विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 June 2023

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग १९ राजा सर्वसेन

 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग १९

राजा सर्वसेन
आत्तापर्यंत आपण वाकाटकांची ज्येष्ठ वा नंदिवर्धन ही शाखा बघितली, आता वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेतील काही महत्त्वाचे राजे पुढील भागात पाहू.
वत्सगूल्म शाखेची माहिती इतिहासाला तब्बल एकोणिसाव्या शतकापर्यंत नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठ्याच्या सोळा नंबरच्या लेण्यांमध्ये आहेत मात्र तो लेख अत्यंत खराब झाल्याने ती नावे बरोबर वाचता येत नव्हती. इ.स. १९३९ मध्ये वाशिम येथे ताम्रपट सापडला आणि या सर्व राजांची नावे वाचता आली. सोबतच या ताम्रपटावरून विंद्याध्री पर्वताच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी महत्त्वाची शाखा राज्य करत होती हे देखील सिद्ध झाले.
या शाखेचा संस्थापक हा प्रथम प्रवरसेनाचा पुत्र सर्वसेन हा होता. याचे नाव अजिंठ्याच्या लेखात आणि वाशिम ताम्रपटात सुद्धा आले आहे. हा प्रवरसेनाचा धाकटा पुत्र असावा. त्याचा अंमल हा उत्तरेतील विंध्याद्री पासून, दक्षिणेत गोदावरी पर्यंत पसरलेला होता. या प्रदेशावर आपले स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी त्याला सोम नामक ब्राह्मणाचा पुत्र असणाऱ्या रवी या सचिवाने मदत केली होती. या रवीचे वंशज नंतर वत्सगूल्मच्या वाकाटकांचे कित्येक पिढ्यांपर्यंत मुख्य प्रधान झाले व त्यांची त्यांनी एकनिष्ठपणे सेवा केली.
सर्वसेनाने आपल्या राजधानीसाठी वत्सगूल्म या प्राचीन पुण्यक्षेत्राची निवड केली. हे वत्सगुल्म म्हणजे आत्ताचे वाशिम होय. ‘ वत्सगुल्ममाहात्म्या’त म्हटले आहे की वत्स नामक ऋषींनी आपल्या आश्रमाजवळ देवांच्या गुल्मांची ( समुहांची) वस्ती करवली होती म्हणून त्याला वत्सगुल्म हे नाव पडले. वाकाटकांच्या राजवटीमध्ये वत्सगुल्म राजधानीची विद्या व संस्कृती यांचे प्रमुख केंद्र म्हणून मोठी ख्याती झाली सोबतच तेथील उत्कृष्ट प्राकृत काव्यामुळे ' वच्छोमी ' रीती सर्वत्र मान्यता पावली.
सर्वसेनाने आपल्या वडिलांप्रमाणेच 'धर्ममहाराज ' ही पदवी धारण केलेली दिसते. त्याने ‘हरिविजय’ हे काव्य महाराष्ट्री प्राकृतात रचले होते. त्या काव्याची स्तुती संस्कृत कवी व अलंकारिक यांनी मुक्तकंठाने केलेली आहे. सर्वसेनाने सुमारे सन ३३० ते ३५५ अशी २५ वर्षे राज्य केले.
त्याच्या माघारी विंध्यसेन हा राजगादी वर आला. याने चढाईचे धोरण स्वीकारले असावे. कारण त्याने कुंतलेशाचा पराभव केला असा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे.
याच राजाने दिलेला वाशिम ताम्रपट हा वाकाटकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा पुरावा आहे. विंध्यसेनाने वाशिम ताम्रपट हा आपल्या कारकिर्दीच्या ३७ व्या वर्षी वत्सगुल्म राजधानी मधून दिला होता. या ताम्रपटात नंदिकोट जिल्ह्यातील एक गाव दान दिल्याचा निर्देश आहे. हे नंदिकोट म्हणजे हैद्राबाद संस्थानातील सध्याचे नांदेड होय.
या ताम्रपटातील लेखाच्या सुरुवातीचा भाग हा राजवंशप्रशस्तीपर असून तो संस्कृत मध्ये आहे तर दानविषयक भाग हा प्राकृत मध्ये आहे. या आधील काही ताम्रपट मात्र संपूर्ण प्राकृत भाषेमध्ये कोरले गेलेले दिसतात. यावरून वाकाटक राजदरबारात संस्कृत भाषा हळू हळू मान्यता पावू लागल्याचे दिसते.
विंध्यसेनाने आपल्या दोन्ही पूर्वजांप्रमाणे 'धर्ममहाराज ' ही पदवी धारण केली होती. विंध्यसेन हा नंदिवर्धनच्या प्रथम पृथ्वीषेणाचा समकालिन होता.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१)वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमान पूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...