लीच्या इंपीरिअल सेक्रेटरिएटमधील लॉ मेंबर्स रूममधील चार चित्रे रंगविण्यासाठी भारतातील सहा चित्रकारांची निवड करण्यात आली. त्यांत धुरंधरांचा समावेश होता. ही चित्रे १९२८-२९ मध्ये तयार झाली. ‘स्त्रीधनम्’, ‘दत्तकविधान’, ‘मृत्युसमयाचे दान’ व ‘कोर्टाचा देखावा’ हे ते चार विषय होते.
धुरंधरांची स्वत:ची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण शैली होती व त्यांची ही शैली रेखाटनप्रधान असल्यामुळे ते तैलरंगापेक्षा जलरंगात अधिक सहजतेने व प्रभुत्वाने काम करीत. परंतु त्यांच्या या सर्वच चित्रांत स्त्री असो की पुरुष, मानवाकृतींची प्रमाणबद्धता सांभाळत ती मानवाकृती आकर्षक करण्याकडे त्यांचा कल असे. त्यामुळे त्यांच्या चित्रांत लयपूर्ण मानवाकृतींची लयलूट दिसून येते व स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचे आविर्भावही काही प्रसंगी नाजूक व लडिवाळ होतात. चित्रविषय प्रभावीपणे सांगण्याच्या अट्टहासात फक्त मानवी शरीर व त्याच्या दृश्य आविर्भावाचाच विचार केल्यामुळे त्यांच्या अशा चित्रांतून चित्रविषय प्रभावीरीत्या समजत असला व ते चित्र आकर्षक वाटले तरी एखाद्या थोर कलाकृतीप्रमाणे त्यांच्या चित्रांचा मनावर चिरस्थायी गंभीर परिणाम होत नाही. कदाचित त्यांनी प्रकाशन व्यवसायासाठी व जाहिरात जगतासाठी केलेल्या कामाचा तो अप्रत्यक्ष परिणाम असावा. धुरंधरांचे समकालीन कलावंत त्रिंदाद व तासकर यांच्या चित्रांमधून मिळणारा आनंद व कलामूल्यांचा शोध धुरंधरांच्या चित्रात क्वचितच आढळतो. परंतु सातत्याने केलेले रेखाटन, अफाट चित्रनिर्मिती कलाशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना केलेले उत्कृष्ट मार्गदर्शन व वरिष्ठांना आपल्या कामामुळे मिळवून दिलेले पूर्ण समाधान हे धुरंधरांचे वैशिष्ट्य होते.
त्यामुळेच जे.जे.मधील एक शिक्षक म्हणून १८९६ मध्ये सुरुवात केलेल्या धुरंधरांची सॉलोमन यांच्या अनुपस्थितीत जे.जे. स्कूलचे हंगामी संचालक म्हणून नेमणूक झाली. निवृत्तीनंतरही त्यांना सहा वेळा मुदतवाढ देऊन त्यांची इन्स्पेक्टर ऑफ ड्रॉइंग या मानाच्या जागेवर नेमणूक झाली. अशा प्रकारे नेमणुका होणारे व रावबहादूर ही पदवी मिळवणारे ते पहिलेच भारतीय चित्रकार ठरले. धुरंधर १९३१ मध्ये जे.जे.मधून निवृत्त झाले.
निवृत्तीनंतरही ते नियमितपणे आपल्या खार येथील बंगल्यात चित्रनिर्मितीचे काम करीत राहिले. त्यांनी १९३७ मध्ये चित्रकार कन्या अंबिका व कुटुंबासह युरोपचा प्रवास करून पाश्चात्त्य देशातील प्रसिद्ध कलाकारांच्या उत्तमोत्तम कलाकृती पाहिल्या. तेथून परतल्यानंतर चित्रनिर्मितीबरोबरच त्यांनी सर जे.जे. स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यापासून निवृत्तीपर्यंतच्या तेथील घडामोडींच्या आठवणी लिहून काढल्या. हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक १९४० मध्ये ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या नावाने प्रकाशित झाले. या काळातील बॉम्बे स्कूलच्या इतिहासाच्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तत्पूर्वी १९३० ते १९३५ या काळात धुरंधरांनी त्यांच्या समकालीन अशा अनेक चित्रकारांवर ‘वसुंधरा’, ‘चित्रा’ अशा नियतकालिकांतून लेखमाला लिहून जनसामान्यांस त्यांच्या कलेचा परिचय करून दिला होता. आज त्यांचे हे लेखन दस्तऐवजीकरण व नोंद या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यांच्या अनेक शिष्यांनी भारतभर काढलेल्या कलाशाळांच्या रूपाने त्यांचे कलाशिक्षणदानाचे व्रत जिवंत ठेवले आहे. धुरंधरांच्या कार्याबद्दल अनेक लेख लिहिले गेले. त्यांतील १९३६ व १९४४ मध्ये कोल्हापूरच्या माधवराव बागलांनी लिहिलेले अनुक्रमे ‘मनोहर’ व ‘प्रभूतरुण’ या दिवाळी अंकांतील लेख उल्लेखनीय आहेत. यात धुरंधरांबद्दल ते लिहितात, ‘अंगात काळ्या अल्पाकचा लांबडा कोट, त्याहून काळे व नुकतेच पॉलिश केलेले पायांतील बूट, त्या बूट-कोटाला विरोध दर्शविणारी भट्टीची शुभ्र पाटलूण... कोटावर ताठ्यात बसविलेली कडक इस्त्रीची चकचकीत कॉलर व त्यावर जुन्या संस्कृतीचे द्योतक असणारी तांबडी रेशमी पगडी... स्थूल देह, वाटोळा चेहरा, भव्य कपाळ, जाड भरदार मिशा व या गोष्टींचे गांभीर्य वाढविणारा सोनेरी काड्यांचा चष्मा असलेले आणि आपल्या कलेच्या आणि स्वभावसौजन्याच्या गुणावर मान्यतेला चढलेले, अधिकार, पदवी व संपत्ती संपादन केलेले हे महाराष्ट्राचे पहिलेच चित्रकार होत. प्रतिभा, विद्वत्ता व कल्पकता अशा सर्व गुणांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर!’
अत्यंत धार्मिक वृत्तीच्या धुरंधरांची वास्तववादी शैलीवर नितांत श्रद्धा होती. परिणामी, त्यांच्या तरुणपणी विकसित झालेली बंगाल-रिव्हायव्हलिस्ट व १९२० च्या सुमारास मुंबईत विकसित झालेली बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट ही भारतीयत्व जपणारी कला चळवळ त्यांना आकर्षित करू शकली नाही. १९३५ नंतर मुंबईत व भारतात सुरू झालेली आधुनिक कला चळवळीत त्यांना स्वारस्य नव्हते. अशा कलाचळवळींचा ना त्यांनी निषेेध केला, ना पुरस्कार. किंबहुना, अशा वादग्रस्त विषयांबाबत ते कायमच तटस्थ राहिले. रविवर्मांनंतरचे एक लोकप्रिय चित्रकार व त्या काळात अभिजात चित्रकलेचा वापर पुस्तक सजावट व जाहिरातकलेसाठी करणारे कलावंत म्हणून धुरंधर यांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
लेखक- डॉ. नलिनी भागवत, सुहास बहुळकर
(संदर्भ-महाराष्ट्रनायक)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...